
एक स्वलिखित कविता....
अशाच एका चांदण्या रात्री.......कविता Information and compilation
This page will update information related to education and also different type of videos helps learners.
Operating as usual
एक स्वलिखित कविता....
अशाच एका चांदण्या रात्री.......कविता Information and compilation
अपयशाकडून ......यशाकडे
नुकताच '12th फेल' हा सिनेमा पाहिला . एक विद्यार्थी आपल्या परिस्थितीवर मात करून कसा आयपीएस अधिकारी बनतो ,त्याच्या संघर्षाची कहाणी सांगणारा हा चित्रपट आहे.आयपीएस अधिकारी मनोज शर्मा यांच्या खऱ्या आयुष्यावर आधारित असा हा अपयशाकडून यशाकडे नेणारा चित्रपट खूप काही सांगून जातो.
या स्पर्धेच्या युगात कितीतरी असे विद्यार्थी आहेत त्यांना अपयशाला सामोरे जावं लागतं .अशावेळी अपयशाला न घाबरता ,न डगमगता, पुन्हा सुरुवात केली पाहिजे . अशक्य असं काही नसतं .आपल्यासमोर अशी कित्येक उदाहरणं आहेत की जे अपयश येऊनही ते थांबले नाहीत तर जिद्दीने लढत राहिले. अगदी आईन्स्टाईन पासून ते अंबानी पर्यंत ....असे अनेक शास्त्रज्ञ, उद्योगपती,तत्त्वज्ञ ,कवी, लेखक, चित्रकार ,कलावंत यांनाही अपयशाने गाठलेलं आहे. परंतु आज आपण या सर्वांना नावाजलेलं पाहतो कारण त्यांनी परिस्थितीवर मात केली, संघर्ष केला आणि आपली स्वप्न पूर्ण केली. यांचा आदर्श प्रत्येक विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे.
कितीतरी विद्यार्थी असे ही आहेत की जे अपेक्षा आणि निराशा यांच्या चक्रव्हूवात अडकलेले पहायला मिळतात. पालकांच्या अपेक्षा, स्वतःच्या स्वतःकडून असलेल्या अपेक्षा ,समाजाच्या त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा आणि त्यात अचानक समोर आलेलं अपयश विद्यार्थ्यांना निराशेच्या दरीत नेऊन ढकलतं .अशावेळी पालकांनीही तेवढ्या जागृकतेने आपल्या पाल्याच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. एकदा हरले म्हणजे जिंकूच शकत नाही असं न मानता त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे.पाल्याची नक्की काय स्वप्न आहेत ती जाणून घेऊन त्यांना मार्ग दाखविला पाहिजे .काही पालक असतात जे आपली स्वप्न आपल्या पाल्यावर जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न करतात.त्यात जर त्या पाल्याला अपयशाने गाठलं तर मात्र तो स्वतः ला दोषी मानत राहतो.ज्याचे कधी कधी गंभीर परिणाम पहायला मिळतात.
मला तर असं वाटतं की अपयश कधीही पाहिलं नाही अशी माणसं शोधूनही सापडणार नाहीत. ज्याला अपयश आलेलं असतं त्यांच्याकडे दोनच मार्ग असू शकतात एक अपयशासमोर हार मानणं आणि दुसरं अपयशाला सामोरे जाणं यातला दुसरा पर्याय निवडणारे विद्यार्थी यश नक्कीच गाठतात आणि जे पहिला पर्याय निवडतात ते निराशेला आमंत्रण देऊन आयुष्याची होळी करतात. जेव्हा कधी वाटेल की आपण हरत आहोत,आपल्या पदरी अपयश पडत आहे अशा वेळी प्रत्येक विद्यार्थ्याने' 3R ' चे नेहमी पालन केले पाहिजे आणि ते म्हणजे Restart, Research, Responsible. Restart म्हणजे पुन्हा नव्याने सुरुवात करा , Research म्हणजे आपल्याला काय मिळवायच आहे आणि कसं मिळवायच आहे याचा शोध घ्या, Responsible म्हणजे जबाबदारीची जाणीव ठेवा .या '3R' च पालन केल्यास विद्यार्थ्याला त्याच्या ध्येयापासून कोणीच लांब ठेवू शकत नाही .लक्षात ठेवा इतिहास तेच घडवतात जे संकटांना सामोरे जातात. हारून ,घाबरून ,निराश होऊन, परिस्थितीला दोष देत बसणारी लोक ही कमकुवत असतात .संधी येण्याची वाट बघू नका तर, संधी शोधा आणि त्या संधीच सोनं करण्याची जिद्द ठेवा. बघा यश कसं तुमच्या पायाशी लोटांगण घालेल . जिद्द ,चिकाटी आणि संघर्ष करण्याची तयारी असेल तर यश तुमचच आहे .
अशावेळी सुरेश भट यांची ही कविता खूप काही सांगून जाते...
विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही ...
पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही...
छाटले जरी पंख माझे ,पुन्हा उडेन मी...
अडवू शकेल मला, अजून अशी भिंत नाही ...
आपण ठरवलेल्या ध्येयाच्या मार्गात अनेक अडथळे येतील .परंतु स्वतःवर विश्वास ठेवा . हार मानू नका ,प्रयत्न करा एक दिवस तुमचा नक्की असेल .आलेल्या अपयशाने प्रवास संपवू नका तर त्याबरोबर जी अनुभवाची शिदोरी मिळाली आहे तिला सोबत घेऊन प्रवासाची नवीन सुरुवात करा.
- जान्हवी भोसले
Repost....
नव्या अध्यायाची ......नवी सुरुवात
Happy new year.....
I am ready 😎...... Welcome 2024
हार मानू नकोस.....
येतील संकटे हजार,
पण तू घाबरू नकोस.....
एकटा पडलास तरी चालेल,
पण तू कोणासमोर झुकू नकोस.....
टोचतील काटे बेसुमार,
पण तू थांबू नकोस.....
रक्तबंबाळ झालास तरी चालेल,
पण तू लाचार होऊ नकोस.....
घायाळ करतील दुःखाच्या झळा ,
पण तू डगमगून जाऊ नकोस.....
नाही मिळालं सुख तरी चालेल ,
पण तू ,त्याच्या पाठी धाऊ नकोस.....
असह्य करतील या वेदना ,
पण तू धीर सोडू नकोस.....
आलं तर येऊ दे ना रडू,
पण तू खचून जाऊ नकोस.....
बेहाल झाले तरी बेहत्तर,
पण तू मागे वळून बघू नकोस.....
एक दिवस तुझा नक्की येईल ,
पण तो पर्यंत ,तू हार मानू नकोस.....
- काव्यस्पर्श
अडगळीतल्या कविता....
कितीतरी दिवस झाले,
अशाच पडून राहिल्या होत्या त्या...
एका कोपऱ्यात शांत,
दमल्या असतील बिचाऱ्या...
म्हणून मी ही लक्ष दिलं नाही फारसं.
किती पावसाळे...किती सुख - दुःख
पाहिले होते त्यांनी...
साऱ्या आठवणींच्या साक्षीदार होत्या त्या...
कधी शब्दांनी गुरफटून गेल्या...
कधी भावनांनी होरपळून निघाल्या...
पण कधी विसावल्या नाहीत क्षणभर.
म्हणूनच कदाचीत ,मी ही आराम करू दिला त्यांना...
पण आज वहीची पाने ओलांडताना,
हलक्याशा आठवल्या ...
पेनाची पकड घट्ट करत ,
त्यांना अडगळीतल्या खोलीतून बाहेर काढत,
धूळ झटकून ...निरखुन पाहिलं त्यांच्याकडे...
तर पुन्हा तश्याच्या तश्या सापडल्या...
कशी काय विसरले होते मी त्यांना?
माझंच मला कळेनासं झालं.
धूळ खात पडलेल्या त्या अडगळीच्या खोलीतून
त्यांना विश्वासानं बाहेर काढलं
त्या ही मग खुश झाल्या...
माझ्याकडे आश्वासक नजरेने पाहू लागल्या...
नव्या स्वप्नांच्या वाटा दाखवत,
पुन्हा एकदा माझ्या आयुष्याचा भाग झाल्या...
- काव्यस्पर्श
लोकं काय म्हणतात...
मनासारखं जगलो तर उनाड म्हणतात,
मनाविरुद्ध जगलो तर भ्याड म्हणतात,
जगण्यावरही आपल्या आक्षेप घेतात,
मग कशाला विचार करायचा
की लोकं काय म्हणतात...
चांगलं वागलो तरी पाठीमागून हसतात,
वाईट वागलो तरी तोंडं मुरडतात,
कसंही वागा,तरी नावच ठेवतात,
मग कशाला विचार करायचा
की लोकं काय म्हणतात...
सुखी दिसलो तर यांचे डोळे खुपतात,
दुखी असलेले बघून लांबून मजा घेतात,
गरजेच्या वेळी बरोबर पळून जातात,
मग कशाला विचार करायचा
की लोकं काय म्हणतात...
यशाच्या शिखरावर असलो की मागे पाय ओढतात,
पराभवाने खचलेलं बघून अजून खड्डा करतात,
काहीही करा ,तुमच्या आयुष्यात नाक खुपसतात,
मग कशाला विचार करायचा
की लोकं काय म्हणतात...
खऱ्या अडचणींमध्येच तर आपले-परके समजतात,
शेवटपर्यंत फक्त आपलीच माणसं साथ देतात
आपली माणसं नसतात ,म्हणूनच तर ती लोकं असतात
मग कशाला विचार करायचा
की लोकं काय म्हणतात...
- काव्यस्पर्श
स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.💐💐
हळुवार क्षणातील... हळुवार आलेला....आठवणींचा पाउस...
पाऊस ...🌧️⛈️
हिरवे रान चोहीकडे,
असेच पाहत रहावे
पावसाची वाट पाहत,
थोडावेळ बसावे
वाऱ्याची चाहूल लागता,
मोहरुनी जावे
पावसाच्या सरींना,
अंगावर झेलावे
सुगंध हा मातीचा,
एकदा घेऊन पहावे
गोंधळलेला मनाला,
शांत करीत जावे
पावसाच्या थेंबाने,
अंग-अंगाला स्पर्श करावे
अलिंगन देता स्वतःला ,
उबदार मन हे व्हावे
डोक्यातील सगळे विचार,
पावसाने भिजून जावे
नवी पालवी फुटून ,
जगायला सुरू करावे
नवी उमेद घेऊन
पुन्हा एकदा सज्ज व्हावे
येणाऱ्या संकटाकडे
नवी संधी म्हणून पहावे
आलाच परत कंटाळा
तर पुन्हा पावसात भिजावे
शरीराबरोबर मनालाही
चिंब भिजू द्यावे
- जान्हवी
तिचं अस्तित्व....
कधी अबला बनून सहन केलं
कधी सबला बनून लढा दिला
स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी
प्रत्येक प्रहार सहन केला
कधी झाशीची राणी बनून लढले
कधी कल्पना चावला बनून उडले
पण समाजाच्या बंधनाने मात्र
कमजोर स्त्री म्हणून हिणवले
कधी सावित्री बनून मुलींना शिकवले
कधी सिंधुताई बनून अनाथांची माय झाले
तरीही हे नको करू, असं नको वागू सांगत
आपल्याच माणसांनी पाठीमागे खेचले
कधी निस्वार्थी बनून आईवडिलांसाठी जगले
कधी अर्धांगिनी बनून संसारासाठी झटले
पण आम्ही नसतो तर तुझं काय झालं असतं?
याची सगळेजण सतत जाणीव करून देत राहिले
कधी पत्नी , कधी आई
कधी बहीण,कधी मुलगी
कित्येक भूमिका साकारत गेले
कुटुंबातल्या प्रत्येकाची मन जिंकण्यासाठी
स्वतःच्या छोट्या- छोट्या स्वप्नांना मारत गेले
खूप रडले ,जिवाच्या आकांताने ओरडले,
वेळप्रसंगी विरोधही केला
चौकट तोडून बाहेर पडण्याचा नाहक
प्रयत्नही केला
प्रत्येकवेळी स्वतःला नव्याने सिद्ध करत राहिले
बस आता नको मला कोणाचा आधार,
नको ते सात्वनांचे बोल
नको तुमची खोटी प्रतिष्ठा,
नको तो सुख्या भावनांचा खेळ
जास्त काहीच नको मला ,
फक्त माझी मला ओळख द्या
त्यागाची मूर्ती बनून नाही तर
स्वच्छंदी बनून जगू द्या
- जान्हवी
मराठी राजभाषा गौरव दिन
महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच सर्वांचे लाडके 'कुसुमाग्रज' यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिन साजरा करण्यात येतो.
समिधाच सख्या या,
त्यात कसा ओलावा
कोठून फुलापरी वा,
मकरंद मिळावा
जात्याच रुक्ष या,
एकच त्या आकांक्षा
तव आंतर अग्नी,
क्षणभर तरी फुलावा
या त्यांच्या कवितेतील काही ओळी.यावरूनच त्यांच्या शब्द रचनेतील प्रतिभा लक्षात येते. कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या कविता, कथा, कादंबऱ्या, नाटक यांचे साहित्य जगातील योगदान विपुल आहे . त्यांच्या कविता मंत्रमुग्ध करणारे आहेत. त्यांचे उत्कृष्ट लेखन व सुंदर काव्यरचना यामुळे ते महाराष्ट्राचे भूषण ठरले आहेत .त्यांनी लिहिलेली 'विशाखा' कादंबरी असो वा 'नटसम्राट' सारखे दर्जेदार नाटक असो त्यांच्या लेखणीने लाखो जणांच्या हृदयावर राज्य केले .त्यांचे हे मराठी साहित्यातील योगदान लक्षात घेता त्यांच्या जन्मदिनी मराठी दिन साजरा केला जातो. तसेच त्यांच्या प्रेरणेने आपल्या पुढील पिढीने मराठी भाषेचे संवर्धन करावे हा महत्त्वाचा हेतू हा दिन साजरा करण्याच्या मागे आहे.
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म पंथ जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
मराठी भाषेचा सारखी सुंदर, सुसंस्कृत आणि गोडवा असणारी दुसरी भाषा कोणती नाही. भारताच्या इतिहासात मराठी संस्कृतीचा वारसा खूप मोठा आहे .मराठी भाषा ही मूळ आर्यांची भाषा. साधारण पंधराशे वर्षांचा इतिहास या भाषेला लाभलेला आहे. मराठी भाषेचा प्रवास हा वळणावळणाने पुढे सरकत गेला .प्राचीन मराठी, ज्ञानदेवांची मराठी आणि आजची आधुनिक मराठी ही तीन मोठी वळणे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे शूरवीर, ज्ञानेश्वर, तुकाराम यांसारखे संत, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांसारखे अनेक कलाकार याच मराठी मातृभूमीत जन्माला आले. मराठी भाषेचा उद्धार करण्याचे काम त्यांनी केले .
काळाप्रमाणे मराठी भाषेतही बदल होत गेले. भारताच्या विविध भागात ,स्थळा नुसार मराठी भाषेचा विकास होत गेला .कित्येक वेळा माझ्या मराठी भाषेवर आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला. परंतु ती कोणासमोर वाकली नाही की झुकली नाही .
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदाधं तख्त फोडते मराठी
आज मराठी भाषा दिन साजरा करताना खूप अभिमान वाटतो आणि आनंदही होतो. पण कुठेतरी असं वाटतं की माझ्या माय मराठी भाषेला लोक विसरत चालले आहेत .इंग्रजी सारख्या इतर भाषांचे प्रभुत्व वाढत जाताना दिसत आहे .मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी झटावे लागत आहे .ज्या मायबोलीत आपण जन्माला आलो ,त्या माय मराठीचा अभिमान प्रत्येकालाच असला पाहिजे .फक्त मराठी दिन साजरा करून उपयोग नाही तर मराठी भाषेचा विकास व्हावा म्हणून प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत .मराठी असल्याचा अभिमान बाळगला पाहिजे .
माझ्या मराठी मातीचा
लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या
दऱ्याखोऱ्यातील शिळा
माझ्या मराठी भाषेचा अभिमान बाळगणार्या माय मराठीच्या सर्व लेकरांना मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा .
जय महाराष्ट्र!
- सौ. जान्हवी भोसले
मराठी दिनानिमित्त एक कविता......
-: माझी राजभाषा मराठी :-
अभिमान आमचा मराठी
स्वाभिमान आमचा मराठी
नसांनसात भिनली फक्त
माझी मायबोली मराठी
गर्व आमचा मराठी
सर्वस्व आमचा मराठी
सर्वांच्या हृदयावर राज्य करते
माझी मातृभाषा मराठी
इतिहास आमचा मराठी
कर्तव्य आमचे मराठी
भारत देशात सर्वात प्रिय
माझी बोलीभाषा मराठी
संस्कृती आमची मराठी
समृद्धी आमची मराठी
संतांचे महात्म्य लाभलेली
माझी ज्ञानभाषा मराठी
आन आमची मराठी
शान आमची मराठी
सर्वस्व अर्पण तुझ्या पायाशी
माझी राजभाषा मराठी
- जान्हवी
खूप दिवसांनी पोस्ट केलेय एक नवीन कविता......
नवी आशा..........
अलगद एका जागी,
विसावून बसले काही क्षण
तुझ्या आठवणींच्या वेलीला,
बिलगून गेले माझे मन
मोहक या सांजवेळी ,
तुझा भास व्हावा
ऊन सावलीच्या खेळात,
तुही भाग घ्यावा
गुलाबी ही प्रीती,
सर्वदूर पसरावी
श्वास बानूनी तुझा,
मी न माझी रहावी
मंद धुंद वाऱ्याचा ,
तो हलकासा स्पर्श
रोम रोम मोहरोनी,
आसमंत दाटे हर्ष
सुगंध या फुलांचा,
दरवळे चारी दिशा
पुन्हा तुला भेटण्याची
जागवी नवी आशा......
- जान्हवी
वाट ही माझ्या एकटीची.....
वाट ही माझ्या एकटीची
वेड्यावाकड्या त्या वळणांची
काटेरी कुंपणे तूडवीत जाईन ...
बंद दरवाजे उघडीत जाईन....
ना गरज कुणाच्या संगतीची
ना भीती त्या नियतीची
स्वतःवर विश्वास ठेवत जाईन ...
बंद दरवाजे उघडीत जाईन....
कैफियत असे रीत सांभाळायची
हसत हसत आयुष्य जगण्याची
जगण्यावर उत्तर शोधत जाईन....
बंद दरवाजे उघडीत जाईन ....
आठवण येता जुन्या क्षणांची
मनी रुजलेल्या पाउल खुणांची
अडखळणाऱ्या पावलांना सावरत जाईन ....
बंद दरवाजे उघडीत जाईन....
- जान्हवी
------- चंद्र -------
कधी कोजागिरीचा चंद्र तू
कधी ईद चा चांद तू
कधी काळोख्या रात्रीची ज्योत तू
कधी बहकलेल्या मनाची साद तू
तू स्वप्नांचा साक्षीदार
तू नववधूचा आधार
तु चांदण्यांची उभारी
तु कलेची आकृती
कधी प्रेमीयुगुलांचे गीत तू
कधी चकोर पक्षासाठी मित तू
कधी लहान मुलांचा चांदोबा तू
कधी स्त्रीचा दागिना तू
तू विखुरलेल्या भावनांची साक्ष
तू कवीच्या कल्पनेचे विश्व
तू बहरलेल्या यौवनाची आस
तू हरवलेल्या जीवनाचा श्वास
कधी ढगाळलेल्या नभाची लाली तू
कधी सौंदर्याच्या गालावरची खळी तू
कधी अथांग सागराची शुभ्रता तू
कधी डोळ्यांना भावणारी शीतलता तू
तू कवेतल्या प्रेयसीचे लाजणे
तू खळखळणाऱ्या लाटांचे चांदणे
तू असिम प्रेमाची आठवण
तू गुंतलेल्या मनाची साठवण
कधी तू ढगाळलेला
कधी तू डागाळलेला
मात्र प्रत्येक जण इथे
तुझ्याच साठी आसुसलेला
- जान्हवी
- पुस्तकभिशी -
वाचनाची आवड असल्याकारणाने फेसबुक वरील 'वाचनवेडा' या ग्रुपला मी सहज फॉलो केलं. त्यावेळी असं लक्षात आलं , बरेच वाचक या ग्रुपला जॉईन आहेत. प्रत्येक जण आपापल्या वाचनाचा अनुभव या ग्रुपच्या माध्यमातून शेअर करीत असतो. असेच एकदा कोणाची तरी पोस्ट वाचताना ' पुस्तकभिशी ' या उपक्रमाबद्दल माहिती झाली. भिशी म्हटल्यानंतर थोडंफार लक्षात आलं ,पण नक्की हा उपक्रम कसा राबवला जातो याची उत्सुकता निर्माण झाली. पोस्टवरील कमेंट वाचल्यावर हा उपक्रम रुपालिताई राबवतात असं समजलं. त्यात त्यांच्या नंबर ही शेअर केलेला होता. म्हटलं बघूया तर काय आहे हा उपक्रम म्हणून त्यांना whatsapp ला मेसेज केला .सदरच्या पुस्तकभिशी या उपक्रमाची संपूर्ण माहिती मला whatsapp च्या माध्यमातून मिळाली.
'पुस्तकभिशी' हा उपक्रम ऑनलाइन आहे. यामध्ये प्रत्येक आठवड्याला 100 रुपये ऑनलाइन भरायचे असतात .त्यानंतर प्रत्येक आठवड्यामध्ये काही जणांचे नंबर काढले जातात .ज्यांचा नंबर लागलेला असतो त्यांनी आपल्या आवडीच्या काही पुस्तकांची यादी गुगल फॉर्मच्या माध्यमातून द्यायची असते .काही दिवसातच तुम्हाला तुमची पुस्तके कुरियर ने ,तुम्ही दिलेल्या पत्त्यावर पाठविली जातात.
उपक्रमाची थोडक्यात रूपरेषा तर मला समजली होती ,पण एक तर हा उपक्रम ऑनलाईन होता .त्यात माझं कोणीही ओळखीचं नाही. फक्त फेसबुक वर लोकांचे अनुभव वाचलेले तेवढेच. शेवटी म्हटलं बघूया तर विश्वास ठेवून .असं करून त्यांचा ' वाचनवेडा पुस्तकभिशी ' हा Whatsapp चा ग्रुप जॉईन केला. त्यावेळी समजले की ,हा त्यांचा अकरावा ग्रुप आहे. माझ्यासारखे कित्येक वाचन वेडे या ग्रुप मध्ये सहभागी झाले आहेत.काही जणांना एकदम पुस्तके खरेदी करता येत नाहीत किंवा काहींना एकदम पैसे खर्च करणे कठीण जाते अशावेळी हा उपक्रम नक्कीच मार्गदर्शक ठरतो.
जेव्हा माझा पुस्तकांचा खजिना मला मिळाला, तेव्हाचा माझा आनंद खरच खूप मोठा होता . 'पुस्तकभिशी ' हा उपक्रम चालवणार्या रूपाली ताईंचे खरंच खूप आभार. वाचनाची संस्कृती जोपासण्याचे कार्य या उपक्रमाच्या आधाराने होत आहे . या उपक्रमास खूप खूप शुभेच्छा!
मैत्री........
मना मनात रुजते ती मैत्री...
हृदयावर राज्य गाजवते ती मैत्री...
बंध झुगारून देते ती मैत्री...
संकटात सावरते ती मैत्री...
प्रेमाच्या अगोदर असते ती मैत्री...
प्रेमा नंतरही उरते ती मैत्री...
नातं संपतं तिथे उभी राहते ती मैत्री...
निरंतर सोबत चालते ती मैत्री...
विश्वासावर विश्वास ठेवते ती मैत्री...
भावनेच्या पुरात वाहते ती मैत्री...
आधाराला खांदा देते ती मैत्री...
हक्काने जवळ घेते ती मैत्री...
कसलीही उपमा नसते ती मैत्री...
हाक न मारता ओ देते ती मैत्री...
अपेक्षा न ठेवता साथ देते ती मैत्री...
अशी मैत्रीच्याही पलीकडची
आपली ही मैत्री............
- जान्हवी भोसले
आभार....
जन्म दिला आई बापाने
अंगाखांद्यावर खेळवलं
न मागता सर्व देऊन
लाडाने वाढवलं
मित्र-मैत्रिणींच्या संगतीने
खडतर जीवन, सुकर झालं
दुःखी झालेल्या मनाला
या मैत्रिणीनेच तर सावरलं
योग्य मार्ग दाखवत
गुरूंनी कौशल्याने हाताळलं
आयुष्याचे धडे गिरवताना
अनुभवानेही खूप शिकवलं
जोडीदाराच्या संगतीनं
आयुष्य मोहरून गेलं
संसाराच्या वेलीला
दोन फुलांनी सजवलं
आई वडिलांचे प्रेम
सासू-सासऱ्यांच्या रुपानं मिळालं
तुझी स्वप्न पूर्ण कर म्हणत
माझ्या स्वप्नांना फुलवलं
सुखदुःखाच्या खेळामध्ये
आयुष्याने खूप काही दिलं
प्रेम ,स्नेह, विश्वासाने
माझं सामर्थ्य वाढवलं
ऋणी आहे त्या सर्वांची,
ज्यांनी मला घडवलं
आजचा सुखी दिवस पाहण्याच्या
लायक मला बनवलं
- जान्हवी भोसले
गणित म्हणजे.....
गणित, गणित, गणित म्हणजे तरी नक्की काय?
आकडेमोड करण्यासाठी पाढ्यांचा
लयबद्ध सुर म्हणजे गणित की,
गुणाकार ,भागाकार ,बेरीज आणि वजाबाकी
यांची डोकेदुखी म्हणजे गणित
शून्यापासून अनंता पर्यंतच्या संख्यांचा
प्रवास म्हणजे गणित की,
भौमितिक आकृत्यांच्या रचनेचे
सौंदर्य म्हणजे गणित
ऋण, धन, व्यस्त संख्यांचा
उलटासुलटा डांस म्हणजे गणित की
प्रमेय आणि त्याची ती सिद्धता
यांनी साध्य केलेलं प्रेम म्हणजे गणित
लसावि आणि मसावि यांच्यातला
गोड गोंधळ म्हणजे गणित की
आलेखाच्या स्तंभांची आपापसातील
चढाओढ म्हणजे गणित
खरं सांगायचं झालं तर ..
या सर्वांचं आपल्या जीवनाशी असणारं
अतूट नातं म्हणजे गणित
- जान्हवी भोसले
प्रत्येक स्त्री च्या मनातील कविता.
अधुरी कविता.....
विचार करीत होते ,एखादी कविता लिहावी .
मनातल्या भावनांना ,शब्दांची जोड मिळावी.
नक्की विषय कोणता निवडावा?
प्रश्न मनात पहिला आला.
स्तब्ध डोळ्यांसमोरून माझ्या,
अनुभव सरसर धावत गेला.
अरे बापरे!म्हणत मी
डोक्यालाच हाथ लावला .
सुखं आणि दुःखाचा
गुंताच जणू समोर आला.
काही मनातले भाव तर,
शब्दांशिवाय तसेच राहिले होते.
ओठांवर न येता ते,
अश्रूंच्या मदतीने धावले होते.
स्वतः च्याच हृदयात डोकावताना,
वेगळीच भीती वाटत होती.
दाबून ठेवलेल्या ईच्छाना,
आशेची वाट दिसत होती.
कोणाच्या तरी हाकेने,
दचकून भानावर आले.
हृदयाने तर माझ्या, लगेच
आपले दरवाजे बंद केले.
बरं झालं बाई ! म्हणत
सोडून दिला कवितेचा नाद.
मनातल्या वादळांना मोकळं करून,
कशाला वाढवू उगीच वाद.
- जान्हवी भोसले
Do like, subscribe and share my youtube channel 'Learning Zone'
Std- 9th ,Sub- Maths 1
https://youtu.be/rP7mfbYnlu8
Sets Introduction || Definition and Methods of writing Sets || Std 9th, Maths 1|| This video helps students to understand concept of sets. You will understand how to recognize set. Also Students will understand Methods of writi...
होय मी तुमची शाळा बोलते l शाळेचे आत्मकथन l शाळेवरील कविता l जानवी भोसले l होय मी तुमची शाळा बोलते .....हे शाळेचे आत्मकथन कवितेच्या स्वरूपामध्ये सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये कोरो.....
एक स्वरचित कविता.....
ओळखलं का मला ? मी तुमची शाळा बोलतेय !
बघता - बघता वर्ष होऊन गेलं,
तुमची माझी भेट नाही
तुमचा तो वर्गातला गोंधळ नाही,
की तुमची अभ्यासाची चंगळ नाही,
तुमच्या साऱ्या आठवणींमध्ये मी हरवून जातेय,
होय बाळांनो ,मी तुमची शाळा बोलतेय !
माझा दिवस तुमच्या पासून सुरू होऊन,
तुमच्यापर्यंत संपत होता .
तुमच्या अभ्यासाच्या गडबडीत ,
माझाही वेळ धावत होता.
आता दिवसही उदास राहतो आणि रात्र ही रडते
होय बाळांनो, मी तुमची शाळा बोलतेय !
सकाळच्या तुमच्या प्रार्थनेने ,
सारे वातावरण कसे प्रसन्न व्हायचे.
तुमच्या त्या किलबिलाटाने ,
माझेही मन भरून जायचे .
आता तुमच्या एका- एका बोला साठी मी तरसतेय,
होय बाळांनो, मी तुमची शाळा बोलतेय !
तुम्हाला शिक्षकांचे शिकवणे ,
आणि तुमचे ते शिकणे यातच मी रमत होते.
शिक्षक वर्गात नसताना तुम्ही घातलेला दंगा,
सारं काही पाहत होते .
आता या रिकाम्या भिंतीकडे ,
मी एकटक नुसती बघत बसतेय,
होय बाळांनो ,मी तुमची शाळा बोलतेय !
आता तर माझ्या या भिंती सुद्धा सुन्न झाल्या
आणि फळा ही काही बोलत नाही.
धूळ खात पडलेल्या बेंच कडे ,
मलाही आता पाहवत नाही.
रिकामी ती वाट सुद्धा, तुमच्या पावलांसाठी झुरतेय,
होय बाळांनो ,मी तुमची शाळा बोलतेय !
मला माहित आहे ,
तुम्हाला ही माझी आठवण येत असणार ,
कधी एकदा शाळेत जातोय,
याची तुम्हीही वाट पाहत असणार,
याच आशेवर तर, मीही दिवस ढकलतेय,
होय बाळांनो, मी तुमची शाळा बोलतेय !
तुमच्या आठवणींमध्ये माझे
हे ही दिवस जातील ,
तुम्ही, तुमचे शिक्षक, सारेजण मला भेटतील,
तोपर्यंत मात्र तुम्ही घराबाहेर पडू नका,
तुमच्या सोबत तुमच्या घरच्यांची ही काळजी घ्या,
माझं काय? मी इथेच उभी राहून,
तुमची आतुरतेने वाट पाहतेय.
होय बाळांनो ,होय ..मीच तुमची शाळा बोलतेय !
- जान्हवी भोसले
https://youtu.be/H3hK6vlThdE
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारीत चारोळ्या ....
व्हिडिओ आवडल्यास like करा आणि "काव्यस्पर्श" या माझ्या youtube channel ला subscribe करायला विसरू नका🙏
छत्रपती शिवाजी महाराज जयंती l मराठी चारोळ्या l भाषणासाठी उपयुक्त चारोळ्या l Shivaji Maharaj Jayanti या व्हिडीओ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारीत चारोळ्या संकलित करण्यात आल्या आहेत.याचा उपयोग शिक्षक,व.....
Problem With Mathematics? VIHA MATHS ACADEMY provides Excellent solution for "Mathematics". 1. Class 8 / 9 / 10 SSC, CBSE, ICSE 2. Class 11 / 12 Science / Commerce 3. Engg. / Diploma 4. BSC / BSC IT / BSC CS 5. BCOM /BAF / BMS /BBI
Welcome to Faizan Sir IAS Classes,The secret to getting ahead is getting started. So, get ready for your competitive exams at Faizan Sir IAS Classes. You might have been looking for the Institute
CBSE | STATE BOARD | V - X STD. | SCHOLARSHIP PROGRAM | JEE FOUNDATION
COACHING FOR Class - V to X (State, CBSE, ICSE Board) Class - XI to XII (Biology and Chemistry) Class - BSC/MSC (Microbiology / Biotechnology)
We believe that studying is no more a duty, we call it an opportunity to learn and grow 📚📝
Mainly focusing on high school students catering to some of the top education boards in India namely CBSE, ICSE, state boards; ekAAti Learning aims at providing "Guidance Towards Self-Learning" to its students.
Aeon Academy institute of 8th to 10th & 11th 12th Science (NEET/JEE)