27/12/2024
गोळवलकर गुरुजी विद्यालयातील १२०० विद्यार्थी साकारला तीर्थ शिवराय कार्यक्रम
पुणे : छत्रपती शिवाजी महराजांच्या काळातील लाठी काठी आजही तितकीच उपयोगी असून ती कला आपल्याला सध्याच्या काळातसुद्धा गरजेची असून शिवचरित्रातून खूप काही शिकता येण्यासारखे असल्याचं प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार आणि भारतीय इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत यांनी केलं आहे. ते काल (१३ डिसेंबर ) माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयाच्या “तीर्थ शिवराय “ कार्यक्रमाच्या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. शाहीर हेमंत मावळे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. संस्थेचे अध्यक्ष प्रमोद रावत , शाळासमिती अध्यक्ष मिलिंद कांबळे यांचीही या कार्यक्रमासाठी उपस्थिती होती.
जय भवानी जय शिवाजी , छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांच्या निनादात डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयातील सुमारे १२०० विद्यार्थ्यांचा सहभाग असलेला “तीर्थ शिवराय “ हा कार्यक्रम १३ डिसेंबर रोजी टिळक रोडवरील न्यू इंग्लिशच्या मैदानावर अत्यंत उत्साहात पार पडला. शिवपूर्वकाल ,बाल शिवाजी नाट्य , पोवाडा , अफजलखान वध , गोंधळ , आग्र्याहून सुटका , कोळी नृत्य आदी कार्यक्रमांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंग विद्यार्थ्यानी सादर केले. तर सर्वात शेवटी प्रचंड तू शिवाजी तू या गाण्याच्या माध्यमातून नृत्य सादर करून शिवरायांना अभिवादन करण्यात आले. तर शिवराज्याभिषेक प्रसंगातून कार्यक्रमाने परमोच्च बिंदू गाठला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 351 व्या शिवराज्याभिषेक वर्षपूर्तीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
श्री संत सेवा संघाची निर्मिती असलेल्या या कार्यक्रमात संगीत , नृत्य आणि नाटक या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंग उलगडून दाखवण्यात आले.
लाठी- काठीचे प्रात्यक्षिक हे या कार्यक्रमातील प्रमुख वैशिष्ट्य होते. इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा यात मोठा सहभाग होता. ढाल – तलवार , भाला आदी शस्त्रांचा वापर शिवकाळात युद्धप्रसंगी केला जात असायचा. त्याचबरोबर स्व-संरक्षणासाठी लाठी-काठीचादेखील वापर केला जात असायचा. आजच्या विद्यार्थ्यांना लाठी-काठी चालविता यावी या उद्देशाने कोल्हापूर इथल्या सव्यासाची गुरुकुलमच्या माध्यमातून प्रशालेतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देवून त्याचे प्रात्यक्षिक “ तीर्थ शिवराय “ या कार्यक्रमात सादर करण्यात आले. कोल्हापूरमधील सव्यासाची गुरुकुलमचे लखन गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली हे प्रशिक्षण देण्यात आले.
प्रशालेतील इयत्ता पहिली ते दहावीमधील विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. चिमुकल्यांपासून ते कुमारवयातील विद्यार्थ्यांकडून शिवरायांचा जीवनपट उलगडून दाखवताना महाराजांनी स्वराज्य निर्मितीसाठी घेतलेल्या कष्टांची जाणीव विद्यार्थ्यांना होणे आवश्यक असल्याने या कार्यक्रमाचे सादारीकरण करण्यात आल्याची माहिती शाळासमिती अध्यक्ष मिलिंद कांबळे दिली. या कार्यक्रमासाठीची गीते डॉ निखील पाठक यांनी तर संगीत संयोजन श्री संत सेवा संघाचे जीवन धर्माधिकारी यांनी केले होते.
प्रशालेच्या पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अपर्णा साने , प्राथमिक विभगाचे मुख्याध्यापक प्रसाद लागू आणि माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका वासंती बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली समूहगीत , नाटक आणि नृत्य या कार्यक्रमाची तयारी करण्यात आली. सुमारे अडीच हजार पालक-प्रेक्षक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. मुख्याध्यापिका वासंती बनकर यांनी आभार मानले.