02/01/2026
येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व्याख्यानमालेअंतर्गत ‘हास्ययोग' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानमालेचे समारोपाचे पुष्प नाशिक येथील प्रसिद्ध छातीरोग तज्ञ तथा हास्ययोगतज्ज्ञ डॉ. सुषमा दुग्गड यांनी अत्यंत प्रभावीपणे गुंफले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे होते. आपल्या व्याख्यानात डॉ. सुषमा दुग्गड यांनी हास्ययोगाचे शास्त्रीय महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, हास्य हे नैसर्गिक औषध असून ते कोणत्याही खर्चाविना शरीर व मनाला आरोग्यदायी लाभ देते. नियमित हास्ययोगामुळे तणाव कमी होतो, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, मन प्रसन्न राहते आणि नकारात्मक विचार दूर होतात. आजच्या धकाधकीच्या जीवनात हास्ययोग ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. डॉ. दुग्गड यांनी केवळ सैद्धांतिक माहिती न देता प्रत्यक्ष कृतीतून हास्ययोगाचे विविध प्रकार उपस्थितांना करून दाखवले. हास्य, श्वसन आणि सकारात्मक विचार यांचा संगम म्हणजेच हास्ययोग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कारण नसतानाही हसता आले पाहिजे, असे सांगत त्यांनी उपस्थितांना आनंदी जीवनाचा संदेश दिला. विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांनीही या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व्याख्यानमालेचे महत्त्व विशद केले. समाजप्रबोधन, आरोग्यजागर आणि मूल्यसंवर्धन या उद्देशाने ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात येते, असे त्यांनी नमूद केले. हास्ययोगामुळे व्यक्तिमत्त्व विकास साधता येतो तसेच शैक्षणिक व सामाजिक जीवन अधिक सकारात्मक होते, असे मत त्यांनी व्यक्त केले. डॉ. सुषमा दुग्गड यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थितांना हास्ययोगाचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी मंचावर उपप्राचार्य डॉ. रवींद्र ठाकरे, पर्यवेक्षक प्रा. कैलास चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्याख्यानमाला समन्वयक डॉ. स्वाती सोनवणे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. के. एस. पगारे यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. रामप्रसाद वाव्हळ यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#पुण्यश्लोकअहिल्यादेवीहोळकर #हास्ययोग
#हास्ययोगव्याख्यान #महात्मागांधीविद्यामंदिर
#कला_व_वाणिज्य_महाविद्यालय #आरोग्यजागर #मानसिकआरोग्य
#सकारात्मकजीवन #विद्यार्थीउपक्रम
#शैक्षणिकउपक्रम
#समाजप्रबोधन