Late Shivramji Hiwase College of Education Warud

Late Shivramji Hiwase College of Education Warud Welcome to Late Shivramji Hiwase College of Education. Education is the apprenticeship of life. Our

"स्वतःचे ध्येय ठरवा, अन्यथा दुसऱ्यांच्या ध्येयपूर्तीचे साधन बनाल" – प्रशिक्षक हिमांशू पझारेहिवसे अध्यापक महाविद्यालयात ​...
21/07/2026

"स्वतःचे ध्येय ठरवा, अन्यथा दुसऱ्यांच्या ध्येयपूर्तीचे साधन बनाल" – प्रशिक्षक हिमांशू पझारे
हिवसे अध्यापक महाविद्यालयात ​महिंद्रा प्राईड क्लासरूम आणि नांदी फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने ७ दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न.


"युवकांनी आयुष्यात स्वतःचे ध्येय वेळेत निश्चित करणे अत्यंत गरजेचे आहे. जर तुम्ही स्वतःची उद्दिष्टे स्वतः ठरवली नाहीत, तर आयुष्यभर तुम्हाला दुसऱ्यांची ध्येये पूर्ण करण्यासाठी एक साधन म्हणून काम करावे लागेल," असे परखड मत प्रसिद्ध प्रशिक्षक हिमांशू पजारे यांनी व्यक्त केले. महिंद्रा प्राईड क्लासरूम आणि नांदी फाऊंडेशन (Naandi Foundation) यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय शिवरामजी हिवसे अध्यापक महाविद्यालय वरुड येथे आयोजित करण्यात आलेल्या सात दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिराच्या प्रसंगी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
​स्थानिक महाविद्यालयात आयोजित या शिबिराचे उद्घाटन आणि नियोजन महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. प्राची ठाकरे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. किशोर तडस उपस्थित होते. आजच्या स्पर्धेच्या युगात केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून, विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्ये असणे काळाची गरज बनली आहे. हाच उद्देश डोळ्यांसमोर ठेवून बीएड द्वितीय वर्षाच्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी या सात दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
​या सात दिवसांच्या प्रदीर्घ आणि अभ्यासपूर्ण शिबिरात प्रशिक्षक हिमांशू पझारे यांनी विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख आणि व्यक्तिमत्त्व विकासाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या पैलूंवर सखोल मार्गदर्शन केले. यामध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी 'सेल्फ अवेअरनेस' आणि 'डिजिटल आयडेंटिटी'चे महत्त्व पटवून देण्यात आले. तसेच, व्यावसायिक जगतात प्रभाव पाडण्यासाठी 'बॉडी लँग्वेज', 'प्रोफेशनल ग्रुमिंग', 'आर्ट ऑफ स्पीकिंग' आणि 'प्रोफेशनल कम्युनिकेशन' यांसारख्या कौशल्यांचे व्यावहारिक धडे देण्यात आले.
​याशिवाय, प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात काम करताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी 'प्रॉब्लेम सॉल्व्हिंग', 'क्रिटिकल थिंकिंग', 'कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट', 'टाईम मॅनेजमेंट' आणि 'वर्कप्लेस एथिक्स' या विषयांवरही विस्तृत चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि त्यांना भविष्यातील नोकरीच्या संधींसाठी (जॉब ऑपॉर्च्युनिटी) तयार करण्यासाठी शिबिरादरम्यान 'रिज्युम प्रिपरेशन' आणि प्रत्यक्ष 'इंटरव्यू प्रॅक्टिस' (मॉक मुलाखती) करून घेण्यात आल्या.
​प्रशिक्षण शिबिराच्या अंतिम दिवशी समारोप, अभिप्राय (फीडबॅक) व आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी या सात दिवसांत आलेल्या अनुभवांचे आणि शिकलेल्या गोष्टींचे मनोगत व्यक्त केले. या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्रा. भारती ठाकरे, प्रा. प्रियंका इंगोले, प्रा. सविता गलपट, प्रा. राजू गोलाईत, प्रा. आरती देशमुख आणि प्रा. चेतना पाटील यांच्यासह बीएड द्वितीय वर्षाच्या प्रशिक्षणार्थ्यांनी मोलाचे परिश्रम घेतले.नांदी फाउंडेशन व महिंद्रा प्राईड क्लास रूम चे स्टेट कॉर्डिनेटर अनुराग पाटणकर, ट्रेनिंग कॉर्डिनेटर डॉमिनिक फ्रँक यांच्या मार्गदर्शनात उपरोक्त कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
​कार्यक्रमाच्या शेवटच्या सत्राचे उत्कृष्ट व बहारदार सूत्रसंचालन प्रियंका जगदेवे यांनी केले, तर उपस्थितांचे औचित्यपूर्ण आभार रेणुका चव्हाण यांनी मानले. या शिबीरामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक नवीन ऊर्जा आणि आत्मविश्वास निर्माण झाला असून, भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मोठी मदत होईल असा विश्वास विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.

शिवरामजी हिवसे अध्यापक महाविद्यालय, वरुड येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न.----------------------वरुड (प्रतिनिध...
20/06/2026

शिवरामजी हिवसे अध्यापक महाविद्यालय, वरुड येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न.
----------------------
वरुड (प्रतिनिधी):
स्थानिक शिवरामजी हिवसे अध्यापक महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भव्य योग शिबिर व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत उत्साहात करण्यात आले. महाविद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. किशोर तडस हे लाभले होते. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शिका तथा योग प्रशिक्षिका म्हणून प्रा. चेतना पाटील उपस्थित होत्या. त्यांनी उपस्थित सर्व अध्यापक प्रशिक्षणार्थ्यांना (B.Ed. प्रशिक्षणार्थी) योगाची विविध आसने, प्राणायाम आणि ध्यानधारणा यांचे थेट प्रात्यक्षिकांसह धडे दिले. केवळ व्यायामापुरते मर्यादित न राहता शारीरिक आणि मानसिक संतुलनासाठी योग कसा आवश्यक आहे, याचे सुंदर विश्लेषण त्यांनी केले.
मार्गदर्शन करताना प्रा. चेतना पाटील म्हणाल्या की, "आजच्या धावपळीच्या आणि मानसिक तणावाच्या आधुनिक मानवी जीवनात योग ही निसर्गाची मानवाला मिळालेली मोठी देणगी आहे. नियमित योगसाधनेमुळे आंतरिक ऊर्जा वाढते आणि आरोग्य सुदृढ राहते." त्यांनी भावी शिक्षकांना आपल्या दैनंदिन जीवनात तसेच भविष्यात शालेय विद्यार्थ्यांमध्ये योगाची आवड निर्माण करण्याचे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य प्रा. किशोर तडस यांनी सर्व प्रशिक्षणार्थ्यांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ते पुढे म्हणाले की, "योग हा केवळ एका दिवसाचा उत्सव नसून ती जीवन जगण्याची एक समृद्ध पद्धती आहे. निरामय आणि निरोगी आयुष्यासाठी प्रत्येकाने योगाचा आपल्या दैनंदिन दिनचर्येत अंतर्भाव करणे गरजेचे आहे. शारीरिक क्षमतेसोबतच बौद्धिक व आत्मिक प्रगतीसाठी योग अत्यंत फायदेशीर ठरतो. या सामूहिक योग साधना कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्रा. भारती ठाकरे, प्रा. प्रियंका इंगोले, प्रा. राजू गोलाईत, प्रा. आरती देशमुख, शिक्षकेतर कर्मचारी आणि बहुसंख्येने उपस्थित असलेल्या अध्यापक प्रशिक्षणार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्धरीतीने योगासने केली. संपूर्ण परिसर 'करो योग, रहो निरोग' च्या घोषणेने आणि योगाच्या ऊर्जेने प्रफुल्लित झाला होता. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

वरूड येथील स्व. शिवरामजी हिवसे अध्यापक महाविद्यालयात 'संयुक्त जयंती महोत्सव व समतापर्व' उत्साहात संपन्नवरूड:स्थानिक स्वर...
16/04/2026

वरूड येथील स्व. शिवरामजी हिवसे अध्यापक महाविद्यालयात 'संयुक्त जयंती महोत्सव व समतापर्व' उत्साहात संपन्न
वरूड:
स्थानिक स्वर्गीय शिवरामजी हिवसे अध्यापक महाविद्यालय, वरूड येथे आज दि. १३ एप्रिल २०२६ रोजी क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 'संयुक्त जयंती महोत्सव व समतापर्व' अत्यंत उत्साहात आणि वैचारिक वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे स्वरूप आणि उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. किशोरजी तडस होते. प्रमुख वक्ते म्हणून प्रसिद्ध साहित्यिक, इतिहास अभ्यासक आणि प्रगल्भ वक्ते श्री. राहुलजी बरडे उपस्थित होते. महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला शिक्षक, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
'विचारांची मशाल पेटवूया, समतेचा जागर करूया!'
या मुख्य ब्रीदवाक्याला अनुसरून प्रमुख वक्ते श्री. राहुलजी बरडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. आपल्या व्याख्यानात त्यांनी नमूद केले की, "केवळ पुतळ्यांचे पूजन न करता या महापुरुषांचे विचार आचरणात आणणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल." डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून घेताना कुठल्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आणि कोणत्या गोष्टी प्रकर्षाने टाळायच्या याचे उदाहरणं दाखल दाखले त्यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना दिले. समतेच्या मूल्यांची आजच्या काळात असलेली गरज त्यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य किशोर तडस यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात समतेची मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सदैव भावी शिक्षकांसाठी प्रेरणादायी राहील त्यांचे आत्मचरित्र हेच खरे ऊर्जा आणि प्रेरणास्त्रोत आहे हे विसरता कामा नये असे मत व्यक्त केले . वैभव राऊत, प्रियंका जगदेवे,रोहन कास्देकर, स्नेहल गजभिये, अफशा खान, अक्सा अली या छात्र अध्यापकांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. राजू गोलाईत यांनी केले कार्यक्रमाचे शिस्तबद्ध आणि उगवत्या भाषेत संचालन वैष्णवी चरोडे यांनी केले तर आभार साक्षी पाटील यांनी मांडले

भावी शिक्षकांचा गौरव: स्व. शिवरामजी हिवसे अध्यापक महाविद्यालयात पदवी वितरण सोहळा संपन्न​वरूड (प्रतिनिधी):येथील महाराष्ट्...
07/04/2026

भावी शिक्षकांचा गौरव: स्व. शिवरामजी हिवसे अध्यापक महाविद्यालयात पदवी वितरण सोहळा संपन्न
​वरूड (प्रतिनिधी):
येथील महाराष्ट्र ग्रामीण विकास वेल्फेअर सोसायटी द्वारा संचालित स्व. शिवरामजी हिवसे (बी.एड.) अध्यापक महाविद्यालयात सन 2023-25 या सत्राचा 'पदवी वितरण सोहळा' मंगळवार, 7 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीत गायनाने झाली. या सोहळ्यात बी.एड. पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदव्या प्रदान करण्यात आल्या.
​शिक्षक हाच समाज परिवर्तनाचा मुख्य घटक: डॉ. प्राची ठाकरे
​कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. प्राची विक्रम ठाकरे होत्या. आपल्या भाषणात त्यांनी नमूद केले की, "शिक्षक हा केवळ एक व्यवसाय नसून समाज परिवर्तनाचे ते एक प्रभावी माध्यम आहे." पदवी वितरक म्हणून उपस्थित असलेले संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा. डॉ. सावन देशमुख यांनी विद्यार्थ्यांना आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना कृतीयुक्त शिक्षणाची महती पटवून दिली. सैद्धांतिक कार्यापेक्षा प्रात्यक्षिक कार्यास महत्व असते त्याचे मानवी मूल्य मनुष्याला आपल्या इस्पित ध्येयापर्यंत पोहचविण्यास मदत करते त्यांनी प्रशिक्षणार्थींना पदवी प्रदान केली व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
​याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून स्व. पंचफुलाबाई पावडे महिला महाविद्यालयाचे प्रा. डॉ. प्रदीप ढोले व प्रा. डॉ. मनोज राठोड उपस्थित होते. त्यांनी शिक्षकी पेशातील नैतिक मूल्ये आणि शिस्तीचे महत्त्व अधोरेखित केले.
​सुव्यवस्थित नियोजन आणि ​कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. किशोर तडस यांनी केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे अतिशय सुंदर आणि प्रभावी सूत्रसंचालन प्राध्यापिका प्रियंका इंगोले यांनी केले. त्यांच्या वक्तृत्वाने कार्यक्रमात एक वेगळीच रंगत भरली.
​प्रा. आरती देशमुख यांनी आभार प्रदर्शन केले.
​कार्यक्रमाला सहकार्य करणारे मान्यवर, उपस्थित पालक आणि सोहळा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेणारे सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे त्यांनी आभार व्यक्त केले. राष्ट्रगीताने या दिमाखदार सोहळ्याची सांगता झाली.
​या सोहळ्यामुळे पदवी प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून वरूड परिसरात या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

स्त्री शक्तीचा जागर आणि क्रांतीज्योतींना अभिवादन; हिवसे अध्यापक महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात संपन्नवरुड (प्रत...
10/03/2026

स्त्री शक्तीचा जागर आणि क्रांतीज्योतींना अभिवादन; हिवसे अध्यापक महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न
वरुड (प्रतिनिधी):
शिक्षणाची गंगोत्री घराघरांत पोहोचवणाऱ्या आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन आणि जागतिक महिला दिन यांचे औचित्य साधून, स्थानिक स्वर्गीय शिवरामजी हिवसे अध्यापक महाविद्यालयात एक भव्य सोहळा संपन्न झाला. महाविद्यालयातील 'उत्कर्ष' गटाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला.
कर्तृत्वाचा सन्मान आणि मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाचे नेतृत्व महाविद्यालयाच्या उत्कर्ष गटप्रमुख प्रा. भारती ठाकरे यांनी प्राचार्य किशोर तडस यांचे मार्गदर्शनात केले.
याप्रसंगी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य किशोर तडस लाभले होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रज्ञास अबॅकस अकॅडमीच्या संचालिका तथा कला व वाणिज्य महाविद्यालय जरूड येथील सहाय्यक प्राध्यापिका डॉ. प्रज्ञा मालपे निंभोरकर आणि वरुड येथील प्रसिद्ध उद्योजिका, समाजसेविका व श्रद्धा शिक्षण केंद्र वरुडच्या अध्यक्षा सोनल चौधरी अग्रवाल यांची उपस्थिती होती.
सावित्रीबाईंच्या विचारांचा वारसा
कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी डॉ. प्रज्ञा मालपे निंभोरकर यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हटले की, "आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत, याचे संपूर्ण श्रेय सावित्रीबाईंच्या संघर्षाला जाते. आधुनिक काळातील महिलांनी केवळ पदव्या मिळवून चालणार नाही, तर कौशल्याधारित शिक्षण घेऊन स्वतःची ओळख निर्माण केली पाहिजे."
दुसऱ्या प्रमुख वक्त्या सोनल चौधरी अग्रवाल यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थिनींना उद्योजकतेचे महत्त्व पटवून दिले. "स्त्रीमध्ये उपजतच व्यवस्थापन कौशल्य असते, त्याचा वापर करून तिने स्वतःचे साम्राज्य उभे करावे आणि समाजाच्या प्रगतीत योगदान द्यावे," असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी विद्यार्थ्यांच्या वाणीतून विचारांचा जागर उमटला, महाविद्यालयातील छात्र अध्यापकांनी अत्यंत अभ्यासपूर्ण आणि ओघवत्या भाषेत आपली मते मांडली. उमेश कास्देकर, राज पापडकर, वैभव राऊत, ऋषिकेश साखरकर, अश्विनी पेठे, प्रियंका जगदाळे, चंचल घोरपडे आणि प्राची तायवाडे या विद्यार्थ्यांनी महिला सक्षमीकरण आणि सावित्रीबाईंच्या कार्यावर प्रकाश टाकला.
नियोजनबद्ध संचालन आणि आभार
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियांशी मते यांनी आपल्या शैलीत करून उपस्थितांची दाद मिळवली. ऋषिकेश साखरकर यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची रूपरेषा मांडली, तर उपस्थितांचे आभार सबा पठाण यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रा.राजू गोलाईत, प्रा. सविता गलफट, प्रा. भारती ठाकरे, प्रा प्रियंका इंगोले, प्रा आरती देशमुख, प्रा चेतना पाटील तथा शिक्षकेतर कर्मचारी आणि 'उत्कर्ष' गटाच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमातून उपस्थितांना महिलांच्या सन्मानाची आणि शिक्षणाच्या महत्त्वाच्या कार्याची प्रेरणा मिळाली.

भावी शिक्षकांनी घेतला मराठी भाषेच्या संवर्धनाचा वसा; हिवसे अध्यापक महाविद्यालयात 'मराठी भाषा गौरव दिन' उत्साहात संपन्न​व...
28/02/2026

भावी शिक्षकांनी घेतला मराठी भाषेच्या संवर्धनाचा वसा; हिवसे अध्यापक महाविद्यालयात 'मराठी भाषा गौरव दिन' उत्साहात संपन्न
​वरुड (प्रतिनिधी):
येथील स्व. शिवरामजी हिवसे (बी.एड.) अध्यापक महाविद्यालय आणि विदर्भ साहित्य संघ, शाखा वरुड यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, 27 फेब्रुवारी रोजी 'मराठी भाषा गौरव दिन' मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. कुसुमाग्रजांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून आयोजित या सोहळ्यात मराठी भाषेची सद्यस्थिती आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुण्यतिथी निमित्त सावरकरांच्या वाङ्मयीन योगदान यावर मंथन करण्यात आले.
​कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या डॉ. सौ. मायाताई आंडे (साहित्यिक तथा सेवानिवृत्त विभाग प्रमुख, मराठी विभाग) यांनी आपल्या ओघवत्या भाषेत मराठी भाषेचा इतिहास उलगडला. मराठी भाषा केवळ संवादाचे साधन नसून ती आपली संस्कृती आणि अस्मिता असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. ​दुसरे प्रमुख वक्ते ज्येष्ठ साहित्यिक तथा पटकथा लेखक श्री. अजयजी देशपांडे (प्राचार्य, आर.जी. देशमुख विद्यालय, चांदस वाठोडा) यांनी 'स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे साहित्य' या विषयावर मार्गदर्शन केले. सावरकरांनी मराठी भाषेला दिलेले नवनवीन शब्द आणि त्यांच्या साहित्यातील प्रखर राष्ट्रवाद आजही तितकाच प्रासंगिक असल्याचे त्यांनी सांगितले.
​कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघ, शाखा वरुडच्या अध्यक्षा श्रीमती रेखाताई सुरेशरावजी आजणकर होत्या. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, "मराठी भाषा टिकवण्याची आणि वाढवण्याची सर्वात मोठी जबाबदारी भावी शिक्षकांवर आहे. हिवसे महाविद्यालयासारख्या संस्थांमधून तयार होणारे शिक्षकच मराठीचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत सक्षमपणे पोहोचवू शकतात" असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय महाविद्यालयाचे प्राचार्य किशोर तडस यांनी उपस्थितांना करून दिला. प्रसंगी माजी गटशिक्षणाधिकारी सौ.उषा शेंदुरसे आणि विदर्भ साहित्य संघाच्या उपाध्यक्ष उषा चौधरी उपस्थित होत्या.
​महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.किशोर तडस यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली प्रा चेतना पाटील यांनी बीएड प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन या संपूर्ण सोहळ्याचे नियोजन केले होते. महाविद्यालयाच्या टेंभुरखेडा रोडवरील भव्य सभागृहात सकाळी ९:०० वाजता दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले. उपस्थित बी.एड.च्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा दैनंदिन जीवनात वापर करण्याची आणि भाषेचा गौरव टिकवण्याची सामूहिक शपथ घेतली. कार्यक्रमाच्या प्रारंभी मराठी भाषेच्या गौरवार्थ अभिमान गीते सादर करण्यात आली.प्रा.राजू गोलाईत, प्रा. सविता गलफट, प्रा. भारती ठाकरे, प्रा प्रियंका इंगोले, प्रा आरती देशमुख, प्रा चेतना पाटील आणि कर्मचाऱ्यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली चोबीतकर तर आभार संजना शिडाम यांनी मांडले.
​या सोहळ्यामुळे वरुड परिसरातील शैक्षणिक आणि साहित्यिक वर्तुळात हिवसे महाविद्यालयाच्या उपक्रमाचे विशेष कौतुक होत आहे.

               "भावी शिक्षकांचे समाजसेवेचे पाऊल; हिवसे अध्यापक महाविद्यालयाकडून सालबर्डी तीर्थक्षेत्राची स्वच्छतासालबर्ड...
25/02/2026

"

भावी शिक्षकांचे समाजसेवेचे पाऊल; हिवसे अध्यापक महाविद्यालयाकडून सालबर्डी तीर्थक्षेत्राची स्वच्छता
सालबर्डी (प्रतिनिधी):
येथील निसर्गरम्य पहाडावर वसलेल्या ऐतिहासिक सालबर्डी तीर्थक्षेत्रात महाशिवरात्रीच्या निमित्ताने भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. या यात्रेदरम्यान पहाडावर मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आणि कचरा साचला होता. ही बाब लक्षात घेऊन स्वर्गीय शिवरामजी हिवसे अध्यापक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी 'सामुदायिक कार्य' अंतर्गत श्रमदान करून काही अंशी परिसर कचरामुक्त केला.
स्वच्छतेचा वसा आणि श्रमदान
महाशिवरात्रीच्या यात्रेनंतर पहाडावरील दुर्गम भागात, पायऱ्यांच्या कडेला आणि मंदिर परिसरात प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या, कागदी द्रोण आणि थर्माकोलचा कचरा मोठ्या प्रमाणावर साचला होता. यामुळे परिसराचे सौंदर्य तर लोप पावले होतेच, शिवाय पर्यावरणालाही धोका निर्माण झाला होता. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली.
प्राचार्यांचे मार्गदर्शन आणि शिस्त
ही संपूर्ण स्वच्छता मोहीम महाविद्यालयाचे प्राचार्य किशोर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली. केवळ कचरा उचलणे एवढ्यावरच मर्यादित न राहता, विद्यार्थ्यांनी पर्यटकांना आणि भाविकांना कचरा न करण्याबाबत आवाहन केले. प्राचार्यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले की, "शिक्षण म्हणजे केवळ पदवी मिळवणे नव्हे, तर आपल्या परिसरातील समस्या ओळखून त्या सोडवण्यासाठी पुढाकार घेणे हाच खरा संस्कार आहे."
विद्यार्थ्यांचा उत्साह आणि सामाजिक बांधिलकी
बी.एड.च्या या विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या सामाजिक बांधिलकीचे स्थानिक नागरिक आणि भाविकांकडून विशेष कौतुक होत आहे. पहाडावर चढणे कठीण असतानाही, विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने पोत्यांमध्ये कचरा भरून तो खाली आणला. या उपक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद प्रा राजू गोलाईत, प्रा. सविता गलफट,प्रा. भारती ठाकरे, प्रा प्रियंका इंगोले, प्रा आरती देशमुख, प्रा चेतना पाटील आणि कर्मचाऱ्यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
तरीही चालवर्डीच्या पहाडावर प्रचंड मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून त्याची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे एकूण कचऱ्याच्या फक्त दोन ते पाच टक्के कचरा उचलण्यात विद्यार्थी यशस्वी झाले. बराच कचरा उचलण्यात आलेला नाही कारण एवढी मोठी यंत्रणा उपलब्ध नव्हती तरी पुन्हा फुलाची पाकळी श्रमदान करण्यास भावी शिक्षक चुकले नाहीत. "भावी शिक्षक जेव्हा स्वतः श्रमदान करतात, तेव्हा ते समाजासमोर एक आदर्श निर्माण करत असतात. हिवसे महाविद्यालयाचा हा उपक्रम इतर संस्थांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल."
असा आशावाद या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे

Address

NEAR BUS STAND TEMBHURKHEDA Road WARUD
Warud
444906

Opening Hours

Monday 8am - 2pm
Tuesday 8am - 2pm
Wednesday 8am - 2pm
Thursday 8am - 2pm
Friday 8am - 2pm
Saturday 10am - 1pm

Telephone

+917229234751

Alerts

Be the first to know and let us send you an email when Late Shivramji Hiwase College of Education Warud posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Late Shivramji Hiwase College of Education Warud:

Shortcuts

Share