28/05/2015
*** जय गंगे ** हर गंगे ***
आम्हां भारतीयांसाठी गंगामैया ही केवळ नदी नाही. ती आमची पूजनीय देवता, आमची जीवनरेखा आहे. आम्हा भारतीयांची ती अस्मिताच आहे. तिच्या नुसत्या सप्रेम स्मरणानेही आमची पापे नष्ट होतात अशी आमची अढळ श्रद्धा आहे. म्हणूनच मृत्युसमयी तिच्या पवित्र जलाचा एक थेंब तरी पोटात जावा यासाठी आम्ही भारतीय धडपडतो. तिचे आम्हाला इतके प्रेम आहे की आम्ही प्रत्येक छोट्या नदी, ओहोळालाही गंगारूपच मानतो.
गंगामैयाचा वार्षिक उत्सव " गंगा दशहरा " हा ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा ते दशमी असा साजरा होतो, दशमीला गंगेची जयंती असते. या दहा दिवसात गंगेचे स्मरण, पूजन, वंदन, स्नान आणि स्तुती केल्याने दहा प्रकारची कायिक, वाचिक आणि मानसिक पापे नष्ट होतात. आज गंगा दशहरा महोत्सवातील दहावा, भगवती श्रीगंगामैयाचा आविर्भाव दिवस. ज्येष्ठ शुद्ध दशमीला हस्त नक्षत्रावर रविवारी माध्यान्हसमयी गंगा पृथ्वीवर प्रकटली.
भगवान श्रीज्ञानेश्वर माउलींचेही गंगामैयावर नितांत प्रेम आहे. म्हणूनच त्यांनी ज्ञानेश्वरीत ठिकठिकाणी गंगेसंबंधी अतिशय सुंदर उपमा दिलेल्या आहेत. या दशहरा महोत्सवानिमित्त आपण माउलींच्या काही निवडक मनोहर उपमांच्या माध्यमातून भगवती श्रीगंगेची ' शब्दपूजा ' बांधून हरिपदपाद्य गंगातीर्थाने पुण्यपावन होऊया.
भगवान श्रीकृष्णचंद्र प्रभूंनी गीतेच्या दहाव्या अध्यायात आपल्या पंच्चाहत्तर विभूती सांगितलेल्या आहेत. त्यात ते सर्व वाहणा-या ओघांमध्ये गंगा ही माझी विभूती आहे असे म्हणतात.
भगवान श्री माउली त्यावर भाष्य करताना म्हणतात,
पैं समस्तांही वोघां - ।
मध्यें जे भगीरथें आणिली गंगा ।
जन्हूनें गिळिली मग जंघा - ।
फाडूनि दिधली ।।
ज्ञाने. १०.३१.२५६ ।।
ते त्रिभुवनैकसरिता ।
जान्हवी मी पांडुसुता ।
जळप्रवाहा समस्तां - ।
माझारीं जाणें ।।
ज्ञाने.१०.३१.२५७ ।।
समस्त जळ प्रवाहांमध्ये, राजा भगीरथाने मोठी तपश्चर्या करून आणलेली आणि राजा जन्हूने गिळून आपली मांडी फाडून बाहेर काढलेली, स्वर्ग-मृत्यू-पाताळ अशा तिन्ही लोकांना पावन करणारी भगवती गंगा ही माझीच विभूती जाण, असे भगवंत अर्जुनाला सांगतात.
भगवान महाविष्णूंनी बळीराजाच्या उद्धारासाठी वामन अवतार धारण केला. त्यावेळी बळीच्या यज्ञशाळेत प्रकट होताना त्यांच्या डाव्या पायाच्या अंगठ्याने ब्रह्मांडाचे कवच भेदले गेले आणि ब्रह्मांडाच्या बाहेरची जलधारा त्यांच्या चरणांना स्नान घालून आत आली. त्यांच्या चरणांवर लावलेल्या केशरामुळे तिचा रंग लाल झाला.
हीच ती त्रिलोकपावनी गंगा, तिलाच ' भगवत्पदी ' देखील म्हणतात. या धारेचा नुसता स्पर्श जरी झाला तरी संसारातील सर्व पापे नष्ट होतात.
या भगवती गंगेच्या पावन जलाला, भक्तश्रेष्ठ ध्रुव, सप्तर्षी, सनकादिक महात्मे , ' तपश्चर्येची आत्यंतिक फलश्रृती ' म्हणून मस्तकी धारण करतात. ही गंगानदी स्वर्गलोकातून मग हिमालयावर उतरून भारतवर्षाला पावन करीत समुद्राला जाऊन मिळते.
सर्वश्रेष्ठ तपोनिधी भगवान शिवशंकर देखील , आपल्या आराध्य भगवान विष्णूंचे चरणोदक म्हणून या गंगामातेला नित्य आपल्या मस्तकावर धारण करतात.
भगवान श्रीमाउली आदिनाथ भगवान शिवांचा गौरव करताना म्हणतात की,
करितां तापसांची कडसणी ।
कवण जवळां ठेविजे शूळपाणि ।
तोही अभिमान सांडूनि पायवणी ।
माथां वाहे ।।
ज्ञाने.९.२५.३७२ ।।
तपश्चर्या म्हणावी तर शिवशंकरांच्या तोडीचा दुसरा कोणी नाही जगात, पण तेही अतीव प्रेमादराने आपल्या देवाचे चरणतीर्थ म्हणून गंगामैयाला मस्तकी धारण करतात.
अशाप्रकारे थोर थोरांनी नित्य मस्तकी धारण केलेल्या पुण्यपावन गंगामैयाचे स्मरण करीत आपणही तिचे तीर्थ मस्तकी धारण करून , आमचीही हरिचरणी दृढ भक्ती निर्माण होवो, अशी तिच्या चरणी सप्रेम प्रार्थना करूया.
भगवान श्रीमाउली म्हणतात,
कां गौतमाचेनि मिषें ।
कळिकाळ ज्वरितोद्देशें ।
पाणिढाळ गिरीशें ।
गंगेचा केला ।।
ज्ञाने.१८.७८.१६८९ ।।
गौतम ऋषींकडून चुकून गोहत्या झाली, त्याचे प्रायश्चित्त म्हणून इतर ऋषींनी त्यांना गंगेला पृथ्वीवर आणण्याची आज्ञा केली. गौतमांनी भगवान शिवांना प्रसन्न करून परमपावनी गंगा पृथ्वीवर आणली. त्यावेळी खरेतर कळिकाळ रूपी तापाने आजारी पडलेल्या सर्व जीवांच्या कळवळ्याने भगवान शिवांनी गौतमांचे निमित्त करून गंगा पाठवली.
गंगेच्या दर्शन, स्मरण, वंदन, पूजन, तीर्थपान, स्तवन आणि स्नान या सात प्रकारच्या उपासनेने सुख-समाधान तर लाभतेच पण दुर्लभ असा मोक्षही प्राप्त होतो. म्हणूनच भगवान श्रीमाउली म्हणतात,
जोडे अमृताची सुरसरी ।
तैं प्राणांतें अमर करी ।
स्नाने पाप ताप वारी ।
गोडीही दे ।।
ज्ञाने.१७.१५.२१९।।
गंगेच्या सेवेने हरिभक्तीची खरी गोडी, आवडही निर्माण होते, असा माउलींचा अभिप्राय आहे.
जगन्नाथ पंडितांची ' गंगालहरी ' आणि आद्य शंकराचार्यांची दोन गंगास्तोत्रे फार प्रसिद्ध आणि सुंदर आहेत, सर्वांनी आवर्जून वाचावीत.
आज दशहरा म्हणून भगवंतांच्या भक्तिगंगेला सादर वंदन करून आपण हरिभक्तीच्या प्राप्तीसाठी प्रेमादरपूर्वक प्रार्थना करूया !!
जय गंगे जय मातर्गंगे
जय जय जान्हवी करुणापाङ्गे ॥
( अशा माहितीपूर्ण पोस्ट नेहमी वाचण्यासाठी कृपया हे पेज लाईक करावे ही विनंती.
https://www.facebook.com/pages/Dr-Govindkaka-Upalekar-Bhakta-Parivar/139539956212450)