27/10/2024
*पापोचाकुकुचि*
दिवाळी अगदी तोंडावर आली होती आणि कुसुमच्या आईने आजच कुसुमसाठी बघण्याचा कार्यक्रम ठेवला. एका दिवसात दोन स्थळं कुसुमला बघायला येणार होती. काही अपरिहार्य कारणांमुळे असा तारखांचा घोळ झाला होता.
कुसुम खरं म्हणजे लग्नासाठी फार उत्सुक नव्हती. सगळंच फार झटपट होतंय असं तिचं मत होतं. आधुनिक विचारांची असल्याकारणाने मुली बघण्याच्या कार्यक्रमाला तर तिचा तीव्र विरोध होता. केवळ आई बाबांच्या आग्रहाने ती तयार झाली.
"काय गं आई. एवढी कसली घाई झालीये तुला माझ्या लग्नाची?" कुसुम पापोचाकुकुचि कढईत परतत म्हणाली.
पापोचाकुकुचि म्हणजे, पातळ पोह्यांचा कुरकुरीत चिवडा.
दिवाळीचा बहुतेक फराळ कुसुमची आईच बनवते. पापोचाकुकुचि मात्र कुसुम स्वतः बनवते. अगदी खमंग आणि कुरकुरीत.
तर, ठरल्याप्रमाणे एकापाठोपाठ एक अशी दोन स्थळं कुसुमला बघून गेली. त्यांचं आदरातिथ्य करता करता कुसुमच्या आई बाबांची पार तारांबळ उडाली. एरव्ही अशा कार्यक्रमांना कांदेपोहे असतात. आज मात्र कुसुम स्पेशल पापोचाकुकुचि होते. सर्वांना ते फार आवडले. कुसुमचं खूप कौतुकही झालं.
दोन्हीही स्थळं उत्तम होती. दोघांनाही कुसुम आवडली होती. आता दोघांपैकी कुसुम कोणाची निवड करणार, याचं आई बाबांना कुतुहल होते. अंतिम निर्णय कुसुमचा असणार होता. कुसुम मात्र दिवाळीचा आकाशकंदील बनवण्यात व्यस्त होती.
बराचवेळ वाट बघून शेवटी बाबांनीच विषय काढला. सोबत आई होतीच.
"कुसुम, मग काय ठरलं तुझं?" बाबांनी सावधपणे विचारले.
"कशा बद्दल?" कुसुम कंदिलाची शेपटी चिकटवत म्हणाली.
"अगं कशाबद्दल म्हणून काय विचारतेस? आज तुला बघुन गेलेल्या दोन मुलांपैकी तुला कोण पसंत आहे, हे विचारतोय मी."
कुसुमने एकवेळ आपल्या अधीर झालेल्या आईबाबांकडे पाहिले.
"जो पहिला मुलगा आला होता, तो." कुसुम आत्मविश्वासाने म्हणाली.
"म्हणजे मी त्याच्याशी लग्न करीनच असं नाही, पण मला त्याच्याबद्दल अधिक जाणून घ्यायला आवडेल."
कुसुमचं उत्तर ऐकून आई बाबांना अगदी हायसं वाटलं. दोघांपैकी एक तरी मुलगा कुसुमला आवडला होता. आधी लग्नाला ठाम नकार देणारी कुसुम आता "बघुया" वर आली होती.
"छान!!" कुसुमचे बाबा हसत म्हणाले.
"तुझी आवड, तीच आमची आवड. आपल्याला कसलीही घाई नाही, पण तुला तोच मुलगा का आवडला? म्हणजे, असं काय पाहिलंस तू त्याच्यात?" बाबांनी न राहवून विचारले.
"दोन्हीही मुलांना मी बनवलेला पापोचाकुकुचि दिला होता. दोघांनाही तो खूप आवडला." कुसुम पहिल्यांदाच थोडीशी लाजत होती.
"पहिल्या मुलाने मात्र अगदी सुकं खोबरं, मिरची आणि कडिपत्त्यासकट ताट स्वच्छ केलं."
"तुम्हाला समजतंय का बाबा?"
कुसुम डोळे विस्फारून बोलत होती.
"त्याने ताटात काहीही शिल्लक ठेवलं नाही. मोहरीचा एक दाणा सुद्धा नाही."
कुसुमचे आई बाबा कौतुकाने ऐकत होते.
शितावरून भाताची परीक्षा करतात, तशी कुसुमने पापोचाकुकुचि वरून वरपरीक्षा केली होती.
-- गुरूराज बुधकर (२७ ऑक्टोबर २०२४)
https://gomarathi.in/blogs/gururaj-budhkar/papochakukuchi.html