13/06/2024
१९८० सालच्या दहावीच्या माजी विद्यार्थीनी वासंती मेहेंदळे (पूर्वाश्रमीची), वाई यांना भावलेला शाळेच्या आठवणीतला सुंदर
हे वाचत असताना काणे बाई, महाबळेश्वरकर बाई, मालतीबाई, ब्रम्हेबाई, मांढरे सर, राऊत सर, दिवेकर सर, देशपांडे सर, केळकर बाई, देशपांडे बाई, यांची आठवण आली. आपले रामजी आणि सीताबाई पण आठवली .........
SSC ची उलटलेली पन्नाशी
आज 13 जून
13 जून 1972 या दिवशी मी अकरावीत म्हणजे त्यावेळच्या SSC मधे प्रवेश केला...
चक्क "पन्नास" वर्ष उलटली ..
आज सकाळी "शाळा" नावाचं मधाचं पोळं फुटलं आणि असंख्य आठवणीं घोंगावायला लागल्या....
तो दिवस असा लक्ख डोळ्या समोर आला .
सकाळची शाळा... रेडिओ वरचं मंगल प्रभात संपत आलं की निघायचं .
हे ठरलेलं ... हेच घड्याळ..
हातावर बांधायला घड्याळ ही कल्पना अस्तित्वातच नव्हती...
शाळेत परवानगी ही नव्हती..
पण अकरावीच्या वर्षात परीक्षेला जाताना घड्याळ मिळणार आहे हे कबूल केलं होतं घरच्यांनी
इथ पासूनच हे वर्ष खास असणारे याची जाणीव झाली होती.
पांढरा blouse आणि निळा स्कर्ट हा युनिफॉर्म घालून ,"हातात "(?) School बॅग घेऊन शाळेत निघाले .
"हातात" ला प्रश्नचिन्ह कारण आजच्या पिढीला नवल वाटेल म्हणून.
पाठीवरचं दप्तर नव्हतं हो,
चक्क पत्र्याची "बॅग "होती..
तीच घरी मांडीवर ठेवून
गृहपाठ करायचा ... Writing table वगैरे fad नव्हतंच तेव्हा..
या वर्षी तर नवीन युनिफॉर्म असण्याचा प्रश्नच नव्हता.
शाळेचं शेवटचं वर्ष ... त्यामुळे गेल्या वर्षीचाच वापरायचा . हा जणू नियमच .
तसंही दरवर्षी नवीन युनिफॉर्म आणि school बॅग ही चैन परवडणारी नव्हतीच .
(ती पत्र्याची बॅग आजही माझ्या कडे आहे
आदल्या रात्री घट्ट घडी घालून गादीखाली ठेवलेला युनिफॉर्म अंगावर चढवला होता.
पालक ही इस्त्रीचे कपडे घालून ऑफिस ला जायचे नाहीत हो तिथे आम्हाला इस्त्री चे कपडे कसे असतील हो
पुस्तक वह्या मात्र एकदम नवीन कोऱ्या ..
त्याला खाकी कव्हर घातलेली आणि रंगीबेरंगी "लेबल" कोपऱ्यात चिकटवलेलं "
मधल्या सुट्टीत खायचा डबा ही साधा भोळा .. तुपसाखर पोळीचा लाडू किंवा तत्सम काही तरी मराठमोळं .
डोसे इडली सँडविच असले चोचले नव्हतेच हो.!
आणि SSC चं वर्ष आहे .
खूप पौष्टिक, शिवाय , बुद्धी वाढी साठी बदाम, आक्रोड, असले मारे आमच्यावर झालेच नाहीत.
"अभ्यास "करा हा एकच "शाब्दिक "मारा...
आज शाळेत येताना दरवर्षी प्रमाणे प्रचंड आनंद झाला होता.
उत्साह तर ओसंडून वहात होता.
पण आज त्या उत्साहाला बारीकशी वियोगाच्या विचाराची किनार होती.
अशा बाकावर बसायचं हे शेवटचं वर्ष ...
आजूबाजूच्या बाकांवर बसलेले आपले सवंगडी पुढच्या वर्षी आपल्या बरोबर असतील का? याची एक अनामिक हुरहूर.
आपलं नावंच काय? मधलं नाव आणि पत्ता माहित असलेले शिक्षक आपल्याला दुरावणार.
नावंच काय तुम्ही वर्गात बसलाय की नाही याचाही "पत्ता" नसलेले शिक्षक कॉलेज मधे भेटणार आहेत या कल्पनेने आज डोळे नकळत, येणाऱ्या प्रत्येक शिक्षकाच्या कडे आदराने, प्रेमानेबघताना भरून येत होते..
मस्ती केली म्हणून कोणी ओरडणार नव्हतं, गृहपाठ केला नाही म्हणून कोणी टोकणार नव्हतं
असं बसायचं नाही, असं बोलायचं नाही, असं हसायचं नाही हे कोणी आवर्जून सांगणार नव्हतं.
ह्या खूप हव्याहव्या शा वाटणाऱ्या साऱ्या गोष्टी ना आपण पुढच्यावर्षी पासून मुकणार आहोत ह्या कल्पनेने एक प्रकारची बेचैनी आली होती.
तो सारा आठवडा प्रत्येक शिक्षक, एवढंच काय अगदी शिपाई सुद्धा, हे तुमचं शाळेतलं "शेवटचं "वर्ष हं. याची जाणीव करून देत होतं..
आमच्या वेळी higher आणि lower मॅथ्स हा एक option होता. त्या प्रमाणे तुकड्या पडायच्या .
संस्कृत आणि special अंकगणित हा पण एक option होता. असं थोडं आठवतंय .
त्याकाळात "शाळेला "खूप महत्व होतं.
शाळेतून SSC ची इतकी तयारी करून घेतली जायची की सहसा "शिकवणी" ला जाण्याची वेळ यायचीच नाही.
तेव्हा ही भरपूर class होते.
पण आता सारखी परिस्थिती नव्हती
की शाळेत काही शिकवत नाहीत म्हणून class ला जावच लागतंय..
तेव्हा "शाळा शाळा" मधे स्पर्धा असायची .
आपल्या शाळेचे जास्तीत जास्त विद्यार्थी "गुणवत्ता" यादीत यावेत यासाठी शाळेतले शिक्षक अथक परिश्रम घ्यायचे .
त्याकाळी मार्क ही खिरापती सारखे वाटले जायचे नाहीत.
अभ्यास मन लावून, चिकाटीने केलात तर तुमच्या कुवती नुसार किती मार्क मिळतील याचा बऱ्याच अंशी अंदाज यायचा .
आमच्या त्या वर्षी 82% मिळवून विद्यार्थी महाराष्ट्रातून पहिला आल्या चं स्मरतय .
सत्तर टक्क्या च्या वर मार्क मिळाले की अत्यंत नावाजलेल्या कॉलेज मधे सहज प्रवेश मिळायचा .
जीवघेणी स्पर्धा नव्हती आणि पालकांच्या अवास्तव, आवाजवि अपेक्षा नव्हत्या.
त्यामुळे नैराश्य, काळजी, ने विद्यार्थी पोखरलेले नव्हते.
अभ्यास करून यश मिळवून पुढे जायचं. हेच मनावर बिंबवलं होतं...
पालकांकडून ही SSC ला बसलाय म्हणून कुठलीच खास सवलत ही मिळायची नाही की खास वागवलं ही जायचं नाही.
साधं सोपं होतं सगळं..
SSC चं सगळं वर्ष अभ्यासाची मजा घेत घालवलं . असं आता आठवतंय ...
आज पन्नास वर्षांनी मला तरी असं प्रकर्षाने जाणवतंय की शाळेचे ते दिवस आजपर्यंत च्या आयुष्यातले सगळ्यात आनंदाचे होते. कुणाचा तरी अंकुश असताना केलेली मजा मस्ती, शिस्त, नियम पाळत केलेली मजा मस्ती, शाळा आणि घर यांची बांधिलकी मानत केलेली मजा मस्ती याची सर कॉलेज च्या स्वछंद जीवनाला नाही..
आपल्या पैकी अनेकांनी, आपण खूप उच्च पदव्या मिळवल्यात, उच्च पदावर काम केलं, अनेक क्षेत्रात भरारी मारली,.
तेही मराठी माध्यमात शिकून
इतके अनुभव गाठीशी बांधले पण आज मला सगळ्यात ठळक काय आठवतं तर शाळेत केले गेलेले संस्कार..
ती पाळं मूळं जी खोलवर रुजवली गेली त्यावर आजपर्यंतचा डोलारा उभा राहायलाय.
दिलेली वेळ पाळणं, वक्तशीर पणा , मोठ्यांचा आदर ठेवणं
शिस्त, नियम पाळणं, सामाजिक बांधिलकी जपणं
हे इतकं अंगात भिनलंय की अगदी प्रतीक्षिप्त क्रिये सारख्या या गोष्टी आजही नकळत केल्या जातात...
पायाला हात लावून, वाकून नमस्कार करावेत असे अनेक ऋषीं तुल्य शिक्षक लाभलेली आमची पिढी भाग्यवान होती. जे काही थोडं फार यश, प्रतिष्ठा, कमावली त्याचं मूळ शालेय जीवनात रोवलं गेलं.
आठवणीच्या प्रदेशात एकदा मनाला पाठवून दिलं की बापडं परत यायचं नावंच घेत नाही..
13 जून. या आजच्या दिवसाने माझ्या आठवणी चाळवल्या ..
आणि एक सुखद लहर आजच्या दिवसावर पसरून राहिलीय....
लेखिका :- नीलिमा जोशी
विद्या पावगी यांनी शेअर केलेला शाळेच्या आठवणीतला सुंदर लेख .........
खरच खूप आठवणी दाटून आल्या.
कन्या शाळा म्हणजे एक मोठे कुटुंबच होते. शाळेतले रोजचे सुविचार ऑफिस समोरची रांगोळी फळ्यावर सुविचाराबरोबरच छोटीशी सुंदर खडूने काढलेली नाजूक वेलबुट्टी, आणि ऑफिस कडे नजर गेली की एक आदर युक्त भीती खर तर छोट्या दरवाजातून आत शिरताच समोर दिसणारे रामजी काका आणि सीताबाई. रामजी काका खरे तर खूप शांत आणि दयाळू होते पण सीताबाई तशा कडक वाटायच्या आणि गोपाळ दादा होते तेही खूप गरीब होते त्यांची मुलगी आमच्या वर्गात होती.
शाळेत शालेय शिक्षणा बरोबर होम सायन्स च्या क्लासमध्ये मेथीचे धपाटे आणि शेंगदाण्याची गुडदाणी करायला शिकवली होती. आमचा स्वयंपाक घरातील तो पहिला धडा असावा त्याच बरोबर विणकाम शिवणकाम तेही शिकलो. कऱ्हाडकर बाई, ब्रह्मे बाईंनी खूप छान शिकवले इतकेच नाही तर बागकाम ही शिकलो. मला तर हेही आठवते आहे की शाळेचे एक दुकान (मला नेमका शब्द आठवत नाही) पण मुलींनीच मुलींसाठी शालेय साहित्य आणून त्याची विक्री करायची, त्यातून व्यवहार ज्ञानाचा एक वस्तुपाठच शिकवला गेला. यातूनच व्यक्ती म्हणून आम्ही घडत गेलो.
अशा या कन्या शाळेचा मला सार्थ अभिमान आहे.
विद्या पावगी
माजी विदयार्थीनी