10/04/2023
आनंदाचे झाड
परीक्षा संपल्या ,सुट्टी लागली कि पूर्वीच्या काळी मामा,मावशी ,आत्या ,काका ,आजी आजोबा यांच्याकडे जायची हुरहूर लागायची .आई वडील करत नाहीत तेवढे लाड हि मंडळी करायची.अश्या गाठी भेटीतून नाती दृढ होत असत.काळ बदलला .आई वडील दोघे नोकरी करणारे.त्यामुळे २ दिवसांच्या वर कुठे नेऊन आणणे अवघड .नातेवाईकांकडे जाण्यापेक्षा एखाद्या स्पॉट वर पिकनिक करून येणे ,त्यानिमित्ताने हॉटेल मध्ये राहणे,खाणे जास्त सोईस्कर होऊ लागले.एकत्र धमाल करणे म्हणजे काय,रात्री सर्वानी गच्चीत ,अंगणात झोपून गप्पा मारणे हे आत्ताच्या मुलांना फक्त गोष्टीतच सांगावे लागेल बहुदा.पण हा हरवत चाललेला आनंद एका दिवसापुरता का होईना चिमुकल्या मुलांना मिळावा ,रमत गमत झुकझुक गाडीतून मामाच्या गावाला जाताना मिळणारा आनंद मुलांना मिळावा ह्या एकाच शुद्ध हेतूने शांतादुर्गा शिक्षण समितीच्या, लोकमान्य टिळक विद्यालय,कवळेच्या प्राथमिक व पूर्व प्राथमिकच्या शिक्षक आणि शालेय कर्मचाऱ्यांनी हि किमया करून दाखवली.ह्या शाळेत समाजातील सर्व स्तरांमधील मुले येतात.अगदी मातृछायेसारखी अनाथांना छत्रछाया देणाऱ्या संस्थेत राहणारी मुले सुद्धा याच शाळेत आहेत.बरेच विद्यार्थी कधी रेल्वे मध्ये बसणे सोडा पण रेल्वे न पाहिलेले. अशा सर्व मुलांना रेल सफरीचा आनंद घेता यावा म्हणून मडगाव ते सावंतवाडी रेल सफरीचे आयोजन केले व हि कामगिरी समर्थ पणे पेलली ती ह्या शाळेतील शिक्षक व कर्मचारी वर्गाने.
मडगाव हुन सुटणारी दिवा एक्सप्रेस सकाळी ६.१० वाजता पकडायची होती.त्यासाठी कवळे ते मडगाव हा जवळपास ३० ते ३५ मिनिटांचा बस चा प्रवास चिमुकल्याना घेऊन करायचे होते.यासाठी सकाळी ५ वाजता शाळेत जमायचे ठरले.काही विद्यार्थ्यांना योग्य साधनांअभावी सकाळी येणे शक्य नव्हते.यासाठी शिक्षकांनी शक्कल लढवली. मुलांनी आणि शिक्षकांनी आणि इतर कर्मचाऱ्यांनी आदल्या रात्री शाळेतच झोपायचे ठरवले.शिक्षिका आणि मदतनीस काकी मुलांना घेऊन वर्गातच झोपल्या .मदतनीस काका आणि काही मुलांचे बाबा वर्गाबाहेर झोपले.मुले झोपतात कसली .त्यांच्या साठी हि रात्र आणि उद्याचा दिवस मंतरलेलाच होता.रात्र भर गप्पा चालू.मुलांचा हुरूप बघता शिक्षक आणि मदतनीस तरी कसे झोपतील.बघता बघता पहाट उजाडली.सर्व प्रातःविधी उरकून चहा पिऊन वानरसेना कूच करायला तयार होती.कुणाचीच रात्रभर झोप झाली नव्हती . तरी सगळे कसे टवटवीत होते .बसने सर्व जण मडगाव पर्यंत पोचले.वाटेत जाताना गाणी ,गप्पा विनोद चालू होते.
दिवा एक्सप्रेस येताच रांगेत मुले रेल्वे मध्ये चढली.कुणाला वरच्या बाकावर बसायचे होते तर कुणाला खिडकी कडे.मदतनीस काकी कंटाळा न करता मुलांचे सर्व हट्ट पुरवीत होत्या.कुणाच्याही ठाई परकेपणा दिसत नव्हता .२ तासांनी रेल्वे सावंतवाडीला पोचली.एकही मूल वाटेत झोपले नाही.खिडकीतून दिसणारे मोकळे आकाश,उगवताना दिसणारा सूर्य,गर्द वनराई,मधेच येणारा उड्डाणपूल आणि त्याखाली दिसणारे स्वच्छ पाणी,बोगदे ,घरे हे सर्व डोळ्यात साठवताना सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू उमटत होते. सावंतवाडीतील मळगाव येथील खानोलकर यांच्या कार्यालयात उतरण्याची सोय केली होती.त्यांनी नाश्त्यासाठी केलेली सोय छानच होती.पोटात कावळे ओरडू लागल्याने वानरसेना खाण्यावर तुटून पडली.एकमेकांच्या खोड्या काढत दोन घास जास्तच पोटात गेले असावेत.कार्यालयासमोर मोठे अंगण होते.तिथे काजू,चिककू आणि जांभळाची झाडे.वानरसेनेपेक्षा बरोबर असलेले पालकच जांभळे ,चिकू पाडत आपल्या बाल्यावस्थेत थोडा वेळ फिरून आले.
थोड्या विश्रांती नंतर सगळे सावंतवाडीतील सावंतांचा राजवाडा बघण्यासाठी बाहेर पडले.सावंतवाडी शहराच्या केंद्रस्थानी असणारा हा राजवाडा पर्यटकांचे एक प्रमुख आकर्षण आहे.आजही हा वाडा सुस्थितीत आहे.दगड,चुना आणि लाकूड यांचे बांधकाम असणारा हा वाडा बांधकामाचा एक उत्तम नमुना आहे.राजदरबार ,तिथे ठेवलेले चांदीचे सिंहासन,पूर्वी राजांनी शिकार केलेल्या वाघांना आजही भुसा भरून जपून ठेवण्यात आले आहे. राजमातेचे सोन्याची जर असलेला शालू,तलवारी व थेतील नक्षीकाम लक्ष वेधून घेत होते.वाड्याच्या आतल्या बाजूला असणाऱ्या खोल्या ,तिथे जपून ठेवलेली लाकडी वस्तू,फोटो,राज घराण्याची वंशावळ हे सगळे मुले मोठ्या उत्सुकतेने बघत ,निरखत होती.आपल्या वयोमानाप्रमाणे तिथल्या गोष्टीचे आपल्या परीने अर्थ,संदर्भही लावत होती.वाड्याचा फक्त १/४ भाग बघण्यासाठी खुला ठेवण्यात आला आहे.बाकीचा 3/४ भाग कडी कुलुपात बंदिस्त आहे.तो राजवाडा ,ती श्रीमंती बघताना एक मात्र जाणवले.ज्या राजघराण्याचा हा वाडा होता त्यांनी शिवाजी महाराजांशी एकदा दोनदा नव्हे तर तब्बल ३ वेळा प्रतारणा केली होती.विजापूरच्या बादशहाकडे व एकदा पोर्तुगीजांकडे सुद्धा महाराजांविरुद्ध हात मिळवणी केली.एका मराठ्याने दुसऱ्या मराठ्यांशी केलेले हे एक ज्वलंत उदाहरण .आपल्या ह्याच स्वभावाचा परक्यांची फायदा घेतला आणि पुढे नको तो इतिहास घडत गेला.लखम सावंतांच्या शौयाचे खुद्द शिवाजी महाराजांनी सुद्धा कौतुक केले .परंतु जे शौर्य हिंदवी स्वराज्याच्या विरोधात वापरले गेले त्या शौर्याला माझ्या नजरेत शून्य महत्व.राजवाड्याच्या निमित्ताने का होईना हा सर्व इतिहास भावी पिढी पर्यंत पोचावा असे मला वाडा पाहताना मनोमन वाटले.
त्यानंतर आमची वानरसेना निघाली लाकडी वस्तूंच्या खरेदीला.लाकडी खेळणी,रंगीत लाकडी फळे,नानाविविध वस्तू बघताना आम्हाला उन्हाचे चटके बसू लागले होते.परंतु जवळच्याच एका दुकानात गारेगार पन्हे,कोकम सरबत,सोलकढी वर ताव मारताना १२ चे उन्हाची सुसह्य झाले.खरेदी करून आम्ही पुन्हा निघालो ते मळगाव कडे .कार्यालयात थोड्या विश्रांती नंतर जेवणे करून डोळ्यावर झापड यायला लागली होती.खाली असलेल्या लग्नाचे हॉल मध्ये जागा मिळेल तशी मुले झोपली.तासाभराच्या विश्रांती नंतर पुन्हा रेल्वे स्टेशन कडे निघालो.जाताना सावंतवाडीची प्रसिद्ध कलिगडे विकत घेतली.पूर्ण गोलाकार आणि हिरवी गार कलिंगडे बघूनच मन सुखावले.परत मग रेल्वे स्टेशन वर आल्यानंतर रेल्वे वेळेपेक्षा तास भर उशिरा धावतेय हे समजले .पण बच्चे कंपनीने रेल्व चे उशिरा धावणे सुद्धा आनंदाने घेतले.रेल्वे स्टेशन वर धुमाकूळ घालत ,चॉकलेटे चोखत मस्त वेळ घालवला.मग पुन्हा रेल्वेत बसत वडा पाव खात मडगाव पर्यंत आलो.मुलांच्याच्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि आनंद तसूभरही कमी झाला नव्हता.त्यांचा तो आनंद बघून शिक्षक आणि कर्मचारी वर्ग सुद्धा समाधानी दिसत होता.एखादा वटवृक्ष जसा तिथे येणाऱ्या पक्षांना ,वाटसरूंना सावली देतो,अन्न देतो आणि आनंद देतो ,ते देताना त्याची अपेक्षा काहीच नसते.त्याला फक्त देणेच माहित असते.तसेच हि शाळा,इथले शिक्षक आणि कर्मचारी आणि पर्यायाने शाळा म्हणजे एक भलामोठा वृक्षच.तिथे येणाऱ्या वाटसरूंना म्हणजे विद्यार्थ्यांना घडवणे,घडवत असताना आनंद देणे,त्यांना न मिळणारे सुख ,आनंद देण्याचा आटोकाट प्रयत्न हा वृक्ष करत असतो .म्हणूच या वृक्षाला आनंदाचे झाड म्हणावे असे वाटते .उपेक्षित मुलांना रेल सफर घडवणारे हे आनंदाचे झाड एक दिवस आपल्या प्रयत्नाने त्यांना विमान सफर सुद्धा घडवेल ह्यात मला तिळमात्रही शंका वाटत नाही.
सौ राधिका वैभव काळे (तन्मय ची आई )