26/10/2024
नितीन गवळी यांचा धम्माल "होम मिनिस्टर" कार्यक्रम म्हणजे "साठी ओलांडलेल्या म्हातार्यांसाठी संजीवनी..!
सांगलीकरांकडून "राजर्षि छत्रपती शाहू महाराज कृषिमहाविद्यालय"कोल्हापूर, "बॅच 1980-83 स्नेहसंमेलनाचे आयोजन" 22 ते 24 आॅक्टोबर 2024- अद्भुत, अप्रतिम, आनंददायक!
संभाजी सावंत, अजय पाटील, अशोक कुपाडे, बाबासाहेब मोहिते आणि इतर सांगलीकर मित्रांनी आठवे स्नेहसंमेलन आयोजित करण्याचा "विडा" उचलला.
या स्नेह स्नेहसंमेलनमध्ये श्री नितीन गवळी यांचा धम्माल "होम मिनिस्टर" कार्यक्रम म्हणजे "साठी ओलांडलेल्या म्हातार्यांसाठी संजीवनी औषधीचे काम करणारा" कार्यक्रम. तश्यात "आधीच मर्कट त्यात मद्य प्याले" या म्हणीनुसार "कृषि महाविद्यालयाचे आम्ही "बैल" आधीच चौखुर उधळलेले त्यात "नितीन" या "गवळ्या"ने "गोंजारले", मग आम्ही सगळेच अक्षरश: शर्यतीतल्या बैलांप्रमाणे उधळलो. आमच्या "गरीब स्वभावाच्या वहिन्या आणि माझी अधिकच गरीब स्वभावाची सौभाग्यवती ज्योती" यांनी वटारलेल्या "डोळेरुपी कासर्यांना" न जुमानता आणि घरातल्या "संस्काररुपी" वेसणेला झिडकारुन गवळींच्या "करमणूकरुपी खेळांच्या गायरानात" मनसोक्त हुंदडलो. अर्थात नाच-गाण्यांत आणि एकमेकींचे फुगे फोडण्यातही वहिनीवर्गाने जबरदस्त कामगिरी केली. मला वाटते "आपापल्या नवर्यांच्या आनंद-अभिमानरुपी फुग्यांना आयुष्यभर टोमण्यांच्या टाचण्यांनी फोडण्यात आणि डाफरण्याच्या डमरुने हवा सोडण्यात मिळवलेले कसब" फुगेफोडणे स्पर्धेत त्यांच्या कामी आले.
येवल्याच्या पैठणींच्या विनर्स महिला आणि स्मार्ट वाॅचचे स्मार्ट विनर्स यांचे कौशल्य तर जबरदस्तच, पण दत्तु इकतपुरे,मोहन गायकवाड,शंतनु गरुड आणि कांही मित्रांचे फोटो काढणे, व्हिडिओ काढणे आणि इतर मित्रांचे टाळ्या वाजवून,प्रोत्साहनपर काॅमेंट्स, काळ्या संज्या पवारच्या शिट्ट्या या गोष्टी सुद्धा तितक्याच रंजक आणि "उत्प्रेरक"होत्या. विशेष उल्लेख "विठ्ठल सूर्यवंशी आणि वहिनी, कल्याण कानडे आणि वहिनी, नारायण लोणकर आणि वहिनी, सुभाष गावडे आणि वहिनी, अजय पाटील आणि वहिनी, संजय फडतरे आणि वहिनी, सुबोध भिंगार्डे आणि वहिनी, दत्तु इकतपुरे आणि वहिनी, प्रभाकर इंगळे आणि वहिनी, डाॅ. बाळू पवार आणि वहिनी आणि सगळेच मित्र, वहिन्या. माझी धर्मपत्नी सौ. ज्योती पण प्लॅस्टर लावलेल्या बोटाने,पायाने पण जमेल तशी नाचली, तिला पण सॅल्यूट. ती तश्या अवस्थेतही जायचंच म्हणाली, म्हणूनच मला उपस्थित राहता आलं.
कृषि महाविद्यालयाच्या "80-83"च्या वयाने साठीतल्या पण मनाने अठराच्याच अवखळ खोंडांना,वळूंना "नितीन" या गवळ्याने "आपल्या कृष्णमय लोभस हास्याने, विनोदी रसाने, खट्याळ भाष्याने आणि निर्मळ सादरीकरणाने मोहवून,भुलवून आणि गुंतवून अक्षरश: तीन-चार तास संमोहित करुन,मंत्रमुग्ध करुन" हवं तसं नाचायला,गायला,बोलायला,ओरडायला,बागडायला लावत सगळ्यांनाच आपापलं शारीरिक वय,व्याधी विसरायला लावत, आपापल्या बायकांचे वटारलेले डोळे-शांत राहण्यासाठी केलेली दमदाटी यांकडे दुर्लक्ष करण्यास भाग पाडत " निखळ आनंदरुपी दुधाचा रतीब, सकस विनोदरुपी खव्याची मिठाई आणि स्निग्ध-स्नेहमय" वर्तणूकरुपी "तुपाची" धार ओतत "कटकटीच्या,चिंतारुपी घरातून थेट आनंदवनरुपी नंदनवनात नेत , साठीतून वीशीत नेत आणि वर्तमानाचा आनंद उपभोगतच प्रत्येकाचे आयुष्य दहा वर्षांनी वाढवत कोयनानगरात जो "आनंदाचा महासागर" निर्माण करत प्रत्येकाला अमृतधारेत डुंबायला लावणारा, प्रत्येकाच्या तन-मनात "उर्जेचा-रसिकतेचा, चैतन्याचा आणि निखळपणाचा" "आनंदमय पान्हा" फोडणारा नितीन हा "गवळी" साधासुधा "गवळी" नसून, "नंदाघरी" बाललीला करणारा साक्षात यशोदा-देवकीचा "कान्हा"च आहे. नितीन गवळी आणि टिमला कोटी-कोटी धन्यवाद आणि शुभेच्छा.
1980-83 चे शिक्षण संपवून कोणी पुढील शिक्षणासाठी,कोणी पोटापाण्यासाठी लगेच नोकरी करायला , कोणी शेती साठी तर कोणी व्यवसायासाठी आपापल्या कार्यक्षेत्रात आपापल्या संपूर्ण कुवतीनुसार, अथक 41 वर्षं "बैलासारखा" राबत, लग्न करुन आणलेल्या आपल्या पत्नीरुपी "गाडीवाना"कडून शेपट्या पिळून घेत, शाब्दिक रट्टे खात तरीही आनंदाने संसाररुपी गाडा खेचतानाच "मित्रधन" सांभाळत,जोपासत,वेळोवेळी सुख-दु:खाला भेटत,साथ-सोबत घेत-देत अर्थातच सर्व आदरणीय गृहलक्ष्मींच्याच पाठिंब्याने-सहभागाने जमेल तश्या स्नेहसंमेलनात भाग घेत (कांही अकाली गेलेल्या दिवंगत मित्रांचेही वेळोवेळी स्मसण करत), वैचारिक,राजकीय आणि इतरही मतभिन्नता ठेवत,मांडत,भांडत तरीही "निखळ मैत्रीच्या अतूट धाग्याने" मजबूतपणे बांधलेल्या मित्रांना भेटताना "मैत्रीवृक्ष" अधिकाधिक डवरलेला, बहरलेला आणि विस्तारलेलाच आहे वरचेवर.
माझ्या मते संपूर्ण जगात, शाळांत,महाविद्यालयांत आणि हो कृषि महाविद्यालयाच्या बॅचेसमध्ये सुद्धा इतक्या मोठ्या (180 मित्र,सौभाग्यवती,मुलं,नातवंडं,सुना,जावई) संख्येनं 45 वर्षांपासूनची जपलेली, शंभर टक्के एकमेकांशी जोडलेली मैत्रीची ही गाथा "एकमेव गाथा असावी, नव्हे खात्रीपूर्वक सांगतो, ही "एकमेवच गाथा" आहे.
"माय-माती सेवा,अर्थक्षेत्रातील-सेवा,ज्ञानदान- सेवा,प्रशासनिक -सेवा,समाज-सेवा आणि देश-सेवा " अश्या विविध क्षेत्रांत गौरवास्पद कामगिरी केलेल्या मित्रांतील शेंडेफळ मित्र मी नोव्हेंबर महिन्यांत सेवानिवृत्त होणारा बहुदा शेवटचाच शिलेदार असावा. "सगळ्याच कर्तृत्त्ववान मित्रांच्या मैत्रीचा ठेवा" देवालाही हेवा वाटावा असाच आहे. समारोपाची भाषणं,मनोगतं,फीडबॅक, मित्रवियोगाचे आवंढे गिळत पण पुढील "नाशिक-येवले" संमेलनाची स्वप्नं बाळगत, जॅगरी टी आणि काळ्या मनुका, बेदाणे-किशमिशची भेट स्विकारत आणि "जातो माघारी पंढरीनाथा"च्या जयघोषातच-समाधानातच "मैत्रीच्या ह्या स्नेहमय वारीची सांगता" झाली. आजवरच्या आठ स्नेहसंमेलनरुपी मंदिराचा सांगलीकर आयोजित संमेलन कार्यक्रम "कळस" झाला. हार्दीक अभिनंदन, शतश: धन्यवाद. "नाशिक-येवला" चे नियोजित नववे स्नेह-संमेलन कळसाची "पवित्र पताका" ठरो, हीच शुभेच्छा.
माझ्याही अनंत अडचणींवर मी मात करुन, पायाच्या बोटांचे फ्रॅक्चर झालेलं, वडिलांचं नुकतंच निधन झालेलं, अशी माझी पत्नी सौ.ज्योती सुद्धा निग्रहाने या दिवाळीपूर्वीच होणार्या "मित्रसंमेलनाच्या" दिवाळीसाठी माझ्यासोबत आली. माझी तर दिवाळीपूर्वीच दिवाळी झाली. "सांगलीकरांनी सामूहिक शक्तिने साकारलेले हे स्नेहसंमेलन निव्वळ अद्भुत, अप्रतिम आणि आनंददायक आहेच, अभिनंदनीय आणि अनुकरणीय सुद्धा आहे. अशी आहे ही मैत्री गाथा, जिथे ठेवतो मी माझा माथा.
रेणुकादास कुलकर्णी, "निर्भय" 9404152620, 9822927618 पुणे