12/06/2024
*माझे चित्रकला शिक्षक*
मी पूर्वाश्रमीची शोभना गणेश प्रभू.
सहावीपर्यंत बॉम्बे मुन्सिपल शाळेत शिकले. सातवीला राममोहन शाळेमध्ये प्रवेश घेतला. त्यावेळी सातवीला एलिमेंट्री परीक्षा व इंटरमिजिएट परीक्षा आठवीला असे.
लहानपणापासून चित्रकलेची आवड होती. पण मार्गदर्शन नसल्यामुळे चित्रकला काही माझी खास नव्हती. त्यावेळी आम्हाला श्री रेगे सर होते चित्रकलेला. माझ्या वडिलांचे ते मित्र होते.
ड्रॉइंग मध्ये थोडेफार करेक्शन सांगत असत.
एलिमेंट्री ला मला 'सी' ग्रेड मिळाली.
आठवीला आमच्या शाळेत श्रीमोदगेकर सर यांची ड्रॉइंग टीचर म्हणून नेमणूक झाली. इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा साधारण सप्टेंबरला होत असे. सर आमच्या शाळेत जुलै ऑगस्टला आले. श्री रेगे सर आम्हाला वर्गाला ड्रॉइंग शिकवायला होते. श्री मोदगेकर सर आम्हाला ग्रेड परीक्षेला क्लासला होते. एक महिन्यात पाहिजे तशी काही माझ्या ड्रॉइंग मध्ये सुधारणा झाली नाही.
पण श्री मोदगेकर सर यांची ड्रॉइंग शिकवण्याची पद्धत मला आवडायला लागली.
आणि इथेच माझ्या चित्रकलेचा पाया घातला गेला. त्या वयात ग्रेड परीक्षेचा उपयोग पुढे काय होणार हे विचार काही मला आले नव्हते.
श्री मोदगेकर सर वर्गात असताना सतत स्केचिंग करत असत. ते स्केचिंग मला खूप आवडायचे. सरांसारखे आपल्याला पण स्केचिंग करता आले पाहिजे असे त्या वयात मला वाटायला लागले. ग्रेड परीक्षा आटोपली तरी स्केचिंग चा मी खूप सपाटा लावला. जो मला पुढील कारकीर्दीत फार उपयोगी पडला. त्या वयात मला फक्त एवढेच वाटायचे की सर जसे करतात ड्रॉईंग तसे मला आले पाहिजे. सर सांगत उद्या 20 स्केचिंग करून घेऊन ये मी 50 स्केचिंग घेऊन जात असे.
आता समजते तो माझ्या चित्रकलेच्या कारकीद्रीचा पाया होता आणि तो भक्कम होत होता कळत नकळत.
आठवी नंतर आम्हाला ड्रॉइंग हा विषय नव्हता.
पण आठवी ,नववी ,दहावी व अकरावी ही चार वर्षे मी श्री मोदगेकर सर यांच्या सहवासात काढली.
ते माझे गुरु होते, शिक्षक होते, मित्र होते, भाऊ होते, वडील होते,
जेव्हा जेव्हा त्यांना मी ड्रॉइंग दाखवायला जात असे तेव्हा जीवन कसे जगावे, आई वडील आपले दैवत आहेत, त्यांना कधी विसरू नका. अशी भरपूर वैचारिक शिदोरी घेऊनच मी घरी परतत असे.
1970 /71 मध्ये ड्रॉइंग कॉलेज जे जे स्कूल ऑफ आर्ट वगैरे मला काहीच माहित नव्हते.
मला शिक्षकीपेशा फार आवडायचा.
श्री मोदगेकर सर वडिलांना म्हणाले तिला शिक्षक व्हायचे आहे ना मग तीला चित्रकला शिक्षक होऊ दे.
मला 1971 मध्ये फाउंडेशन ची फर्स्ट बॅच मिळाली. 1972 मध्ये टीचर डिप्लोमा. एक वर्ष दोन शाळेमध्ये पार्ट टाइम टीचरची नोकरी केली. 1973 ला मुन्सिपल शाळेमध्ये नोकरी मिळाली. जे जे स्कूल ऑफ आर्टने शिक्षणाचे खूप वेड लावले. सकाळी शाळा करून संध्याकाळी फोटोग्राफीचा कोर्स केला जे जे मध्ये.
दोन वर्ष सरांकडे नियमित जाण्याचे थोडे कमी झाले होते. एके दिवशी श्री मोदगेकर सरांना मी म्हणाले मी नोकरी करून पुढे शिकणार आहे. तेव्हा शरीराने मी फार अशक्त होते. सर म्हणाले जमेल का तुला नोकरी करून शिकायचे. हो , चार वर्ष सकाळी शाळा सात ते एक दुपारी कॉलेज एक ते सात मी मनाने खंबीर होते. वैयक्तिक अडचणी असतील तेव्हl सरांना मी आवर्जून भेटत असे.
मी त्यांच्याकडे काही प्रश्न घेऊन जायचे पण प्रश्न विचारायच्या आधीच त्याचे उत्तर त्यांच्याकडून मिळत असे. त्यांचे आई-वडील वारकरी पंथातले. त्यामुळे जीवन कसे जगावे, जीवनातील चढ-उतार कसे हाताळावे हे त्यांना समजत असे.
पुढे सर कालांतराने रिटायर झाले. मीही झपाटल्यासारखे A.M,
M,A with पेंटिंग, ब्रिज कोर्स असे बरेच शिक्षण घेतले. सामान्य लोकांच्या मध्ये चित्रकला हा निम्न प्रतीचा विषय पण तो आपलासा करून आवडीने आपण किती शिकू शकतो हे सरांकडून मी शिकले.
आता सर चाळीतून सोसायटीत राहायला गेले होते वसईला.
त्यांचा पत्ता त्यांच्या ह्युमन फिगर या पुस्तकावर मला मिळाला. मी घरी त्यांना भेटले.
त्यांना म्हटले, माझी विरारला ' कलाविष्कार ' नावाची संस्था आहे.
पंधरा वर्षाखालील पाच विद्यार्थ्यांची मी बाल चित्रकला प्रदर्शन भरवीत आहे. राणी बाग मध्ये भाऊ दाजी लाड संग्रहालयात.
सरांना खूप खूप आनंद झाला. आपल्या सहवासात वाढलेले एक रोपटे किती उंच होत आहे याचा त्यांना खूप अभिमान वाटत होता.
मी विरारला राहत होते . सर वसईला. पुढे त्यांचे प्रत्येक प्रदर्शनांना येणे जाणे वाढू लागले.
त्यांचे मार्गदर्शन फार मोलाचे असे.
अजूनही हे माझे सर आहेत. हे अभिमानाने मी सर्वांना सांगते. त्यांची मनुष्याकृतीवर शाळेत व कॉलेजच्या मुलांसाठी दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. उतार वयात स्वतःचे एकदल प्रदर्शन जहांगीर मध्ये भरवले. आमचे सर बेळगावला गुरुकुल पद्धतीत शिकले. दोन वर्षांपूर्वी त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या वाढदिवशी अजूनही आठवणीने शाळेतील काही विद्यार्थी त्यांना भेटायला घरी जातात.
यावर्षी नाही जमले मला.
*पण अंत करण्यापासून सर मी सांगते जी आज मी आहे ती तुमच्यामुळे*.
*जे विचारधन आहे ते तुमच्यामुळे*.
*जी जिद्द आहे ती तुमच्यामुळे.*
*जी कला आहे ती तुमच्यामुळे.*
*आज माझ्या संसारात पाय घट्ट रोवून उभी आहे ती तुमच्यामुळे.*
*सर तुम्ही तुमच्या आयुष्यात स्वतःच्या मुलांना स्वतंत्रपणे जगू दिले. आपले विचार त्यांच्यावर लादले नाहीत* .
*दोन्ही मुले , सुना, नातवंडे तुमच्यावर खूप प्रेम करतात. तुमच्या स्वभावामुळे हे खूप मोठे ऐश्वर्य तुम्ही प्राप्त केले आहे.*
*शुभम भवतु*.
*सौ. शुभांगी सुभाष फडके*
*सुभाष वि. फडके*
*कमांडर मिलिंद सुभाष फडके*.