21/10/2025
पक्षी निरीक्षण कार्यक्रम
दिनांक: 17 ऑक्टोबर 2025
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या आनंद निकेतन विद्यालयात पक्षी निरीक्षणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. परीक्षेनंतरचा थकवा घालवण्यासाठी ही एक छोटी सहल आमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरते. निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन त्यातील सौंदर्याचा आस्वाद घेण्यात एक वेगळीच मजा असते.
पक्षी निरीक्षणासाठी आदल्या दिवशी म्हणजे 16 ऑक्टोबर 2025 रोजी विद्यार्थ्यांना निरीक्षणाची माहिती ppt च्य माध्यमातून गौरीताई ने मुलांना करून दिली.
प्रत्यक्ष निरीक्षणाच्या दिवशी विद्यार्थ्यांचे वर्टिकल ग्रुप करून सकाळी पावणे सात वाजता आम्ही पक्षी निरीक्षणासाठी निघालो. आमच्या गटाने आश्रम परिसर ते तलाव या भागात निरीक्षण केले. पक्षी पाहताना आजूबाजूच्या दृश्यांचेही मुलांनी निरीक्षण केले.
सकाळच्या सूर्याचे मनोहारी दर्शन खूपच प्रेरणादायी वाटले. एरवी घाईत आपण त्याच्याकडे पाहत नाही, पण आज तो नव्या दिवसाची आशा देणारा वाटला.
निरीक्षणादरम्यान भोवरी, कोकीळ, भारद्वाज, सुभग, नीलकंठ, हरियाळ अशा अनेक पक्षांचे दर्शन झाले. मध्येच सुगरणीचा खोपा दिसला आणि बहिणाबाई चौधरींच्या कवितेची आठवण झाली —
अरे खोप्यामधी खोपा,
सुगरणीचा चांगला,
देखा पिलासाठी,
तिन झोका झाडाले टांगला...
ही घरटी म्हणजे जणू सृष्टीतील विरामचिन्हेच — इथे येऊन मन थांबतं आणि प्रत्येक गोष्ट निरखून पाहावीशी वाटते.
पक्षी निरीक्षण करताना विद्यार्थ्यांनी पक्ष्यांचे आवाज, रंग, आकार, पंखांची रचना, चोचीचा प्रकार आणि अधिवास यांचे निरीक्षण केले. त्यांनी दुर्बिण हाताळण्याचा अनुभव घेतला आणि पाहिलेल्या पक्ष्यांची माहिती तक्त्याच्या स्वरूपात नोंदवली. प्रत्येक गटाने जवळपास २५ ते ३० पक्षी पाहिले आणि त्यांच्या वैशिष्ट्यांवर चर्चा केली.
या कार्यक्रमात इयत्ता पाचवी ते दहावीचे विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी मिळून एकूण १५० विद्यार्थी, शिक्षक व आमचे स्नेही — श्री. अतुल शर्मा, श्री. किशोर वानखेडे, श्री. जयंत सबणे, श्री. प्रभाकर पुसदकर आणि श्री. पराग दांडगे व सुषमाताई यांच्या सहकार्याने पक्षी निरीक्षणाचा कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडला.
पक्षी निरीक्षण करता करता मुलांना रस्त्यात मिळालेला रानमेवा खाण्याचा मोह आवरता आला नाही; झाडावरील चिंचा त्यांनी आवडीने खाल्ल्या. फिरताना गवतफुले, किडे, झुडुपे यांचेही मुलांनी निरीक्षण केले. या सगळ्या अनुभवातून निसर्गाबद्दल आदर, जिज्ञासा आणि संवेदनशीलता या तीनही गोष्टी विकसित झाल्या.