25/10/2025
सामाजिक पालकत्व म्हणजे वेगळं काय असतं...?
एके दिवशी एका मित्राचा फोन आला. त्याचा पहिला प्रश्न होता, "सोसायटीमध्ये काही लोक मुलांना खेळू देत नाही तर त्यांच्यावर कोर्ट केस करता येईल का?"
त्याच्या आवाजावरून त्याचा वैताग जाणवत होता.
त्याला म्हटलं, "आधी काय झालं ते नीट सांग."
त्याने थोडक्यात सांगितलेला वृत्तांत असा - "सोसायटीच्या कॉमन स्पेसमध्ये, मोकळ्या जागेत मुलं खेळत असतात. सोसायटीला मैदान नाही. त्यामुळे मुलं त्या जागेत खेळतात. मात्र सोसायटीतले काही लोक मुलांना रागवतात, ओरडतात, वाईट शब्द बोलतात आणि इथे खेळू नका, आम्हाला त्रास होतो, असं म्हणून त्यांना हाकलून देतात. हे खूप वेळा घडलं आहे. काही वेळा सोसायटीतल्या इतर सदस्यांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु ते त्यांच्याशीही भांडले."
यावर मित्राला सुचवलं, "सोसायटीतील सदस्यांची मीटिंग घेऊन, ज्यांना मुलांच्या खेळण्याचा त्रास होतो त्या सदस्यांना बोलावून, सगळ्यांनी मिळून सांगण्याचा प्रयत्न करावा. या मीटिंग नंतर पुढचं ठरवू."
त्यानुसार त्यांची सोसायटी मीटिंग होऊन प्रश्न तात्पुरता सुटला, आणि हा एवढा उपाय पुरेसा ठरला...
इतर सोसायट्यांमध्ये पण असं चित्र आहे. अशाच काही सोसायटीमध्ये प्रशस्त मैदान आहे. परंतु मुलांचा आवाज, दंगा सहन होत नाही, दुपारची झोप होत नाही, अशा कारणास्तव ती मैदानं बंद करून ठेवलेली आहेत.
एवढंच काय, आत्ता covid-19 या महामारीच्या साथीमुळे मुलं जवळपास र्दीड वर्षापासून घरातच आहेत. अशावेळी मुलांना क्वचितच खेळायला मिळत आहे. अर्थात सर्व नियम पाळून, तरीही काही सदस्यांना मुलांच्या आवाजाचा त्रास होत आहे.
बरं यासाठी इतर पर्याय शोधता येतील... परंतु, कुठेतरी मूलभूत बाबींचा विसर पडत चालला आहे. जी काही कारणं पुढे देऊन मुलांचं खेळणं बंद होतं, त्यावर काही पर्याय शोधता येतील का? ज्यामुळे मुलांचं खेळणं बंद करण्याची गरज पडणार नाही. परंतु अशी भावना तेव्हाच येऊ शकते, जेव्हा दुसऱ्या कुटुंबातील मुलही आपलं मुल आहे अशी भावना मनात येईल. काही लोकांच्यात ही भावना असते.
या घटना प्रातिनिधिक आहे. शहरं मोठी आहेत. पण मुलांच्या खेळण्याच्या, शाळेतील मैदानांच्या, घराजवळील खेळण्याच्या जागेचा संकोच झालेला आहे.
आर्थिक समीकरणात पहिला बळी गेला आहे, तो मुलांच्या खेळण्याच्या जागेचा!
मुलांचं खेळणं कित्येकदा मोठ्यांच्या दृष्टीने टाईमपास आहे. परंतु विविध शास्त्रीय संशोधनानुसार मुलांचं खेळणं त्यांच्या वाढ, विकासासाठी अत्यावश्यक आहे. अलीकडे मेंदू संशोधनात जे काम चालू आहे, त्यानुसार मुलांच्या मुक्त हालचाली, खेळणं ही त्यांच्या मेंदूची गरज आहे. याबरोबरच मुलांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक विकासासाठी खेळ महत्त्वाचे आहेत.
निकोप समाजासाठी मुलांची वाढ आणि विकास निकोप व्हायला नको का?
मूल फक्त त्या कुटुंबाचंच आहे का?
आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचा भाग हे मूल आहे की नाही?
सोसायटीचे सभासद म्हणून, देशाचे नागरिक म्हणून, माणूस म्हणून सर्वांना जे हक्क आहेत, ते हक्क मुलांना आहेत की नाही?
मुलांच्या हक्कांच्या संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
अर्थात, तुमची-आमची, हो की नाही? मग सामाजिक पालकत्व म्हणजे याहून काय वेगळं असतं.....???
- अॅड छाया गोलटगावकर Chhaya Golatgaonkar
मिळून साऱ्याजणीचं सामाजिक पालकत्व
| विभाग संयोजक - संदीप मसहूर Sandeep Mashoor | 94238 58077 | [email protected] |
#मिळूनसाऱ्याजणी #मराठीमासिक #मासिक #सामाजिकपालकत्व #मिळूनसाऱ्याजणीचंसामाजिकपालकत्व
#विद्याबाळ #गीतालीविमं #छायागोलटगावकर #अॅडछायागोलटगावकर