30/09/2026
गणपती विसर्जनानंतर स्वच्छता व घनकचरा निर्मूलन जनजागृती कार्यक्रमाचा अहवाल
दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजी दाते कॉलेज, यवतमाळ येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने यवतमाळ शहरालगत असलेल्या वाघाडी परिसरामध्ये गणपती विसर्जनादरम्यान निर्माण झालेली घाण व घनकचरा निर्मूलनासाठी स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले.
गणपती विसर्जनानंतर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जमा झालेला प्लास्टिक, निर्माल्य, कागद, थर्माकोल व इतर घनकचरा यामुळे परिसराच्या स्वच्छतेवर तसेच पर्यावरणावर विपरीत परिणाम होत होता. ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी पुढाकार घेत परिसराची स्वच्छता केली.
हा स्वच्छता व घनकचरा निर्मूलन कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश सिंगरू यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रा. दत्तात्रय जोशी यांच्या नेतृत्वाखाली स्वयंसेवकांनी वाघाडी परिसरातील विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविली. स्वयंसेवकांनी जमा झालेला घनकचरा वेगवेगळा करून योग्य पद्धतीने संकलित केला. तसेच नागरिकांमध्ये स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकण्याबाबत जनजागृती करण्यात आली.
या उपक्रमामुळे परिसर स्वच्छ व सुंदर होण्यास मदत झाली. विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, सामाजिक बांधिलकी, श्रमप्रतिष्ठा आणि सामाजिक जबाबदारीची भावना विकसित झाली. गणपती विसर्जनानंतर सार्वजनिक ठिकाणी निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या या स्वच्छता अभियानामुळे वाघाडी परिसरातील घनकचरा व अस्वच्छता कमी होण्यास मदत झाली. सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांनी केलेले हे कार्य पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरले.
प्रा. दत्तात्रय जोशी कार्यक्रम अधिकारी
राष्ट्रीय सेवा योजना, दाते कॉलेज, यवतमाळ