13/03/2026
डॉ. केशव साठये यांचा लेख साभार सामायिक करत आहे !
टिळक महाराष्ट्र विद्यापीठात मी काम करतो असे सांगितले की तिथल्या इंडॉलॉजीच्या अभ्यासक्रमाची अनेकजण चौकशी करतात.त्यात कॉलेज मधील मूलांपासून ते सेवानिवृत्ती पर्यंत पोहोचलेल्या अनेकांचा समावेश आहे . भारतशास्त्र समजून घ्यावे त्याचे मूळ,संस्कृती ,भाषा ,शिल्पे जाणून घ्यावीत अशी आस अनेकांच्या मनात आहे ही अतिशय आनंदाची आणि दिलासा देणारी गोष्ट आहे.
खरंच इंडॉलॉजी हे विश्व अफाट आहे आणि यात काम केलेले आपले सर्वस्व वाहिलेले अनके विद्वान या देशात आहेत . हे त्यापैकी एक महत्वाचे नाव.
१९७५ साली पदमभूषण या सन्मानाने गौरवले गेलेले एक महान स्कॉलर. तत्कालीन रत्नागिरी जिल्ह्यातले. कुवळे हे गाव(सध्या सिधुदुर्ग )महाराष्ट्राच्या नकाशातही सुईच्या अग्रापेक्षा लहान दिसते . पण या अभ्यासकामुळे ते नावारूपाला आले. कोल्हापूरात आणि पुण्यात शिक्षण ,नागपूर आणि अमरावती इथे संस्कृतचे अध्यापन असे त्यांच्या करिअरचे 'वन लाईनर' म्हणून सांगता येईल . नागपूरच्या मॉरीस कॉलेजचे ते प्राचार्यही होते .
प्रकांड पंडित आणि विद्वान या दोन शब्दांच्या कक्षेत आणि परिघात त्यांच्या उत्तुंग कामगिरीची अनेक शिखरे दडलेली आहेत .अभिजात संस्कृत साहित्य,शिलालेख आणि नाणी ही त्यांची व्यासंगाची प्रमुख क्षेत्रे. वाकाटकाच्या शिलालेखाचा आधार घेत ,रामटेक हे मेघदूतातील रामगिरी असल्याचं त्यांनी केलेलं संशोधन विद्वत जगात नावाजलं गेलं.पण एवढंच करुन ते थांबले नाहीत तर अजंठा लेण्यातील शिलालेख ,भित्तिचित्रे यांचा सखोल अभ्यास करुन वाकाटक राजवंशाचा समग्र इतिहास त्यांनी जगापुढे ठेवला.
नाणकशास्त्रातही ते माहिर होते.या व्यासंगाच्या आधारे त्यांनी सातवाहन राजांच्या अज्ञात वंशांचा मागोवा घेतला . ३८ ग्रंथ आणि ४०० पेक्षा जास्त शोधनिबंध लिहून त्यांनी आपला ज्ञानसागर जागतिक संशोधनाच्या क्षेत्रात खळाळत ठेवला. महामहोपाध्याय ही त्यांना मिळालेली पदवी ही त्यांच्यातील अभ्यासकाला दिलेली मानवंदनाच होती त्या वासुदेव विष्णू मिराशी यांची आज जयंती-
जन्म १३ मार्च,१८९३.प्रणाम ..
डॉ केशव साठये
[email protected]