05/08/2021
"पाळणाघर एक संचित"
काल रात्री स्वप्नामधे, आमचं पाळणाघर, दोन तीन वर्षांपूर्वी सोडून गेलेला ,"निहार" आला. त्याच्या शाळेच्या व्हॅनमधून उतरला आणि त्याचा Birthday होता म्हणून मी दारातच त्याला wish केलं, मग आम्ही दोघांनी झोक्यावर बसून छान गप्पा मारल्या आणि आत जाऊन त्याच्या वाढदिवसाचा मस्त केक कापला . आज सकाळी उठल्यावर ही मला हे स्वप्न पूर्ण आठवत होतं आणि निहारला आज मेसेज करायचा असं मनाशी नक्की ठरवलं, तेवढ्यात आमच्या Little Angels Day care च्या जुन्या ग्रुपवर निहारचाच मेसेज, " Hi! अश्विनी मावशी, कशी आहेस ?" मी आश्चर्याने थक्क! त्याला हे सगळं स्वप्न सांगितल्यावर तो म्हणाला," आहेच माझा दोन दिवसात Birthday, येतो तुला भेटायला" मी अजूनच थक्क! कशी असतात ना ही मुलं, लहानपणी लावलेली माया, प्रेम " ह्या -हदयीचे त्या -हदयी " तसंच असतं .
अचानक एखाद दिवशी छोटी मुलं आजूबाजूला खेळत असताना, एक जोरदार बुलेट दाराशी येऊन थांबते, हेल्मेट आरशाला अडकवून बेफिकीर झालेले केस सारखे करत, मस्त वाढलेली दाढी मिशी मिरवत एक तारुण्य समोर उभं येऊन ठाकतं, आणि खांद्यावर हात टाकत म्हणतं," काय अश्विनी मावशी, कशी आहेस ?" त्याच्या सगळ्या अधिकार आणि प्रेमाच्या देहबोलीत मी विरघळते आणि म्हणते, "मी छान, तू कसा आहेस ( मनात अतिशय अपराधी भावना कारण हया लेकराचं बदललेलं रूप कोणाचं हे आठवतच नसतं) तेवढ्यात तो तरुणच माझ्या चेहेऱ्यावरची तारांबळ बघून म्हणतो," अगं, chill! मी ऋत्त्विक ", त्या क्षणी पाणी खळाखळा वाहू लागतं, शाळेतून व्हॅनमधून उडी मारून येणारा, भरपूर दंगा करणारा, अतिशय शांत स्वभावाच्या आईला गजबजून सोडणारा सगळा ऋत्त्विक डोळ्यासमोर उभा राहतो आणि परत, "ह्या -हदयीचे त्या -हदयी " हाच प्रत्यय येतो .
असंच रात्रीची जेवणं बिवणं उरकून काहीतरी छान वाचत बसलेली असते तेवढ्यात फोनवर long ring वाजते, परदेशातला नंबर दिसतो आधी मी घेतच नाही न जाणो कोणाचा असेल, परत वाजतो, तरी तीच भीती मग video call येतो आणि आमच्या गोड हसऱ्या तेजस्वी मीराचा चेहरा समोर येतो आणि म्हणतो, " Hi, मावशी कशी आहेस गं?" माझ्या डोळ्यात आनंदाश्रू, मी म्हणते," मी छान, तू कशी आहेस ? छान दिसते आहेस" पलीकडलं लेकरू म्हणतं, " हे बघ, मला नीट, मी pregnant आहे " ह्यानंतर मी निः शब्द, नुसतेच डोळे भरलेले, अरे ही पिल्लं किती लवकर मोठी होतात, मग अमेरिकेला यायचा प्रेमळ आग्रह, पुण्याला आल्यावर नक्की भेटायची आश्वासनं अशा प्रेमळ संवादात तो phone call थांबतो आणि आपल्या एका लेकीला लेकरू होणार ह्या आनंदात मन भरून येतं पुन्हा एकदा, " ह्या -हदयीचे त्या -हदयी " हीच अवस्था असते .
एकदा what's app चे status बघताना माझ्या अजून एका मुलीच्या status मधे एक देखणा तरुण डोकावलेला दिसतो . मग आईपण काही थांबत नाही, लगेच माझा तिला Msg," Hi, Nikki, How are you?" पलीकडून क्षणार्धात voice msg ," मावशी, डी.पी. बघितलास ना, मी वाटच पहात होते तुझ्या मेसेजची, हो लग्न ठरलंय, इथेच U.S मधेच settle आहे तो, मग चिडवाचिडवी, कुठे भेट कधी भेट सगळी इत्यंभूत माहिती मावशीला दिली जाते आणि पटकन विमानात बस आणि इकडे ये ना असा लडिवाळ आग्रह होतोच, ह्या सगळ्यात मी विरघळून जाते आणि परत, " ह्या -हदयीचे त्या -हदयी " ह्याच स्थितीत मी .
अशीच एक सकाळ छान ताजी प्रसन्न, मस्तपैकी चहा पिताना मेसेज येतो, " म्हहह, आता म्हण गं मला डॉ. श्रेया!" उर अभिमानाने भरून येतो. स्वतः ठरवून, भरपूर अभ्यास करून, जर्मनीमधे एकटं राहून आमची श्रेया आज डॉक्टरेट होते, फार मोठंठं स्वप्न च साकार झालेलं असतं, पाळणाघरात, तिच्या आईने तिच्यासाठी केलेल्या वहीतली आई मुलीची गोड गोड छोटी पत्रं, छोटासा दिलेला अभ्यास, छोटंसं सांगितलेलं काम, लहान बहिणीची दिलेली जबाबदारी सगळं सगळं आठवतं आणि पुन्हा एकदा खूप अभिमान वाटतो लेकराचा, परत , " ह्या -हदयीचे त्या -हदयी " हीच जाणीव मनात .
गेल्या २१ वर्षात हया पाळणाघराच्या गोड व्यवसायामुळे अनेक लेकरं आणि त्यांच्या प्रेमाचे उदंड अनुभव साठवले गेलेत -ह्दयात!
अनेक मुलं आमच्याकडे येतात काही वर्षं आमचीच होऊन इथे मिसळून जातात हळूहळू मोठ्ठी होतात तसं हे घरटं पुरेनासं होतं म्हणून सोडून जातात आम्हाला, खूप मोठ्ठं व्हायला! त्या क्षणी खूप वाईट वाटतं, उद्यापासून हा चेहेरा रोज नाही दिसणार, रोज १ वाजता येणाऱ्या हया व्हॅनमधून, एक पिल्लू कमी असणार अशी खंत मनात भरून जाते, ......तेव्हाच एक छोटंसं दीड दोन वर्षाचं लेकरू नव्यानेच झालेल्या आई बाबांचा हात घट्ट धरून आमच्याकडे येते, त्याच्या छोट्याशा भिरभिर नजरेने त्यांचं सगळं निरीक्षण चालू असतं आणि मी पण ह्या नव्या पिल्लाला कुशीत घ्यायला नव्याने सामोरी जाते, परत एक चक्र सुरु होतं,
" ह्या -हदयीचे त्या -हदयी , त्या -हदयीचे ह्या -हदयी ".
अश्विनी😊