07/02/2021
आपल्या मुलांना शारारिक, मानसिक आणि बौद्धिक दृष्टीने मजबूत बनविण्याकरिता बालपण आणि खास करून प्राथमिक शिक्षणाचा काळ अत्यंत महत्वाचा असतो.
त्यांना स्वावलंबी जीवनाचे धडे देणे हे विविध प्रयोगातून आणि दैनंदिन कामकाजातूनच शक्य होते यावर विश्वास ठेवणारे लोक शैक्षणिक क्षेत्रात अधिकारपदी असतात तेव्हा शिकणंही आणि संस्कारही कसे हसत खेळत, गाणं म्हणत होत जातात त्याचं सर्वोत्तम उदाहरण या जपानी शाळेच्या व्हिडीओतून लक्षात येईल. माहितीचा डोंगर मुलांच्या डोक्यावर चढविण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा त्यांच्या जाणिवा जागृत करण्यासाठी धडपडणं महत्वाचं.
स्वावलंबन, सहकार्य, त्याग, सेवा, समर्पण यांसारख्या गोष्टी करीत करीत शिकणंं आणि शिकत शिकत करणं होत राहिलं तरच, आदर्श चारित्र्य घडविणा-या सवयी अन् संस्कारामध्ये त्यांचं रुपांतर होतं. आपल्याकडे मात्र शिक्षकानं मुलाला एखादं छोटंसं काम जरी सांगितलं तर त्याचा राग येतो... कित्येक ठिकाणी शिक्षकाला बेदम मारहाणही होते. कालच माझ्या लहान मुलाच्या काॅलेजमध्ये असाच एका शिक्षकाला तगडा चोप विद्यार्थ्यांनी दिला.
बेजबाबदार पालकांच्या पोटी आज्ञाधारक मुलं म्हणजे भविष्यकालीन जबाबदार नागरिक कसे पैदा होणार???
कोळशाच्या खाणींमध्ये हिरे बहुसंख्येने कसे मिळणार???
खरंतर सर्वात सुरक्षित अन् संपूर्ण स्वातंत्र्य असलं पाहिजे शिक्षकांना, तरच सामान्यांतूनही असामान्य व्यक्तिमत्वे घडवण्यासाठी धडपडण्याचा विचार ते करू शकेल. भीती आणि असुरक्षिततेच्या सावटाखाली विचारसुद्धा केला जाऊ शकत नाही.
दुर्दैवानं व्यवस्थेच्या मुळालाच किडीनं खाल्लंय... उपचारसुद्धा तितकाच अवघड आणि कष्टदायी आहे. परंतु तरीही हे शिवधनुष्य उचलण्याची हिंमत कुणीतरी दाखवलीच पाहिजे. विश्वास ठेवा, अशा कर्तृत्वाला जन्म देण्याची शक्ती या मातीत निश्चितच आहे. इतिहास साक्षीला आहे.
मुलांच्या मनात खरोखरीच श्रमप्रतिष्ठा उभी करायची असेल तर अशा प्रकारच्या शैक्षणिक प्रयोगांची आवश्यकता खूप खूप खूप मोठ्या संख्येने आहे. ऐतखाऊ उडाणटप्पू लोक राष्ट्राचा गाडा नाही नीट चालवू शकत.
पहा जरा बारकाईने....याच जगातलं हे वास्तव. कष्टातही आनंद मिळविणारी मुलं पाहिल्यावर वाटतं आपल्याकडंसुद्धा गावोगावी अशा मानवी हि-यांना पैलू पाडणारी, प्रेमाच्याच मजबूत अधिष्ठाणावर उभी असणारी जीवन शिक्षण देणारी विद्यामंदिरं उभी व्हावीत अशी तीव्र इच्छा होते.
पण करणार कोण???
माझा प्रश्न आहे, दुसरं कोण???
चला मित्रांनो, अशी विद्यामंदिरं उभारण्यास आपणच सज्ज होऊया.
तशी मनोभूमिका बहुजनांमध्ये निर्माण करावी अशी ईश्वरचरणी विनम्र प्रार्थना.
- संपत फडतरे, पुणे.
Most Japanese schools do not employ janitors or custodians.
You can watch more about this here - https://goo.gl/8gJWxn (AJ+) and here - https://goo.gl/1pSTt7 (Cafcu)