08/08/2026
*दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटी आयोजित*
*अमृतप्रभा समूहगीत गायन स्पर्धेचा दिमाखदार पारितोषिक वितरण समारंभ*
दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीतर्फे आयोजित जिल्हास्तरीय ‘अमृतप्रभा समूहगीत गायन स्पर्धा – २०२६’ चा पारितोषिक वितरण समारंभ संस्थेच्या सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित या जिल्हास्तरीय स्पर्धेत ७० शाळांमधील सुमारे ९०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ‘वंदे मातरम्’ला १५१ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने स्पर्धेतील गीतांमध्ये ‘वंदे मातरम्’ हे शब्द असणे हा विशेष निकष ठेवण्यात आला होता.
समारंभाचे प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध *संगीतकार कौशल इनामदार* यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. “स्पर्धा केवळ जिंकण्यासाठी नसते, तर शिकण्यासाठी असते. स्पर्धेच्या मंचावर चुकण्याचीही मुभा असते. त्यामुळे जिंकणे-हरणे यापेक्षा स्पर्धेत सहभागी होणे महत्त्वाचे आहे. तुमची स्पर्धा इतरांशी नसून स्वतःशीच असावी,” असा प्रेरणादायी संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
समूहगीताविषयी बोलताना त्यांनी गाणे हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून प्रेरणा, शिस्त, समन्वय आणि मातृभाषेची आवड निर्माण करणारे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले.
संस्थेचे मानद कार्याध्यक्ष *संजीव महाजन* यांनी आपल्या मनोगतात संस्थेच्या विविध उपक्रमांची आणि विद्यार्थ्यांसाठी सातत्याने राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळावी, या उद्देशाने असे उपक्रम भविष्यातही अधिक व्यापक स्वरूपात आयोजित केले जातील, असे त्यांनी सांगितले.
संस्थेचे मानद सचिव *प्रफुल्ल निकम* यांनी विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहा, ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा आणि भविष्यात आपल्या आचरणातून चांगल्या गोष्टी समाजासमोर आणा, असा प्रेरणादायी संदेश दिला.
या प्रसंगी ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक, वंदे मातरम्चे अभ्यासक मिलिंद सबनीस, संस्थेचे मानद कार्याध्यक्ष संजीव महाजन, मानद सचिव प्रफुल्ल निकम, परीक्षक डॉ. उपेंद्र सहस्त्रबुद्धे, मकरंद केळकर तसेच स्पर्धेचे समन्वयक प्रसाद भडसावळे उपस्थित होते.
परीक्षकांच्या वतीने डॉ. उपेंद्र सहस्त्रबुद्धे यांनी विद्यार्थी व पालकांना उपयुक्त मार्गदर्शन केले. मिलिंद सबनीस यांनीही मनोगत व्यक्त केले. माधुरी जोशी यांनी सूत्रसंचालन केले.
🏆 स्पर्धेतील विजेते
इयत्ता ५ वी ते ७ वी गट :
🥇 प्रथम क्रमांक – एस. पी. एम. इंग्लिश स्कूल
🥈 द्वितीय क्रमांक – शेठ आर. एन. शहा इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल
🥉 तृतीय क्रमांक – परांजपे विद्यामंदिर
🥉 तृतीय क्रमांक – महिलाश्रम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय
🏅 उत्तेजनार्थ – आर्यन वर्ल्ड स्कूल
🏅 उत्तेजनार्थ – सह्याद्री नॅशनल स्कूल
इयत्ता ८ वी ते १० वी गट :
🥇 प्रथम क्रमांक – परांजपे विद्यामंदिर
🥈 द्वितीय क्रमांक – एंजल हायस्कूल, कदमवाक वस्ती
🥉 तृतीय क्रमांक – महिलाश्रम हायस्कूल
🏅 उत्तेजनार्थ – माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी माध्यमिक विद्यालय
🏅 उत्तेजनार्थ – जयवंत पब्लिक स्कूल, हडपसर
🏅 उत्तेजनार्थ – डॉ. जी. जी. शहा इंग्लिश मीडियम हायस्कूल
कनिष्ठ महाविद्यालय गट :
🥇 प्रथम क्रमांक – एस. एन. डी. टी. कला व वाणिज्य महाविद्यालय
🥈 द्वितीय क्रमांक – एच. एच. सी. पी. हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, लक्ष्मी रोड, पुणे
स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने तसेच सहभागी विद्यार्थ्यांच्या उत्साहाने संपूर्ण वातावरण सुरेल आणि आनंददायी झाले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, शिक्षक-पालकांचे सहकार्य आणि आयोजकांचे नियोजन यामुळे ‘अमृतप्रभा’ समूहगीत स्पर्धेचा हा सोहळा संस्मरणीय ठरला.
विशेष म्हणजे, संस्थेच्या *शताब्दी वर्षात पदार्पणाच्या वाटचालीतील* हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ देणारा आणि समूहगायनाच्या माध्यमातून संस्कार, समन्वय व सांस्कृतिक जाणीव वृद्धिंगत करणारा ठरला.
- शब्दांकन : प्रसाद भडसावळे