08/07/2025
झांज टाळ खंजिरीच्या नाद मधुर गजरात विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल अशा आरोळ्या देत विठ्ठल रखुमाईच्या मनोहर मूर्ती समोर सजवलेल्या पालखीच्या साक्षीने सुवासिक धूप व उदबत्तीच्या मंद सुवासाने भरलेल्या वातावरणात बाल वारकरी व बाल विठ्ठल रखुमाई, तुकाराम ,ज्ञानेश्वर, मीरा ,जनाबाई व संतांच्या वेशभूषेतील छोटे वारकरी आज दिनांक ४ जुलै २०२५ शुक्रवार रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बालक मंदिरात अवतरले होते यावेळी बालक मंदिर मुख्याध्यापिका मंजिरी देशपांडे बाईंच्या हस्ते विठ्ठल रखुमाई, ज्ञानोबा, सरस्वती यांच्या प्रतिमांचे सर्व शिक्षकांसमवेत पूजन झाले. विठ्ठल नामाच्या आरोळ्यांनी बालक मंदिर परिसर दुमदुमून गेला.
शाळा समिती अध्यक्ष माननीय श्री सारंग कोल्हापुरे सरांनी या सोहळ्यात सामील होत विठ्ठल रखुमाई यांच्या प्रतिमेचे पूजन व आरती करत कार्यक्रमाची शोभा वाढवली. यावेळी मुलांना बुंदी व खारे दाणे मिश्रित चुरमुरे असा खाऊ दिंडीचा प्रसाद म्हणून देण्यात आला या कार्यक्रमास शाळा समिती सदस्य माननीय श्री अमित कुलकर्णी सर व संस्थेचे विश्वस्त माननीय श्री अनंत जोशी सरांनी शुभेच्छा दिल्या. बालक मंदिर प्रमुख सौ मंजिरी देशपांडे बाईंच्या मार्गदर्शनाखाली सर्व स्टाफच्या सहकार्याने अतिशय उत्साही व भक्तीपूर्ण वातावरणात दिंडी सोहळा पार पडला.