07/08/2026
मार्च २०२६ मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत व उच्च माध्यमिक परीक्षेत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले गुणवंत विद्यार्थी आणि म.ए.सो. ज्ञानवर्धिनी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ ...
गुणगौरव सोहळा 2026 MES Felicitation Program Maharashtra Education Society Pune
MES Felicitation Ceremony 2026 Maharashtra Education Society (MES...
06/08/2026
“मूल्य जपत आजच्या काळातील नवीन प्रश्न सोडविणे म्हणजे यश”
“यश म्हणजे मागच्या पिढीची नक्कल करणे नाही तर यश म्हणजे मूल्य जपत आजच्या काळातील नवीन प्रश्न सोडविणे. त्यादृष्टीने नवीन प्रश्न काय आहेत, नव्या समस्या काय आहेत हे ओळखण्यासाठी आवश्यक असलेले कुतुहल आत्मसात केले पाहिजे,” असा सल्ला मा. श्री. इंद्रनील चितळे यांनी विद्यार्थ्यांना दिला.
मार्च २०२६ मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत व उच्च माध्यमिक परीक्षेत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले गुणवंत विद्यार्थी आणि म.ए.सो. ज्ञानवर्धिनी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ बुधवार, दि. ५ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आला होता. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. इंद्रनील चितळे (मॅनेजिंग पार्टनर, चितळे बंधू) उपस्थित होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) होते. संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री. प्रदीप नाईक यांची या वेळी विशेष उपस्थिती होती. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाच्या मा. उपाध्यक्ष सौ. आनंदी पाटील, संस्थेचे सचिव डॉ. अतुल कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित होते.
कोथरुडमधील मयूर कॉलनीतील म.ए.सो. ऑडिटोरियममध्ये झालेल्या या समारंभात माध्यमिक शालांत परीक्षेतील ६० व उच्च माध्यमिक परीक्षेतील ३० आणि म.ए.सो. ज्ञानवर्धिनी परीक्षेतील १६ यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
चितळे पुढे म्हणाले, “कुतुहलाची भावना विकसित करायची असेल तर त्यासाठी मोकळेपणाने विचार केला पाहिजे. कल्पना, भावना आणि माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी लोकांशी संपर्क आणि संवाद साधण्याचे कौशल्य असले पाहिजे आणि त्यातून निर्माण झालेली विश्वासार्हता कायमस्वरुपी टिकवून ठेवण्याची क्षमता निर्माण करता आली पाहिजे. याशिवाय गुणवत्ता कायम राखण्यासाठी काय केले पाहिजे याच्याकडेही लक्ष देण्याची आवश्यकता असते. कुतुहल, शिस्त, क्षमता वाढविणे, संवादकौशल्य यातच यशाचे गमक आहे.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सौ. आनंदी पाटील म्हणाल्या की, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या माजी विद्यार्थ्यांची उज्ज्वल परंपरा आहे. या माजी विद्यार्थ्यांनी केवळ देशभरातच नव्हे तर जगातील अनेक देशात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. आपल्या यशातून त्यांनी आपले पालक, शाळा आणि संस्था यांचा नावलौकिक वाढविला आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सध्याच्या विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनाची दिशा ठरवावी आणि भविष्यात नोकरी मागणारे न होता नोकरी देणारे होण्याचा प्रयत्न करावा.
आपल्या अध्यक्षीय भाषणात एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी संस्थेच्या संस्थापकांनी दिलेले संस्कार आणि मूल्ये यांच्या आधारे नवे विद्यापीठ स्थापन करण्यासाठी संस्था प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
डॉ. अतुल कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले.
सौ. राही भालेराव आणि सौ. माधवी बाबरस यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
25/06/2026
नूतनीकृत गुरुवर्य डॉ. प्र. ल. गावडे सभागृहाचे डॉ. राहुल कराड यांच्या हस्ते उद्घाटन
म.ए.सो. मुलांचे विद्यालय (पूर्वीची पेरुगेट भावे स्कूल) या शाळेतील नूतनीकरण केलेल्या गुरुवर्य डॉ. प्र. ल. गावडे सभागृहाचे उद्घाटन शाळेचे माजी विद्यार्थी आणि ‘एमआयटी’चे व्यवस्थापकीय विश्वस्त व कार्यकारी अध्यक्ष मा. डॉ. राहुल कराड यांच्या हस्ते आज (बुधवार, दि. २४ जून २०२६) करण्यात आले. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. बाबासाहेब शिंदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
डॉ. राहुल कराड यांनी दिलेल्या भरघोस देणगीतून सभागृहात व्यासपीठ रचना, आधुनिक ध्वनियंत्रणा, दृकश्राव्य तसेच वातानुकुलन व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे.
या प्रसंगी मएसो च्या नियामक मंडळाचे सदस्य व शाला समितीचे अध्यक्ष डॉ. दिलीप शेठ, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरु डॉ. आर. एस. चिटणीस, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अशोक जोशी,
शाळेचे महामात्र श्री. सुधीर गाडे, संस्थेचे सचिव डॉ. अतुल कुलकर्णी, म.ए.सो. मुलांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सायसिंग वसावे व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. कराड म्हणाले, “ देशात मोठ्या संख्येने आज शैक्षणिक संस्था उभ्या राहिल्या असल्यातरी शिक्षणाच्या क्षेत्रात पुण्याचे स्थान अबाधित आहे. पुण्याचा शैक्षणिक, सांस्कृतिक, वैचारिक पाया भक्कम आहे. पुण्यातील शिक्षण संस्था वैशिष्ट्यपूर्ण आहेत, प्रत्येकाची वेगवेगळी बलस्थाने आहेत. त्यामुळे पुण्यातील शिक्षण संस्थांनी सहयोगात्मक स्पर्धा केली पाहिजे, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अनेक विषयांची जाण निर्माण होईल आणि त्यांची सृजनशीलता, रचनात्मक मानसिकता जोपासता येईल.”
मा. श्री. बाबासाहेब शिंदे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, “महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ही स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीयांनी सुरु केलेली आणि १६५ वर्षांनी देखील अखंडपणे कार्यरत असलेली एकमेव शिक्षण संस्था आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या रेट्यात संस्थेने मराठी माध्यमाच्या शाळा टिकवून ठेवल्या आहेत. त्यामुळेच समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल स्तरातील मुलांना देखील शिक्षण मिळत आहे. या विद्यार्थ्यांना कौशल्याधारित प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. संस्थेचे शिक्षक आणि माजी विद्यार्थी हाच संस्थेचा आधार आहे. माजी विद्यार्थी असलेल्या डॉ. राहुल कराड यांच्या उत्स्फूर्त सहकार्यामुळेच शाळेतील सभागृहाच्या नूतनीकरणाचे काम झाले आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. शिक्षण संस्थांनी परस्पर सहकार्याने काम करण्याचा विचार डॉ. कराड यांनी मांडला आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी यासंदर्भात निश्चितच एम.आय.टी. शी सहकार्य करेल.”
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. दिलीप शेठ यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, संस्थेने कृतज्ञता निधीसाठी केलेल्या आवाहनाला संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामाध्यमातून गेल्या तीन-चार वर्षात सुमारे तीन कोटी रुपयांचा निधी उभा राहिला. माजी विद्यार्थी आपल्या शाळेसाठी काय करू शकतो? हे प्रत्यक्ष अनुभवाला आले आहे. याशिवाय विविध बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शाळेतील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा केल्या आणि भर देखील घातली आहे. शाळेच्या इमारतीची डागडुजी व रंगकाम, प्रयोगशाळा अद्ययावत करणे, स्वच्छतागृहातील सुधारणा, मैदानावर आधुनिक प्रकाशयोजना अशी विविध कामे माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून झाली आहेत. त्याचबरोबर माजी शिक्षकवर्गाचे मार्गदर्शन मिळते आहे. विशेष म्हणजे प्रदीर्घ काळानंतर शाळेचा इ. १० वी च्या परीक्षेचा १००% निकाल लागला आहे. कौशल्यांचे बदलते स्वरुप लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. म.ए.सो. मुलांचे विद्यालय ही संस्थेची फ्लॅगशीप शाखा आहे. नजिकच्या भविष्यात शाळा चांगल्या स्वरुपात सर्वांसमोर येईल. शाळेतील शिक्षकवर्ग त्यासाठी प्रयत्नशील आहे.
संस्थेच्या नियामक मंडळाचे आणि आजीव सदस्य मंडळाचे सदस्य, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सचिन आंबर्डेकर या प्रसंगी उपस्थित होते.
मुख्याध्यापक श्री. वसावे यांनी आभार प्रदर्शन केले.
23/04/2026
‘मएसो’च्या शाळांना गुणवत्ता संवर्धनाबद्दल पुरस्कार
पुणे, दि. २१ : पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग आणि पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये घेण्यात आलेल्या गुणवत्ता संवर्धन अभियानात शाळा तपासणीमध्ये पुणे शहर स्तरावर इ. ५ वी ते १२ वी गटामध्ये म.ए.सो. मुलांचे विद्यालय (पेरुगेट भावे स्कूल) या शाळेला प्रथम आणि म. ए. सो. रेणुका स्वरुप मेमोरियल गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजला द्वितीय क्रमांक मिळाला आहे. म.ए.सो. सौ. विमलाबाई गरवारे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाला पुणे शहर - औंध विभागात इ. ५ वी ते १२ वी गटात प्रथम क्रमांक मिळाला आहे. याचप्रमाणे म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेला मुळशी तालुका स्तरावर इ. ५ वी ते १२ वी गटात द्वितीय क्रमांक मिळाला आहे. तसेच म.ए.सो. सौ. विमलाबाई गरवारे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाला पुणे जिल्हा स्तरावर इ. ५ वी ते १२ वी गटात तृतीय क्रमांक मिळाला आहे.
गुणवत्ता संवर्धन अभियानाचा पारितोषिक वितरण समारंभ गुरुवार, दि. २३ एप्रिल २०२६ रोजी गणेश कला क्रीडा मंच येथे होणार आहे.
पुणे जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळामध्ये शालेय स्तर, तालुका स्तर व जिल्हा स्तर या तीन टप्प्यांमध्ये गुणवत्ता संवर्धन शाळा तपासणी अभियान राबविण्यात येते. भौतिक सुविधा, प्रशासन विषयक, अध्ययन-अध्यापन प्रक्रिया, मुख्याध्यापकांची कर्तव्ये, शालेय विभाग, गुणवत्ता संवर्धन व विशेष उपक्रम या सहा विभागांच्या अंतर्गत पाहणी करून गुण दिले जातात व अभिप्राय नोंदवण्यात येतो. हे अभियान शालेय विकासातील महत्त्वपूर्ण टप्पा आहे.
गुणवत्ता संवर्धन अभियानाचा प्रमुख उद्देश शालेय निरीक्षण व पर्यवेक्षणाद्वारे पारंपरिक व आधुनिक बाबींचा शालेय शिक्षण वाटचालीत समावेश व्हावा या दृष्टीने वर्तमान व आधुनिक निरीक्षण, तपासणीच्या पद्धतीचा समावेश करणे तसेच गुणवत्तेचे संवर्धन करण्यासाठी क्षमता वृद्धिंगत करणे, उणिवा दूर करणे, शिक्षक व शाळेचे कार्य यांचा परिचय करून देणे, शाळेच्या विकासासाठी आवश्यक घटकांचे पुनरावलोकन करून अद्ययावत राहणे, शाळांमधील उत्तम व नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आदान-प्रदान करणे हा आहे.
28/03/2026
‘रंगवेध’ चित्रकला प्रदर्शनातून विस्तारते कल्पनांचे क्षितिज : डॉ. माधवी मेहेंदळे
“कला ही सर्वांना जोडते. मनातील भाव चित्रांच्या माध्यमातून प्रकट करता येतात, कल्पना स्वातंत्र्याला वाव मिळाल्याने व्यक्तीमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ‘रंगवेध’सारख्या चित्रकला प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या कल्पनांचे क्षितिज विस्तारत असल्याने त्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण देखील होते. त्यामुळेच विद्यार्थ्यांनी रेखाटलेली सामाजिक संदेश देणारी, पर्यावरण विषयक मांडणी असणारी चित्रे देखील या प्रदर्शनात आपल्याला बघायला मिळत आहेत. ‘मएसो’च्या शाळांमध्ये असलेली ‘मएसो कलावर्धिनी आर्ट वॉल’ चित्रकलेविषयी मोलाचे योगदान देत आहे,” असे मत ज्येष्ठ नेत्र शल्यविशारद व चित्रकार डॉ. माधवी मेहेंदळे यांनी आज येथे व्यक्त केले.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ‘मएसो कलावर्धिनी’ तर्फे आयोजित तीन दिवसीय ‘रंगवेध’ या चित्रकला प्रदर्शनाचे डॉ. मेहेंदळे यांच्या हस्ते आज (शुक्रवार, दि. २७ मार्च २०२६) करण्यात आले. या प्रसंगी त्या बोलत होत्या.
उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) हे होते. संस्थेच्या नियामक मंडळाच्या उपाध्यक्षा सौ. आनंदीताई पाटील यांची यावेळी विशेष उपस्थिती होती.
‘मएसो कलावर्धिनी’चे अध्यक्ष डॉ. दिलीप शेठ व महामात्र डॉ. गोविंद कुलकर्णी, शाळेच्या महामात्र सौ. चित्रा नगरकर, कमांडंट एव्हीएन विंग कमांडर म. यज्ञरामन, पर्यवेक्षक व प्रदर्शनाचे समन्वयक संदीप पवार आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
कासारआंबोली येथे म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेत हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. त्यामध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सहा जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या चित्रांपैकी निवडक चित्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत.
समारंभाचे प्रास्ताविक करताना डॉ. दिलीप शेठ म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही कला असते, एक शिल्प दडलेले असते. त्याला वाव देण्यासाठी ‘मएसो कलावर्धिनी’च्या माध्यमातून रंगवेध, स्वरवेध, तालवेध इ. उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. ‘रंगवेध’च्या भव्य कलादालनात सुमारे ३०० निवडक चित्रांचे प्रदर्शन साकारण्यात आले आहे.
सौ. आनंदी पाटील म्हणाल्या की, विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलांना चालना देण्यासाठी ‘मएसो कलावर्धिनी’ची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येकाने एक तरी कला जोपासली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी ‘रंगवेध’ या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय भाषणात एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) म्हणाले की, ‘मएसो कलावर्धिनी’ चित्रकला विषयक नवनवीन कल्पना राबवून विद्यार्थ्याच्या चित्रांचे एक उच्च दर्जाचे कलादालन उभारते हीच एक वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण कल्पना आहे. आपण पुन्हा एकदा चित्र काढायला शिकत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
‘मएसो कलावर्धिनी’चे महामात्र डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी आभारप्रदर्शन तर चित्रकला शिक्षिका सौ. यशोदिनी कुलकर्णी यांनी समारंभाचे सूत्रसंचालन केले.
तीन दिवसांच्या या प्रदर्शनात सुलेखन, फेस पेंटिंग, शिल्पकला इत्यादी विषयावर विविध सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. ‘रंगवेध’ दि. २९ मार्चपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.