06/10/2023
वुइमेन्स एज्युकेशन सोसायटीचा 90 वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न…!
वुइमेन्स एज्युकेशन सोसायटी या आपल्या संस्थेचा 90 वा वर्धापन दिन सोमवार, दिनांक 25 सप्टेंबर, 2023 रोजी दुपारी 3.30 वाजता राणी सरस्वतीदेवी कन्या शाळा व मातोश्री सायरबाई चंपालाल बेदमुथा ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या विभागामधील श्रीमती सरोजदेव पडळकर सभागृहामध्ये अतिशय उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून भारताच्या संरक्षण क्षेत्रात तसेच अवकाश संशोधनात विशेष कामगिरी बजावणारे सांगलीतील प्रसिद्ध उद्योजक मा. श्री. संदीपजी सोले उपस्थित होते.
तसेच मंचावर संस्थेच्या अध्यक्षा मा. डॉ. लताताई देशपांडे, उपाध्यक्षा मा. नीलाताई बोडस, माजी अध्यक्षा व संचालिका मा. मेधाताई भागवत, कार्यवाह मा. स्मिताताई केळकर, सहकार्यवाह मा. यशश्री आपटे, संचालिका मा. मनीषा गोखले, मा. विभावरी राजोपाध्ये, मा. अपर्णा कोल्हटकर, मा. प्राचार्य डॉक्टर आर. जी. कुलकर्णी, मा. डॉ. राजेंद्र भागवत उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात संस्था गीताने करण्यात आली. या सुमधुर संस्था गीताने सर्वांची मने जिंकली. त्यानंतर संस्थेच्या अध्यक्षा मा. डॉ. लताताई देशपांडे यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी संस्थेच्या 90 वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेत संस्थेच्या प्रगतीबद्दल माहिती दिली. उपस्थित सर्वांना 90 व्या संस्था वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेच्या माजी कार्यवाह मा. उषाताई कुलकर्णी, मा. सुमनताई गाडगीळ आदींच्या शुभेच्छा संदेशांचाही उल्लेख केला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व व्यासपीठावरील मान्यवरांचे चाफ्याचे फुल देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर मा. मेधाताई भागवत यांनी प्रमुख अतिथी सांगलीतील प्रसिद्ध उद्योजक मा. श्री. संदीपजी सोले यांचा अत्यंत सुंदर शब्दात परिचय करून दिला.
प्रमुख अतिथींच्या हस्ते संस्थेतील निवृत्त व विशेष गौरव प्राप्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये राणी सरस्वतीदेवी कन्या शाळेच्या निवृत्त मुख्याध्यापिका मा. सौ. सुनिता माने, श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयातील वरिष्ठ विभागातील प्रा. डॉ. उर्मिला क्षीरसागर, प्रा. डॉ. संदीप दळवी, प्रा. डॉ. विनायक होनमोरे, तर कनिष्ठ विभागातील शिक्षक श्री. वैभव पाटील व मातोश्री सायरबाई चंपालाल बेदमुथा ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स सांगली मधील शिक्षक श्री. निर्भयकुमार विसपुते, श्रीमती उज्वला पाटील त्याचप्रमाणे राणी सरस्वतीदेवी कन्या शाळेतील शिक्षिका श्रीमती वंदना हुळबत्ते, श्रीमती संगीता पाटील, श्री. रामचंद्र ब्रम्हे तसेच श्री. राजाराम रंगलाल सारडा प्राथमिक कन्या शाळेच्या कर्मचारी श्रीमती जयश्री पाटील आणि सौ. सीताबाई मिरजकर पूर्व प्राथमिक कन्या शाळेच्या मा. मुख्याध्यापिका श्रीमती विदुला ओक यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयातील प्रा. डॉ. उर्मिला क्षीरसागर यांनी प्रातिनिधिक मनोगत व्यक्त केले.
सर्वांच्या सत्कारानंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, प्रसिद्ध उद्योजक मा. श्री. संदीपजी सोले यांनी उपस्थित श्रोत्यांशी संवाद साधला. मा. श्री. संदीपजी सोले आपल्या मनोगतात म्हणाले की "प्रत्येक माणसाला एक संधी येते. त्या संधीचे सोने करणे आपल्या हातात असते. आपण कोणते काम करतो हे महत्त्वाचे नाही, पण त्या कामात किती आत्मीयतेने काम करतो आणि त्यात अधिकाधिक ज्ञान घेऊन किती प्राविण्य मिळवतो, तज्ञ होतो यावर यश अवलंबून आहे". पुढे बोलताना ते म्हणाले की, सांगलीत कंपनीची सुरुवात 1997-98 च्या दरम्यान झाली. अथक परिश्रमाने कंपनी नावारुपाला आणली. अगदी सुरुवातीच्या काळात तव्याला कोटिंग करून देण्यापासून आज मोठमोठी कामे कंपनीकडे येतात. सुरुवातीला ISRO आणि भारताच्या संरक्षण विभागाच्या काही मिसाईल्स यांच्या सुट्ट्या भागांची निर्मिती केली. त्यासाठी लागणारी पुरेशी यंत्रणा उपलब्ध नव्हती. त्यासाठी अत्यावश्यक बाबी फॅक्टरीमध्ये नव्याने तयार करून घेतल्या व कामास सुरुवात केली. यासाठी 30 वर्षांची मेहनत करावी लागली. ही जी रॉकेट लॉन्चर्स बनवली जातात त्यांचा वापर संरक्षण खात्यासाठी लागणारी क्षेपणास्त्रे बनवण्यासाठी केला जातो. पुढे संवाद साधताना ते म्हणाले की पृथ्वी, अग्नी, आकाश, ब्रह्मोस, त्रिशूल, प्रलय, पिनाका यांसारख्या मिसाईल्स मध्ये बेसिक सिस्टीम एकच वापरली. रॉकेट लॉन्चर चे काही भाग तयार करण्यात आले. यापूर्वी पीएसएलव्ही अंतराळ यानासाठी याच ठिकाणी सुटे भाग तयार करण्यात आले. गगन यानासाठी वापरण्यात येणारी उपकरणे तयार करण्यात आली. तसेच श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रावरून चांद्रयान-3 चंद्राच्या दिशेने यशस्वीपणे झेपावले, त्याच्या रॉकेटचे पार्टस, कोटिंगचे महत्वपूर्ण काम याच फॅक्टरीत पार पडले. हे इतके मोठे पार्ट्स श्रीहरीकोटा येथून आणणे, त्याचे येथे कोटिंग करणे आणि पुन्हा त्यांची वाहतूक करून ते श्रीहरीकोटा येथे पोहोचवणे, हा खूप खूपच मोठा चॅलेंजिंग जॉब होता. ही मोहीम खूपच मोठी असल्यामुळे वेळेचे खूप महत्त्व होते. प्रत्येक गोष्ट नेटकी करणे, एकाच वेळी दोन-तीन जॉब चे काम करणे, त्यांचे रेकॉर्ड ठेवणे ही सर्व कामे अगदी काटेकोरपणे आम्ही जवळपास अर्ध्या वेळेत पूर्ण केली. यासाठी मुलगा निहार व मित्रांची कामगिरी नेत्र दीपक ठरली. तसेच सांगलीकरांच्या प्रेमामुळेच आमच्या कंपनीचे अधिक कौतुक होऊन प्रसिद्धी मिळाली.
माननीय अतिथींचे कार्य हे सर्व उपस्थितांना प्रेरणादायी ठरले.
कार्यक्रमाचे आभार संस्थेच्या कार्यवाह मा. श्रीमती स्मिताताई केळकर यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती प्रांजली कुलकर्णी यांनी केले.
याप्रसंगी संस्थेचे सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ, सभासद तसेच रा.स.क. शाळेच्या मा. मुख्याध्यापिका सौ. धनश्री करमरकर, उप-मुख्याध्यापक श्री. मिलिंद कुलकर्णी, पर्यवेक्षक श्री. बाळकृष्ण शेंडगे, श्री. राजाराम रंगलाल सारडा प्राथमिक कन्या शाळेच्या मा. मुख्याध्यापिका सौ. अश्विनी गोरे, सौ. सीताबाई मिरजकर पूर्व प्राथमिक कन्या शाळेच्या मा. मुख्याध्यापिका श्रीमती विदुला ओक, गर्ल्स इंग्लिश स्कूलच्या मा. मुख्याध्यापिका सौ. सुप्रिया पाटील तसेच संस्थेच्या सर्व विद्याशाखांमधील शिक्षक-शिक्षकेतर सहकारी उपस्थित होते.
अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.