22/03/2026
आजच्या 'लोकसत्ता' मधला श्रीनिवास बाळकृष्ण यांचा लेख वाचला आणि मुलींचा अभ्यास झाल्यानंतर थोडा ब्रेक म्हणून मुलींना हा उद्योग द्यायचं ठरवलं.
झोपण्यापूर्वी विरंगुळा होईल, आणि शांत झोप लागायला मदत होईल असं मला वाटत होतं. पण झालं ते त्याही पेक्षा अधिक चांगलंच!
एक तर मुलींनी स्वतःहूनच ठरवलं की हे पाण्याच्या रंगांनी नाही तर कोरड्या रंगांनी करायचं. थोडी माझी मदत घेतली की "आई, छोटा कागद घेऊ की मोठा घेऊ?" "रंग कुठे ठेऊ?", "आई, रंग डोळे बांधल्यानंतर घेऊ की आधीच घेऊन ठेवू?"
मग शेवटी आमचं एकेक करत सगळे प्रयोग करून बघायचं ठरलं. एकदा त्यांनी सगळं न बघता केलं. एकदा माझ्याकडे आपल्याला हवा असलेला एकेक रंग मागत चित्र काढलं. एकीने नंतर स्वतः डोळे उघडून रंग उचलून घेतले आणि डोळे बंद करून चित्र रंगवत गेली, नंतर डोळे उघडून शेजारी ते चित्र डोळे उघडून काढून पाहिलं. असे अनेक प्रयोग केले.
मजा आली ती हे सगळं त्या करत असताना, त्या दोघींकडे बघायला... ऋषिकाची चित्रं टेक्निकली (म्हणजे रेषा, स्ट्रोक्स, रंगांची निवड अशा पातळ्यांवर) परफेक्ट येत होती; तर राधिका उडालेला कागद बोटांनी पुन्हा पुन्हा स्पर्श करत तपासून रंग तिथेच आहे का उलट्या बाजूला..ते तपासून बघायची. बराच वेळ त्या चित्राचा, रंगांचा वास घेत बसायची. शेवटी डोळे उघडल्यावर आनंदून म्हणाली, "आई मला न, न बघताच कळालं होतं की हा लाल आणि हा पिवळा आहे!" "आई मला असं वाटतंय की मी माझे बाकीचे चारही senses पूर्णतः वापरत होते.." हे मला दिसतच होतं..पण तिचं तिलाही कळलं होतं, हे बेस्ट होतं.
.मी विचार करत होते की.. अभ्यासानंतर हे करायला द्यावं की चार-पाच तासांच्या अभ्यासाच्या बैठकीच्या मध्ये..? कारण.. इथे झोपेपूर्वी senses शांत झालेले नसून जास्त activate झालेले आहेत!
आता रात्रीचे साडे १२ वाजून गेलेत तरी दोघी टकाटक जाग्या आहेत!
आता...? आडवं पडून रंगवलेल्या तबल्यावर ठेके वाजवणं चालू आहे दोघींचं... 😵😵😵 दमलेय मी.. पण झोपेचा मागमूस दिसत नाहीये त्या दोघींच्या राज्यात...😞😞😞
त. टी. : (१) बाल मैफिलीतली श्री. श्रीनिवास बाळकृष्ण यांची ही सीरिज उत्कृष्ट आहे. नक्की वाचा आणि मुलांना याचे प्रयोग करू द्या. इथल्या फोटोतून कुणाला नीट वाचता येत नसल्यास मला सांगा, मी पाठवून देईन.
(२) वॉटर कलर्स वापरून आम्ही हे कसं कधी करणार आहोत यावर स्वप्नरंजन करून झालंय आमचं.. फक्त आईने नंतरचा ओला पसारा आवरण्यापासून सुट्टी द्यायला तिचा मूड चांगला कधी असेल याची वाट बघणं चालू आहे.... ;)
#गोष्टींच्या_गावात #छोट्यांच्यागोष्टी