Miti - A Hidden Dimension of Learning

Miti - A Hidden Dimension of Learning

Share

MITI is a space where children explore, experience, and grow.

10/05/2026

आजचा आपला नववा दिवस!
दिवसाची सुरुवात नेहमीप्रमाणे ओंकार आणि सूर्यनमस्काराने झाली. आपला छोटा मित्र रुद्र दरेकर याचा आज वाढदिवस. Happy Birthday to you म्हणायच्या ऐवजी आज मुलांनी त्यांना संस्कृत मध्ये ' सुदिनं सुदिनं' म्हणून शुभेच्छा ही दिल्या...

उन्हाळ्याची सुट्टी आणि सिनेमे हे एक ठरलेलं समीकरण!
आज चक्क मुलांनी सिनेमा पाहिला!
कुंफू पांडा 2!
तुम्ही म्हणाल सिनेमा का दाखवला? मुलांना आपण स्क्रीनपासून लांब नेऊ शकत नाही. पण ते ज्या गोष्टी बघतात त्या चांगल्या असतील याची मात्र नक्की दक्षता घेऊ शकतो.
कुंफू पांडा सिनेमा हा पूर्णतः लहान मुलांचा सिनेमा असला तरी तो आम्हाला सुद्धा तितकाच अंतर्मुख करतो. मुलांनी नुसता सिनेमा पाहिला नाही तर तो कसा तयार होतो, प्रत्येक शॉट मधे काय विचार आहे, हा सिनेमा या पद्धतीने तयार होताना प्रत्येक व्यक्तिरेखेमागे काय विचार आहे, या सगळ्या गोष्टी मुलांनी समजून घेतल्या आणि त्यावर चर्चा केली.
सिनेमा पाहण्याचं सुद्धा एक तंत्र आहे. अर्थात प्रत्येक सिनेमाला ते लागू होत नाही. पण कुंफू पांडासारखे कलाकृती असलेले सिनेमे बघण्यात मात्र निश्चितच ते शिकता येतं आणि लागू ही पडतं. ॲनिमेटेड कलाकृती करताना, त्यामागे त्या दिग्दर्शकाची असलेली सृजनशीलता, ती आपल्याला अंगी कशी आणता येईल, आपल्या मनात चाललेल्या कल्पना, इतक्या सुंदर पद्धतीने प्रत्यक्षात कशा आणता येतील, याबद्दल ही मुलांसोबत आम्ही चर्चा केली. यासोबत भावनांचं व्यवस्थापन याबद्दल ही मुलं स्वतःहून बोलली

आज बीज रोवलं गेलं आहे... आम्ही आहोतच... पण तुम्हीही त्याला भरपूर खतपाणी घाला असा आमचा आग्रह आहे. त्यांना उत्तमोत्तम सिनेमे दाखवा, कारण आता त्यांना तो कसा बघायचा हे कळलय.... चांगले सिनेमे कुठले आणि कुठले नाहीत, हे तेच तुम्हाला काही काळाने सांगतील....!

Photos from Miti - A Hidden Dimension of Learning's post 10/05/2026

आजचा आपला सातवा दिवस,
आपण पहिल्यांदा भेटलो तेव्हा मुलांच्यात खेळण्यातून, उपक्रमांमधून कोणकोणती कौशल्यं, चांगल्या सवयी वाढीस लागतील यावर आपण बोललोच, तसं मागचे सहाही दिवस मुलांसोबत आम्ही कामही करत आहोत.

आज मात्र फक्त मज्जा करावी म्हणून ही face painting ची activity मुलांबरोबर करायचं ठरवलं होतं. आपण आपल्या मित्राच्या चेहऱ्यावर नेमकं काय चित्रं काढायचं हे काही मुलं छान ठरवून आली होती आणि काहींनी तिथे आल्यावर ठरवलं, मात्र रंग, ब्रश, ताटली, वाटी, फडकं अशी सगळी तयारी घेऊन मुलं उत्साहात येऊन बसली. सुरुवातीला नीट ठरवून चेहेरे रंगवायला सुरुवात झाली. मुलं मज्जा करत होती, आम्हालाही मस्त वाटत होतं. मग हळू हळू त्यांच्यातले संवाद आमच्या कानावर यायला लागले, एकमेकांच्या डोळ्यात किंवा नाकात रंग जाऊ नये म्हणून ते किती बारकाईने लक्ष देत होते, मित्राचा चेहेरा निरखत होते, आपल्या हातात त्याची हनुवटी धरून एका हाताने रंगवत होते, कोणी कपाळ धरत होतं, हे बघताना मुलं मनानीही फार चांगली आहेत, त्यांच्या मनात मित्राविषयीचा एक ओलावा, काळजी तयार झाली आहे हे पाहताना फार समाधान वाटलं. मैत्रीचा हात फक्त संकटात मदत करण्यासाठी थोडीच असतो! तो कधी आनंद एकमेकांना सांगताना उत्साहाने हातात घेण्यासाठी, कधी सहज प्रेमळ स्पर्श करून केवळ सोबत जाणवून देण्यासाठी, तर कधी आजच्यासारखी एकमेकांची काळजी व्यक्त करण्यासाठी असतो.

खरं सांगू? हुशार मुलं पाहिली की छान वाटतंच, अभ्यासू, गुणी मुलं पाहिली कीसुद्धा छान वाटतं, पण मनानी प्रेमळ आणि मायाळू मुलं पाहिली की मात्र सर्वाधिक आनंद होतो, हे त्यांचं मन आपण कायम जपायला हवं आणि समजून घ्यायला हवं, असं वाटत राहतं.

Photos from Miti - A Hidden Dimension of Learning's post 07/05/2026

आजचा आपला सहावा दिवस...

कालच्या trip मुळे मुलं ( आणि आम्ही सुद्धा ) थोडे दमलेले होतोच... आल्या आल्या सगळ्यांनी ओंकार घेतला. आणि आज सगळ्यांनी आपल्या हिंदू ( मराठी ) कॅलेंडरची माहिती करून घेतली.
मराठी महिने, पंधरवडा, शुद्ध पक्ष, शुक्ल पक्ष, प्रतिपदेपासून पौर्णिमा अमावस्येपर्यंत प्रत्येक तिथी मुलांनी माहित करून घेतली. गणपती कधी बसणार, नवरात्र कधी येणार, दिवाळी कधी येणार याच्या तिथी ठरलेल्या आहेत. परंतु दुर्दैवाने त्या आपल्याला माहित नाहीत. ख्रिसमस 25 डिसेंबर ला येणार याबाबत मुलांना कुठेही शंका नव्हती. त्यासोबत आता गणपती " भाद्रपद शुद्ध चतुर्थीला " बसतात आणि हे कधीच बदलत नाही हे आज मुलांनी डोक्यात पक्कं केलं आहे.
आज homework म्हणून - त्यांना पुन्हा एकदा गणपती आणि दसरा कुठल्या दिवशी येतात हे आवर्जून विचारा आणि काय उत्तर येतंय हे आम्हाला सांगा.

नंतर मुलांच्या आवडीचे काही खेळ खेळलो. मुलानी आज स्वतः एक एक वाक्य सांगत सांगत गोष्ट तयार केली. ती गोष्ट मुलं तयार करत असताना आपल्या नेहमीच्या पारंपरिक गोष्टी सोडून, मुलांना आता गोष्टीच माहीत नाहीत याची खंत वाटली. त्यांना जास्तीत जास्त गोष्टीची पुस्तकं वाचायला द्या/ युट्यूब वर नवनवीन गोष्टीच दाखवा हा आमचा आग्रह आहे.

अभिनयाची तोंडओळख ही स्टेज वर वाटणारी भीती नाहीशी करायला अतिशय उपयुक्त असते. आम्ही तिघेही या तालमीत तयार झालो आणि तेच आम्ही आज मुलांना शिकवलं. प्रसन्न दादाने मुलांना काही काल्पनिक परिस्थिती देऊन, हॉल मधल्या वस्तू वापरून त्यांना त्यांचं अगदी 10 मिनिटातच नाटक बसवायला सांगितलं आणि मुलानी ते उत्साहाने केलं सुद्धा....! Sack पासून सोफा, खुर्चीपासून रिक्षा अशा काही काल्पनिक गोष्टी मुलांनी उभ्या केल्या...

Photos from Miti - A Hidden Dimension of Learning's post 07/05/2026

आजचा आपल्या कॅम्पचा The Most Awaited - ट्रिपचा दिवस.

आपली पहिली मीटिंग झाली तेव्हा पुस्तकपलीकडचा इतिहास मुलांना शिकवणं हा ही आमचा उद्देश आहे हे आम्ही म्हणालो होतो. तो आमचा उद्देश अगदी सुफल संपूर्ण झाला. सकाळी सिंहगडावर गेल्या गेल्या मुलांनी सगळे माहितीफलक वाचले. दारांची नावं, इतिहासातल्या गोष्टी, एकाच गोष्टीची 3 वेगवगेळी रूपं, त्यावर चर्चा ही केली. 'गड आला तर सिंह गेला' , 'आधी लगीन कोंढण्याचं' या उक्तीचा इतिहास सुद्धा त्यांनी समजून घेतला.

ठरल्याप्रमाणे मुलांनी कचरा उचलला. उचलत असताना त्यांना कुठेही कमीपणा वाटला नाही. उलट महाराजांची सेवा करत असल्याच्या भावनेत अगदी शोधून शोधून कचरा मुलांनी गोळा केला. सुभेदार मालुसरेंच्या समाधी समोर मुलं न सांगता नमस्कार करत होती. प्रदक्षिणा घालत होती. त्यांच्यातली संवेदनशीलता जाणवली, ती इथे... तानाजी मालुसरेंच्या समाधी समोर मुलानी ठरल्याप्रमाणे 4 सूर्य नमस्कार ही घातले. एकत्र बसून सावलीत डबा खाल्ला आणि आठवणीने फळं सुद्धा खाल्ली.

सिंहगडापासून - शिवसृष्टी पर्यंत बव्हंशी सगळे दमून झोपले होते...मुलं दमली आहेत आणि आता शिवसृष्टी फिरतील का असं काहीसं वाटत होतं. पण शिवसृष्टीत उतरून पहिलाच show बघताना मुलं इतकी गुंग झाली, की तो थकवा नाहीसा झाला.... छत्रपतींचा इतिहास, मराठा साम्राज्याचा इतिहास, जिजाऊंची शिकवण, त्यांची दूरदृष्टी, दृढ विश्वास, माणसांना जमवायची शक्ती आणि कला, या सगळ्या गोष्टी त्यांना तिकडे भावल्या. छत्रपतींचे आरमार, ही मराठा साम्राज्याची सर्वात मोठी ओळख. ती अतिशय अनोख्या पद्धतीने मुलांसमोर उभी राहिली, की तो इतिहास आता अनुभव म्हणून लक्षात राहील....

गड किल्ले, शस्त्र, आग्रा भेट आणि सुटका, या आणि अशा अनेक गोष्टी मुलांनी प्रत्यक्ष पाहिल्या.. आणि त्यांना आवडल्या सुद्धा....

मुलानी तर मजा केलीच पण प्रवासात मुलं आमच्याशी गप्पा मारत असताना , खेळत असतना आम्हालाही शाळेच्या सहलीला निघालो आहोत असं वाटलं!

03/05/2026

आपल्या कॅम्पचा आजचा दुसरा दिवस, काल ठरल्याप्रमाणे, जे जे नियम मुलांनी स्वतःच तयार केले होते ते सगळे नियम अगदी लक्षात ठेऊन त्यांनी आज पाळले, चपला रांगेत काढल्या, कचरा कचराकुंडीत टाकला अगदी न सांगता.
आज छान ओमकार म्हणून दिवसाची सुरुवात झाली, मग मुलांना रामरक्षा शिकवायला घेतली, मुलांनी रामाबद्दल त्यांना जे जे काही माहीत होतं ते ते सांगितलं. रामरक्षा कोणाची पाठ नाहीये, त्यामुळे एक गोष्ट चांगली झाली ती म्हणजे, शुद्ध उच्चारासहित आणि अर्थासहित ती मुलांपर्यंत पोहोचवणं आता थोडं सोपं होईल. कारण शिकलेलं unlearn करणं अवघड, कोऱ्या पाटीवर नव्यानं शिकणं सर्वाधिक सोपं नाही का?
निरीक्षण शक्ती वाढवणारे काही खेळ आज घेतले, नवीन गाणं शिकायला सुरुवात झाली. एक अख्खा सूर्यनमस्कार घालून मस्त व्यायाम झाला. मजा आली. कालपेक्षा आज मुलं रुळली आहेत, बोलायला लागली आहेत, हसायला, विचार करायला लागली आहेत, कालपेक्षा आज थोडं अधिक पुढे जाणं याचसाठी तर हा अट्टाहास! नाही का?

02/05/2026

Qbees Summer Camp च्या पहिल्या दिवसाची क्षणचित्रे ....

आज मुलांनी एकमेकांशी ओळख करून घेतली. कुठल्याही जागेचे, कार्यक्रमाचे नियम असतात, तसे या ही camp चे आहेत... पण हे नियम मुलानी तयार केले आहेत. त्यांनी त्यामागचा विचार समजून घेतला, आणि नियम का असतात ते का पाळायचे यावर स्वतःची मतं सांगितली. ठरवलेले नियम रोज पाळण्याचं प्रॉमिस ही त्यांनी केलं आहे....😀

सेल्फ पोर्ट्रेट अँक्टिव्हिटी मधून, त्यांनी स्वतःचं चित्र काढलं. त्याचाच हा फोटो...
आपण आरशात स्वतःला कसे पाहतो, आपण कोण आहोत, आपल्या काय आवडतं हे सगळं त्यांनी विचार करून त्यांना जमेल तसं कागदावर उतरवत, आत्मपरीक्षण केलं. न घाबरता इतर मुलांसमोर येऊन ' हा मी आहे ' हे सुद्धा सांगितलं....

आज सगळ्यांच्या डब्यात फळं होती. या बद्दल पालकांचं विशेष कौतुक! पालक ही आमच्यावर विश्वास टाकत आहेत, हे बघून खूप आनंद झाला आणि मुलांनी फळं सुद्धा मजा करत खाल्ली!
भेटूया उद्या.....!

19/04/2026

Learn, Bloom and Fly — with Q? Bees!

Parents, are you looking for something more meaningful than screen time this summer?

At Q? Bees Summer Camp, your child won't just have fun — they'll come back changed. Through real experiences at Sinhagad Fort, Science Park, Shivsrushti, and Trishund Ganapati, every day is designed to stretch their curiosity, courage, and character.

We build what classrooms often can't —
🧠 Independent thinking
🎨 Creative expression
🗣️ Confident communication
🤝 Friendship & teamwork
🌿 Love for nature & Indian culture
✨ Hygiene & etiquettes
These aren't just activities. They're the building blocks of who your child is becoming.

📅 18 May – 2 June 2025
📍 Talegaon, Pune
💰 Just ₹3,000/-

Give your child a summer they'll talk about for years.

📧 [email protected]
📞 +91 7030080137 , +91 9421324631

Because childhood is too precious to be spent on a screen. 🌻

Photos from Miti - A Hidden Dimension of Learning's post 09/04/2026

सरस्वती शिक्षण संस्थेचे सरस्वती विद्या मंदिर आणि मिती Solutions
घेऊन येत आहोत,
QBees Summer Camp!!!!
🐝

*📅 कधी ? - 2 ते 17 मे 2026
🕥*केव्हा ? - सकाळी 11 वाजता
📍*कुठे? - आपल्या सरस्वती शाळेत!!!

Camp मध्ये नक्की काय घेणार आहोत, activities ची थोडक्यात माहिती, फी भरणे, रजिस्ट्रेशन साठी आणि अधिक माहितीसाठी -
+91 9421324631 या क्रमांकावर तुम्ही फोन करू शकता!

Photos from Miti - A Hidden Dimension of Learning's post 08/04/2026

Meet the Team!!

माझी माहिती

माझे नाव अनुजा सुरेश झेंड. माझा आवडता विषय मराठी हा आहे. मला इंग्लिश सुद्धा आवडतं . लिहायला, वाचायला. पण बोलायची खूप भीती वाटते. पण मला गणित विज्ञान अजिबात आवडत नाही. गणिताची खूप भीती वाटते. समजत नाही. बाईंसारखं मला शिकवायला आवडतं. नाच करायला आवडतो. भरतनाट्यम हा माझा आवडता नृत्य प्रकार आहे. मी रोज क्लासला जाते. शाळा २ तास आणि क्लास ५ तास असावा असं मला वाटतं. म्हणून सगळे माझ्यावर हसतात. मला बडबड करायला , लिहायला आणि झोपायला आवडतं. मला जेवण करायचा कंटाळा येतो. मला आई चहा पिऊ देत नाही. मला आईच्या साड्या नेसायला आवडतात मला रोज शाळेत साडी नेसून यावं असं वाटतं. मी मोठी होऊन अभिनेत्री होणार आहे.

Photos from Miti - A Hidden Dimension of Learning's post 08/04/2026

Meet the Team!!

मी तेजस्विनी. सगळे मला तेजू म्हणतात. मला नाच आणि नाटक करायला खूप आवडतं. मी एका नाटकात नारळ झाले होते. आणि एका नाचात मोर.
मी शाळेतून घरी गेले की दोन तास झोपते. मला झोपायला खूप मज्जा येते.मला बाईंनी शिकवलेली 'नदी बाई माय माझी' ही कविता खूप आवडते, ती मी पाठ केली आहे, आणि सगळ्यांना म्हणून दाखवली आहे. आईने केलेली भेंडीची भाजी आणि गुलाबजाम मला खूप आवडतात. मला आई रोज गणपती स्तोत्र म्हणायला सांगते. मी मोठेपणी मराठीची शिक्षिका होणार आहे. आणि सगळ्यांना कविता शिकवणार आहे. मला माझे मित्र मैत्रिणी खूप आवडतात. ते मला मॉनिटर म्हणून निवडून देतात. मला मॉनिटर व्हायलापण खूप मज्जा येते. मला माझी शाळा खूप आवडते.

Want your school to be the top-listed School/college in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


Law College Road
Pune
411004