12/12/2021
भारतीय सैन्यदलाचे नवनियुक्त सेनाप्रमुख…
जनरल श्रीमान मनोज मुकुंद नरवणे
PVSM, AVSM, SM, VSM, ADC
ज्ञानप्रबोधिनी, पुणे चे विद्यार्थी
देवी अहिल्या विद्यापीठ,इंदौर येथून ‘रक्षा व प्रबंधन’ विषयात पदवी.
मद्रास विद्यापीठातून ‘रक्षा अध्ययन’ या विषयात एम.ए.
नॅशनल डिफेन्स ॲकेडमी मधून ‘डिफेन्स स्टडी’ या विषयात एम.फिल.
पंजाब विद्यापीठ पटियाला येथून ‘रक्षा आणि सामरिक अध्ययन’ या विषयात पीएचडी करत आहेत.
१९८० साली भारतीय सैन्यदलात दाखल.
७ जून १९८२ साली म्हणजे दोन वर्षांनी लेफ्टनंट पदावर पदोन्नती.
७ जून १९८५ साली कॅप्टन पदी नियुक्ती.
सहा वर्षांनंतर ७ जून १९९१ साली मेजर पदी पदोन्नती.
३१ डिसेंबर २००२ साली लेफ्टनंट कर्नल पदी पदोन्नती.
तीन वर्षांनंतर १ फेब्रुवारी २००५ साली कर्नल म्हणून नियुक्ती.
पाच वर्षांनंतर १९ जुलै २०१० रोजी ब्रिगेडीअर.
तीन वर्षांनंतर १ जानेवारी २०१३ रोजी मेजर जनरल.
दोन वर्षांनंतर १० नोव्हेंबर २०१५ रोजी लेफ्टनंट जनरल पदी.
चार वर्षांनंतर ३१ डिसेंबर २०१९ रोजी आर्मी चीफ पदी नियुक्ती.
४० वर्षांची देशसेवा…
जम्मू-काश्मीर आणि उत्तर-पूर्व भागातील अशांत परिस्थितीत, आतंकवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, आत्यंतिक तणावग्रस्त परिस्थितीत सैन्यदलाच्या नियुक्ती व प्रशासनाचे महत्त्वपूर्ण काम.
जम्मू- काश्मीर मध्ये नॅशनल रायफल्स बटालियन आणि पूर्व दलाच्या एका ब्रिगेडचे नेतृत्व.
श्रीलंकेतील भारतीय शांति सेनेत सहभाग.
तीन वर्षं म्यानमारच्या भारतीय दूतावासात भारतीय रक्षा अधिकारी म्हणून कार्यभार.
२०१७ मध्ये भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या राजपथ संचलनाचे परेड कमांडर.
परम विशिष्ट सेवा पदक
अति विशिष्ट सेवा पदक
सेना पदक
विशिष्ट सेवा पदक
सामान्य सेवा पदक
विशेष सेवा पदक
आॅपरेशन पराक्रम पदक
सैन्य सेवा पदक
विदेश सेवा पदक
५० वे स्वातंत्र्य वर्ष पदक
३० वर्ष सेवा पदक
२० वर्ष सेवा पदक
९ वर्ष सेवा पदक……………….. सन्मानित….!
हे सगळं लिहीतानासुद्धा हात थरथरतात, तर इतक्या अतिमहत्वाच्या जबाबदाऱ्या कणखरपणे निभावणारं हे व्यक्तिमत्व कसं असेल याची कल्पनाच केलेली बरी.
आम्हांला कोचिंग क्लासला जायला गाडी लागते, दर आठवड्याला अभ्यास करून कंटाळा येतो म्हणून सिनेमा हवा असतो, घरचं खाऊन कंटाळा येतो म्हणून दर आठवड्याला बाहेरचं जेवण हवं असतं.. वाढदिवसाला दोन केक लागतात - एक तलवारीनं कापायला अन् दुसरा तोंडाला फासायला.. रात्र-रात्र चॅटिंग करण्यासाठी, सेल्फी पोस्ट करण्यासाठी, गेम्स खेळण्यासाठी, फ्रेंडशिप देण्या-घेण्यासाठी पन्नास-साठ हजार रुपयांचे स्मार्टफोन लागतात.. रोज चौकात टवाळक्या करत उभं राहण्यशिवाय दिवसच जात नाही. वेबसिरीज पाहणं, मीम्स बनवणं, रिल्स बनवणं आणि अनिर्बंध सोशल मिडीया ॲप्स वापरत राहणं म्हणजे आमचं आयुष्य झालंय.. अशा सगळ्याच्या तुलनेत तुमचं करिअर म्हणजे कल्पनाचित्र वाटावं इतकं मोठं आहे.
गेले १४,६०० दिवस तुम्ही देशाची सेवा करत आहात आणि तीही कुठलीही पब्लिसिटी न करता…! इथं आम्ही एखाद्या रूग्णालयात फळं वाटण्यासाठी गेलो तरी एक केळं किंवा सफरचंद देताना पंचवीस जण मिळून एक फोटो काढतो आणि तो फोटो पोष्टून शे-पाचशे लाइक्स मिळवण्यासाठी रक्ताचं पाणी करतो..!
आम्ही घरी मस्त जेवणार, शतपावली करणार आणि डोळे उघडून नीट बघत बघत बाष्कळ सल्ले देणार किंवा बिनपैशाची टिका-टिप्पणी करत बसणार.. तेव्हा तुम्ही तिथं ४००० किलोमीटर्स लांबीची चिनी सीमारेषा डोळ्यात तेल घालून सांभाळत असता..! कसं जमायचं हो आम्हाला ?
पेट्रोल महाग झालं की शिमगा करायला आमच्यातले सेलिब्रिटी एका पायावर उभे असतात. त्यांना ते डायरेक्ट सोन्या-चांदी इतकं महाग वाटतं. सोशल मिडीयावर त्यांनी निषेधाचं एक वाक्य लिहीलं की त्याची ब्रेकिंग न्यूज होते. पण वर्षानुवर्षं जम्मू-काश्मीर कसं धुमसतं अन् तिथं काय काय चालतं, कसं कसं चालतं, कुठं आणि किती सावरावं लागतं, हे जगणाऱ्या तुमच्या सारख्यांचं अभिनंदन करण्यासाठी किंवा स्व. बिपीन रावतांना श्रद्धांजली देण्यासाठी मात्र अशा पेट्रोलियम सेलिब्रिटीज् ना वेळ नसतो..! पेट्रोल सोन्यासारखं वाटतं पण सोन्यासारखी माणसं अपघातात गेली तर श्रद्धांजली अर्पण करायला यांच्याकडं वेळ नाही..!
“जा रे बाबा तू परदेशात. इथं राहूच नकोस. काय ठेवलंय या देशात?” असं पोरांना उठता-बसतां सांगणाऱ्या उच्चशिक्षित पालकांच्या देशाचे तुम्ही सर्वोच्च सेनाप्रमुख झाले आहात. शेतकरी आर्थिक दुर्दशेनं पिचून आत्महत्या करत आहेत, एसटी कामगार पगाराविना गळफास घेतायत अशा परिस्थितीतही आपल्या मुलाबाळांची लग्नं सप्ततारांकित पद्धतीनं लावणाऱ्या नेतेमंडळींच्या देशाचे तुम्ही सेनाप्रमुख झाले आहात. ‘भारत तेरे टुकडे होंगे’ म्हणणाऱ्याचं समर्थन करणाऱ्या लेखक-कवी-अभिनेते सेलिब्रिटीज् च्या देशाचे तुम्ही सेनाप्रमुख झाले आहात…!
तुम्हाला वाईट वाटेल कदाचित. पण काही लोकांनी तुमच्या नियुक्तीची बातमी कळताच गुगलवरून तुमची जातही शोधली असेल. तुमची जात कळाल्यावर अनेकांचा पोटशूळही उठला असेल. ‘ब्राह्मण कुठं सैन्यात असतात’ असली जातीवाचक वक्तव्यं करणारे राजकीय नेते आपल्या देशात आजही आहेत आणि त्यांच्या असल्या वक्तव्यांना भलीमोठी प्रसिद्धी देणारी माध्यमंदेखील समाजात आहेत. तुम्ही कोण आहात याहीपेक्षा तुमची जात कोणती यावरच चर्चा जास्त होते, हे कडवट सत्य आहे सर..!
आव्हानं सोपी नाहीत आणि लवकर संपणारीही नाहीत.. तुमचा मुकूटही काट्यांचाच आहे आणि खुर्चीही काट्यांचीच आहे. एक क्षणही सुखाचा आणि निवांतपणाचा नसेल..! जबाबदारी हिमालयाएवढी मोठी आहे. अंतर्गत आणि बाह्य सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न सोपा नाहीय. अधिकारीच स्वत:च्या शासकीय कार्यालयात बसून शंभर-शंभर कोटींच्या मासिक वसुलीच्या योजना आखतात आणि उघडकीला आल्यावर सहा-सात महिने थेट गायब होतात, हे आम्ही वर्तमानपत्रात वाचतो, वाहिन्यांवर पाहतो. कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टी बाहेर काढून त्यांची उघड निंदानालस्ती आकसापोटी करणारी माणसं आम्ही पाहतो. कोट्यावधी रूपयांची मादक ड्रग्ज जवळ सापडूनही त्याच्या बाजूनं उभे राहणारे लोकप्रतिनिधी आम्ही पाहतो.
तुमच्यावरची जबाबदारी किती मोठी आहे, याचा आवाका एवढ्यावरून समजणं पुरेसं आहे.
धवल आणि ऊज्ज्वल कारकीर्दीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा..!
आम्हाला अभिमान वाटतो आपला..!
(सत्चिदानंद शेवडे यांच्या फेसबुक पोस्ट वरून )