17/05/2026
विषय : NEET तसेच देशातील विविध स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी प्रकरणांबाबत निषेध, संताप व कठोर कारवाईची मागणी
देशातील लाखो विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यास करून NEET, UPSC, MPSC, SSC, UGC-NET, JEE, पोलीस भरती, शिक्षक भरती, रेल्वे भरती अशा विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतात. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून वारंवार समोर येणाऱ्या पेपरफुटी, गैरव्यवहार, OMR छेडछाड, बनावट उमेदवार, ग्रेस मार्क्स घोटाळे आणि राजकीय संरक्षण असलेल्या रॅकेटमुळे विद्यार्थ्यांचा संपूर्ण परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला आहे.
विशेषतः NEET परीक्षा घेणारी National Testing Agency (NTA) ही संस्था आता “National Testing Agency” नसून विद्यार्थ्यांमध्ये “Non Trustable Agency” म्हणून ओळखली जाऊ लागली आहे, ही अत्यंत गंभीर बाब आहे. देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य ठरवणारी संस्था जर विश्वासार्ह राहिली नाही तर देशातील शिक्षणव्यवस्थेचा पाया हादरेल.
NEET ही परीक्षा दरवर्षी जवळपास 22 लाखांहून अधिक विद्यार्थी देतात. 2024 मध्ये तब्बल 22 लाख 79 हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली; मात्र MBBS सरकारी जागा फक्त सुमारे 1 लाख 28 हजार इतक्याच आहेत. म्हणजेच स्पर्धा प्रचंड आणि जागा अत्यंत मर्यादित आहेत. अशा परिस्थितीत काही श्रीमंत आणि प्रभावशाली लोक पैशाच्या जोरावर पेपरफुटी, सॉल्व्हर गँग, डमी उमेदवार, OMR मॅनेजमेंट, “ग्रेस मार्क्स”, “गेस पेपर”, आणि “घोडा पद्धती”सारखे गैरमार्ग वापरत असल्याचे आरोप सातत्याने होत आहेत.
आज डॉक्टर बनणे हे समाजात प्रतिष्ठेचे प्रतीक मानले जात असल्याने काही श्रीमंत कुटुंबे आपल्या मुलांना कोणत्याही मार्गाने मेडिकल सीट मिळवून देण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यास तयार आहेत. गरीब, शेतकरी, कामगार आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांकडे मात्र अशा रॅकेटसमोर लढण्याची आर्थिक ताकद नसते. त्यामुळे खऱ्या अर्थाने अभ्यास करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे.
2024 च्या NEET प्रकरणात बिहारमधील पेपरफुटी रॅकेटचे धागेदोरे अनेक राज्यांपर्यंत पोहोचल्याचे समोर आले. काही आरोपींनी गुजरात, बिहार आणि इतर राज्यांमध्ये नेटवर्क असल्याचे तपासात नमूद झाले. अनेक संशयित आरोपींवर वेळेवर कारवाई झाली नाही, काही आरोपी फरार झाले, तर अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये “सिस्टमच माफियांकडे गेली आहे का?” असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
UPSC, MPSC, SSC, रेल्वे, पोलीस भरती, शिक्षक भरती, UGC-NET अशा अनेक परीक्षांमध्ये पेपरफुटीची प्रकरणे वारंवार समोर येत आहेत. व्यापम घोटाळ्यापासून सुरू झालेला हा प्रकार आता जवळपास प्रत्येक स्पर्धा परीक्षेचा “कॉमन पॅटर्न” बनत चालला आहे. लाखो युवक आपले गाव सोडून पुणे, दिल्ली, प्रयागराज, पटना, हैदराबाद, कोटा अशा शहरांमध्ये वर्षानुवर्षे अभ्यास करतात; मात्र पेपरफुटीमुळे त्यांचे मानसिक, आर्थिक आणि सामाजिक नुकसान होत आहे.
आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की विद्यार्थ्यांना “अभ्यास करून यश मिळेल का?” यापेक्षा “पेपर फुटणार तर नाही ना?” ही भीती जास्त वाटू लागली आहे. 17-18 वर्षांच्या मुलांच्या मनातून जर परीक्षा प्रणालीवरील विश्वास उडाला, तर तो देशाच्या भविष्यासाठी अत्यंत धोकादायक इशारा आहे.
यावर्षी काही मेडिकल कॉलेजांनी First Year आणि Second Year MBBS विद्यार्थ्यांना NEET परीक्षेच्या दिवशी सुट्ट्या न देण्याचे आदेश दिल्याची चर्चा होती. त्याचवेळी काही ठिकाणी “गेस पेपर” फिरत असल्याच्या घटना समोर आल्या. हे सर्व निव्वळ योगायोग मानणे कठीण आहे. या संपूर्ण प्रकारामागे संघटित आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत पेपरफुटी माफिया कार्यरत असल्याचा संशय विद्यार्थ्यांमध्ये आहे.
देशाचे शिक्षण मंत्री, गृहमंत्री आणि केंद्र सरकारने या विषयाकडे अत्यंत गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. परीक्षा व्यवस्थेतील भ्रष्टाचार, बेरोजगारी, शैक्षणिक असमानता आणि विद्यार्थ्यांच्या मानसिक तणावाचा प्रश्न आता राष्ट्रीय संकट बनत चालला आहे.
आमच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे :
1. NEET व इतर सर्व राष्ट्रीय स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी प्रकरणांची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली निष्पक्ष चौकशी करावी.
2. NTA ची संपूर्ण कार्यपद्धती तपासून स्वतंत्र राष्ट्रीय परीक्षा सुरक्षा आयोग स्थापन करावा.
3. पेपरफुटीमध्ये सहभागी अधिकारी, राजकीय व्यक्ती, दलाल, सॉल्व्हर गँग व शिक्षण माफियांवर कठोर कारवाई करावी.
4. डिजिटल एन्क्रिप्टेड प्रश्नपत्रिका प्रणाली व AI आधारित मॉनिटरिंग लागू करावे.
5. OMR शीट, सर्व्हर डेटा व CCTV फुटेज सार्वजनिक ऑडिटसाठी उपलब्ध करावे.
6. परीक्षा केंद्रांची जबाबदारी निश्चित करून निष्काळजी संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.
7. पेपरफुटीमुळे प्रभावित विद्यार्थ्यांना आर्थिक व मानसिक सहाय्य देण्यासाठी हेल्पलाइन सुरू करावी.
8. विद्यार्थ्यांसाठी “Exam Integrity Protection Law” सारखा कठोर केंद्रीय कायदा आणावा.
9. प्रत्येक परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता, वेळेवर निकाल आणि उत्तरपत्रिका पडताळणीची हमी द्यावी.
10. गरीब व ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी मोफत दर्जेदार स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे सुरू करावीत.
भारतातील काही प्रमुख पेपरफुटी / परीक्षा गैरव्यवहार प्रकरणे :
2015 : व्यापम घोटाळा, मध्यप्रदेशातील मोठा भरती व परीक्षा घोटाळा
2017 : NEET, प्रश्नपत्रिका गैरव्यवहार आरोप
2018 : SSC CGL, पेपर लीकविरोधात देशव्यापी आंदोलन
2021 : RPSC SI Exam, राजस्थान पोलीस भरती पेपरफुटी
2021 : NEET UG, बनावट उमेदवार व कॉपी प्रकरण
2022 : Railway Recruitment, परीक्षा प्रक्रियेवर मोठा वाद
2023 : Bihar Teacher Recruitment, पेपरफुटीचे आरोप
2023 : Bihar Constable, पेपर व्हायरल, परीक्षा रद्द
2024: NEET UG, बिहार पेपरफुटी, ग्रेस मार्क्स वाद
2024 : UGC-NET, परीक्षा रद्द
2024 : UP Police Constable : परीक्षा रद्द, 48 लाख उमेदवार प्रभावित
2024: RPSC Recruitment, भरती पेपरफुटी
2026: NEET UG, CBI तपास, अटक कारवाई
देशातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही माफी नाही.
मेहनती विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे!
“पेपरफुटी थांबवा , विद्यार्थ्यांचे भविष्य वाचवा!”
आपला,
डॉक्टर सुदर्शन घेरडे
अध्यक्ष: महाराष्ट्र युवा महासंघ
अध्यक्ष: फॉरेन मेडिकल असोसिएशन, भारत
अध्यक्ष: फिनिक्स एजुकेशन अकॅडमी
७०६६२०८४५९
८००३१००३२०
25/04/2026
25/04/2026
25/04/2026
25/04/2026
05/04/2026