26/02/2025
एकदिवसीय राष्ट्रीय वेबिनार -संत साहित्य व भारतीय ज्ञान परंपरा
फुलंब्री दिनांक १३ फेब्रुवारी २०२५ रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय शिक्षण संस्था संचालित, श्री संत सावता माळी ग्रामीण महाविद्यालय, फुलंब्री व यशवंतराव चव्हाण कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सिल्लोड आणि प्रधानमंत्री उच्चत्तर शिक्षा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने आभासी पद्धतीने 'संत साहित्य व भारतीय ज्ञान परंपरा' या विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन दिनांक १३ फेब्रुवारी २०२५ रोजी श्री संत सावता माळी ग्रामीण महाविद्यालयात करण्यात आले.
याप्रसंगी वेबिनारचे उदघाटन अमरावती विभागाचे सहसंचालक, प्रो.डॉ. केशव तुपे यांच्या हस्ते करण्यात आले. तर बीजभाषक म्हणून नाशिक येथील संत साहित्याचे अभ्यासक, प्रो. डॉ. दिलीप धोंडगे उपस्थित होते. प्रमुख उपस्थितीत पंडित दीनदयाळ उपाध्याय शिक्षण संस्थेचे संचालक, डॉ. सर्जेराव ठोंबरे तर अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव, मा.श्री निवृत्ती गावंडे उपस्थित होते.
प्रास्ताविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य, डॉ. पांडुरंग कल्याणकर यांनी केले. तर वेबिनारची भूमिका मराठी विभागप्रमुख, डॉ. राजश्री पवार यांनी मांडली.
उदघाटनप्रसंगी बोलत असताना प्रो. डॉ. केशव तुपे म्हणाले की, संत साहित्य हा एक विचार आहे. या विचारात एका प्रकारची भाषिक मूल्यता दडलेली आहे. म्हणून हा विचार समाजात रुजावा हा प्रयत्न संत साहित्य करतांना दिसते. तसेच आजच्या शैक्षणिक बदलासंदर्भात विवेचन करत असताना भारतीय व पाश्च्यात शैक्षणिक परंपरेविषयी विवेचन केले. तसेच संतांची परंपरा ही भारतीय ज्ञान देणारी परंपरा आहे. याचा आवर्जून अभ्यासक, संशोधकांनी विचार करावा. असे मत व्यक्त केले.
बीजभाषाण प्रसंगी बोलत असताना प्रो. डॉ. दिलीप धोंगडे म्हणाले की, महाराष्ट्राची संस्कृती ही वारकऱ्यांची संस्कृती आहे. ही एक प्रकारची परंपरा आहे. संतांचे कार्य हे क्रांती घडविणारे आहे. आणि ही क्रांती संत विचारांनी त्या त्या वेळी घडवून आणलेली सुद्धा आहे. हे आपणास विसरता येणार नाही. पुढे बोलताना डॉ. धोंडगे म्हणाले की, वेद, उपनिषदांची जागा संत साहित्याने घेतली. परंतु वेद हे संपन्न आहेत पण कृपन आहेत असेही मत व्यक्त केले. यासोबतच वेदाला पर्याय म्हणून ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत यामधून संत साहित्याची निर्मितीप्रक्रिया झालेली दिसते. संत साहित्याचे मूल्य समजमनात आजच्या घडीला महत्त्वाचे वाटते आहे. असेही मत व्यक्त केले.
प्रमुख उपस्थितीत डॉ. सर्जेराव ठोंबरे यांनी उपस्थित अभ्यासक, संशोधक यांना समाज घडणीत संत विचारांचे योगदान कसे महत्त्वाचे राहिले आहे. याअनुषंगाने विचार व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोप मा. श्री निवृत्ती गावंडे यांनी केला. बोलत असताना श्री गावंडे यांनी नालंदा विद्यापीठाची आठवण करून दिली. वारकरी संप्रदायातील लोकांना कुठल्याच प्रकारचा अभिमान असत नाही. त्यांचा अभिमान भक्तीतून गळून पडलेला असतो. ही माणसे जीवनमूल्ये जगत असतात. त्यांची सामाजिकता दृढ बनत असते. या संदर्भाने आपले मत व्यक्त केले.
वेबिनारच्या दुसऱ्या सत्रात मराठी भाषा विभागप्रमुख, व भाषा संशोधन केंद्र संचालक, विवेकानंद कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर यांनी भेदा भेद भ्रम अमंगळ ही परंपरा निर्माण करण्यासाठी संत साहित्याच्या अभ्यासाची आवश्यकता आहे. तसेच या समाजाला संत विचारांचा समृद्ध असा वारसा लाभला आहे. ही खरी आमची मुळातली परंपरा आहे. ही संत विचारांची परंपरा आपल्याला जपावी लागणार आहे. याच परंपरेतून संस्कृती संवर्धन आणि ज्ञान जतन करता येईल. हे ज्ञान जतन करताना आमची देणगी अयुर्वेद आहेत. हेही विसरता येणार नाही. असे मत व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोप यशवंतराव चव्हाण कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सिल्लोड येथील प्राचार्य, डॉ. अशोक पंडित यांनी केला. त्यांनी वैदिक काळापासून असलेली ज्ञानाची परंपरा सांगितली. पुढे ते असेही म्हणाले की, आपण पश्चिमात्यीकरणाच्या स्वीकारामुळे आपण भारतीय ज्ञान परंपरेपासून दूर गेलो आहोत. असे होऊ नये. तर अध्यात्म, विज्ञान आणि नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याची आपणास सांगड घालावी लागेल. म्हणजे भारतीय ज्ञान परंपरा काय? आहे याचाही शोध यामध्यमातून घ्यावा लागेल. असे प्रतिपादन केले.
वेबिनारच्या तिसऱ्या सत्रात महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर येथील मराठी विभागप्रमुख, प्रा. डॉ. रत्नाकर बेडगे उपस्थित राहिले. यांनी 'संत तुकाराम यांचे साहित्य व भारतीय ज्ञान परंपरा' या विषयावर बोलत असताना भारतीय तत्वज्ञानाचा धांडोळा घेतला. तुकारामांनी खऱ्या अर्थाने आपल्या साहित्य निर्मितीतून समृद्ध अशी भारतीय ज्ञान परंपरा पुढे नेहलेली आढळते. संत तुकाराम यांनी त्यांच्या लेखनातून अध्यात्म व विज्ञान यांची सांगड घातली. याबरोबरच संत तुकाराम यांचे तत्वज्ञान हे जनकल्याणासाठी असलेले दिसून येते. मुळात तुकाराम महाराजांचा पिंड हा भावनाप्रदान राहिलेला आहे. नवीन पिढीला त्यांचे विचार आणि तत्वज्ञान आजही लागू पडताना दिसते आहे. असे मत व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोप प्रो. डॉ. कैलास इंगळे यांनी केला.
वेबिनारच्या समारोप सत्रात प्रो. डॉ. ज्ञानेश्वर थोरात, सुप्रसिद्ध कीर्तनकार, मंचर, पुणे यांनी बोलत असताना सांगितले की, भारतीय परंपरेचा मुलस्रोत वेद आहेत. परंतु, व्यक्ती, कालपरत्वे स्थित्यंतरे निर्माण झाली. पुढे ते असेही म्हणाले की, नामस्मरण, सदाचार हा वारकऱ्याचा आचारधर्म आहे. संत साहित्यात विज्ञान आहे. ते विज्ञान आपणास जगता आले पाहिजे. कारण संत साहित्य हे कालग्राह्य आहे. हे विवेचन करत असताना संत साहित्याची ज्ञान प्रबोधन परंपरा व आधुनिक परंपरा सांगितली.
या समारोप सत्राचा अध्यक्षीय समारोप संस्थेचे पालक संचालक, डॉ. प्रदीप जब्दे यांनी केला. बोलत असताना डॉ. जब्दे म्हणाले की, संत म्हणजे काय? याचा अर्थ समजावून सांगितला. संत साहित्य हे माणसांच्या व समाजाच्या विकाराची मशागत करते. कारण संत साहित्याचा पाया नैतिकता आहे. संत साहित्य हे माणसांचे विचार, आचार व संस्कार बदलण्याचे काम करते. तसेच जात, धर्म याच्या पलीकडे जाऊन संत विचार समाजात काम करतो. ही आजच्या काळात महत्त्वपूर्ण अशी बाब आहे. त्यामुळे या विचारांचा अंगीकार प्रत्येकाने करावा. असे सूचित केले.
उपस्थित सर्व मान्यवर, अभ्यासक, संशोधक यांचे आभार प्रा. डॉ. ज्ञानेश्वर गवळीकर यांनी मानले.
प्रस्तुत वेबिनारचे सूत्रसंचलन अनुक्रमे प्रा. डॉ. ज्ञानेश्वर शेजूळ, प्रा. डॉ. संजीवकुमार पांचाळ यांनी केले. प्रस्तुत वेबिनारसाठी साधारणतः ७५ ते ८० अभ्यासकांची आभासी पद्धतीने उपस्थिती होती.