04/04/2017
# स्पर्धेने अर्धे झालेल्या सर्वांना अर्पण...
2 एप्रिल 2017 स्पर्धेने ज्यांचा जीव 'अर्धा' केलाय अशा पोस्ट
भक्तांच्या वारीच पहिलं रिंगण पार पडलं. आता या रिंगनातून
पुढच्या रिंगणापर्यंत किती जातात, आणि किती पुन्हा
अपयश पदरात घेऊन पहिल्याच रिंगणाच्या तयारीला पुन्हा लागतात
हा 3 महिने चघळण्याचा विषय आहे.
सदाशिव पेठ म्हणजे "सुशिक्षित" वारकऱयांची
"आळंदी" आहे. इथे भक्तांची कमी
नाही आणि भक्तावर पोसून पोसून फुगलेल्या देवांची
आणि देवालयांची पण. पोथ्यांचा बाजार इथेही जोमात
चालतो. इथे चातुर्वर्ण्य आहे. पोस्ट मिळालेले 'उच्चवर्णीय',
मुलाखत दिलेले 'क्षत्रिय', मुख्य परीक्षा दिलेले 'वैश्य', आणि
फक्त पूर्व परीक्षा च देणारे 'शूद्र'. फक्त हि चातुर्वर्ण्य
व्यवस्था अगदीच लवचिक आहे. आणि दर वर्षी
तुमचा वर्ण तुम्ही बदलू शकता. जस जस तुम्ही
उच्च वर्णात जाल तसतसे तथाकथित देवालये हा आमचा भक्त..हा आमचा
भक्त असा टाहो फोडतात.
इथेही थोडेसे तुकारामांसारखे संत आहेत जे पोस्ट मिळवून या
व्यवस्थेत प्रामाणिकपणे कार्य करतात. आणि भरपूर 'बडवे' पण जे "आईच्या
कुशीत मातीच्या मुशीत" सारख्या
मंत्र पठणाने कित्येक सामान्य जनतेच्या मनावर गारुड घालून, त्यांना
पोस्टरूपी स्वर्गाचे दार मिळेल अशी
अशी भाषणे देत फिरतात. या आळंदीत
वारकऱयांच्या साधनेसाठी कित्येक 'मठ' आहेत. सर्व
वारकरी या मठात दिवसरात्र साधना, मनन, चिंतन करत असतात.
"हेची दान दे गा देवा...
FACTS चा विसर ना व्हावा"
"आम्हा घरी धन तथ्यांचीच रत्ने,
तथ्यांचीच शस्त्रे करू आता"
"भले तरी देऊ संकल्पनेची लंगोटी
प्रश्नाच्या माथी हानु आकडे"
"मागे उभी prelim, पुढे उभी मुलाखत
माझ्याकडे POST माझी पाहते आहे"
या अशा कित्येक ओव्यांनी इथले वातावरण सदैव भारलेले असते.
इथेही तुकारामासारख्या संताना जे तमाम वारकाऱयांचे आशास्थान
असतात त्यांना छळणारे मंबाजी आहेत. "व्यवस्था, सरकार,
आयोग" हि इथल्या मंबाजी चे प्रतीक. ऍड न
काढणे, पोस्ट कमी काढणे, पेपर फॅक्च्युअल काढणे, वेळेवर
निकाल न लावणे अशा विविध कुरापती करून ते वारकऱ्याना छळत
असतात.
पण गम्मत अशी आहे की इथला विठ्ठल असतो
तो आयोगाचा चेअरमन, आणि हा विठ्ठल बदलत राहतो आणि रिटायर पण होतो.
पण सर्व वारकऱयांची या विठ्ठलावर भक्ती
किती आणि त्याच्याबद्दल भीती
किती हा कीर्तनाचा विषय आहे. या विठ्ठलाचा दरारा
असा की........
"आले त्याच्या मना
पोस्ट कुणाची निघेना".
आणि या अशा आळंदीत समस्त वारकरी ,
"तुका म्हणे आता उधार तू होई
मज ठेवी पायी संतांचिया".....
या मागणीच्या तालावर दिवसरात्र,
"लोक म्हणे आता CLEAR तू होई,
मज ठेवी पायी आयोगाच्या"....
या घोषात दिवसरात्र झिंगलेले असतात.
पण खंत एवढीच कि इथे खूप कमी जणांना
"मुक्ती" मिळते. न बाकीच्यांना आयुष्यभर अपयश
डोळ्यात घेऊन जगण्याची "सक्ती"
मिळते......फक्त "सक्ती".
"बोला आयोग वर्दे पोस्ट कधी भेट्टेल.."