UPSC मराठी माध्यमातुन मीच होणार टॉपर

UPSC मराठी माध्यमातुन मीच होणार टॉपर

Share

Upsc मराठी माध्यमातुन मीच होणार टॉपर.....................

02/09/2015

Times

यूपीएससीचा राजमार्ग

संकलन - शब्दुली कुलकर्णी, कॉलेज क्लब रिपोर्टर

प्रशासकीय सेवेत रूजू होण्यासाठी आवश्यक असलेल्या अनेक परीक्षांपैकी एक म्हणजे यूपीएससीची परीक्षा. मात्र या परीक्षेसाठी कठोर मेहनत करावी लागते. परीक्षेचा अभ्यास कसा करायचा, कोणत्या विषयांना जास्त वेळ द्यायचा, पर्याय कसे निवडायचे असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात असतात. त्यासाठीच 'महाराष्ट्र टाइम्स' आणि 'डोंबिवलीकर - एक सांस्कृतिक परिवार' यांच्या संयुक्त विद्यमानं डोंबिवलीमध्ये सेमिनारचं आयोजन करण्यात आलं होतं. या सेमिनारचा हा गोषवारा...

यूपीएससी परीक्षेची तयारी करताना काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. यात रोजच्या पेपर वाचनापासून, सामान्यज्ञान, प्रश्नपत्रि‌का सोडवण्याचा सराव असायला हवा.

चालू घडामोडींचं ज्ञान : यूपीएससी परीक्षेमध्ये सर्वात महत्वाचा घटक म्हणजे चालू घडामोडींचं सखोल ज्ञान असणं. या घडामोडींची सखोल माहिती मिळविण्यासाठी दररोज किमान एक वृत्तपत्र, त्याचं पूर्णत: वाचन करणं आवश्यक आहे. राष्ट्र किंवा राज्य पातळीवरचं किमान एक वृत्तपत्र संपूर्णत: वाचून काढावं तर याचा अभ्यास नेटका होतो. याखेरीज काही मासिकं आणि नियतकालिक यांचंदेखील वाचन करणं आवश्यक आहे. या चालू घडामोडींमध्ये राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरच्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या महत्त्वाच्या घटना, महत्त्वाच्या व्यक्ती आणि महत्त्वाचे प्रसंग किंवा इव्हेंट्स या संदर्भातली बातमी किंवा माहिती जास्त पद्धतशीरपणे वाचणं आवश्यक आहे.

सामान्यज्ञान : व्यक्तीचं सामान्यज्ञान हे चालू घडामोडींचे अपडेट्स ठेवल्याने वाढतं. तसंच सामान्यज्ञानाची खूप पुस्तकं बाजारात उपलब्ध असतात. ही पुस्तकं अभ्यासासाठी उपयुक्त ठरतात. या पुस्तकांतून आपल्याला काही महत्त्वाच्या अशा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्था, तेथील पदाधिकारी, संघटना आणि त्यांची कार्य याविषयीची माहिती मिळते. या माहितीचं टिपण एका वहीत लिहून काढलं तर आणखीनच उत्तम. वेगवेगळ्या प्रकारच्या नियतकालिकांमधून या संबंधीची कात्रणंदेखील गोळा करून संग्रह करून ती अभ्यासली तर त्याचादेखील अभ्यासाकरीता उपयोग होऊ शकतो.

संदर्भसाहित्य गोळा करणं : प्रत्येक स्पर्धा परीक्षेला अनुकूल असं संदर्भसाहित्य गोळा करणं ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही जी परीक्षा देत आहात त्यासंबंधी असा मजकूर गोळा करणं याचा यात समावेश होतो. या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना महत्त्वाचं म्हणजे अगदी चौथीपासून ते दहावीपर्यंतची पुस्तकं, ज्यामध्ये गणित, विज्ञान विविध भाषा यांच्या पुस्तकांचा समावेश असेल त्याचादेखील संदर्भ साहित्य म्हणून उपयोग होऊ शकतो. याव्यतिरिक्त संशोधनपर पत्रिका किंवा काही विशेष पत्रिका निघत असतात त्याचीदेखील जुळवाजुळाव करणं किंवा ते एकत्रित करून त्यांचा अभ्यास सुरू करणं हे महत्त्वाचं आहे.

प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव : प्रत्येक विद्यार्थ्यानं स्वत:ची नमुना प्रश्नपत्रिका तयार करावी. त्यानंतर त्याची उत्तरं कशी लिहावीत आणि त्याद्वारे वेळेचं योग्य नियोजन करण्याचादेखील सराव करा. एकंदरीत उत्तरपत्रिकादेखील सोडवण्याचा सराव होऊ शकेल. याबरोबरच वेळेचं नियोजनही आपोआप करता येतं. उत्तरपत्रिका सोडवत असतानाच, जे प्रश्न सोडवण्यामध्ये अडचणी येतात त्या प्रश्नांची नोंद ठेवणं आवश्यक आहे. पुन्हा त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करावा. तसंच सोडवलेली प्रश्नपत्रिका स्वत:च तपासून पाहावी किंवा एखादी तज्ज्ञ व्यक्ती असेल तर त्यांच्याकडून सल्ले घेणं आवश्यक आहे किंवा आधीची पास झालेली किंवा परीक्षा दिलेली व्यक्ती त्यांच्याकडूनदेखील मार्गदर्शन घेऊ शकतो.

उजळणी : एकूण सगळ्या टप्प्यांचा अभ्यास केल्यानंतर त्याची पुन्हा उजळणी करणं आवश्यक आहे. ही उजळणी केल्यामुळे आपला अभ्यास किती झाला आहे, त्यात कोणत्या कमतरता आहेत या संदर्भातला नेमका अंदाज घेता येऊ शकतो.

तयारी मुख्य परीक्षेची...

नवीन अभ्यासक्रमानुसार मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहे -

अ) आठव्या परिशिष्टामधील कोणतीही एक भारतीय भाषा

ब) इंग्रजी - वरील दोन्ही पेपर्समधील गुण एकूण गुणांमध्ये ग्राह्य धरले जात नाहीत.

एकूण गुणांत ग्राह्य धरले जाणारे पेपर पुढीलप्रमाणे :

पेपर १ निबंध :- विद्यार्थ्यांना एका विशिष्ट विषयावर निबंध लिहावा लागतो.

पेपर २ सामान्य अध्ययन :- भारतीय संस्कृती व वारसा, जग व समाजाचा इतिहास आणि भूगोल.

पेपर ३ सामान्य अध्ययन :- शासनयंत्रणा संविधान, प्रशासन, सामाजिक न्याय व आंतरराष्ट्रीय संबंध.

पेपर ४ सामान्य अध्ययन :- तंत्रज्ञान, आर्थिक विकास, जैवविविधता, पर्यावरण सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन.

पेपर ५ सामान्य अध्ययन:- नीतीमूल्य, एकात्मता व प्रवृत्ती.

पेपर ६ व ७ वैकल्पिक विषयासंदर्भात : विद्यार्थी हा अधिसूचनेत नमूद केलेल्या विषयांपकी कोणताही एक विषय घेऊ शकतो.

बॉक्स

पेपरचं वाचन महत्वाचं

यूपीएससीच्या मुख्य परीक्षेत सामान्यज्ञान हा विषय असून बऱ्याच विद्यार्थ्यांना हा विषय कठीण जातो. यासाठी विद्यार्थ्यानं नियमितपणे एक मराठी व एक इंग्रजी वर्तमानपत्र वाचणं अत्यंत गरजेचं आहे. इंग्रजी वर्तमानपत्र वाचल्यानं इंग्रजी विषयाचा सराव उत्तम प्रकारे होतो. त्याशिवाय सामान्यज्ञानाच्या पेपरमध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडी अधिक प्रमाणात विचारल्या जातात. त्यांची योग्य माहिती इंग्रजी वर्तमानपत्रातून मिळते.

यूपीएससीची अधिकृत वेबसाईट

यूपीएससीच्या www.upsc.gov.in या वेबसाइटवर महत्वाच्या तारखा परीक्षा केंद्रांची माहिती, निकाल आणि इतर मार्गदर्शनपर माहिती असते. त्याशिवाय ऑनलाइन फॉर्मदेखील याच वेबसाइटवर भरला जातो. तसंच सर्वात महत्वाची बाब म्हणजे यूपीएससी परीक्षेबाबतचे कोर्टात घेतले जाणारे निर्णय या वेबसाइटवर उपलब्ध असतात. ही वेबसाइट सतत अपटेड करण्यात येत असल्यामुळे परीक्षेच्या संदर्भात जे काही बदल केले जातात, उदाहरणार्थ वेळापत्रकामध्ये बदल, एवढंच काय तर परीक्षेच्या स्वरूपामध्ये जे काही बदल केले जातात तेदेखील या वेबसाइटवर टाकले जातात.

इतर स्पर्धा परीक्षा

यूपीएससीच्या परीक्षेसोबतच एमपीएससी आयबीपीस एसएससी पीआरबी पीएसयू पीआरबी पीएसयू या स्पर्धा परीक्षादेखील असतात. मात्र यूपीएससी आणि एमपीएससी या परीक्षांच्या महत्वापुढे या परीक्षांकडे दुर्लक्ष केलं जातं. विद्यार्थ्यांच्या दृष्टिनं या परीक्षादेखील अतिशय महत्वाच्या आहेत. तरूणांना उत्तम रोजगाराच्या संधी या परीक्षेद्वारे देखील उपलब्ध आहेत.

यूपीएससीचे फायदे

-आयएएस आयएफएस आयपीएस यांसारख्या उच्चपदावर काम करण्याची संधी

-शासकीय नोकरीत भरती होण्याची संधी

-समाजामध्ये बदल घडवून आणण्यासाठी जी ताकद लागते ती याच्या माध्यमातून मिळते.

-सुरक्षित नोकरीची हमी

-बढतीची संधी

पर्याय निवडताना...

ग्रॅज्युएशनला घेतलेले विषय शक्यतो निवडा.

त्यानंतर तुमच्या आवडीच्या विषयाला प्राधान्य द्या.

एखाद्या विषयाबद्दल चर्चा करायला आवडते अशा विषयाची निवड करा.

बहुतांश विद्यार्थी एखादा विषय निवडतात म्हणून किंवा केवळ तज्ज्ञ व्यक्ती एखादा विषय सांगते म्हणून पर्यायी विषयाची निवड करू नका.

निवडलेल्या पर्यायाचा पुन्हा एकदा विचार करा आणि त्या विषयाचा सखोल अभ्यास करायला सुरूवात करा.

इंग्रजीचा न्यूनगंड नको

इंग्रजी वगळता सर्व उर्वरित यूपीएससीची परीक्षा आपण मराठीत लिहू शकतो. त्यामुळे बहुतांश गुण हे आपल्या हातचे असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी इंग्रजीची भीती बाळगण्याचं काहीच कारण नाही. त्याशिवाय मुलाखतदेखील मराठीतून देता येते. मात्र इंग्रजीचं ज्ञान असणं आवश्यक आहे. यूपीएससीची मुख्य परीक्षा मराठीतून देता येत असली, तरी इंग्रजी विषयाचा पेपर देणं अनिवार्य असतं. यूपीएससीच्या मुख्य परीक्षेत जर अनिवार्य इंग्रजीच्या पेपरात अनुत्तीर्ण झालात, तर इतर पेपर तपासले जात नाहीत. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी नियमितपणे संपूर्ण एका इंग्रजी वर्तमानपत्राचं वाचन करा. दररोज किमान एक तास तरी इंग्रजी वृत्तवाहिन्या पाहा. मित्र-मैत्रिणींसोबत इंग्रजीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करा.

पद्धतशीर उत्तरं लिहा

यूपीएससी परीक्षेचा अभ्यास करताना रोज किमान एक तरी वर्तमानपत्र वाचणं गरजेचं असतं. त्याशिवाय पेपर वाचताना प्रत्येक बातमीमागचं कारण शोधा. त्यामुळे सराव आपोआप होईल. एका वहीत बातमीचे महत्वाचे मुद्दे लिहून काढा आणि त्याच्याबरोबरच त्या बातमीबद्दलचं तुमचं मत लिहा. जेणेकरून उजळणी करताना सोपं जाईल. निबंध लिहिताना त्या विषयांचा परिचय त्याचं स्पष्टीकरण आणि सगळ्यात शेवटी निष्कर्ष असावा. सगळी उत्तरं पद्धतशीर लिहा. खूप सराव करा. यश तुमचंच आहे.

-आनंद मापुस्कर (करिअर मार्गदर्शक)

सोशल साइट्सचा असाही उपयोग

सध्याचा जमाना स्मार्टफोन्सचा, टॅबलेटचा आहे. सोशल नेटवर्किंग साईटस्वर उगाचच वेळ घालवण्यापेक्षा यूपीएससीसंदर्भातली पेजेस लाईक करा. सोशल नेटवर्किंग साइट्सवरील वेगवेगळे फोरम जॉईन करा. याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. सध्या परीक्षेचं स्वरूप बदलण्यात आलं आहे. अभ्यास करताना विचारांचा कस लागतो. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्या. खूप सराव करा.

डॉ. संदीप गुंजाळ (यूपीएससी उत्तीर्ण)

बदल घडवून आणण्यासाठी

तुमच्यासारख्या तरूणांची देशाला गरज आहे आणि त्यासाठी पात्र विद्यार्थी ठरवण्यासाठी केलेली ही व्यवस्था आहे असा दृष्टिकोन ठेवून या परीक्षेला सामोरं जा. तुम्हाला समाजात बदल घडवून आणायचा असेल, तर तुमच्याकडे सत्ता हवी. ही सत्ता यूपीएससीसारखी स्पर्धा परीक्षा तुम्ही उत्तमरित्या यशस्वी झालात तर आपोआप मिळते. त्याशिवाय ही परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी काही शॉर्टकट नाही. त्यामुळे अभ्यास करणंच गरजेचं आहे. अभ्यास करताना प्रत्येक उत्तराचं आकृतीत रूपांतर करा. जेणेकरून लक्षात राहायला सोपं जाईल. शिवाय परीक्षेत दरवर्षी काही ना काही बदल होतात, ते आत्मसात करा आणि पुढे जा. तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.

-डॉ. मिलिंद देबाजे (यूपीएससी उत्तीर्ण)

अपयशानं खचू नका

यूपीएससी देणारे बहुतांश विद्यार्थी हे मध्यमवर्गीय घरातून आलेले असतात. मेहनत करणं हेच तुमच्या हातात असतं. यूपीएससी ही परीक्षा कठीण असली तरी प्रयत्न करत राहणं गरजेचं असते. एकदा अपयश आलं म्हणून खचून जाऊ नका. अपयश हा देखील जीवनाचा एक भाग आहे. वेळेचं व्यवस्थित नियोजन करा. वृत्तपत्र-मासिक यांचं वाचन करा. मुलाखतीची तयारी करताना तुमच्या मित्र-मैत्रीणींशी चालू घडामोडींवर गप्पा मारा. एकमेकांच्या मुलाखती घ्या, जेणेकरून तुम्हाला बरंच काही शिकायला मिळेल. अभ्यासासोबतच भरपूर फिरा, खेळा त्याचबरोबर मेहनतदेखील करा आणि यशस्वी व्हा.

-सचिन कदम (यूपीएससी मार्गदर्शक)

08/06/2015

प्रशासकीय सेवा परीक्षा : २०१५
-----------------------------------------------------------------------------------
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या भारतीय प्रशासकीय सेवा- पूर्वपरीक्षा- २०१५ या राष्ट्रीय स्तरावरील पात्रता परीक्षेची अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे.
जागांचा तपशील : या स्पर्धा परीक्षेद्वारा केंद्र सरकारच्या विविध सेवा आणि आस्थापनांमध्ये १,१२९ जागा भरण्यात येणार असून त्यापैकी काही जागा सरकारी नियमांनुसार राखीव आहेत.

शैक्षणिक पात्रता : कुठल्याही विषयातील पदवीधर .

वयोमर्यादा : उमेदवारांचे वय २१ ते ३२ वर्षांच्या दरम्यान असावे. वयोमर्यादेची अट राखीव गटातील उमेदवारांसाठी सरकारी नियमांनुसार शिथिलक्षम आहे.

निवड प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्र उमेदवारांना पूर्वपरीक्षा देता येईल. ही निवड परीक्षा २३ ऑगस्ट २०१५ रोजी देशांतर्गत निवडक परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. त्यामध्ये राज्यातील मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद व ठाणे या परीक्षा केंद्रांचा समावेश असेल.

प्राथमिक प्रशासन सेवेत निर्धारित गुणांक मिळविणाऱ्या उमेदवारांना आयोगातर्फे मुख्य निवड परीक्षेला बोलाविण्यात येईल. त्यात यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांची मुलाखत व वैद्यकीय तपासणीच्या आधारे अंतिम निवड करण्यात येईल.

अर्जासह भरायचे शुल्क : अर्जासह भरायचे शुल्क म्हणून १०० रु. रोखीने स्टेट बँक ऑफ इंडिया अथवा तिच्या सहयोगी बँकेच्या कुठल्याही शाखेत भरावेत.

अधिक माहिती: 'एम्प्लॉयमेंट न्यूज'च्या २३ ते २९ मे २०१५च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी अथवा www.upsc.gov.in संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने आयोगाच्या www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर १९ जून २०१५ पर्यंत अर्ज करता येतील.

UPSC

29/04/2015

"युपीएससी मराठी माध्यमातुन मीच होणार टाॅपर" च्या वतीने व्हाट्सअप ग्रुप तयार करायच आहे. त्याकरीता कोणी अॅङमिन बनण्यास तयार असेल तर त्यांनी सर्व प्रथम आपलं नाव व मोबाईल क्रमांक टाकून सुरुवात करावी व त्यानंतर येणारे प्रत्येक मोबाईल क्रमांक व्हाट्सअप ग्रुप मध्ये अॅङ करणेस विनंती.

जेणेकरून सर्वांना स्पर्धापरीक्षा बाबतीतील माहीतीची देवाणघेवाण करणे सोईचे होईल व त्या माध्यमातून सर्वजण परीक्षेकरीता अॅक्टीव राहतील.

02/03/2015

एमपीएससीच्या विविध स्पर्धा परीक्षा

करिअरचा एक पर्याय म्हणून स्पर्धा परीक्षांना प्राधान्य देण्याची मानसिकता मराठी पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये वाढली आहे. ही चांगली बाब आहे. पण स्पर्धा परीक्षांकडे वळण्यामागे केवळ शासकीय नोकरी, सरकारी बंगला, लाल दिव्याची गाडी, सामाजिक प्रतिष्ठा यांचेच नुसते आकर्षण असून चालणार नाही तर नेमके काय साध्य करायचे आहे याविषयी स्पष्टता असणे फार आवश्यक आहे. कारण आजही असे अनेक उमेदवार भेटतात ज्यांना आयएएस-आयपीएस व्हायचे असते, त्यासाठी यूपीएससीचे प्रयत्नसुद्धा सुरू असतात; पण एमपीएससीच्या विविध परीक्षांबाबत त्यांच्यात पूर्ण निरुत्साह दिसून येतो. बऱ्याचदा या परीक्षांबाबत त्यांना नीटशी माहितीसुद्धा नसते, असे निदर्शनास येते. पीएसआय/ एसटीआयसारख्या परीक्षांमध्ये आम्हाला स्वारस्य नाही, मी फक्त यूपीएससी करतो अशा ताठय़ामध्ये वावरणारा एक वर्ग आहे. तर एमपीएससीच्या परीक्षेतून एखादे छोटे-मोठे पद मिळाले की पुरे झाले! यूपीएससीचे नंतर बघता येईल किंवा 'माझं ध्येय फौजदार होणे, इतर परीक्षांमध्ये मला स्वारस्य नाही,' असे म्हणणारे उमेदवारही आहेत. महत्त्वाकांक्षा असणे वा ध्येयवादी असणे गर नाही, पण करिअरच्या वाटेवर नेमके काय साध्य करायचे आहे या विषयीची स्पष्टता व ते साध्य करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्नांची साथ असणे आवश्यक आहे.
एक आणि एकाच परीक्षेत अडकून पडल्यास उमेदवारांचे नुकसान होण्याची शक्यता असते. दोन/ तीन प्रयत्न संपले तरी तीन-चार वर्षांचा अवधी हातातून निसटलेला असतो. अशा वेळी येणारे वैफल्य व बिथरलेली तरुणाई हा एका वेगळ्या लेखाचा विषय होईल. म्हणून केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षांची नीट माहिती घेऊन उमेदवारांनी आपली योजना आखायला हवी. सर्वप्रथम, तयारी सुरू करताना नागरी सेवा परीक्षा, आयएएसचे ध्येय ठेवून अभ्यास सुरू केला पाहिजे. नागरी सेवा परीक्षेचा अभ्यास विस्तृत व व्यापक आहे. नागरी सेवा परीक्षा ही इतर सर्व परीक्षांमध्ये प्रमुख आणि काठिण्यपातळीत सर्वाधिक वरची मानली जाते. इतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम यूपीएससीच्या जवळपास जाणारा असतो. हा अभ्यास चांगला झाला की इतर परीक्षांना तुम्ही सहज सामोरे जाऊ शकता. यूपीएससीची तयारी करताना सामान्य अध्ययनाचा पायाभूत अभ्यास चांगला झाल्यामुळे इतर परीक्षांना सामोरे जाण्यात विशेष अडचण येत नाही आणि नव्याने अभ्यासही करावा लागत नाही. इतर परीक्षांचा अभ्यासक्रम, परीक्षापद्धती, पॅटर्न यामध्ये काही अंशी फरक असतो, पण त्यासाठी तुम्हाला फार वेगळे आणि मोठे श्रम घ्यावे लागत नाहीत.
या एका परीक्षेच्या अभ्यासामुळे एमपीएससी, स्टाफ सिलेक्शन, बँकिंग, रेल्वे, पोस्ट, संरक्षण दल, एलआयसी अशा विविध परीक्षांना बसणे सोपे जाते. एकदा घेतलेल्या परिश्रमाचा सर्वत्र फायदा होताना दिसेल. एका परीक्षेच्या मेहनतीचा 'पॉपकॉर्न इफेक्ट' घडताना नक्कीच दिसेल. यासाठी थोडा कालावधी जरूर द्यावा लागेल, पण एका परीक्षेतील यश तुमच्या करिअरला स्थर्य देण्यात व तुमचे मनोबल उंचावण्यास कारणीभूत ठरू शकते. ध्येय जरूर आयएएसचे असावे, पण पीएसआय/ एसटीआय/ तलाठीसारख्या परीक्षासुद्धा देण्याची मानसिकता उमेदवारांनी बाळगली पाहिजे. आपली निवड काय किंवा कोणत्या पदावर काम करायची इच्छा आहे हा व्यक्तिगत इच्छेचा/ भावनेचा प्रश्न झाला. स्पध्रेत स्वत:ला 'चार्ज ' ठेवण्यासाठी आणि करिअर सुरक्षित करण्यासाठी विविध परीक्षांना सामोरे जाण्याची रणनीती व्यवहार्य आहे.
नागरी सेवा परीक्षा व राज्यसेवा परीक्षांचा अभ्यासक्रम किमान पूर्व परीक्षेच्या स्तरावर समान पातळीवर आला आहे. याचे अनेक गुणात्मक परिणाम गेल्या तीन वर्षांत आपण पाहिले आहेत. समान अभ्यासक्रमामुळे यूपीएससीची तयारी करणारे बहुतांश उमेदवार आता एमपीएससीच्या विविध परीक्षांना बसण्याचे प्रमाण वाढले आहे. एकीकडे एकापेक्षा अनेक परीक्षांचे पर्याय उमेदवारांसमोर उपलब्ध झाले, पण दुसरीकडे स्पध्रेची तीव्रता मात्र वाढली. एमपीएससीच्या सर्व परीक्षांचे स्वरूप, प्रश्नांची पद्धत, दृष्टिकोन बदलला आहे. पीएसआय/ एसटीआयसारख्या परीक्षांनंतरसुद्धा 'पेपर यूपीएससी पॅटर्नचा होता' अशी प्रतिक्रिया उमेदवारांची असते. एकूणच स्पर्धा वाढली आहे आणि उमेदवारांचा कस लागत आहे, हे गेल्या तीन वर्षांतील एमपीएससीच्या विविध परीक्षांचे कटऑफ आणि निकालावरून सिद्ध झाले आहे.
स्पर्धा परीक्षात झालेले व भविष्यात होत राहणारे बदल, बदलते प्राधान्यक्रम यांच्याशी जुळते घेण्याचा व्यावसायिक दृष्टिकोन उमेदवारांनी अंगीकारणे आवश्यक आहे. त्यामुळेच स्पर्धेत टिकणे शक्य होईल. म्हणूनच ध्येय यूपीएससी असेल किंवा एमपीएससी, इतर विविध स्पर्धा परीक्षांची माहिती
घेऊन अभ्यासाची योजना
आखायला हवी.
राज्य लोकसेवा आयोगाकडून विविध सेवांसाठी परीक्षा घेतल्या जातात. सोबत दिलेल्या चौकटीत या परीक्षांची यादी दिलेली आहे. या सर्वच परीक्षा 'एमपीएससीची परीक्षा' याच नावाने ओळखल्या जातात. या विविध परीक्षांविषयी थोडक्यात माहिती पुढच्या भागापासून करून घेऊयात-
[email protected]
* राज्य सेवा परीक्षा (State Services Examination)
* महाराष्ट्र वनसेवा परीक्षा (Maharashtra Forest Services Examination)
* महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा (Maharashtra Agricultural Services Examination)
* महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट अ परीक्षा (Maharashtra Engineering Services, Gr-A Examination)
* महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट ब परीक्षा (Maharashtra Engineering Services, Gr-B Examination)
* दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी, प्रथम वर्ग परीक्षा. Civil Judge (Jr. Div.) Judicial Magistrate (Ist Class) Competitive Exam
* सहायक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा (Assistant Motor Vehicle Inspector Examination)
* सहायक अभियंता (विद्युत) श्रेणी -२, महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा, गट-ब (Assistant Engineer (Electrical) Grade-2, Maha. Electrical Eng. Services, B)
* पोलीस उपनिरीक्षक परीक्षा (Police Sub Inspector Examination)
* विक्रीकर निरीक्षक परीक्षा (Sales Tax Inspector Competitive Examintion)
* कर सहायक गट-क परीक्षा (Tax Assistant Examination)
* सहायक परीक्षा (Assistant Examination)
* लिपिक-टंकलेखक परीक्षा (Clerk typist Examination)

02/03/2015

निबंध लेखन एक दुर्लक्षित टप्पा

डिसेंबर २०१४ मध्ये पार पडलेल्या नागरी सेवा मुख्य परीक्षेतील निबंधाच्या अनिवार्य प्रश्नपत्रिकेमध्ये आयोगाने २५० गुणांसाठी दोन निबंध लिहिणे अनिवार्य केले. त्या अंतर्गत एक निबंध अमूर्त तत्त्वविचारावर आणि दुसरा वर्तमान घडामोडींवर बेतलेला आहे. या दोन्ही निबंधाला प्रत्येकी चार पर्याय दिलेले असल्याने निवडीला अधिक वाव आहे. प्रत्येक निबंध विषयास किमान शब्दमर्यादा एक हजार असून ही प्रश्नपत्रिका लेखी चाचणीमध्ये महत्त्वपूर्ण बनली आहे.
निबंधाच्या प्रश्नपत्रिकेमधून विद्यार्थ्यांची ताíकक विचारक्षमता आणि विश्लेषणात्मक ताकद जोखणे हा आयोगाचा उद्देश आहे. अभ्यासाद्वारे तर्क आणि विश्लेषण यावर आधारित स्वत:ची विचारप्रक्रिया जागी करून निबंध लेखनामध्ये ती रूपांतरीत करणे गरजेचे आहे. निबंधातून विद्यार्थ्यांच्या विचाराची समग्रता, ताíककता, विश्लेषणक्षमता आणि मुद्देसूद लेखन कौशल्य जाणवायला हवे.
पहिल्या प्रकारच्या निबंधातून विद्यार्थी एखाद्या तत्त्वविचाराचा अमूर्त (abstract) पातळीवर कसा विचार करतो तसेच संबंधित तत्त्वविचार समाजजीवनाच्या विभिन्न क्षेत्रांशी कसा जोडतो याची चाचपणी केली जाते. त्याद्वारे विद्यार्थ्यांच्या विचारव्यूहाची मांडणी मोजली जाते. तद्वतच संबंधित तात्त्विक विधानाचे राजकीय, सामाजिक, आíथक आणि भौगोलिक संदर्भ दाखवता येणे अपेक्षित आहे. तत्त्वविचारांवर आधारलेल्या निबंधाचा लाभ सामान्य अध्ययनाच्या पेपर ४ मधील नीती, सचोटी, तत्त्वज्ञान आणि अभिवृत्ती या अभ्यास घटकांना होतो.
दुसऱ्या कोटिक्रमातील निबंधाद्वारे विद्यार्थ्यांचे समकालीन घडामोडीचे आकलन, बहुपदरी आणि खोलवर आहे का, याची चाचणी केली जाते. निबंध लेखनात वर्तमान घडामोडींवर प्रक्रिया करून तिचे विभिन्न आयाम उलगडून दाखविण्याची क्षमता विकसित करावी लागते. सर्वसाधारणत सामान्य अध्ययन १ ते ३ या पेपरमध्ये घटक उपघटकांचे वर्तमान उपयोजन अपेक्षित असते. आपसूकपणे या तिन्ही पेपरचा निबंधाच्या तयारीला थेट फायदा होतो.
निबंध लेखन करताना भावनिक होऊन लेखन करू नये. लिखाणात पोकळ आदर्शवाद मांडू नये. संदर्भाशिवाय विधान करू नये. अवाजवी कल्पना करणे टाळावे. विद्वानांची ढोबळ मते उद्धृत करू नयेत. सुविचार किंवा सुभाषिते वारंवार लिहू नयेत. गुंतागुंतीची वाक्यरचना करू नये. भाषेच्या चुका टाळाव्यात. निबंध लेखनातून आपल्याला संपूर्ण सत्य समजले आहे, अशा आग्रहाचे लेखन करू नये. निबंध हा भाषणप्रकार नसून तो विषयाचे पृथक्करण आणि विश्लेषण करणारा असतो.
निबंध लिहिताना विद्यार्थ्यांच्या हातून कळत-नकळत वेगवेगळ्या स्वरूपाच्या चुका होत असतात. निबंध बहुतांश वेळा भरकटलेला असतो. निबंधाचे शीर्षक लेखनात अनेकवार उद्धृत केले जाते. एखादा मुद्दा स्पष्ट करताना तो मधेच अर्धवट सोडून दुसरा मुद्दा त्यात घुसडला जातो. त्यातील मुद्दय़ांचे सुसूत्रीकरण साधलेले नसते. निबंधात एकसंधपणा दिसून येत नाही. बऱ्याचदा निबंधाच्या मांडणीमध्ये एकसुरीपणा आढळतो.
लेखी चाचणीमध्ये निबंध लेखनास तीन तास नेमून दिलेले असतात. विद्यार्थ्यांनी दिलेल्या पर्यायातील एक-एक अशा दोन निबंधांची निवड करून त्याचा आराखडा बांधण्यास सुरुवात करावी. सर्वसाधारणपणे एका निबंधाला दीड तास वेळ उपलब्ध होतो. त्यापकी प्रत्येकी एका निबंधाला २० मिनिटे राखीव ठेवून त्याचा कच्चा मसुदा तयार करावा. काढलेल्या मुद्दय़ांची नीट रचना आखावी. त्याला समान लय प्रदान करावी. अशा प्रकारच्या नियोजनातून दिलेल्या वेळेत निबंध लेखनाला यथोचित न्याय देता येतो.
खरे तर निबंध लेखनातून उमेदवाराचे व्यक्तिमत्त्व उलगडले जाते. वास्तविक पाहता निबंधाची तयारी शैक्षणिक वाटचालीसोबत समांतरपणे घडून येत असते. तुमचा वैचारिक विकासच त्यात दडलेला असतो. तो घडवून आणण्यासाठी प्रमाणित संदर्भ साहित्याचे वाचन आणि त्या अनुषंगाने लेखन करण्याची सवय सुरुवातीपासून करायला हवी.
निबंध लेखन ही एक प्रकारची कला असल्याने यासाठी लेखनतंत्रे विकसित करावी लागतात. सर्वप्रथम संदर्भ ग्रंथामधील एखादे प्रकरण किंवा वर्तमानपत्रातील एखादा लेख वाचताना त्यातील काही मुद्दे स्वतंत्रपणे लिहून काढावेत. त्यानंतर काढलेल्या मुद्दय़ांचा आपल्या भाषेत विस्तार करावा किंवा त्या मुद्दय़ांच्या आधारे २००-३०० शब्दांमध्ये सारांश लिहून काढावा. ही लेखन प्रक्रिया सातत्यपूर्ण असायला हवी. (याचा फायदा 'सीसॅट'मधील 'उताऱ्याचे आकलन' या उपघटकाला होतो.) अभ्यासातून पुढे आत्मविश्वास वाढीला लागला की, ठरावीक विषयावरील दोन-तीन लेखांचा आधार घेऊन वरचेवर आपल्या लिखाणातील शब्दसंख्या वाढवत न्यावी. निबंध लेखन एक हजार शब्दसंख्येपर्यंत वाढवत नेण्यासाठी असे तंत्र अवलंबणे कधीही फायदेशीर ठरते. निबंध लेखनात तुलना, विश्लेषण, समीक्षा तसेच संदर्भासह स्पष्टीकरण यायला हवे. स्थानिक विषयावर लेखन करताना वैश्विक उदाहरणे आणि वैश्विक संदर्भात लेखन करताना स्थानिक उदाहरणे देणे अधिक महत्त्वपूर्ण ठरते.
निबंध लेखनाची प्रस्तावना विषयाला सुसंगत आणि समर्पक असावी लागते. त्यातून आपली वैचारिक प्रगल्भता स्पष्ट होते. २००९ साली संपूर्ण भारतात ३७ गुणानुक्रमे यशस्वी झालेल्या शीतल उगले यांनी 'विशेष आíथक क्षेत्र' या निबंधाची सुरुवात पुढीलप्रमाणे केली होती-'स्वातंत्र्यानंतर भारतीय राज्यकर्त्यांपुढे एक पेच कायम होता, तो म्हणजे विकास साधायचा तर सामाजिक न्यायाचे काय करायचे आणि सामाजिक न्याय संपादित करायचा तर विकासाचे काय करायचे?' त्यांना निबंधाच्या पेपरला २०० पकी १३६ गुण मिळाले. असे समीकरणात्मक विधान करण्याची ताकद विश्लेषणात्मक आणि समीक्षात्मक संदर्भ ग्रंथ आणि वृत्तपत्रांतील लेखांच्या वाचनातून येते. त्यातून स्वत:चा दृष्टिकोन विकसित होण्याबरोबर विश्लेषणक्षमता वाढीस लागते. चौफेर वाचन, संशोधनात्मक दृष्टी असल्याशिवाय अशी सुरुवात करता येत नाही.
सामान्य अध्ययनाच्या तयारीचे स्वरूप कसे आहे यावर निबंधाचे यश अवलंबून आहे. आपली तयारी गाइडस्मधून होत असेल तर निबंधामध्ये अधिक गुण प्राप्त करण्याचे उद्दिष्ट तर बाजूला पडतेच, किंबहुना आपली लेखनकला वृिद्धगत होण्याऐवजी आक्रसली जाते. म्हणून विविध विषयांवर चौफेर वाचन, त्याविषयी चिंतन आणि प्रत्यक्ष लेखन याद्वारे निबंध लेखनाचा पेपर प्रभावी करण्यावर भर देणे केव्हाही श्रेयस्कर!

26/02/2015

मुलाखतीचे यशस्वी तंत्र

लोकसेवा स्पर्धा परीक्षेत सर्वात मोठी भीती मुलाखतीची असते. लेखी परीक्षा बरीच मुले पास होतात. आता सबंध राज्यभर कोचिंग क्लासेस आहेत. तेथे लेखी परीक्षेचे प्रशिक्षण दिले जाते. मात्र मुलाखत हा एक वेगळा अनुभव आहे.

इंग्रजीत आपण पेपर लिहितो; परंतु बोलायची वेळ आल्यावर गडबडतो. त्याचे कारण आपल्याला रोज सातत्याने इंग्रजी बोलायची सवय नसते. कॉनव्हेंन्टमधील मुले फाडफाड इंग्रजी बोलतात. त्याचा प्रचंड न्यूनगंड आपल्या मनात बसतो. आपल्याला इंग्रजीत विचार करता येत नाही. आपण मराठीत किंवा आपल्या भाषेतच विचार करतो. मग तो इंग्रजीमध्ये भाषांतरीत करतो. यामध्ये वेळ जातो. नेमका शब्द न सापडल्यास फजिती होते. मुलाखतीच्यावेळी आपली देहबोली समोरच्याला हे स्पष्ट जाणवून देते की आपण घाबरलो आहोत. अशाने आपले मूल्यमापन करताना परीक्षक लक्षात ठेवतो की आपल्याजवळ OLQ (officer like qualities) नाहीत. मग थोडक्यात आपली संधी हुकते.

या सर्वांवर उपाय काय ? घरी इंग्रजी बोलले जात नाही, किंवा ज्यांच्याकडे इंग्रजी बोलण्याचा सराव करण्याचे साधन नाही अशा मुलांना मुलाखतीची भीती जास्त वाटते. मीही या दिव्यातून गेले आहे. त्यावेळी महाराष्ट्रात आठवीपासून इंग्रजी शिकवायचे. त्यामुळे इंग्रजी बोलण्याची भीती वाटायची. मी नववीत असताना दिल्लीला गेले. तेथे माझी बोर्डाची प‍रीक्षा झाली. मी संस्कृतमध्ये बोर्डात प्रथम आले. त्यामुळे मी कॉलेजची अॅडमिशन घ्यायला गेले की, संस्कृत घेऊन बी.ए. कर, असे मला सागितले जायचे. संस्कृत घेऊन मी कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतली असती तर काही बिघडले नसते. परंतु ज्ञानाची कवाडे उघडायची असतील, आणि जागतिक पातळीवर स्पर्धा करायची असेल तर इंग्रजी भाषेला पर्याय नाही. मग आपणच ती भाषा आत्मसात का करु नये ? त्यामुळे पहिली गोष्ट ही होईल की माझ्या मनातली इंग्रजीची भीती निघून जाईल. माझा न्यूनगंड नाहीसा होईल.

मी इंग्रजी विषय घेऊन बी.ए. झाले. मग पुन्हा इंग्रजी घेऊन एम.ए. झाले. इंग्रजी बोलता यावे यासाठी आधी घरातल्या घरात भावंडांशी, आई वडीलांशी इंग्रजी बोलायला सुरुवात केली. कॉलेजमध्येही कटाक्षाने मैत्रिणींशी इंग्रजीत बोलायचा चंग उचलला. त्याच्या जोडीला रोज इंग्रजी वर्तमानपत्रातून आठ ते दहा ओळी निवडून त्या मोठयाने वाचायला सुरुवात केली. मग त्या ओळींचा अर्थ सोप्या भाषेत पण इंग्रजीत वडिलांना सांगायला सुरुवात केली. जनरल नॉलेज वाढविण्यासाठी काही मासिके, काही पुस्तके वाचायला सुरुवात केली. सुरुवातीला फार जड गेले. सारखे मराठी शब्दच तोंडात येत. त्यामुळे इंग्रजीत विचार करायची सवय लावून घेतली. आता प्रश्न होता उच्चारांचा. त्यासाठी डिक्शनरीचा आधार घेतला. थेसॉरसही अश्यावेळी फार उपयोगी पडला. इंग्रजी बोलताना सारखे आपण 'दुसरी' भाषा बोलतो आहोत, याची जाणीव व्हायची. त्यामुळे एक प्रकारचा अवघडलेपणा यायचा. त्यासाठी आरशासमोर बोलण्याचा सराव केला.

मनातील दुसरा शत्रू मुलाखतीबद्दलची भीती. प्रत्यक्ष मुलाखतीपेक्षा ‍तिथले वातावरण, अपरिचीत वास्तू यामुळे आपल्या मनात धडकी भरते. मुलाखत घेणारी माणसे आपल्याला येणारेच प्रश्न विचारतील, की भलतेच काही, अशी धास्ती वाटत असते. यासाठी शक्यतो ज्या ठिकाणी आपली मुलाखत आहे, ती जागा आधी पाहून ठेवावी. मुलाखत घेणारे कुठे बसणार, आपण कुठून प्रवेश करणार, आपली बसायची जागा कुठली, याचा पूर्ण अभ्यास करावा. आपली मुलाखत कोण घेणार आहेत, त्यांची पार्श्वभूमी काय आहे हे शोधायचा प्रयत्न करावा. ती माणसे ज्या विषयात तज्ज्ञ आहेत त्याला धरून प्रश्न विचारण्याची शक्यता असते. त्यामुळे एकदम अपरिचित विषयावर प्रश्न समोर येऊन आपली फजिती होत नाही.

मुलाखतीत विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आपल्याला माहीत असेलच असे नाही. अशावेळी बतावणी करून वेळ मारुन नेणे अगदी चुकीचे. उत्तर माहीत नाही, असे प्रांजळपणे कबूल करणे योग्य. काही प्रश्न गुगलीसारखे असतात, काही राजकारणाशी निगडित असतात. अश्यावेळी 'हे माझे मत आहे' असे स्पष्ट करावे. त्याने समोरचा माणूस दुखावत नाही.

एखाद्या मुलाखतकाराच्या बोलण्याने वाईट वाटले तरी ते चेहऱ्यावर दाखवू नये. अनेकदा प्रश्नकर्ता आक्रमक होतो, वा एखाद्या गोष्टीचा कीस काढत बसतो. या मागची भूमिका तुमचा संयम जोखण्याची असते. आपण अशावेळी रागावलो, उद्दीप्त झालो किंवा संयम सोडला तर हानी आपलीच होते. हे सगळे आपली परीक्षा घेण्यासाठीच आपल्याला मुद्दाम डिवचत आहेत याची जाणीव ठेवणे गरजेचे आहे.

चेहरा शांत आणि संयमी असावा. भाषा मृदू परंतु स्पष्ट असावी. आपली मते ठाम असावीत. आपल्या देहबोलीत कुठेही उग्रपणा किंवा उद्दामपणा नसावा. मुलाखतीनंतर मुलाखतीचा सारांश लिहायचा असतो. त्यासाठी मुलाखतीच्यावेळी विचारलेले प्रश्न आणि आपली उत्तरे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करावा. झालेली मुलाखत थोडक्यात पण प्रभावी पद्धतीने आपल्याला मांडता येते का याची ती परीक्षा असते.

थोडक्यात काय, तर मुलाखत ही आपल्या व्यक्तिमत्त्वाची, ज्ञानाची, प्रा‍माणिकपणाची आणि आपल्या सच्चेपणाची परीक्षा असते. त्यामुळे आपण सहज-सुंदर राहावे.

अनेकांना असे वाटते की मुलाखतीसाठी विशेष कपडे घालणे आवश्यक आहे. त्याची खरे तर काहीच आवश्कता नसते. आपण छान कपडे घालून गेलो की बघणाऱ्याला आपल्याकडे पाहून प्रसन्न वाटते. परंतु अनेकांना भारी कपडे घेणे परवडत नाही. त्यामुळे आपले साधेच कपडे व्यवस्थित घालून गेल्याने काहीही नुकसान होत नाही. चेहऱ्यावरचा भाव महत्त्वाचा. चेहरा प्रसन्न आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण हवा. फाजिल अभिमानही नको. थोडक्यात, आपण जसे आहोत तसेच मुलाखतकारांसमोर सादर व्हावे. आपल्यातल्या प्रामाणिकपणाने आणि साधेपणाने आपल्याला कोणालाही जिंकून घेता येते.

23/02/2015

चालू घडामोडी

परीक्षेच्या दृष्टीने 'चालू घडामोडी' या घटकाची तयारी कशी करता येईल, याचे मार्गदर्शन-
प्रश्नपत्रिकेचे अलीकडचे स्वरूप बघता बरेचसे प्रश्न हे राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, पर्यावरण, भूगोल, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या चालू घडामोडींविषयी विचारले जातात, हे स्पष्ट होते. हे तीनही विषय अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात चालू घडामोडींवर आधारित कमी प्रश्न विचारले जातात, असे वाटले तरी पूर्वपरीक्षेतील प्रत्येक घटक विषयाला जोडून चालू घडामोडींचे प्रश्न विचारले जातात. या महिन्यात विक्रीकर निरीक्षक पदासाठी परीक्षा झाली. परीक्षेनंतर बहुतांश उमेदवारांची प्रतिक्रिया होती की, प्रश्नपत्रिका बरीच अवघड होती. 'आपण वाचलेल्या पुस्तकांतील प्रश्नच येत नाहीत, चालू घडामोडींचा नेमका स्रोत कळत नाही,' असे या विद्यार्थ्यांचे म्हणणे होते. केवळ मोजक्या परीक्षार्थीची प्रतिक्रिया होती- 'प्रश्नपत्रिका आव्हानात्मक होती आणि परीक्षा यूपीएससी पॅटर्ननुसार होती, केलेला अभ्यास कामी आला, पेपर चांगला गेला.' या दोन टोकाच्या प्रतिक्रियांतून उमेदवारांची नेमकी मानसिकता, अभ्यासाचा दृष्टिकोन व अभ्यास करण्याच्या पद्धतीतील नेमका फरक दिसून येतो.
उमेदवारांचा एक सर्वसाधारण अनुभव असा आहे की, एका विषयाची, घडामोडींची माहिती वेगवेगळ्या दोन-तीन संदर्भ पुस्तकांत वाचली की संभ्रम वाढतो. चालू घडामोडींबाबत परीक्षार्थीना हा प्रश्न पडतो. यावर एखादे दुसरे गाईड वाचणे हा पर्याय ठरू शकत नाही अथवा माहितीस्रोत म्हणून एकाच संदर्भपुस्तकाचा उपयोग करून अभ्यास संपवा, असेही उपयोगाचे ठरत नाही. आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका पाहिल्या की, याची मर्यादा लक्षात येईल. अशा तऱ्हेने अभ्यास केल्यास आपण स्पध्रेत टिकणे कठीण बनते.
या विषयांची संदर्भपुस्तके म्हणून इंडिया ईअर बुक, योजना, लोकराज्य या उत्तम पर्यायांची निवड करायला हवी.
प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणातून लक्षात येईल की, चालू घडामोडी घटकात तीन प्रकारांचे प्रश्न विचारले जातात.
* स्वतंत्र चालू घडामोडी
* सामान्य अध्ययन : इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राजकारण, विज्ञान, पर्यावरण अशा घटकांशी संबंधित चालू घडामोडी.
* सामान्य ज्ञान स्वरूपाची माहिती.
अभ्यासासाठी अशी विभागणी केली तरी प्रश्नांचे नेमके स्वरूप समजण्यासाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. त्याकरता प्रश्नपत्रिकांचे नियमित वाचन करायला हवे. प्रश्नांचे स्वरूप लक्षात आले की, वृत्तपत्र वाचन सोपे होते. दैनिक, मासिकात नेमके काय वाचायला हवे, ते कळते. वृत्तपत्रांतील 'बातमी' आणि स्पर्धा परीक्षेविषयी आवश्यक 'माहिती' यातला फरक परीक्षार्थीनी जाणून घेणे आवश्यक आहे.
सामान्य अध्ययन विषयाच्या अभ्यासक्रमातील 'चालू घडामोडी' हा घटक केवळ काही मार्कासाठी विचारला जात नसून तो एमपीएससी परीक्षेचाच मूलभूत घटक आहे. चालू घडामोडींच्या अभ्यासाची व्याप्ती पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत या तीनही टप्प्यांवर विस्तारलेली आहे. चालू घडामोडी हा नुसता एक घटक विषय नाही तर अभ्यासक्रमांतील प्रत्येक विषयाशी अनिवार्यपणे जोडलेला घटक विषय आहे. चालू घडामोडींचा आधार राज्यव्यवस्थेपासून अर्थव्यवस्थेपर्यंत, इतिहासापासून सामान्य विज्ञानापर्यंत सर्वच विषयांत ठेवून उमेदवाराचे समकालीन आकलन जोखण्याचा प्रयत्न आयोगामार्फत केला जातो. म्हणूनच चालू घडामोडी हा अभ्यासाचा केवळ एक भाग न मानता तो अभ्यासाचा पाया बनायला हवा. घटक विषय कोणताही असो, बहुतेक प्रश्नांच्या पाश्र्वभूमीला एखादी राज्य-राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोड असते हे समजून घ्या. म्हणूनच चालू घडामोडी हा स्पर्धा परीक्षांसाठी एक 'अनिवार्य' प्रश्नपत्रिकेइतका महत्त्वाचा विषय आहे.
या विषयाचा अभ्यास करताना सर्वप्रथम प्रत्येक घटकांशी संबंधित पायाभूत पुस्तकांचे वाचन करा आणि मग त्यातून पक्क्या केलेल्या संकल्पनाशी- भोवताली घडणाऱ्या घटनांचा 'संबंध' शोधण्याचा दृष्टिकोन विकसित करा.
जागतिकीकरणाच्या रेटय़ात रोज नव्या घटना घडत आहेत. या जागतिक उलथापालथींचा प्रभाव कधी अल्पकालीन तर कधी दीर्घकालीन असतो. यापकी अनेक घटनांचा प्रभाव भारताच्या आणि महाराष्ट्राच्या राजकीय, आíथक आणि सामाजिक क्षेत्रांवर पडत असतो. या सर्व बदलांचे प्रतिबिंब 'सामान्य अध्ययन' प्रश्नपत्रिकेत उमटणे स्वाभाविक आहे.
हे लक्षात घेऊन चालू घडामोडींची तयारी करताना एका बाजूला स्वतंत्र चालू घडामोडी, तर दुसऱ्या बाजूला त्या त्या घटकांशी संबंधित चालू घडामोडींची तयारी करणे आवश्यक आहे.
चालू घडामोडींच्या नोट्स सूत्रबद्धपणे पुढीलप्रमाणे काढता येतील- केंद्र व राज्य सरकारच्या योजना, कार्यक्रमाशी संबंधित घडामोडी, राष्ट्रीय संस्थाविषयक घडामोडी, आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाची घटना, ज्या घटनेचा प्रभाव देशावर पडू शकतो, पर्यावरण व भौगोलिक घटना संदर्भ, अर्थव्यवस्था व राज्यव्यवस्थेसंबंधी घडामोडी, विज्ञान-तंत्रज्ञानविषयीच्या घडामोडी, महत्त्वाच्या परिषदा, संघटना, चच्रेतील व्यक्ती, त्यांचे कार्यक्षेत्र, नियुक्त्या-निवड-बढती, पुरस्कार, सन्मान, पारितोषिके, ग्रंथ लेखक, निधन, महत्त्वाच्या चच्रेतील कंपन्या, संस्था- संस्थाप्रमुख, त्यांचे उत्पादन क्षेत्र, चच्रेतील ठिकाणे, विज्ञानातील शोध व त्यातील संकल्पना, महत्त्वाच्या समित्या, आयोग व त्यांचे अहवाल, नव्या योजना, धोरणे व त्यातील महत्त्वाचे मुद्दे, महत्त्वाची आíथक आकडेवारी, महत्त्वाची विधेयके, कायदे व घटना दुरुस्ती, महत्त्वाचे न्यायालयीन निवाडे इत्यादी.
अर्थात ते वर्गीकरण काहीसे लवचीक स्वरूपाचेच असावे. या वर्गीकरणानंतर प्रत्येक विभागात पुन्हा प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशी विभागणी करावी. थोडक्यात, प्रश्नांचे स्वरूप लक्षात घेऊन त्यावर आधारित 'वर्गीकरण तक्ते' बनवावेत आणि त्या विभागात संबंधित घटना नमूद करावी.
चालू घडामोडींची तयारी करताना मागील प्रश्नांचे स्वरूप लक्षात घेऊन अभ्यास करावा आणि त्यानुसार नोट्स काढाव्यात. म्हणजे एखादी महत्त्वाची परिषद झाली असल्यास तिचे ठिकाण, देश, त्या परिषदेतील मुद्दे व फलित; त्याच मुद्दय़ावर पार पडलेल्या मागील परिषदा, त्यांचे ठिकाण याचीही माहिती जमा करावी किंवा विविध स्पर्धाची तयारी करताना खेळाडू, क्रीडा प्रकार, स्पर्धाचा निकाल, त्यातील विक्रम; विजेता-उपविजेता याबरोबरच त्यांचे देशही जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. म्हणून एखाद्या चालू घडामोडींची
तयारी करताना तिच्या आजूबाजूला शक्य त्या त्या पलूंची, घटनांची
तयारी करावी.
चालू घडामोडी म्हणजे तारखा, स्थळे, नावे असा मर्यादित अर्थ नाही, हे परीक्षार्थीना एव्हाना समजून चुकले असेल. महत्त्वाच्या घडामोडींची पायाभूत, विश्लेषणात्मक माहिती उमेदवाराला असणे अपेक्षित आहे. यासाठी वाचन चाचपडत करू नये, तर 'स्मार्ट'पणे करावे. बातमीचे किंवा तथ्याचे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्व लक्षात न घेता शब्द न् शब्द वाचून काढायची अभ्यास पद्धत वेळखाऊ, अनुत्पादक ठरते. म्हणून नेमके आणि विश्वसनीय संदर्भ साहित्य अभ्यासणे आवश्यक आहे. योजना, कुरुक्षेत्र, इंडिया ईअर बुक, लोकराज्य, शासनाच्या महत्त्वाच्या वेबसाइट्स, तथ्यात्मक माहितीसाठी आघाडीच्या वर्तमानपत्रातील वृत्तवेध घेणारे लेख, तसेच विश्लेषणात्मक माहितीसाठी 'करंट ग्राफ 2015' उपयुक्त ठरेल.

Want your school to be the top-listed School/college in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Pune
411001