15/08/2026
लाल बहादुर शास्त्री प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.
---------------------------------
उदगीर(दि.१५ ऑगस्ट २०२६): येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई द्वारा संचलित लाल बहादुर शास्त्री प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला.मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समिती अध्यक्ष व्यंकटराव गुरमे,प्रमुख वक्ते म्हणून माधव अण्णाराव केंद्रे उपस्थित होते.याप्रसंगी व्यासपीठावर
बालवाडी विभाग अध्यक्षा अंजलीताई नळगीरकर,अर्थ समिती अध्यक्ष गजानन जगळपूरे, सेवानिवृत्त शिक्षक चंद्रचकोर कारखाने,प्रकाश जोशी,मदनेबाई, शांता सुरनर,संतोष जिरोबे,विभाग प्रमुख सुधाकर पोलावार व श्रीमती सुरेखाबाई कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर शाळेच्या वतीने सर्व मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व, देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि विद्यार्थ्यांनी राष्ट्रनिर्माणात बजावायची भूमिका याविषयी प्रमुख वक्ते माधव अण्णाराव केंद्रे यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून प्रेरणा घेऊन शिक्षण, शिस्त, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांचा अंगीकार करावा,असे आवाहन केले.
यावेळी इयत्ता चौथी शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा २०२६ मध्ये जिल्ह्याच्या यादीत क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा पालकांसह मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल उपस्थितांनी कौतुक करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमात शाळेतील पाच विद्यार्थ्यांचे वाढदिवसही उत्साहात साजरे करण्यात आले.विद्यार्थ्यांच्या आनंदात शिक्षक,पालक व मान्यवर सहभागी झाले होते.
दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने अतुल गुरमे यांनी दरवर्षी ₹५०० चे बक्षीस देण्याची घोषणा केली.या स्तुत्य उपक्रमाबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.त्यांच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
अध्यक्षीय समारोप करताना व्यंकटराव गुरमे यांनी विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजून घेत जबाबदार,कर्तव्यनिष्ठ आणि संस्कारक्षम नागरिक बनण्याचा संकल्प करावा,असे आवाहन केले. शाळा ही केवळ ज्ञान देणारी संस्था नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारे संस्कारकेंद्र आहे. विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम,शिस्त, वेळेचे नियोजन आणि सातत्य यांच्या माध्यमातून शैक्षणिक प्रगती साधावी,असे त्यांनी सांगितले.
“देशाचे भविष्य आजच्या विद्यार्थ्यांच्या हातात आहे.उत्तम शिक्षण,उत्तम संस्कार आणि राष्ट्रप्रेम यांच्या बळावरच सक्षम भारताची निर्मिती होईल,”असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्याम गौंडगावे यांनी तर आभार श्रीमती सुरेखाबाई कुलकर्णी यांनी मानले.शाळेतील शिक्षक,विद्यार्थी, पालक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम आनंददायी,शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.कार्यक्रमाची सांगता विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करुन करण्यात आली.
#स्वातंत्र्यदिन