25/07/2026
कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सीबीएसई स्कूल, शिरपूर येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी
शिरपूर : किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सीबीएसई स्कूल, शिरपूर येथे आषाढी एकादशीचा पवित्र उत्सव अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. वारकरी परंपरा, संत संस्कृती आणि अध्यात्मिक मूल्यांचा परिचय विद्यार्थ्यांना व्हावा, या उद्देशाने विविध सांस्कृतिक, धार्मिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे विद्यमान अध्यक्ष डॉ. तुषारजी रंधे, धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सीमाताई रंधे, किसान विद्या प्रसारक संस्थेच्या खजिनदार श्रीमती आशाताई रंधे व शाळेच्या प्राचार्या सौ. सुरेखा मिस्त्री, समन्वयक श्री. सागर वाघ तसेच उपप्राचार्य श्री. विवेक पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व विठ्ठल-रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन शाळेच्या सांस्कृतिक विभागाने केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीतील कुमारी समृद्धी धनगरी व कुमार चैतन्या खैरणार यांनी प्रभावीपणे केले.
यावेळी शाळेच्या संगीत विभागाने विठ्ठलभक्तीपर गीते सादर करून संपूर्ण वातावरण भक्तिरसाने भारावून टाकले. तसेच कुमार प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या "विठू माऊली" या भक्तिमय नृत्याने उपस्थितांची मने जिंकली.
शाळेच्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी वारकरी, संत, विठ्ठल-रुक्मिणी तसेच विविध पारंपरिक वेशभूषा परिधान करून कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. पूर्व प्राथमिक विभागातील चिमुकल्यांनी सादर केलेले आकर्षक नृत्य उपस्थितांसाठी विशेष आकर्षण ठरले. तसेच पूर्व प्राथमिक विभागातील शिक्षिकांनी सादर केलेल्या कीर्तनाने वारकरी परंपरेचे महत्त्व प्रभावीपणे उलगडून सांगितले.
कार्यक्रमादरम्यान कुमारी यतीशी वाणी हिने इंग्रजी भाषेत विठ्ठल माऊलीवर प्रभावी भाषण सादर केले, तर कुमारी माधवी केंद्रे हिने मराठी भाषेत आषाढी एकादशीचे धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व स्पष्ट करणारे प्रेरणादायी भाषण केले. उपस्थित प्रमुख पाहुण्यांनीही विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे महत्त्व, संत परंपरा, भक्ती, संस्कार आणि समाजातील एकात्मतेचा संदेश देत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल कुमारी समृद्धी धनगर व कुमारी चैतन्या खैरणार या विद्यार्थिनींनी आभार प्रदर्शन करून उपस्थित मान्यवर, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
यानंतर शाळेच्या परिसरातून भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. टाळ-मृदंगाच्या गजरात, "ज्ञानोबा-तुकाराम", "विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल" अशा जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला. ही दिंडी शाळेपासून प्रारंभ होऊन आशीर्वाद हॉस्पिटल परिसर, नाका परिसर आदी शहरातील प्रमुख मार्गांवरून उत्साहात काढण्यात आली. नागरिकांनी दिंडीचे ठिकठिकाणी स्वागत करून विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक सादरीकरणाचे कौतुक केले.
या संपूर्ण कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना संत परंपरा, वारकरी संस्कृती, भक्तीभाव, सामाजिक ऐक्य आणि भारतीय संस्कृतीची समृद्ध परंपरा यांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.