22/04/2026
मन सांभाळा आणि तुमचं जगणं सुंदर करा..!
मल्हार सर
या लेखात अपान समजून घेणार आहोत कि, प्रत्येक वयोगटात मानसिक आरोग्याची काळजी घेणे का आवश्यक आहे? सध्याच्या काळात ते अधिक महत्वपूर्ण का बनत चालले आहे. आज पहिला लेख त्याच दिशेने पाहिलं पाऊल आहे.
आपण रोज सकाळी उठतो, दात घासतो, आंघोळ करतो, कपडे घालतो इतर बऱ्याच गोष्टी ज्यातून शरीराची काळजी घेतो. पण आपण कधी थांबून स्वतःला विचारलं आहे का? "आज माझं मन कसं आहे?" बहुतेकदा नाही. कारण आपल्या समाजात शारीरिक त्रास झाला की डॉक्टरकडे जाणे नॉर्मल आणि मन दुखलं की लपवणे हे नॉर्मल मानतो नाही का? हीच चूक आपल्याला महागात पडते.
आज एकविसाव्या शतकात जगणं म्हणजे एक प्रचंड स्पर्धा आहे. स्पर्धा करिअरची, नातेसंबंधांची, सोशल मीडियावरील प्रतिमेची, आर्थिक स्थिरतेची. या धावपळीत माणूस बाहेरून हसतमुख दिसतो, पण आतून कुठेतरी तुटत जात असतो. मानसिक आरोग्य म्हणजे केवळ "वेड्यांसाठी" असलेली गोष्ट नाही, ती आपल्या प्रत्येकाची, रोजची, अत्यंत महत्त्वाची गरज आहे.
💡मानसिक आरोग्य म्हणजे नक्की काय?
जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO), मानसिक आरोग्य म्हणजे केवळ मानसिक आजार नसणे नव्हे तर माणूस म्हणून स्वतःची क्षमता ओळखून, आयुष्यातील सामान्य तणावाचा सामना करून, उत्पादकपणे काम करून समाजात सकारात्मक योगदान देऊ शकतो, ती मनोशारीरिक अवस्था.
थोडक्यात सांगायचं तर, मानसिक आरोग्य म्हणजे आनंदाने जगण्याची, निर्णय घेण्याची, नातेसंबंध जपण्याची आणि संकटांना धैर्याने तोंड देण्याची ताकद.
शरीर आणि मन एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत. जेव्हा मन अस्वस्थ असतं, तेव्हा शरीरावरही त्याचा परिणाम होतो जसे कि, झोप उडते, भूक मरते, डोकेदुखी होते, रक्तदाब वाढतो. त्यामुळे मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे संपूर्ण शरीरालाच धोका आहे नाही का?
📊काही धक्कादायक आकडे :
👉1 अब्ज+:- जगभरात मानसिक आजाराने ग्रस्त लोक आहेत.
👉७.५% :- भारतीय लोकसंख्येला मानसिक विकाराचा त्रास आहे.
👉८०% :- रुग्ण योग्य उपचार न घेता राहतात.
👉१५-२९ :- आत्महत्येचे प्रमाण सर्वाधिक या वयोगटात आहे.
भारतात दर एक लाख लोकांमागे केवळ ०.३ मानसोपचारतज्ज्ञ आहेत. म्हणजे उपचारांची गरज प्रचंड आहे, पण सुविधा अत्यंत कमी आहेत. अशा परिस्थितीत जनजागृती हीच सर्वात मोठी उपाययोजना आहे.
👥 प्रत्येक वयोगटात मानसिक आरोग्याची काळजी का घ्यावी?
मानसिक ताण कोणत्याही एका वयापुरता मर्यादित नसतो. तो जन्मापासून म्हातारपणापर्यंत प्रत्येक टप्प्यावर वेगळ्या रूपाने येतो.
🧒 बालपण (०–१२ वर्षे) पायाची भक्कम होण्याची वेळ
मुलांच्या मेंदूचा ९०% विकास वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत होतो. या काळात घरातील वातावरण, आई-बाबांमधील भांडणे, शाळेतील बुलिंग, शिक्षणाचा अतिरिक्त ताण या सगळ्यांचा खोल परिणाम मुलाच्या मानसिकतेवर होतो. लहानपणात झालेले नकारात्मक आघात ओळखणे, समजून घेणे आणि आधार देणे हे पालकांचे सर्वात मोठे कर्तव्य आहे.
🧑 किशोरवय (१३–१७ वर्षे) उमेदीचा काळ
या वयात शरीरात, भावनांमध्ये आणि विचारांमध्ये प्रचंड बदल होतात. सोशल मीडियावरील तुलना, परीक्षेचा दबाव, प्रेमसंबंध, स्वतःची ओळख शोधणे या सगळ्यात किशोरवयीन मुलं आतून कोलमडत असतात. भारतात या वयोगटातील आत्महत्येचे प्रमाण चिंताजनकरित्या वाढत आहे. "थोडं मोठं झालास की सगळं ठीक होईल" असं म्हणणं बंद करा, आज त्यांना ऐका. समजून घ्या. त्यांना बरे करा.
🧑💼 तरुणाई (१८–३५ वर्षे) स्पर्धेचं जग.
नोकरी मिळवणे, करिअर घडवणे, लग्न, स्वतःच घर, तरुण वयात जबाबदाऱ्यांचं ओझं एकाएकी पडतं. "मला सगळं जमलं पाहिजे" हा आत्मदबाव आणि "मी अपयशी ठरलो तर" हा न्यूनगंड, या दोन्हींच्या कात्रीत तरुण पिळला जातो. Anxiety आणि Depression या वयात सर्वाधिक आढळतात, पण मदत मागण्याची लाज याच वयात सर्वाधिक असते. इथे तज्ञांची मदत घेणे वावघे नाही.
👨👩👧 मध्यमवय (३५–५५ वर्षे) मानसिक पाठरावस्था.
बाहेरून सगळं स्थिर वाटतं. नोकरी, घर, कुटुंब. पण आतून Mid-life Crisis असतो. "मी इतक्या वर्षांत काय मिळवलं?" हा प्रश्न सतावतो. आई-बापाचं वाढतं दुखणं, मुलांचं भविष्य, स्वतःची स्वप्नं,यांचा ताळमेळ घालताना मन थकतं. या वयातील पुरुष तर क्वचितच मदत मागतात आणि इथेच सर्वात मोठा धोका आहे. स्त्री-पुरुष दोघांनाही या काळात समस्या असतात.
👴 वृद्धावस्था (५५+) एकट्याचा-उत्तरार्धातील संघर्ष.
निवृत्तीनंतरचा एकटेपणा, जोडीदाराचं जाणं, शारीरिक आजारपण, मुलांपासून दूर राहणं या सगळ्यामुळे वृद्धांमध्ये Depression खूप जास्त आढळतं. पण आपल्या समाजात वृद्धांना "आता काय त्यांना?" असं म्हणून दुर्लक्षित केलं जातं. ते जितकं हसतात तितके ते आतून एकटे असतात हे समजून घेणं गरजेचं आहे.
(यापुढील सर्व लेख वाचण्यासाठी आणि सदैव मोटिवेट राहण्यासाठी आमचा "Daily सायकोलॉजी" ग्रुप जॉईन करा. https://www.facebook.com/groups/dailypsychology/)
11/08/2025
23/06/2025
31/05/2025
20/05/2025
30/01/2025