15/08/2026
*ध्वजारोहणासह विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर कलाविष्कारांनी शंकर माध्यमिक आश्रमशाळेमध्ये रंगला कार्यक्रम*
उदगीर : गुणाई शिक्षण प्रसारक मंडळ, कवळखेड द्वारा संचलित शंकर माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, बोरतळा पाटी, उदगीर येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. जीएसपीएम संस्थेचे अध्यक्ष बापूरावजी राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जीएसपीएम संस्थेचे अध्यक्ष बापूरावजी राठोड होते. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेच्या उपाध्यक्षा तथा लातूर जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती ज्योतीताई राठोड, दिगंबर रावजी राठोड, विजयजी राठोड, प्रकाश राठोड, व्ही. के. जाधव, उद्धव राठोड, बाळासाहेब राठोड, पालक प्रतिनिधी गुंडन पिंपळे, गणपत पवार तसेच आश्रमशाळेचे मुख्याध्यापक एस. जी. स्वामी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात इयत्ता अकरावी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी ममता सूर्यवंशी हिने सादर केलेल्या सुरेल स्वागतगीताने झाली. मंचावरील सर्व मान्यवरांचा शाल, पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. वाघमारे जी. एस. यांनी केले.
यावेळी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी नृत्यावर आधारित कवायत सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. ऋषिकेश जाधव, रितेश जाधव, संस्कार भोसले, शुभम केंद्रे, पवित्रा चव्हाण, स्वराज हंबर्डे, प्रणव सिरसे, गौरी टिपराळे, मीनाक्षी शिंदे, आयशा मादळे, वैभव पवार, शेख तमीम आदी विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत प्रभावी देशभक्तीपर भाषणे सादर केली.
चव्हाण वैशाली, चव्हाण पवित्रा, राठोड संध्या, पवार योगेश्वरी व तेलंगे स्नेहा यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर समूह नृत्याने कार्यक्रमात रंगत आणली. तसेच आश्रमशाळेतील विद्यार्थिनींनी सादर केलेल्या लेझीम पथकाने उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या विविध कलाविष्कारातून देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि स्वातंत्र्याच्या मूल्यांचा जागर करण्यात आला.
प्रमुख अतिथी ज्योतीताई राठोड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजून घेत जबाबदार नागरिक म्हणून देशाच्या प्रगतीत योगदान देण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय समारोपात बापूरावजी राठोड यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करून स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून मिळालेल्या स्वातंत्र्याचे जतन करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन प्रा. नेवळे के. बी. यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सांस्कृतिक प्रमुख स्वामी व्ही. एम. यांनी मानले. कार्यक्रमास आश्रमशाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.