13/05/2025
शाळा बंद पडली..... कायमची.
आदर्श बाल मंदिर.
स्वारगेट.
माझी लहानपणीची शाळा.
शाळा अंगणवाडी पासून ते चौथी पर्यंत होती. रोज तिथून जाताना मनात यायचं की, शाळेत जाऊन बघुयात एकदा. पण नेहमी काही न काही कारणाने जायचं रद्द व्हायचं.
काल वाट वाकडी करून खास शाळेला भेटायला गेलो. पण आता काहीच शिल्लक नाही. फक्त शाळेची ईमारत होती. तिला देखील कुलूप लावलेलं.
शाळेच्या खालच्या मजल्यावर हॉल होता. तिथे काही छोटे कार्यक्रम घेण्यात येत. बाजूलाच एक रिकामी खोली होती. आधी शाळेमध्ये तांदूळ मिळायचा. त्यावेळी आम्हा विद्यार्थ्यांना तिथे बोलावून तांदळाच्या पिशव्या दिल्या जात.
त्याच खोलीत डोकावून पाहिले तर एक फळा दिसला, ज्यावर मराठी कविता लिहिलेली होती, आणि तारीख होती 2018 सालातली. म्हणजे 2018 पर्यंत शाळा चालू होती. चालू होती म्हणण्यापेक्षा जिवंत होती म्हणणे जास्त योग्य ठरेल. कारण आता फक्त शरीर शिल्लक आहे.
भविष्यात ती ईमारत देखील गायब होईल. Something is better than nothing काहीच आठवण नसण्यापेक्षा ईमारत तरी शिल्लक आहे असा विचार करून जड अंतःकरणाने तासभर बसून घरी जायला निघालो.
पण मनात एक खंत कायम राहिलं, थोडं आधी आलो असतो तर शाळा जिवंत असताना भेटता आलं असतं.
टीप.
कोणाकडे या शाळेला संपर्क करण्याचा काही मार्ग असेल तर सांगावा.
सुदर्शन संकपाळ