25/08/2019
बोरकूट, चिंचेच्या गोळ्या, थोडी लाल रंगाची आडव्या आकाराची पांढरी गोळी, वेफर क्रीम बिस्कीट्स, मँगो बाइट, दुधाचा किंवा वेगवेगळ्या चवींचा पेप्सीकोला, कॉफी बाइट, प्राणी आणि बाहुल्यांच्या आकारातील साखरेच्या गोळ्या, श्रीखंडाच्या गोळ्या, रावळगाव, पेपरमिंट, नुसती नावं वाचूनही नॉस्टॅल्जिक झालात ना? जवळपास हे सगळेच पदार्थ काही वर्षांपूर्वीपर्यंत शाळेच्या बाहेर विक्रीसाठी उपलब्ध असायचे. आता मुलांना ही नावं फक्त ऐकून माहीत असतात. यांची मागणी कमी झाली, तसं या गोळ्यांच्या उपलब्धतेचं प्रमाणही. अजूनही पुण्यातल्या फारच मोजक्या ठिकाणी या गोळ्या मिळतात. एक काळ असा होता, जेव्हा शाळेच्या मधल्या सुट्टीत या गोळ्या मिळवण्यासाठी संबंधित दुकानात किंवा गाडीवाल्याच्या गाडीवर मित्रांमध्ये स्पर्धा असायची. कुणाला सगळ्यांत आधी आणि किती जास्त गोळ्या मिळतायत, याची तर चढाओढ असायचीच; पण बरणीत असलेल्या त्या अतिशय मर्यादित गोळ्या संपू नयेत, याकडे मुलांचं जास्त लक्ष असायचं. एकदा करून ठेवली, की वर्षभर टिकणारी चिंचेची गोळी, अति गोड नसणाऱ्या आणि साखरेचं अगदी मोजकं प्रमाण असलेल्या श्रीखंडाच्या गोळ्या किंवा वेफर बिस्कीट्ससुद्धा आरोग्याला अपायकारक नव्हती. हातात पैसा आला, जीवनमान बदलत गेलं, तसतसं ‘हायजिनिक’ संकल्पनेचं पेव फुटलं. बंद पाकिटात नसतील, तर त्या गोळ्या चांगल्या नाहीत. उघड्यावरच्या या गोळ्या आरोग्यावर परिणाम करणाऱ्या ठरू शकतात, अशा नव्या पिढीतील पालकांच्या मानसिकतेमुळे मुलांचा या गोळ्यांकडे वळण्याचा ओघच बंद झाला. निमित्तानंच आणली जाणारी कॅडबरीही आता पाच आणि दोन रुपयांत मिळू लागल्यामुळे शाळकरी मुलांचं ते प्रमाण वाढलं. यामुळे वर उल्लेखलेल्या जवळपास सगळ्याच पदार्थांची मागणी घटली. असं असलं, तरी हे पदार्थ खाण्यात मुलांना वाटणारी गंमत आजही कमी झालेली नाही.
गोळ्या मिळण्याची ठिकाणं
आजही हे पदार्थ आणि या गोळ्या मिळण्याची काही मोजकी ठिकाणं पुण्यात आहेत. लक्ष्मी रोडवरील शांती स्टोअर्समध्ये बाहुल्या आणि प्राण्यांच्या आकारातील बिस्कीटं आणि चिंचेच्या गोळ्या मिळतात. सदाशिव पेठेतील पुणे विद्यार्थी गृहासमोरील लक्ष्मी- नृसिंह मंदिराच्या शेजारील छोट्या खिडकीवजा दुकानात विविध लाडू आणि चिक्क्यांप्रमाणेच श्रीखंडाच्या गोळ्या, रावळगाव असे बरेच प्रकार मिळतात. भरत नाट्य मंदिराच्या गल्लीतील पाटणकर यांच्या दुकानात आणि पेरूगेट पोलिस चौकीकडे येणाऱ्या भावे हायस्कूलच्या मुख्य दरवाजासमोरील छोट्या जनरल स्टोअरमध्येही एक रुपयांत दोन चिंचेच्या गोळ्या, पॉपिन्सच्या रंगीबेरंगी गोळ्या आणि लिमलेटच्या गोळ्या असे पदार्थ मिळतात. सिंहगड रोडवरील हिंगणे खुर्दच्या चौकातून कॅनॉल रोडकडे निघालं, की रोकडोबा मंदिरापाशी असलेल्या अदिती आइस्क्रीम पार्लरमध्ये आणि रविवार पेठेतील गांधी गोळी या दुकानातही या सर्व गोळ्या मिळतात. शुक्रवार पेठेतील ११ मारुतीच्या चौकाच्या गल्लीतदेखील हे पदार्थ मिळणारं दुकान आहे. विविध एस. टी. स्टँडवर, विशेषतः आडगावातील, यातले बरेच पदार्थ आजही मिळतात. यात आता मागणी कमी झालेल्या; पण अजूनही ट्रेकर्स किंवा भटक्यांच्या पोतडीत हमखास सापडणाऱ्या पॉपिन्स आणि लिमलेटच्या गोळ्याही आहेत.