18/03/2026
पद्मश्री अनुताई वाघ :
सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या, शिक्षणतज्ज्ञ आणि पद्मश्री पुरस्काराच्या मानकरी.
अनुताई वाघ यांचा जन्म १७ मार्च १९२० रोजी मोरगाव येथे झाला. पुण्यामधील मोरगाव येथील त्यांचे वडील बालकृष्ण वाघ हे सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरीस होते. आईचे नाव यमुनाबाई असे होते. त्या सोनोरी येथील पानसे राजघराण्यातील होत्या. त्यांचे वडील सुधारकी आणि उदारमतवादी होते. त्याचप्रमाणे ते अत्यंत बुद्धिमान आणि प्रेमळ होते. अनुताईंचे शिक्षण तसे सरळ झाले नाही. त्यामध्ये भर की काय म्हणून की काय १९२३ मध्ये वयाच्या तेराव्या वर्षी शंकर वामन जातेगावकर यांच्याशी अनुताईंचा विवाह झाला. परंतु त्यांना सासरचे दर्शन फक्त वरातीमध्येच झाले कारण लग्नात त्यांचे वय लहान असल्यामुळे त्या लग्नानंतर आपल्या वडिलांकडेच होत्या. त्यांचे पती मनमाड रेल्वे लाईनवर फिरत असतांचाच त्यांच्या पतीचे म्हणजे जातेगावकर यांचे सहा महिन्यांतच अपघाती निधन झाले आणि त्यांना वैधव्य प्राप्त झाले. विवाहाच्या दिवसानंतर सासरचे किंवा पतीचे दर्शनही त्यांना झाले नाही. त्यांनी पुढे माहेरचे ‘वाघ’ हेच आडनाव चालू ठेवले.
अनुताई यांनी तत्कालीन सामाजिक चालीरीती व स्त्रीजातीवरील बंधने झुगारून आपले अध्ययन पुढे चालू ठेवले. त्यानंतर १९२५ मध्ये इगतपुरीमध्ये व्हर्नाक्युलर फायनलची परीक्षा पास होऊन त्यात त्या पहिल्या आल्या. पुढे त्यानंतरची तीन वर्षे झाल्यानंतर त्यांना पुण्याच्या 'वुमेन्स ट्रेनिग्ज कॉलेज' मधून त्यांना शिष्यवृत्ती मिळाली आणि त्यामध्ये त्या पहिल्या आल्या. त्या शिवणकामात आणि मोडी लिपीमध्ये अव्वल झाल्या. १९२७ मध्ये त्या व्हर्नाक्यूलर अंतिम परिक्षेत नासिक जिल्ह्यात प्रथम आल्या. मराठी सातवी झाल्यावर १९२९ मध्ये त्या अध्यापकीय प्रशिक्षण परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या. त्यांनी सुरुवातीस नासिक विभागातील चांदवड (पिंपळगाव) या खेड्यात प्राथमिक शिक्षिका म्हणून तीन वर्षे नोकरी केली. त्यानंतर १९३३ मध्ये त्या पुण्यात हुजूरपागा प्राथमिक विद्यालयात नोकरीस लागल्या आणि रात्रशाळेत शिक्षण घेऊन १९३७ मध्ये त्या मॅट्रिक झाल्या. तेथे त्यांनी तेरा वर्षे शिकवले. हुजुरपागेत त्यांच्या विद्यार्थिनी होत्या शिरीष पै, डॉ. तारा बनारसे, सिंधू परांजपे, डॉ. सुशीला आगा, मृणालिनी देसाई आणि अन्य विद्यार्थिनींबद्दल त्यांना खूप अभिमान होता.
अनुताई ह्या स्वातंत्र्यानंतर' सुराज्य' निर्माण करण्याच्या ध्येयामुळे प्रेरित होऊन त्यांनी हुजूरपागा शाळेमधील नोकरी सोडली आणि कस्तुरबा ट्रस्टच्या आयोजित केलेल्या मुंबईमधील शिक्षक शिबीरात गेल्या तेथे त्यांची ताराबाई मोडक यांच्याशी भेट झाली. अनुताई ताराबाईबद्दल म्हणतात, “त्या नसत्या तर त्यांचे आयुष्य आज आहे त्यापेक्षा वेगळे झाले असते. म्हणून कृतज्ञता व्यक्त करते”. १९४५ मध्ये ताराबाई यांनी अनुताई यांना' आघाडीचा सैनिक' म्हणून बोर्डी येथे पाठवले आणि तेथेच अनुताई वाघ यांना आयुष्याचा सूर 'सापडला. खेडेगावातील बालवाड्या शास्त्रीय रितीने पण कमी खर्चात कशा चालवाव्यात हा प्रयोग करायचा होता. . १९३३–१९४४ या काळात बोर्डी येथील ग्राम बालशिक्षा केंद्र व १९४५–१९७३ या काळात कोसबाड येथील नूतन बालशिक्षा केंद्रात अनुताईंनी अध्यापिका म्हणून काम केले. त्यानंतर १९७४-७५ मध्ये कोसबाडच्या नूतन बालशिक्षा केंद्राच्या सरचिटणीस, १९७६–१९७९ या काळात राष्ट्रीय शिक्षण अनुसंधान व प्रशिक्षण मंडळाच्या कार्यकारिणीच्या सदस्या, अखिल भारतीय पूर्वमाध्यमिक शिक्षणसंस्थेच्या उपाध्यक्षा इ. पदांचा कार्यभार त्यांनी सांभाळला. अनुताईंचा अनेक शिक्षणसंस्थांशी घनिष्ठ संबंध आला; तथापि बोर्डी-कोसबाडच्या आदिवासी परिसरामध्ये त्यांनी आपल्या कार्याचा व्याप वाढविला. स्वाभिमानी, कष्टाळू, प्रामाणिक असणारा, बरेच दिवस डोंगराळ भागात राहिल्याने शहरी सुधारणांपासून वचित असलेला, शहरी संस्कृतीला काहीसा घाबरलेला, व्यसनी असलेला आदिवासी सुधारणे हे काही सोप काम नव्हते पण अनुताईनी ते मोठ्या जिद्दीने, चिकाटीने केले. आणि त्यांच्या अथक परिश्रमाने कोसबाड भागातील आदिवासी पुरता बदलून गेला. आदिवासी भागात ताराबाई आणि अनुताई या दोघीनी भारतातील ग्रामीण बालशिक्षणाच्या इतिहासात कुणी कधी केले नाही असे प्रयोग त्यांनी केले. ताराबाईच्या मार्गदर्शनाखाली अनुताईनी मुंबईजवळ कोसबाड येथील आदिवासी वस्तीत पहिल्या बालवाडीची सुरुवात केली. या भागातल खर शिक्षण म्हणजे मुलांना माणसात आणणे, ते काम अनुताईनी अगदी नाक न मुरडता हौसेने केले त्यांना स्वतःला मूल नव्हतेच पण या आदिवासी मुलांच्या त्या आई बनल्या. केवळ अक्षर ओळख न शिकवता त्याना न्हाऊ माखू घालणे, त्यांच्या डोक्यातील उवा काढणे, त्यांच्या खरजेला औषध लावणे, त्यांना संडास मुताऱ्यांचा वापर कसा करायचा ते दाखवणे, इत्यादि अनेक गोष्टी त्यांनी त्यांच्यासाठी केल्या बालशिक्षणाचा संदेश ज्या ज्या मार्गानने पोहचवता येईल तो तो मार्ग त्यांनी अवलंबिला. विशेष म्हणजे हे सारे शिक्षण देत असताना त्यांनी एकही शहरी वस्तू वापरली नाही. तेथील परिस्थितीत जे जे मिळेल त्याचा उपयोग त्यांनी शिक्षणासाठी केला. भिंती म्हणजे फळा, कोळसा म्हणजे खडू तेथे मिळणारे शंखशिंपले, पानेफुले, यांच्या सहाय्याने हसतखेळत गाणी, गोष्टी, सहली यातून शिक्षण देण्याची अभिनव पद्धत त्यांनी सुरू केली. अशा रितीने स्वतंत्र बुद्धिमत्ता, समर्पित वृत्ती, स्त्रीचा भावूकपणा, पुरुषाचा कणखरपणा, अशा विविध स्वभाव पैलूंच्या सहाय्याने अनुताईंनी निराकार अशा आदिवासी समाजाला आकार देण्याचे मौलिक कार्य केले. या परिसरातील उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग करून त्यांनी मुलांना स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न केला. ताराबाई मोडक यांनी ब्रिटिशांनी रूढ केलेल्या परकीय शैक्षणिक संकल्पनेला आव्हान दिले होते. त्यांच्या प्रयोगशीलतेला अनुताईंच्या निर्मितिक्षमतेची तेवढीच प्रभावी जोड मिळाली आणि त्यातून बोर्डी व नंतर कोसबाड ह्या बालशिक्षणाच्या प्रयोगशाळाच बनल्या. ताराबाईंच्या मृत्यूनंतर या संस्थांची पूर्ण धुरा अनुताईंनी अखेरपर्यंत सांभाळली. तसेच त्यांचा विस्तारही केला. मुलांचे शिक्षण म्हणजे त्यांचे खेळणे! ‘शिकलो’ हे लक्षातही येऊ न देता मुलांना शिक्षित करावयाचे; खेळण्याच्या, बालगीतांच्या, गोष्टींच्या रूपांत शैक्षणिक साधने तयार करावयाची; त्यासाठी मुलांच्या भावविश्वाचा शोध घ्यावयाचा आणि स्वतः बनविलेले शिक्षणसाहित्य वापरून मुलांना हाताळायचे कौशल्य त्यांनी आत्मसात केले. परिणामतः त्यांच्या संस्थांत स्त्रिया, मूक-बधिर व अपंग यांच्या विकासाचे प्रकल्प कार्यान्वित झाले. पाच-पंचवीस गावांचा समूह एकत्र करून ‘ग्राममंगल प्रकल्पा’पर्यंत अनुताई अखेर पोचल्या अनुताईंनी तेथे एक नविन सृष्टी निर्माण केली. अनुताईंचं कार्य फक्त शिक्षण विषयाशीच निगडीत नव्हतं. मुलीच्या शिक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी पाळणाघरे काढली दारुबंदी, विधवा विवाह अशा अनेक सामाजिक प्रश्नांबद्दल जवळच्या पाड्यांवर जाऊन तेथील लोकांचं प्रबोधन केलं. आदिवासी जोडप्यांची सामुदायिक लग्ने लावून दिली. केवळ या परिसरात त्यांनी दहा पाळणाघरे, अकरा बालवाड्या, चार पूर्वप्राथमिक शाळा, बालसेविका प्रशिक्षण वर्ग, अंगणवाडी प्रशिक्षणवर्ग, अध्यापक प्रशिक्षण विद्यालय, कार्यानुभव प्रकल्प, उद्योगप्रशिक्षण, स्त्रीशक्ती जागृती संस्था, रात्रशाळा, ३० प्रौढशिक्षण संस्था, कुरणशाळा, मूकबधिर संस्था, आरोग्यकेंद्रे अशी अनेक संस्था स्थापन केल्या. तिथे गरीब मुलांची राहण्याची, जेवणाची सोय केली, स्वावलंबी व्हावे म्हणून उद्योगाचे शिक्षण दिले. कोसबाडला शिक्षक महाविद्यालय, प्राथमिक शाळा, छापखाना, उद्योगवर्ग सुरू करण्यासाठी अनुताईंनी अथक परिश्रम घेतले. शिक्षणपत्रिका व सावित्री ही मासिके, तसेच बालवाडी कशी चालवावी, विकासाच्या मार्गावर, कुरणशाळा, सहज शिक्षण ही पुस्तके यांच्या माध्यमातूनही त्यांनी आपल्या शैक्षणिक विचाराचा प्रसार केला. “कोसबाडच्या टेकडीवरून” हे त्यांचे आत्मवृत्त प्रसिद्ध आहे.
त्यांनी ठाणे जिल्ह्यातील कोसबाड येथे शिक्षणकार्य केले. विशेष म्हणजे आजूबाजूच्या परिसराला जुळतील अशी बडबड गीते त्याचबरोबर कोसबाडच्या टेकडीवरून, कुरणशाळा, टिल्लूची करामत, अशी पुस्तके लिहिली. तसंच शिक्षण पत्रिका या मासिकाचे संपादन देखील केले. अनुताई ७० व्या वर्षीही त्या तरुणाईच्या उमेदीने काम करत होत्या. या वयात त्यांनी दुर्गम आदिवासी भागात काम करण्याची जबाबदारी अंगावर घेतली आणि ग्राममंगलचे रोपटे लावले, दुर्गम भागात शिक्षणाचे आणि सांस्कृतिक विकासाचे काम अंगावर घेतले आणि सहज शिक्षणाचा एक नवाच प्रयोग केला. अनुताई स्वतः प्रसिद्धीपराङमुख असल्या, तरी त्यांच्या कार्याची कीर्ती सर्वदूर गेली.
अनुताई वाघ यांना त्यांच्या विधायक व भरीव कार्याबद्दल अनेक मानसन्मान मिळाले. त्यांपैकी महाराष्ट्र शासनाने १९७२ साली ‘आदर्श शिक्षिका’ व १९७५ साली ‘दलित मित्र’ हे किताब देऊन त्यांचा गौरव केला. तसेच त्यांना १९७८ साली इचलकरंजीचा ‘फाय फाउंडेशन पुरस्कार’, १९८० साली ‘आदर्श माता’, ‘सावित्रीबाई फुले पुरस्कार’ व ‘बालकल्याण राष्ट्रीय पुरस्कार’, १९८५ साली ‘जमनालाल बजाज पुरस्कार’, १९९२ साली दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानचा ‘आशा भोसले पुरस्कार’ तसेच ‘रमाबाई केशव ठाकरे पुरस्कार’ इ. पुरस्कार देऊन विविध संस्थांनी सन्मानित केले. १९८५ साली केंद्र शासनाने ‘पद्मश्री’ किताब देऊन त्यांचा सन्मान केला.
महात्मा गांधी, विनोबा भावे, धोंडो केशव कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील, ताराबाई मोडक यांच्या प्रेरणेने स्त्रीजागृती आणि स्त्रियांचा उद्धार यांसाठी अनुताईंनी अविरतपणे कार्य केले. अनुताईंचे हे कार्य तरुण पिढीस, विशेषतः स्त्रीवर्गास, स्फूर्तिदायक व मार्गदर्शक ठरेल, असेच आहे.
शिक्षणतज्ज्ञ, संशोधक आणि सामाजिक कार्यकर्ती अशा अनुताई वाघ यांचे १७ सप्टेंबर १९९२ रोजी कोसबाड येथे निधन झाले.
Maharashtra balshikshan parishad