30/08/2025
पराक्रमाला माथ्यावरचे अथांग नभ अपुरे..
ज्ञान प्रबोधिनी युवती विभाग आज एकच दिवशी १६ प्रात्यक्षिके करणार आहे. त्यासाठी सर्वांना आग्रहाचे आमंत्रण..
This is the Official Page for ज्ञान प्रबोधिनी युवती विभ? Jnana Prabodhini has a seperate wing for activities of ladies which is called the Yuvati Vibhag.
"The two sexes posses just two different sets of qualities, which need not go antagonistic but can be complementary to each other and make family and society happy"
This is Jnana Prabodhini's view regarding women. There is an enrichment programme for girls attending different schools. "They play heartily, sing inspiring songs, discuss the current issues of social and personal relevance, and wander
30/08/2025
पराक्रमाला माथ्यावरचे अथांग नभ अपुरे..
ज्ञान प्रबोधिनी युवती विभाग आज एकच दिवशी १६ प्रात्यक्षिके करणार आहे. त्यासाठी सर्वांना आग्रहाचे आमंत्रण..
ज्ञान प्रबोधिनी
युवती विभाग
गणेशोत्सव २०२५
मनोगत २
युवतींच्या ध्वज–बर्ची–वाद्य पथकाला सुरुवात झाल्यावर ध्वज नाचायला शिकलेली पहिल्या युवतींपैकी एक म्हणजे वंदनाताई कामठे. अन्य शालेय दलांमधून युवती विभागाशी जोडल्या गेलेल्या वंदनाताईने आपल्यासारख्या वेगवेगळ्या शाळेतल्या मुलींना सुद्धा सहभागी होता यावं यासाठी पुण्यात व पुण्याबाहेरही बरचीनृत्य शिकवायचं काम केलं. काही वर्षं परदेशात राहून भारतात परतल्यावर विविध संस्थांत काम केल्यानंतर आता अनेक वर्षं प्रबोधिनीत ती काम करत आहे. स्वतः स्त्री शक्ती प्रबोधन, ग्राम विकसन, नेतृत्व विकसन अशा वेगवेगळ्या कामांचा अनुभव घेत ताई नेहमीच युवतींना आणि महिलांना मोठं काम करण्यासाठी मार्गदर्शन, प्रेरणा आणि प्रोत्साहन देते!
#ज्ञानप्रबोधिनी #युवती #ढोलताशा #ध्वज #गणपती
सार्वजनिक गणेशोत्सवाचं आकर्षण असलेला ढोल ताशाचा नाद आता जगाच्या कानाकोपऱ्यात घुमतो आहे. ज्ञान प्रबोधिनीच्या संस्थापकांनी, आ. आप्पा पेंडसे यांनी केलेला परिवर्तनात्मक विचार आता बरची, ध्वज, ढोल ताशांच्या माध्यमातून युवक, युवतींच्या मनामनात पोहोचतो आहे. हाच विचार पुढे घेऊन जात, ४० वर्षांपूर्वी ज्ञान प्रबोधिनीच्या युवती विभागाने सुरू केलेलं युवतींचं ध्वज – बरची – वाद्य पथक, सातत्याने अनेक युवतींना चांगल्या कामासाठी संघटित करण्याचं काम करत आहे. हा प्रवास उलगडून बघण्यासाठी काही निवडक मनोगते घेऊन येत आहोत.
त्यातील पहिले मनोगत, सुरुवातीपासून यात सहभागी होऊन जबाबदारी घेणाऱ्या सुवर्णाताई यांचे! ऐकूया त्यांच्याकडून तब्बल चाळीस वर्षांपूर्वीचे केवळ युवतींचे पथक रस्त्यावर उतरवण्याचे धडाडीचे अनुभव.
गणपती बाप्पा मोरया!🌸
15/07/2025
ज्ञान प्रबोधिनी
युवती विभाग
प्रबोध शालेय दल
"गणेशोत्सव २०२५"
बर्ची नृत्य सराव
सर्व शाळांमधील ७वी ते १०वी मुलींसाठी खुले
दिनांक : १९/०७/२५, शनिवार
स्थळ : ज्ञान प्रबोधिनी पुणे,गच्ची
वेळ : सायं ४-७
नावनोंदणी करण्यासाठी -
https://forms.gle/JUPpoRpzsnj5zT8J8
05/07/2025
समकृती समकृती समकार्य
हृदय स्पंदन घडो मन एक..
गणेशोत्सवासाठी बर्ची आणि वादन सराव लवकरच चालू होत आहे. सर्व युवतींसोबत पुन्हा नृत्य – वादनाची आतुरतेने वाट पाहत आहोत.
आजच नावनोंदणी करून सहभागी व्हा..
https://forms.gle/E25g9mKLJkaqmcBc6
31/05/2025
05/03/2025
‘विश्र्वाचे आर्त...’
शहा सरांनी चष्म्याआड बोट घालून डोळे टिपले. ते पुन्हा एकदा भर वर्गात भावुक झाले होते.
“ कशी ही मुलगी? क्लासला पण येत नाही! दुसरेच उद्योग करत बसते. नियमित आली तर महाराष्ट्रात पहिली येईल. ... पण नाही!”
‘त्या’ मुलीशी – म्हणजे लताशी - माझी पहिली गाठ पडली ती अशी : आमच्या लाडक्या शहा सरांच्या साउंड ट्रॅकवर.
शहा सरांच्या आग्रहावरून डे. जि. भावे स्कूलमधली आम्ही नववीदहावीतली मुलं महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेच्या प्रबोध, प्रवीण वगैरे हिंदीच्या परीक्षांना बसायचो. खूप कळकळीनं शिकवायचे सर. त्यांच्या शिकवण्यातली वाक्यंच्या वाक्यं अजून कानात गुंजतात, इतकं सुंदर शिकवायचे. त्यामुळे मी सकाळच्या शाळेत असले तरी पुन्हा संध्याकाळी शाळेत येऊन त्यांच्या क्लासला हजेरी लावायची. अशा व्याख्यानांची पर्वणी सोडून दुसरीकडेच भुरकळणारी, सरांच्या डोळ्यांत पाणी आणणारी ही दुपारच्या शाळेतली सुंदरी आहे तरी कोण?... माझ्या मनात उत्सुकता निर्माण झाली.
मग हळूहळू तिचे ‘दुसरेच उद्योग’ समजायला लागले. ती तरी काय करणार? नाट्यवाचन स्पर्धेत ‘वऱ्हाडी मानसं’ मधला वऱ्हाडी लहजा पकडण्यासाठी बाईंना तीच हवी असायची. वक्तृत्व स्पर्धेत फड दुसरं कोण गाजवणार? तीच पाहिजे! आणि कॅलेस्थेनिक्समधे मानवी रांगांमधे रंग भरून मैदान गाजवायलाही तिच्याशिवाय पर्याय नाही. कुणाकुणाचे डोळे टिपणार बिचारी?
पुढे लक्षात आलं - दुसऱ्यांच्या डोळ्यांतल्या पाण्याशी या मुलीचा बराच गहिरा संबंध आहे.
मोठेपणी कॅलेस्थेनिक्सची जागा अध्यात्मानं घेतली आणि शहा सरांची जागा ज्ञान प्रबोधिनीच्या अप्पांनी घेतली. ती अध्यात्मात वाहून गेली तर प्रबोधिनीचं समाजकार्य बाजूला पडेल अशी काळजी त्यांना पडायची. पण तिनं जसे प्रबोध परीक्षेत अव्वल मार्क मिळवून शहा सरांचे पांग फेडले, तशीच प्रबोधिनीचं कार्य वाढवून अप्पांच्या अश्रूंचीही फुलं केली. कोणत्याच आघाडीवर ती कमी पडली नाही.
लताची आणि माझी मैत्री किती दीर्घ ? प्रबोधिनीत काम ती वयाच्या सतराव्या वर्षापासून करते आहे. शहा सरांच्या वर्गात (अखेर एकदाची! ) ती उगवली तेव्हा पंधरा वर्षांची असेल. प्रबोधिनीचं काम आम्ही बारा वर्षं सतत बरोबर केलं – अगदी एकाच विभागात मात्र नव्हे. आणि मग माझ्या बाजूनं -अधूनमधून खंड पडत - ते आजतागायत कमीअधिक प्रमाणात चालू आहे. लताची मैत्री मात्र अखंड चालू आहे.
प्रबोधिनीतल्या तिच्या कामाचा पैस फार मोठा आहे. संघटनकार्याचं बाळकडू तिला घरातच मिळालं होतं. तिचे आई-वडील संघाच्या आणि समितीच्या कार्यात रमून गेलेले होते. घरी कार्यकर्त्यांची उठबस चालू असायची. बापूसाहेब ‘तरुण भारत’चे संपादक असल्यामुळे साहित्यगुण लताच्या डीएनएमधेच जडवले गेले असणार. तिला घडवायला मात्र त्यांना वेळ देता आला नाही फारसा.
असं हे स्वयंभू रत्न अप्पांच्या हाती लागलं आणि त्याचं मूल्य ओळखायला त्यांना वेळ लागला नाही. युवती विभागातल्या जबाबदाऱ्या ते तिच्यावर सोपवत गेले आणि ती स्वभावगत निष्ठेनं, परिश्रमपूर्वक त्या पार पाडत गेली.
सतरा-अठराच्या वयातच तिला ज्ञानेश्वरीची गोडी लागली होती. अवघड आणि विद्वत्ताप्रचुर असं लोकमान्य टिळकांचं गीतारहस्य तिनं जिज्ञासेनं वाचून काढलं होतं. तत्त्वज्ञान हा तिच्या आवडीचा विषय होता. मराठी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत ह्या सगळ्याच भाषांवर तिचं प्रभुत्व होतं. फ्रेंचच्याही परीक्षांचा अभ्यास तिनं सुरू केला होता. वृत्तबद्ध काव्यरचना ती लीलया करू शकत असे. (आजही दिलेल्या विषयावर, दिलेल्या मुदतीत ती अत्यंत सुंदर आणि आशयघन रचना करून देते – अगदी हुकमीपणे!) युवतींच्या वैचारिक बैठकी घेणं, क्रीडा-दलं चालवणं, प्रबोधवर्गात शिकवणं हे दैनंदिन उपक्रम चालवताचालवताच ती अप्पांना विविध संस्कारांच्या पोथ्यांची रचना करण्यासाठी मदत करू लागली. आणखीही काही विद्वान लोक त्या उपक्रमात सहभागी होते. त्या कामासाठी त्या तरुण वयातही ती सर्वथा पात्र होती. तेवढी प्रगल्भता तिच्यापाशी होती. संस्कारांमागची धार्मिक आणि तात्त्विक पार्श्वभूमी तिला जाणून घेता येत असे. त्या विधींमधलं काव्य तिला भावत असे आणि ते मराठीच्या कवेत आणायला तिला प्रयास पडत नसत. आजही आपल्या संस्कारपोथ्या वाचताना त्यांतलं भावसौन्दर्य जाणवल्याखेरीज राहात नाही.
ह्या पोथ्यांचा उपयोग करून वेगवेगळ्या संस्कारांचं पौरोहित्यही ती करू लागली. आधुनिक जीवनसरणीतल्या एका तरुण युवतीनं अशी जबाबदारी घेणं सोपं नव्हतं. लोकांच्या श्रद्धा आणि भावना ह्या विधींशी जोडल्या गेलेल्या असतात. लता सहृदयपणे त्यांच्याशी समरस होत असे. संस्कारांचा अर्थ समजून देतादेता त्या त्या घरच्या परिस्थितीनुसार योग्य ते समुपदेशनही करत असे. त्यामुळे अनेकांना आपल्या कार्यांचं पौरोहित्य तिनंच करावं असं वाटत असे. अमेरिकेत तर अशा विधींमधून तिनं अनेकांची हृदयं प्रबोधिनीशी जोडली.
स्वभावत: एकांतप्रिय असूनही हा अनेकांची अंतरे राखण्याचा आणि जोडण्याचा वसा लतानं सदैव मन:पूर्वक जपला. सुरुवातीपासूनच तिच्या परिचयातल्या अनेकांना तिनं प्रबोधिनीच्या वर्तुळात सहजपणे आकर्षून आणि सामावून घेतलं आहे. काही व्यक्ती तर इतक्या भिन्न प्रवृत्तीच्या असत की, त्यांचं पाऊल प्रबोधिनीत पडलंच कसं असा प्रश्न पडावा.
सहजपणे आठवतं ते उदाहरण सिस्टर निष्ठा ह्यांचं. ह्या फ्रेंच मिशनरी बाई आम्हाला फ्रेंच शिकवत असत. बहुधा आमची ओळख आलियांस फ्रॉन्सेज ह्या संस्थेच्या कार्यक्रमात झाली असावी. इंग्रजी फारसं बोलू न शकणाऱ्या ह्या बाई प्रथम लताच्या घरी राहायला आल्या आणि मग प्रबोधिनी हेच त्यांचं घर बनून गेलं. त्यांच्या दुव्यामधून मग अनेक फ्रेंच मंडळी प्रबोधिनीशी जोडली गेली. वर्षारंभ, वर्षान्त अशा कार्यक्रमांना उपस्थित राहू लागली. त्यांची संख्या एवढी वाढत गेली की मग आपल्या पोथ्यांचा फ्रेंचमधे अनुवाद करण्याची वेळ आली. आपली कार्यवृत्तं आमच्या मदतीनं त्या फ्रेंचमधे भाषांतरित करून द्यायच्या. विविध उपक्रमांचे प्रस्ताव फ्रेंचमधून सादर व्हायला सुरुवात झाली आणि फ्रान्समधून प्रबोधिनीसाठी मदतीचा ओघ चालू झाला. सिस्टर निष्ठांना साहाय्यिका आणि दुभाषी म्हणून बरोबर नेऊन अप्पांनी फ्रान्ससह युरोपचा यशस्वी दौरा केला.
सिस्टर निष्ठांबद्दलची बातमी काही वर्षांपूर्वी कानावर आली ती, त्यांनी काश्मीरच्या थोर समन्वायक संत लालदेड ह्यांच्यावरच्या एका नाटकाचा फ्रेंचमधे अनुवाद केल्याची! मिता वसिष्ठ ह्या माझ्या मैत्रिणीनं ते नाटक दिग्दर्शित करून त्यात लालदेडची भूमिका केली होती.
एका परभाषी, ख्रिश्चन मिशनरी स्त्रीला आपलंसं करून तिच्या दुव्यामधून एवढा कार्यविस्तार साधणं, तिला आपल्या देशाच्या सुखदु:खांशी इतकं समरस करून घेणं ही फारच मोठी उपलब्धी म्हणावी लागेल. लतानं अप्पांच्या साथीनं ती साधली, हे एक विलक्षणच कर्तृत्व.
अप्पांनी आणि अण्णांनी इतरही अनेक क्षेत्रांमधून प्रबोधिनीशी जोडलेल्या अनेक थोर व्यक्तींशी लतानं घनिष्ठ आपुलकीचे संबंध निर्माण केले. श्री. श्रॉफ, श्री. कारिया, श्री. आचार्य ही त्या काळातली आठवणारी आणखी काही नावं. प्रकाश आमटे, वीणा देव, विजय सरदेशमुख, ह्यांच्यासारख्या प्रसिद्ध व्यक्तींपासून ते दादा कानडे, श्रीनिवास कुलकर्णी, हेमाताई होनवाड वगैरे कामसू व्यक्तींपर्यंत असंख्य लोकांना तिनं प्रबोधिनीच्या परिवारात सामावून घेतलं आहे.
पंजाब दौरा, राजस्थान दौरा, ‘आशा इज होप’ हा कार्यक्रम, प्रज्ञा मानस संशोधिकेचे उपक्रम अशी पुण्यातली कित्येक कामं यशस्वी केल्यानंतर १९८९ मधे लतानं सीमोल्लंघन केलं. तिची नेमणूक अण्णांनी सोलापूरची अवंतिकाबाईंची शाळा चालवण्यासाठी केली. सोपवलेल्या कामाला नकार देणं लताच्या रक्तातच नाही. खऱ्या कार्यकर्तीच्या आज्ञांकितपणे तिनं ही जबाबदारी स्वीकारली. पुण्यातलं बसलेलं बस्तान उठवून एका परक्याच गावात स्वत: नव्यानं रुजायचं आणि नव्या कामाची एकहाती पायाभरणी करायची, हे अवघडच म्हणायचं. आम्ही गमतीनं म्हणत असू की लता आता सासुरवाशीण झाली! (पुढे अण्णांनीही तिला भरपूर सासुरवास केला! त्यांच्या कठोर शिस्तीला अनेकजण वैतागत असत. पण लता त्यांच्या कसोटीला पुरेपूर उतरली. ‘उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही’ ह्या बाण्यानं, आत्यंतिक सोशिक वृत्तीनं ती कामाचे ढीग उपसत राहिली. ) खरोखरच सासरी गेलेल्या मुलीनं खाव्या तशा अनेक खस्ता खाऊन, विविध मंडळींची मर्जी प्रयत्नपूर्वक संपादन करून, चिकाटीनं काम करून तिनं अवंतिकाबाईंच्या शाळेचं खऱ्या अर्थानं प्रबोधिनीकरण केलं. शाळेचे पूर्वीचे समर्थक व्यवस्थापन बदलल्यामुळे साशंक असायचे. त्यांचा विश्वास तिनं संपादन केला एवढंच नव्हे, तर द्विगुणित केला. शाळा अधिक नावारूपाला आणली आणि उत्तम सहकारी मिळवून साखरशाळा, प्रौढ साक्षरता वर्ग असे अनेक उपक्रम यशस्वी करून दाखवले.
हराळी हे महाराष्ट्राच्या नकाशातलं एक ठिपक्याएवढं गाव. अण्णांनी त्याच्या भौतिक प्रगतीचा पाया घातला. अनेक सोयीसुविधा, हिरवे मळे आणि शाळा उभारून तिथे कार्याचं रोपटं लावलं. लतानं अलौकिक आपुलकीचा ओलावा शिंपून हे रोप बहराला आणलं. इतक्या कोपऱ्यातल्या ह्या दुर्गम गावाकडे अनेकजण आज खेचले जातात ते लताच्या व्यक्तिमत्त्वातल्या सात्त्विक आकर्षणामुळे; इथे उभारल्या गेलेल्या कामाच्या सचोटीमुळे आणि त्यात सहभाग म्हणजे आयुष्याची खरी कृतार्थता हे मनोमन जाणवल्यामुळे.
एवढंच करून आयुष्याचं सोनं झालं, असं मानती तर ती लता कसली? प्रबोधिनीचा एवढा प्रचंड कार्यभार सांभाळत असताना तिची अध्यात्मसाधनाही दमदारपणे चालू होती. एकाच व्यक्तीला दोन भिन्न क्षेत्रांमधे एवढी उंची गाठता यावी, एवढी लोकमान्यता लाभावी ही किती दुर्मिळ गोष्ट आहे!
मला तिच्या अध्यात्मसाधनेचा प्रवास अजून पुरता जाणून घेता आलेला नाही. त्याचे काही कवडसेच हाती लागल्यासारखे वाटतात. तिचं अध्यात्म पोथीबद्ध नाही; ती ते आचरणात आणण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत असते, हे मला जाणवलेलं आहे.
लताची रसाळ आध्यात्मिक प्रवचनं मी जिवाचे कान करून ऐकली आहेत. तिचा भर विद्वत्तापूर्ण विश्लेषणावर नसतो. घटपटाच्या लटपटी करायला तिला आवडत नाही, तर लोकांनी खरोखर साधना करून अलौकिक शक्तीचा प्रत्यय घ्यावा ही तिची तळमळ असते.
आपल्या भारतीय चित्रपटसृष्टीतल्या मजरुह सुलतानपुरी, शैलेन्द्र, लता, रफीसारख्या प्रतिभासंपन्न कलावंतांना गीतं परिपूर्ण वठवण्याचे निकष आपोआपच गवसले आणि त्या निकषांवर उतरणारं लेखन-गायन स्वयंभूपणे त्यांच्या लेखण्यांमधून किंवा गळ्यांतून अवतरलं. कुणाला त्यांना काही शिकवावं–पढवावं लागलं नाही. लताची प्रवचनकला हाही तितकाच उत्स्फूर्त, स्वयंप्रज्ञ आविष्कार आहे. आतला प्रकाश बाहेर फाकायला निमित्त शोधत होता, इतकंच. पुण्यातल्या सुविद्य आणि जाणकार श्रोत्यांनाही तिचं विवेचन समाधान देऊन जातं आणि बारामतीतल्या अशिक्षित बायांनाही तिच्या अंतरीचे बोल आयुष्याची लढाई लढायला बळ देतात.
आमच्या सहप्रवासातले काही झळाळ सहजपणे आठवणीच्या जाळ्यात गवसतात. तेच इथे सगळ्यांसह वाटून घ्यावे म्हणते.
प्रथम फर्ग्युसन आणि नंतर स. प. महाविद्यालयात आम्ही अनेक उपक्रमांत बरोबर भाग घेतला आहे – साहित्य सहकारमधल्या मैफली; सॉक्रेटिस क्लबमधले वादविवाद; वर्गप्रतिनिधीच्या निवडणुका; ‘डॉक्टर झिवॅगो’, ‘गॉन विथ द विंड’, ‘शहीद’ ह्यासारख्या चित्रपटांचा आस्वाद; ‘ऋतुचक्र’, ‘द लास्ट टेम्टेशन ऑफ ख्राइस्ट’, ‘चित्रलेखा’, ‘सावित्री’, ‘फाउंटन हेड’ सारख्या असंख्य पुस्तकांवरच्या चर्चा; मोहन रानड्यांची तुरुंगातून सुटका झाल्यानंतरची सभा; १९७१ मधे ढाका पडल्यानंतर एकमेकींना फोन करून साजरा केलेला आनंद; कॉलेज- युवकांनी उत्स्फूर्तपणे काढलेली विजययात्रा; इंदिरा गांधींची रेस कोर्सवरची विराट सभा आणि तिथून घरी येताना बस न मिळाल्यामुळे करावी लागलेली पायपीट; काळ्याकुट्ट रात्री प्रबोधिकांना घेऊन शिवापूरच्या दिशेनं हसतखेळत केलेली वाटचाल; कितीतरी शिबिरं; स्वत:पाशी प्रावीण्य नसतानाही युवतींकडून बिनचूक करून घेतलेली हॉकी, भालाफेक वगैरे क्रीडांची नेत्रदीपक प्रात्यक्षिकं; ग्यानबा तुकारामांचा वारीबरोबर केलेला गजर; निवासी शिबिरात निधडेपणानं रांधलेल्या पाककृती...
एकत्र गप्पा मारतामारता आपापल्या आवडत्या कवीच्या एखाद्या कवितेची आवेगानं आठवण यावी आणि प्रत्येकीनं स्वतंत्रपणे (आणि एकसमयावच्छेदे!) त्या वेगवेगळ्या कविता म्हणत (की बरळत?) सैराट येरझारा घालू लागावं, अशी झपाटलेली काव्यसंमेलनं आम्ही मैत्रिणींबरोबर साजरी केली आहेत. कवितेप्रमाणेच कामाचीही नशा एकत्र अनुभवली आहे. चांदण्या रात्री राजगडावर स्वारी करण्यातला थरार अनुभवला आहे. पंजाब दौऱ्यात प्रसंगी आंघोळ न करणं हीसुद्धा कशी देशसेवा ठरू शकते, त्याचा अनुभव घेतला आहे. प्रबोधिनीच्या कामाच्या अतिरेकावरून एकमेकींच्या घरच्यांच्या शिव्या खाल्ल्या आहेत. एकमेकींच्या घरच्या मंगल आणि शोकसिक्त प्रसंगांत सहभागी झालो आहोत. एकमेकींची आजारपणं आणि उदास मनोवृत्त्या निस्तरल्या आहेत. ‘सर देईन, परि सार न देईन’ ह्या ओळींचा इंग्रजी अनुवाद करण्यातला वैताग एकत्र अनुभवला आहे ... आणि ‘ I shall give my head, but not my soup!’ अशी गर्जना करून तो संपवलाही आहे! वर्षारंभ उपासनेतली परब्रह्माची कल्पना कुणा फ्रेंच युवतीला तिच्या भाषेत समजावून देताना आम्हाला ब्रह्मांड आठवलेलं आहे. अप्पा-अण्णांच्या आजारपणातले चढउतार हातात हात घेऊन सहन केले आहेत. ...
‘कसा करावा आपुल्या
देण्याघेण्याचा हिशेब?
रत्नखचित रातीचे
खाली झुकलेले नभ ..’
-शब्द दुसऱ्या कुणाचे? तिचेच... ऐन वेळी मदतीला धावून आलेले!
फार पूर्वीच जाणवलं होतं की, ह्या मुलीपाशी इतरांना रडवण्याचं दुर्मिळ सामर्थ्य आहे! चुंबकानं लोखंडाचे कण खेचून घ्यावेत, तसे हिला लोकांच्या डोळ्यांतले अश्रू आकर्षून घेता येतात. हिच्या सहृदय मार्दवात दुसऱ्यांच्या शल्यांचा आपोआप निचरा होऊन जातो. ‘ जी में आता है, तेरे दामन में सर छुपा के हम रोते रहें, रोते रहें ’ ... ही उत्कट गरज कुणाला नसते? पण अश्रूंनी भिजवायला पदरही तितकाच मायाळू आणि आश्वासक असावा लागतो. कुचेष्टा होणार नाही, कुठे उगाच बभ्रा होणार नाही ह्याची हमी असावी लागते. आपण आपल्या हक्काच्या घरी आलो आहोत असा दिलासा हवा असतो. आणि नंतर प्रसन्नतेच्या इंद्रधनुषी कमानीखालून आपला प्रवास पुन्हा धीरानं चालू राहील ह्याची ग्वाहीसुद्धा.
‘ मैं भी क्या चीज़ हूँ, खाया था कभी तीर कोई
दर्द अब जाग उठा, चोट लगे देर हुई
तुम को हमदर्द जो पाया, तो मुझे याद आया
के मेरे दिल पे पड़ा आ था कोई ग़म का साया ...’
ही मजरूह सुलतानपुरीची अनुभूती तिच्यामुळे तिच्या अनेक सुहृदांना आली.
मीनाकुमारीवरचं गाणं आलंच आहे ओठावर, त्यामुळे वाटतं; तिच्याप्रमाणेच लता ‘मैं चुप रहूंगी’ बाण्यानं, आपल्या पोळलेल्या मौनावर आपणच फुंकर घालून समजूतदारपणे जगली. आणि आपल्या सर्वांच्या वाट्याला तिचं पौर्णिम बोलणंच फक्त यायला हवं, ह्याचंही समंजस भान तिला तुलनेनं लहान वयातच आलं. असाध्य सहनसिद्धी तिला खूप सहजसाध्य झाली होती.
दुसऱ्याचं दु:ख किंवा समस्या जाणायला खूप संवेदनशीलता लागते आणि ते दूर करायला खरी कळकळ आणि अंतर्दृष्टी असावी लागते. नुसतं कोरडं विश्लेषण आणि मानसशास्त्रीय चिरफाड पुरी पडत नाही. प्रत्येक जिवाबद्दल खरी आस्था असावी लागते. तिच्या वागण्यातून ती सतत जाणवते. समोरच्या साध्यातल्या साध्या माणसालाही ती आदरानं वागवते, तो महत्त्वाचा आहे ह्याची त्याला जाणीव देते. मुख्य म्हणजे तिची आस्था माणसांपुरतीच मर्यादित नाही किंवा प्रबोधिनीच्या उंबरठ्यापाशीच थबकलेलीही नाही.
देशांतर करून हराळीला आलेलं कासवाचं पिल्लू एखाद्या संध्याकाळी एकटं, उदास व्हायचं. ते ओळखून ती इतर उद्योगांतून वेळ काढून, त्याला उचलून घेऊन, त्याच्या गळ्याखाली खाजवून त्याला दिलासा द्यायची. एखाद्या कार्यक्रमात दृष्टी अधू असलेल्या एका कार्यकर्तीकडे गायनाची जबाबदारी असायची, पण तिला मंचावर आपलं स्थान घेताना अडचण आली तर ती लक्षात येऊन झट्कन तिला हात द्यायचं भान हिलाच असायचं. अप्पा- अण्णांच्या आजारपणात तिचं त्यांच्याकडे बारीक लक्ष असायचं. अण्णांच्या बाबतीत तर धोक्याची जाणीव वेळीच होऊन तिनं दक्षता घेतली आणि वेळ निभावली, असं अनेकदा झालं.
माचणूरला ती एकांतसाधनेसाठी गेलेली असताना संसारात पिचलेली एक सामान्य, अशिक्षित बाई तिला सामोरी गेली. तिच्या सर्व भल्याबुऱ्या वैशिष्ट्यांसह हिनं तिचा पत्कर घेतला तो कायमचा - अगदी कायदेशीर बाबींची पूर्तता करून. तिच्या उपजीविकेसाठी हिनं स्वत:च्या पदराला खार लावून घेतला.
हराळीतल्या अनेक बायांची दुखणीखुपणी सहानुभूतीनं जाणून घेऊन ती ओळखीतल्या डॉक्टरांकरवी त्यांच्यावर अल्प खर्चात उपचार करवून देते.
शाळेपासूनच्या अनेक मैत्रिणींचे हात प्रबोधिनीच्या दैनंदिन धबडग्यात खरं तर सुटून जायचे. पण तिनं ते सुटू दिले नाहीत. देश-परदेशात, सत्संग परिवारात, जिथे कुठे कामाला जाईल त्या गावांत नवे, जिव्हाळ्याचे संबंध रुजवून जिवाच्या शर्थीनं तिनं ते सारे रेशमी धागे आजतागायत जपले आहेत. इतक्या सहजपणे हे बंध तिनं गुंफले आहेत की, हा एक चमत्कार आहे ह्याचंही भान कुणाला राहू नये.
कॉलेजच्या वयात बरोबरच्या कवी–कवयित्रींच्या कविता, त्यांचा साहजिक संकोच बाजूला सारत आग्रहानं वाचायला मागायचा आणि त्यांच्यावर सविस्तर, समतोल अभिप्राय द्यायचा तिचा शिरस्ता होता. आजही तरुण कवींच्या बाबत तेवढीच जिवंत उत्सुकता तिला असते.
सहवासात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याला तिनं केवळ स्पर्श केला आहे असं नाही; तर ते अधिक खुलावं-फुलावं, सार्थकी लागावं ह्यासाठी ती सहजस्फूर्तीनं, एखाद्या कुशल माळ्याप्रमाणे प्रयत्न करत आली आहे. दुर्धर आजारानं ग्रस्त असलेल्या पण अध्यात्माचं देणं देण्यासाठी तळमळणाऱ्या एखाद्या मैत्रिणीकडून तिनं कोणत्यातरी मौलिक पुस्तकाचा अनुवाद करून घ्यावा आणि त्याच्यावर आवश्यक ते संस्कार करून हर प्रयत्नानं तो प्रकाशित करावा. आणखी कुणाचा साहाय्यकाअभावी रखडलेला संशोधन प्रकल्प वेळात वेळ काढून आणि जिवाच्या पलिकडे काम करून मार्गी लावावा. एखादीचे साहित्यिक गुण हेरून तिला लिहायला उत्तेजन द्यावं. कुणाचा एकटेपणा लक्षात घेऊन तिच्या शस्त्रक्रियेसाठी सोबतीला धावून यावं. कुणाच्या जीवनक्रमाचा प्रवाह प्रिय व्यक्तीच्या व्याधी-वार्धक्यामुळे खंडित होत असेल, तर तिची जबाबदारी स्वीकारून तो पुन्हा वाहता-खेळता करून द्यावा. ... अनेक परींनी अनेकांच्या जिवाला खरा विसावा द्यावा – आणि हे सारं करून अलिप्त, नामानिराळं राहावं. कसलं श्रेय हाताला चिकटू देऊ नये.
तिच्या अशा गुणांचा गंध तिच्या सहवासात आलेल्या अनेक माणसांमधेही दरवळताना दिसतो, आणि ह्या सहजपणे घडून येणाऱ्या परागीभवनाचा विस्मयभरित आनंद होतो. ‘आपणासारिखे करिती तात्काळ’ ह्या संतलक्षणाचा प्रत्यय अशा वेळी येतो.
‘ फळा हळदिव्या झाकी हिरवासा पंख
रस गळे, करी चोच लालसर डंख
अशी पांखरून छाया, लावोनिया माया
आनंदाचे आसू लावी कोण ओघळाया?’
- ह्यातल्या आनंदाच्या आसवांशीदेखील तिचं जवळचं नातं आहे. मधे अनेक मैलांचं अंतर असलं तरी तिच्या प्रेमाची पाखर जाणवून जाते. त्याची कंपनं जाणवत राहतात.
२०१५ साली पुण्यात अनेकांना झाली, तशी मलाही चिकुनगुनियाची बाधा झाली. लता तेव्हा पुण्यात होती. तिलाही चिकुनगुनिया होऊन गेलेला असल्यामुळे त्या आजारात माणूस किती असहाय्य, परावलंबी होतो; त्याला किती वेदना होतात; हालचाल किती अवघड होते ह्याची तिला पुरेपूर कल्पना होती. माझ्याकडे राहून माझी शुश्रूषा करण्यासाठी तिचा जीव तळमळत होता. तर तिला पुन्हा बाधा होऊ नये, स्वत:चीच तब्येत नाजुक असताना तिनं माझ्यासाठी ताण घेऊ नये म्हणून मी तिला न येण्यासाठी विनवीत होते. अनेक जबाबदाऱ्या अंगावर असल्यामुळे शेवटी तिला माझं ऐकणं भाग पडलं.
फोनवर आमचं असं संभाषण झाल्यानंतरची गोष्ट. थोड्याच वेळात इमारतीत खालीच राहणारे आमचे सज्जन डॉक्टर, मी त्यांच्याकडे जाण्याची वाट न बघता स्वत:च उठून मला तपासायला आले. मला सूचना आणि औषधं देऊन ते निघून गेले. त्यानंतर बसल्या जागीच माझं ध्यान लागल्यासारखं झालं. मला अतिशय शांत, निवांत, स्थिर आणि विश्रांत वाटलं. विश्रब्ध वाटलं. ह्याचा काय अन्वयार्थ लावायचा, मला अजून नीट समजलेलं नाही. लताची तळमळीची प्रार्थना मला काहीतरी बाह्य साहाय्य आणि आंतरिक सामर्थ्य देऊन गेली, अशी माझी समजूत आहे. माझा चिकुनगुनिया आश्चर्यकारक रीत्या तीनचार दिवसांतच पळाला.
पुद्दुचेरीला योगी अरविंदांच्या आश्रमात सेवारत असणाऱ्या एक साधिका भेटल्या होत्या. अरविंदांच्या एका इंग्रजी ग्रंथाचा अनुवाद लतानं केला होता, तो आश्रमात त्यांच्या वाचण्यात आला. तो अनुभव सांगताना त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटले होते. “वाचतावाचता माझ्या खोलीतलं वातावरण बदललेलं मला जाणवलं. ते अरविंदांच्या कंपनांनी भारलं आहे असं मला जाणवलं. त्यांच्या चिंतनलहरी त्या अनुवादातून साक्षात् झंकारत आहेत असा प्रत्यय मला आला. खोलीत जणू एक वेगळाच प्रकाश फाकला होता. अंगावर रोमांच उभे करणारी ही साक्षात्कारी अनुभूती!” त्या अगदी भारावून बोलत होत्या.
हराळीला वीज खंडित होणं, इंटरनेटची सेवा नीट नसणं अशा अनेक अडचणी असल्या तरी परगावातल्या सुह्रदांपर्यंत तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा पोचणारच. पुण्यात आल्यावर वेळ आणि शक्ती जास्तीत जास्त ताणून ती अधिकात अधिक जनांना भेटून त्यांची खबरबात घेणारच. पोटाच्या विकारामुळे उभंसुद्धा राहवत नाही अशा शक्तिशून्य अवस्थेतही, केवळ प्रेमाखातर तिनं आपल्या विद्यार्थिनीच्या आईचा श्राद्धविधी स्वत: कसा संपन्न केला ते मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे.
एक सुंदर कथा आहे. एका पुण्यशील माणसाला देवदूत स्वर्गात पाचारण करायला येतो. चिकित्सक पुण्यात्मा देवदूताला स्वर्गलोकाची माहिती विचारतो. स्वर्गातली चिरंजीव सृष्टी, अम्लान फुलं ह्यांच्याबद्दल सांगताना देवदूत ओघात सांगून जातो, की स्वर्गात अश्रूंना अजिबात स्थान नाही. हे ऐकल्याबरोबर तो पुण्यात्मा स्वर्गात जायला नकार देतो. जिथे अश्रू नाहीत, तिथे संवेदना नाही; तिथे जिव्हाळा नाही. तिथे प्रेमाला वाव नाही. अश्रूंमधून निर्माण होणारी कळकळीची नाती नाहीत. थोडक्यात, तिथे माणुसकीच नाही! मग कुणाला हवा आहे असला कोरडा, भावविहीन स्वर्ग?
तिला मोक्ष हवा आहे हे आपल्याला माहीत आहे. पण तसला, अश्रूच नसलेला स्वर्ग तिला भावेल का?
..कुणास ठाऊक! एखादवेळेस दुसऱ्याच उद्योगात रमून ती ईश्वराच्या डोळ्यांतूनही पाणी काढेल.
- हेमा अंतरकर
होती अनेक हृदये जरि एकरूप
सामर्थ्य तेथ प्रकटेल तरी अमूप |
हा मंत्र संघरचनार्थ सदा जपू या
हे ज्ञान–कर्म–युत भक्ती–व्रत आचरू या ...
क्रीडा प्रात्यक्षिके २०२५