12/12/2021
CP from Shri Erande
पालकांनी वागायचं तरी कसं? ही ब्रह्मास्त्र वापरून बघा!
भाग २
"शाळेतून आल्यावर शूज आणि स्कुलबॅग जागेवर ठेव" , "अरे बाबा/ अगं बाई स्कुल बस यायची वेळ झाली, तू घोरत काय पडली आहेस" "आज होमवर्क काय आहे, हे सुद्धा तुला सांगता येत नाही" "झालं वस्तू वापरून झाली की दिली टाकून, जागेवर ठेवता येत नाही?" जगातल्या एका तरी घरात आत्ता या क्षणाला यातील एक तरी वाक्य ऐकवलं जात असणार, याची मला शंभर टक्के खात्री आहे!
मुलांच्या या अशा वागण्याला अनेक पालक शब्दश: वैतागून गेल्याच दिसत. मुलांच्या अशा वर्तवणुकीत कसा बदल घडवून आणायचा, याविषयी आपल्या गटातील पालकांनी काही प्रश्न विचारले होते तेव्हा मी त्यांना आज जे ब्रह्मास्त्र सांगणार आहे, तेच सुचवले होते आणि हे ब्रह्मास्त्र वापरल्याने समस्या सुटल्याचे एका पालकांनी कळवले देखील होते! आपला प्रश्न सुटला आहे, असं पालकांनी कळवणे हे दुर्मिळ असल्याने त्या पालकांनी कळवल्याचं ,माझ्या बरोब्बर लक्षात राहिले आहे!
या ब्रह्मास्त्राच्या काही पायऱ्या आहेत, त्या पायऱ्या आपल्या मुलाचा स्वभाव,घरातील वातावरण आणि वर्तवणुकीची तीव्रता या गोष्टी बघून वापरायच्या आहेत. आणि हो, एक महत्वाची गोष्ट, मी या विषयातील तज्ञ नाही तर तुमच्यासारखाच एक पालक आहे. अमेरिकेतील येल विद्यापीठाचा एक कोर्स करताना, मला या पायऱ्या सापडल्या, त्या मी वापरून बघितल्या,मला "गुण" आल्याने मी त्या इतरांना सांगायला सुरुवात केली!
या पायऱ्या कोणत्या?
१. पहिली आणि म्हणूनच सगळ्यात महत्वाची पायरी म्हणजे, आपल्या मुलाची एखादी वर्तवणूक आपल्याला समस्या वाटत असेल तर त्या प्रसंगात, मुलाकडून नक्की कोणती वर्तवणूक अपेक्षित आहे, हे आपल्याला अत्यंत स्पष्ट असले पाहिजे. उदाहरण मुलगा सकाळी शाळेत जायच्या वेळेत किंवा ऑनलाईन क्लासच्या वेळेत घोरत पडत असेल तर त्याच्याकडून अपेक्षित कृती ही त्याने "वेळेवर उठणे" ही आहे, हे आपल्याला मांडता आले पाहिजे.
२. एकदा का अपेक्षित कृती कळाली की कृती प्रत्यक्षात आणण्यासाठी काय अडचणी आहेत हे आपल्याला निरीक्षणातून किंवा मुलांशी बोलून समजून घ्यावे लागेल. म्हणजे रात्री झोपायला उशीर होतो का? रात्री झोप लागत नाही का वगैरे?
३. अपेक्षित कृती अमलात आणण्यासाठी मुलाला अपेक्षित कृतीचा सराव करण्याची संधी दिली पाहिजे. हि संधी देताना मुलाचं वय, त्याचा स्वभाव आणि घरातील वातावरणाचा विचार केला पाहिजे.
४. अपेक्षित कृतीचा सराव मुलांशी रोल प्ले म्हणजे खेळता खेळता करता येईल. त्यातून उशिरा उठल्याने सगळ्यांची होणारी तारांबळ मुलाच्या लक्षात आणून देता येईल.
५. मुलाला अपेक्षित कृती केल्यास काही बक्षीस देता येईल का हे सुद्धा बघता येईल. मात्र हे बक्षीस देताना, ते केवळ आणि केवळ त्याच्या वेळेवर उठण्याच्या कृतीला दिलेले बक्षीस आहे, याची त्याला पूर्ण जाणीव असेल हे बघावे लागेल. हे बक्षीस लगेच मिळणारे असावे आणि हळहळू वेळेवर उठणे ही सवय मुलाला लागतेय हे बघून हे बक्षीस हळहळू बंद सुद्धा केले पाहिजे.
६. काही मुलांना चॅलेंजेस स्वीकारायला आणि ती पूर्ण करायला आवडतात! अशा मुलांसाठी " सकाळी वेळेवर उठणे असेल, वस्तू जागेवर ठेवणे असेल किंवा लहान भावाशी हिंसक "न" वागणे असो" ही अपेक्षित कृती एक चॅलेंज म्हणून आपण ठेवू शकतो.
७. अपेक्षित कृती घडवून आणण्यासाठी आपण यापैकी कोणतीही पायरी करणार असू, तर हे करताना, घरातील आणि मुलाच्या शाळेतील तसेच इतर "स्टेकहोल्डर्सना" विश्वासात घेऊन, आपण असा बदल करतोय आणि हे बदल करताना, मूल नाऊमेद होऊ नये याची आपण सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे, हे त्यांना विश्वासात घेऊन सांगितले पाहिजे.
८. शेवटचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्या उपायांनी मुलांच्या वर्तवणुकीत जे सकारात्मक बदल दिसू लागतील, त्याचे आपण मनमोकळे कौतुक केले पाहिजे. आणि हो कौतुक करताना, स्तुती करताना, कौतुक "कृतीचे" झाले पाहिजे, "व्यक्तीचे" नाही. त्याचबरोबर हे सगळं करत असताना, संयम ठेवणे, मुलाच्या, आपल्या हातून काही चुका झाल्या तर त्या व्यक्तीच्या चुका नसून "कृतीतील" उणिवा आहेत, हे समजून, "चौकशी" आयोग नेमण्यापेक्षा, उणिवा दूर करण्यावर भर दिला पाहिजे.
या पायऱ्या जर आपण नीट समजून घेऊन, आपल्या मुलाच्या स्वभावाला अनुसरून, घरातील वातावरणाला अनुसरून अंमलात आणल्या तर आपण वर्तवणुकीच्या कोणत्याही समस्या सोडवू शकतो, असा माझा वैयक्तिक अनुभव आहे!!
चेतन एरंडे.