05/10/2024
● शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेती प्रियंका ●
◆ खो-खो खेळातील नवदुर्गा क्रमांक २ : प्रियंका इंगळे ◆
मन, मेंदू आणि अफाट सरावाचा मेळ म्हणजे खेळ खो-खो. इयत्ता पाचवीत असताना लाल मातीत उतरण्याचा घेतलेला निर्णय तिला आज महाराष्ट्र शासनाच्या सरकारी नोकरी पर्यंत घेऊन गेला. ती प्रियंका हनुमंत इंगळे आहे आपली खो-खो खेळातील दुसरी नवदुर्गा. सध्या ती आयकर विभागामध्ये कर सहाय्यक या पदावर कार्यरत आहे. नुकतीच तिची राजपत्रित क्रीडा अधिकारी पदी देखील थेट निवड झाली आहे.
घरची परिस्थिती तशी बेताचीच. वडिलांचा गाड्यांचा व्यवसाय तर आई घर सांभाळत असे. वडिलांचा व्यवसाय गाड्यांचा होता पण त्या गाड्यांच्या चाकांचा वेग प्रियंकाच्या पायी होता असे म्हणले तरी वावगे ठरणार नाही. कारण आळंदीच्या श्री सयाजीनाथ महाराज विद्यालयाच्या मैदानावर खो-खो हाच खेळ तिने निवडला. ज्या खेळामध्ये कधी तुमची वेगाशी स्पर्धा असते तर कधी हवेत झेपावत वेगालाही आव्हान द्यायचे असते. शाळेत पाचवीच्या वर्गात शिकत असताना रोज मैदानावरती खो-खो या खेळाचा सराव चालायचा. शाळा सुटली की घरी न जाता प्रियंका तो सराव रोज पाहत असे. आपणही या मैदानावर उतरलं पाहिजे, मैदान गाजवले पाहिजे हा विचार मनात आला अन तिने आयुष्यातला पहिला खो दिला, ते वर्ष होते २००९ !
सुरुवातीला खो-खो हा खेळ खेळत असताना प्रियंकाच्या घरच्यांना खो-खो खेळाची पार्श्वभूमी नव्हती. त्यामुळे त्यावेळेस थोडाफार का होईना पण घरच्यांचा नकार असायचा. पण अंगी चपळता असल्याने खो-खो हा खेळ कधी तिच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला हे तिलाही समजले नाही. लवकर बाद न होणारी आणि खांबावर अचूक गडी टिपणारी खेळाडू म्हणून तिची महाराष्ट्र राज्याच्या संघामध्ये निवड झाली. आपली मुलगी मैदान गाजवतेय हे जेंव्हा आई वडिलांच्या लक्षात आले तेव्हापासून घरच्यांचा खेळासाठी पाठिंबा खूप वाढला. २०१३-१४ साली १४ वर्षे वयोगटातील स्पर्धेत 'सर्वोत्कृष्ट खेळाडूचा इला पुरस्कार' ही खो-खो खेळातील तिची पहिली मुसंडी होती. त्यांनतर जेंव्हा इतर लोक घरी येऊन प्रियंकाच्या खेळाचे कौतुक करायचे तेंव्हा आपल्या लेकीचा आईला विशेष अभिमान वाटायचा.
आपल्या यशाचे श्रेय ती मार्गदर्शक अविनाश करवंदे सरांना देते. त्यांच्याच मार्गदर्शनामुळे आज यशाचे शिखर गाठता आले. पालकांची भूमिकाही तेवढीच महत्वाची होती. त्यांनतर तळेगावच्या इंद्रायणी महाविद्यालयात प्रवेश घेतला व खो-खो चा नवा अध्याय सुरू झाला. खो-खो खेळातील एक उदयोन्मुख खेळाडू म्हणून प्रियंका इंगळे हे नाव राज्यभर नावारूपाला आले होते. २०२१-२२ सालच्या महिला गटाच्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत केलेल्या अष्टपैलू कामगिरीने तिला राणी लक्ष्मीबाई या पुरस्कारान गौरविण्यात आले. शालेयस्तरापासून सुरू झालेला खो-खो चा प्रवास आता आंतरराष्ट्रीय पातळीवर न्यायचाच हे ध्येय ठेवून सराव चालू ठेवला होता. आणि ती वेळ आलीच जेंव्हा तिची २०२२-२३ च्या चौथ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली. हा मी क्षण कधीच तिच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण होता. एकूण २३ राष्ट्रीय स्पर्धा, १८ सुवर्णपदके ही खो-खो खेळाने दिलेली संपत्ती इतर कोणत्याही दागिन्यांपेक्षा खूप मोठी आहे.
खो-खो खेळातील सर्वोत्तम कामगिरी साठी प्रियंकाला मानाचा समजला जाणारा महाराष्ट्र राज्य शासनाचा श्री शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार २०२२-२३ साली मिळाला. अविनाश किसन करवंदे या गुरूंच्या चरणी ती आदराने नतमस्तक होते कारण आज त्यांच्याशिवाय हे सगळं वैभव उभं करू शकले नसते, त्यांच्यामुळे मला एवढे नावलौकिक मिळाला अशी तिची भावना आहे.
सध्या खो-खो खेळणाऱ्या मुलींना संदेश देताना ती सांगते की खो-खो हा खेळ आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळ आहे. आज या खेळातून शासकीय नोकरीच्या थेट नियुक्तीसाठी ३२ जण पात्र ठरले आहेत.
आज महाराष्ट्र राज्य शासनाची गट ब राजपत्रित क्रीडा कार्यकारी अधिकारी म्हणून माझी निवड झाली. मी खो-खो खेळते याचा मला खूप अभिमान आहे आपण सर्वांनी खो-खो खेळाला असेच पुढे घेऊन गेले पाहिजे एवढाच मी संदेश देते. मी खो-खो खेळते याचा मला खूप अभिमान आहे.. !
प्रियंका इंगळेचा खो-खो प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. खेळून काय होतं ? असा प्रश्न विचारणाऱ्यांना उत्तर हे प्रियंकाने मिळवलेले यश आहे. नवरात्री उत्सवातील ही दुसरी नवदुर्गा ! तिला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा !!
संकलन
डॉ. राजकुमार देशमुख
#जागर_नवरात्रीचा
#सन्मान_खो_खो_कन्येचा
#खो_खो #नवदुर्गा
05/10/2024
● आई-वडील व मार्गदर्शकांच्या खंबीर पाठबळाने गाजवले खो-खो मैदान
◆ खो-खो खेळतील नवदुर्गा क्रमांक १ : निकिता पवार ◆
लाल मातीतील स्वप्नाला जिद्दीची जोड मिळाली आणि धाराशिवची निकिता आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकली. होय धाराशिव सारख्या ग्रामीण भागातून येऊन निकिता चक्रधर पवार ही आजची आपली पहिली खो-खो खेळातील नवदुर्गा आहे.
खो-खो या खेळामुळे आज ती आयकर विभागामध्ये एम टी एस या पदावर कार्यरत आहेत. घरामध्ये शिक्षक असलेल्या वडिलांनी लहानपणापासून अभ्यासाबरोबरच निकिताला मैदानावर देखील उतरवलं. गृहिणी असलेल्या आईंना निकिताला मैदानावर पाहून खूप आनंद होत असे.
धाराशिवच्या श्रीपतराव भोसले हायस्कूलच्या मैदानावर शाळा सुटल्यानंतर खो-खो चे मैदान गजबजून गेलेले असायचे. ते पाहून आपणही खो-खो च्या मैदानावर उतरलं पाहिजे हा विचार निकिताच्या मनात आला. सहावीत असताना सरांजवळ खो-खो खेळण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्याच वेळी मैदानावर पाहिलं पाऊल ठेवलं. ते वर्ष होतं २००५ जेंव्हा पहिल्यांदा दोन खांबामधील जगाशी लळा लागला.
धाराशिव तसा ग्रामीणच भाग त्यामुळे मुली मैदानावर खेळताना त्यावेळी क्वचितच दिसायच्या. निकिताने जेंव्हा खो-खो खेळायला सुरुवात केली तेंव्हा 'मुलींनी खेळून पुढे काय' ? असे अनेक प्रश्न नातेवाईक, समाजातून विचारले जाऊ लागले. परंतु मार्गदर्शक व आई वडील खंबीरपणे पाठीशी राहिल्याने बऱ्याच अडचणीवर मात करणे सोपे गेले. पाहता पाहता निकिताने तालुका, जिल्हा पातळीवर आपल्या आक्रमक खेळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दररोज नियमित सराव आणि खो-खो या खेळासाठी लागणारी चिकाटी निकिताकडे उपजतच होती. धारधार आक्रमण आणि कौशल्यपूर्ण बचाव हे तिच्या खेळाचे वैशिष्ट्य होते. त्यामुळेच पुढे जाऊन तिला राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. तेरणा महाविद्यालयाकडून विद्यापीठ स्पर्धेत चमकदार कामगिरी केली.
धाराशिव मधून सुरू झालेला खो-खो चा प्रवास निकिताला आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत घेऊन गेला. आपल्या मेहनतीच्या जोरावर तिने आजपर्यंत महाराष्ट्राला २५ राष्ट्रीय सुवर्णपदक मिळवून दिली. एक वेळा आशियाई क्रीडा स्पर्धा, एक वेळा दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत देशाला सुवर्णपदक मिळालेल्या संघाची ती महत्वाची खेळाडू होती. आत्तापर्यंत तिने पाच वेळा महारष्ट्र संघाचे कर्णधार पद भूषविले आहे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे.
सन २०११-१२ मध्ये राष्ट्रीय स्पर्धेत भारतातील खो खो खेळामध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूला दिला जाणारा ईला पुरस्कार प्राप्त झाला तो क्षण निकिताच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे. आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करायला मिळणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. सन २०२३ आंतरराष्ट्रीय आशियाई स्पर्धेत भारत देशाचा गणवेश परिधान करून खेळण्याचे स्वप्न पूर्ण झाले. या सर्व कामगिरीमागे प्रशिक्षक भारतीय खो खो महासंघाचे सहसचिव, महाराष्ट्र खो खो असोसिएशन चे सचिव आदरणीय प्रा डॉ चंद्रजीत जाधव सर व राष्ट्रीय खो खो मार्गदर्शक श्री प्रविण बागल सर, अभिजित पाटील सर यांचे खूप मोठे कष्ट आहेत.
● मुलींनी आत्मनिर्भर होण्यासाठी खो-खो खेळाकडे वळावे
सध्या खो-खो खेळणाऱ्या मुलींना संदेश देताना निकिता सांगते की खो-खो हा ग्रामीण भागातील खेळ समजला जात असला तरी आज या खेळाची वैश्विकता पाहता जगातील ३६ विविध देशात या खेळाची लोकप्रियता पोहचली आहे. त्यामुळे खो-खो हा खेळ फक्त ग्रामीण भागापुरता मर्यादित न राहता जगातील कानकोपऱ्यात पोहचला आहे. त्यामुळे लवकरच ऑलोम्पिक स्पर्धेत सुद्धा याचा समावेश होऊ शकतो. खो-खो खेळामुळे बुद्धीचा विकास व शरीराची चपळता लवचिकपणा इत्यादी अनेक शारीरिक विकासासाठी फायदेशीर आहे.
खो खो मुळे आज फक्त धाराशिव सारख्या जिल्ह्याच्या मैदानावरील ३५० पेक्षा जास्त खेळाडू हे सरळ सेवेने विविध सरकारी पदावर नौकरीत लागले आहेत. तर याच मैदानावरील पाच पेक्षा जास्त खेळाडू राजपत्रित अधिकारी वर्ग दोन पदावर सरळ सेवेने सामावून घेतले आहे. वरील यश पाहता मुलींना मी हाच संदेश देऊ इच्छिते की प्रत्येक मुलीने आत्मनिर्भर होण्यासाठी खो-खो खेळाकडे वळावे.
खो-खो हेच आपले ध्येय समजून शेवटपर्यंत खेळत राहावे, आपल्याला जीवनाची दिशा आणि दशा बदल्यानासाठी खो खो हा खेळ नक्कीच किफायतशीर ठरेल. मी आज २० वर्षापेक्षा जास्त कालावधी खो-खो खेळात घालवत आहे व आज मी राजपत्रित अधिकारी वर्ग दोन पदावर आहे त्यामुळे मला नक्कीच माझ्या खो खो खेळाचा अभिमान वाटतो व आपण सुद्धा अभिमानाने खो-खो कडे पहावे !
निकिताच्या यशाकडे पाहून पुढे अनेक मुली खो-खो च्या मैदानावर उतरतील हीच नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने अपेक्षा बाळगूया! निकिताला पुढील कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा !!
संकलन
डॉ. राजकुमार देशमुख
#जागर_नवरात्रीचा
#सन्मान_खो_खो_कन्येचा
#खो_खो
#नवदुर्गा
15/07/2024
द्रविड इतका सभ्य का आहे? कारण त्याला गुंडाप्पा विश्वनाथ बनायचं होतं…
१९८० चा फेब्रुवारी महिना , इंग्लंडची टीम भारत दौऱ्यावर आली होती. एकच कसोटी सामना खेळवला जाणार होता. बीसीसीआयला ५० वर्षे पूर्ण झाली म्हणून मुंबईमध्ये आयोजित केलेल्या या खास सामन्याला ज्युबली कसोटी असे नाव देण्यात आले होते.
इंग्लंडची टीम दिग्गज होती. ग्रॅहम गुच, इयान बॉथम, डेव्हिड गोव्हर,डेरेक अंडरवूड सारखे मोठे खेळाडू होते. माईक ब्रियरली त्यांचा कप्तान होता. भारताच्या टीममध्ये सुनील गावस्कर, कपिल देव, वेंगसरकर, संदीप पाटील असे चांगले खेळाडू होते. पण तुलनेने आपली टीम इतकी अनुभवी नव्हती. भारताचा कप्तान होता गुंडाप्पा विश्वनाथ. आपण टॉस जिंकून पहिली बॅटिंग निवडली. किरमाणी आणि गावस्कर यांच्या बॅटिंगच्या जीवावर भारताने २४२ धावा बनवल्या. याला उत्तर देण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या टीमची सुरवात अतिशय खराब झाली. कर्सन घावरी आणि कपिल देव च्या स्विंग बॉलिंगने इंग्रज खेळाडूंना जखडून ठेवलं होतं.
एक वेळ अशी आली की इंग्लंडचे ५८ धावांवर ५ बाद झाले होते. सर्व प्रमुख फलन्दाज स्वस्तात आउट झाले होते. आता क्रीझवर इयान बोथम आणि बॉब टेलर हे दोघेही ऑल राऊंडर होते. म्हणजेच त्यांच्याकडून खूप मोठ्या स्कोअरची अपेक्षा नव्हती. भारताचे वेगवान गोलंदाज त्यांना सहज गुंडाळतील असच वाटत होतं. आणि झालंही तसंच. कपिलच्या एका जबरदस्त तेजतर्रार बॉलचा बॉब टेलरला अंदाजच आला नाही. त्याने बॅट फिरवली, आवाज आला आणि विकेटच्या मागे असलेल्या सय्यद किरमाणीने सहज कॅच पकडला. कपिलने जोरदार अपील केली. किरमाणी आणि इतर स्लिपमधील खेळाडू सुद्धा त्याला जॉईन झाले. अंपायरने टेलरला आउट दिलं. मान हलवत तो पॅव्हेलियनला जाण्यासाठी निघाला एवढ्यात भारतीय कॅप्टन गुंडाप्पा विश्वनाथने त्याला अडवलं. त्याने टेलरला विचारलं कि, बॉल तुझ्या बॅटला लागलेला का ? टेलरने नाही म्हणून सांगितलं. लगेच विश्वनाथने अंपायरला आम्ही अपील मागे घेतोय टेलरला परत बोलवा असं सांगितलं.
अंपायर हनुमंतराव यांनी भारतीय कप्तानच्या सांगण्यावरून त्याला परत बोलावलं. बॉब टेलर परत आला आणि त्याने इयान बॉथम बरोबर १७४ धावांची पार्टनरशिप केली. भारत ती मॅच १० विकेट्सनी हरला. याला जबाबदार जी.विश्वनाथ याच्या सज्जनपणाला धरण्यात आलं.
तो तसाच होता. आयुष्यभर सज्जनपणाबद्दल बायकोच्या शिव्या खाणाऱ्या एखाद्या मध्यमवर्गीय माणसासारखा. आजही भारतातल्याच नाही तर जगातल्या सर्वोत्तम फलंदाजांची यादी काढली जी विश्वनाथ याच नाव सर्वात आघाडीवर घ्यावं लागेल पण दुर्दैव म्हणजे आजकालच्या कित्येकांना जी विश्वनाथ हे नाव देखील ठाऊक नसते.
द्रविड प्रमाणे मूळचा कर्नाटकचा असलेला जी.विश्वनाथ आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी ओळखला जायचा. त्याचे मनगटी शॉट विशेषतः लेट कट जगभरात गाजले होते. अगदी वेस्ट इंडिजच्या मृत्यूदूत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तेजतर्रार बॉलिंगला तो सहज सामोरा जायचा. भारतासाठी त्याने गावस्करच्या सोबतीने कित्येक कसोटी सामने वाचवले.
राहुल द्रविड सारख्या अनेक खेळाडूंचा आदर्श गुंडाप्पा विश्वनाथ आहे. त्याचे वडील विश्वनाथचे फॅन होते. त्यांनी सांगितलेल्या असंख्य किस्से आणि स्टोरीमधून प्रभावित झालेल्या राहुलला मोठेपणी गुंडाप्पा विश्वनाथ बनायचं होतं. हेच स्वप्न घेऊन राहुल क्रिकेट खेळू लागला. पुढे तर त्याला विश्वनाथ यांच्या कोचिंग खाली शिकण्याची संधी देखील मिळाली.
रणजी मध्ये त्यांच्या प्रशिक्षणाखाली राहुलवर पैलू पडले. विश्वनाथ यांच्याप्रमाणे सभ्यपणा द्रविडमध्ये देखील मुरला. कधीही विरुद्ध टीमला स्लेजिंग करायचं नाही. आपल्या टीकाकारांना उत्तर बॅटने द्यायचं ही विश्वनाथ यांची शिकवण द्रविडने आपल्या संपूर्ण कारकिर्दीत कधीही विसरला नाही. मैदानात आणि मैदानाबाहेर तो विश्वनाथ यांनी दाखवलेल्या मार्गावरच चालत राहिला.
फक्त स्वभाव आणि बॅटिंग स्टाईल एवढं नाही तर विश्वनाथ आणि द्रविडमध्ये अनेक बाबतीत साम्य आहे. दोघांचीही कारकिर्द टीममधल्या सुपरस्टार खेळाडूमुळे झाकोळली गेली. ज्याप्रमाणे सचिनच्या महानतेच्या सावलीमुळे द्रविडच्या बॅटिंगकडे रसिकांचे आणि समीक्षकांचे दुर्लक्ष झाले तसेच विश्वनाथच्या बॅटिंगला सुनील गावस्करमुळे कधीच उचित न्याय मिळाला नाही.
राहुल प्रमाणेच विश्वनाथ निवड समितीने केलेल्या अन्यायामुळे आणखी काही दिवस खेळण्याची क्षमता असूनही लवकर रिटायर झाला.
गावस्कर हा टिपिकल मुंबईचा खडूस खेळाडू होता. त्याने मैदानंतर गाजवले पण आपल्या भोवतीचे फेम प्रोफेशनल अटेन्शन व्यवस्थित सांभाळले. गावस्कर स्वतः मात्र विश्वनाथचा प्रचंड मोठा चाहता होता. दोघे एकत्र ओपनर म्हणून भारताच्या इनिंगला सुरवात करायचे. गावस्कर सांगतो “ वेस्ट इंडिजमध्ये खेळताना तिथल्या फास्टर बॉलर्सचे अवघड बॉल विशी किती सहज खेळतो हे बघून मला नेहमी दडपण यायचं.”
गावस्कर आणि गुंडाप्पा विश्वनाथ हे खऱ्या आयुष्यात देखील चांगले मित्र होते. इतकंच काय तर गावस्करच्या सख्ख्या बहिणीचे विश्वनाथ बरोबर लग्न झालं होत. गावस्करने त्याच्या मुलाचं नाव गुंडाप्पा विश्वनाथ, रोहन कन्हई आणि विक्रम जयसिंघे या तीन आवडत्या फलंदाजावरून ठेवलंय.
“रोहन जयविश्वा”
खेळात असतानाही विश्वनाथ कधी प्रसिद्धीच्या झोतात आला नाही. रिटायर झाल्यावरही कॉमेंटेटर किंवा बीसीसीआयचे मॅनेजमेंट सारख्या वलय व पैसा असणारे क्षेत्रात तो गेला नाही. या ऐवजी शांतपणे कोचिंग मधून नवीन पिढी घडवण्याकडे त्याने लक्ष दिले. राहुल द्रविड देखील याच मार्गाने चालला आहे.
विश्वनाथ यांनी निवृत्ती नंतर मॅच रेफ्री म्हणून देखील काम पाहिलं, काही काळ राष्ट्रीय निवड समितीमध्ये देखील होते. बेंगलोरच्या नॅशनल क्रिकेट अकादमीची जबाबदारी त्यांनी अनेक वर्ष सांभाळली. ते खेळत असताना भारत सरकारने अर्जुन अवॉर्ड दिला होता तसेच काही वर्षांपूर्वी बीसीसीआयने भारतीय क्रिकेटमधील सर्वोच्च समजला जात असणारा सीके नायडू लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्डने त्यांचा सन्मान केलाय.
आजही भारतीय क्रिकेटमध्ये विश्वनाथ यांच्या शब्दाला मान आहे. फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात फेअरप्लेला समानार्थी शब्द म्हणून गुंडाप्पा विश्वनाथ यांना ओळखलं जातं.