14/09/2022
*हस्ताक्षर सुधारण्याबाबत समज गैरसमज:पालकांच्या मनातले संभ्रम निर्माण करणारे प्रश्न.*
©️ *शैलेश जोशी*
(सुलेखन मार्गदर्शक ,अक्षर रसिक सुलेखन वर्ग,पुणे )
हस्ताक्षर हा तसा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मुलांच्या प्रत्येक इयत्तेनुसार असणाऱ्या गरजा आणि समस्या वेगवेगळ्या आहेत. त्याप्रमाणे योग्यवेळी योग्य मार्गदर्शक जर मिळाला तर मुलांचे संपूर्ण आयुष्य वळणदार होण्यास सुरुवात होते. यामध्ये सुलेखन शिकणाऱ्या विद्यार्थ्याची जबाबदारी जेवढी महत्त्वाची तेवढीच पालक आणि शिक्षकांची सुध्दा असते.
सुलेखन हे आपले कर्तव्य आहे. याची जाणीव ही योग्य वयातच झाली पाहिजे. ती नंतर लादून काय उपयोग?सुंदर हस्ताक्षर ही एक अनमोल अशी कला आहे. तिचा सराव वयानुसार , इयत्तेनुसार शाळांमधून वेळ काढून तो करायलाच हवा.कारण कोणत्याही कलेचा आनंद समुहात जास्त घेता येतो.तो एकदा का मिळाला म्हणजे पुढच्या इयत्तेत मुलांना सुलेखनाचा फारसा त्रास होत नाही.
या सगळ्या गोष्टींची आज आठवण होण्याचे कारण म्हणजे गेली दोन वर्षे शाळा बंद असल्याने विद्यार्थी घरात होते. तेव्हा आणि त्या आधी देखिल लेखन फार मनापासून केले जात नव्हतेच. त्या अनुषंगाने पालकांचे आपल्या पाल्याच्या हस्ताक्षरा संदर्भात येणा-या प्रश्नांना मी देत असलेली उत्तरे आज येथे थोडक्यात लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे.काय असतात हे प्रश्न? त्याची साधारण एकत्र यादी पुढील प्रमाणे.....
१)सुलेखन शिकण्याचे योग्य वय कोणते?
२)पेन्सिल किंवा पेनची पकड कशी असावी?
३)एकाठिकाणी बसतच नाही तर लेखन कसे करून घ्यावे?
४)अक्षर पाट्या गिरवण्याचा सराव योग्य आहे का?
५)रोज १०ओळी शुध्दलेखन करून घेतले तरी फार फरक पडत नाही.
६)हळूवारपणे लेखन केल्याने वह्या,पेपर अर्धवट राहतात.
७)लेखनाचा वेग वाढवला की हस्ताक्षर खराब होते.
८)पेन कोणता वापरावा?
९)लेखनाला सुरुवात केली की बोटं/हात दुखतो.
१०)खाडाखोड खूप होते.
*साधारणपणे अशाप्रकारचे प्राथमिक स्वरूपाचे प्रश्न.*
या सगळ्या प्रश्नांना उत्तर देण्यापूर्वी कोणत्याही आईला आणि वडिलांना मी नेहमीच एक विनंती करत असतो.हा सगळा दोष केवळ आपल्या मुलांचा आहे असे नाही तर त्याच्या आजुबाजुच्या परिस्थितीचा म्हणजेच योग्य वेळी आपण केलेले या संदर्भातील किंवा शाळेतून केलेले मार्गदर्शन यावरही खूप गोष्टी अवलंबून असतात.
*सुलेखन विषयी प्रश्नांची एकत्रित उत्तरे*
प्रथम मुलांना अक्षर म्हणजे काय?तर जे नयनरम्य आणि चिरंजीव असते ते अक्षर! हे समजावता आले पाहिजे.आपल्यासाठी ते किती महत्त्वाचे आहे. त्याचा केवळ अक्षर वळणदार येण्याबरोबर एकाग्रता वाढणे,एकाठिकाणी बसणे,कलात्मक दृष्टी तयार होणे,नीट नेटकेपणाची सवय लागणे,योग्य वाचनाची आवड लागणे, खाडाखोड कमीतकमी प्रमाणात होणे म्हणजेच अभ्यासातला आत्मविश्वास बळकट होतो मग लेखनाचा आपसूकच वेग वाढतो,वैचारिक पातळी सुधारते आणि व्यक्तिमत्त्व विकास होतो या सारखे फायदे सहज होतात हे समजावून सांगितले गेले पाहिजे.
*शाईपेन वापरल्याने हस्ताक्षर जीवंत वाटते. आपलेसे वाटते म्हणून विद्यार्थ्यांनी बॉलपेन टाळावा म्हणजे बोटं दुखण्याचे प्रमाण कमी होते.हे उदाहरणासह समजावले पाहिजे. एखाद्या अक्षर रसिकाचे सुंदर लेखन दाखवले पाहिजे त्याचे अनुभव माहिती करून त्यामागचे कष्ट समजले पाहिजे तर याबाबत मनाची तयारी होते की सुलेखन ही कष्ट साध्य गोष्ट आहे.* हा अमूल्य ठेवा आयुष्यभर जपायचा असेल तर सातत्याने सराव करावा लागतो.रोज १०ओळी शुद्धलेखन करून किंवा पाट्या गिरवून अक्षर सुधारत नाही तर आधी अक्षर वळण समजून घ्यावे लागते आणि मग तसे वळवावे लागते या साठी योग्य मार्गदर्शक योग्यवेळी मिळणे फार महत्त्वाचे असते.वेळ प्रसंगी आईबाबांनी पण पाटी घेऊन आपल्या मुलांबरोबर लेखनाची तयारी दाखवली पाहिजे.
📱9881001790
अक्षर रसिक सुलेखन वर्ग, पुणे