PDEA's Annasaheb Waghire Arts, Commerce & Science College,Otur

  • Home
  • India
  • Otur
  • PDEA's Annasaheb Waghire Arts, Commerce & Science College,Otur

PDEA's Annasaheb Waghire Arts, Commerce & Science College,Otur BCUD.unipune.ac.in Education facility from Higher Secondary to PG in hilly,rural area. UGC and Govt. Of Maharastra approved and affiliated to SPPU Pune

23/11/2022
दि. १०/९/२२ ......पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या ८१ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूरमध्...
12/09/2022

दि. १०/९/२२ ......पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या ८१ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूरमध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने रांगोळी स्पर्धा व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० या विषयावर अंतर महाविद्यालयीन ऑनलाईन व ऑफलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अभय खंडागळे यांनी दिली.

ओतूर महाविद्यालयामध्ये संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने “पर्यावरण व शिक्षण” या विषयावरील रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.सदर रांगोळी स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील ८८ विद्यार्थ्यांनी भाग घेतला. सदर रांगोळी स्पर्धेचे परीक्षण प्रा. सौ. आंद्रे मॅडम व प्रा.सौ.गोरडे मॅडम यांनी केले. सदर स्पर्धेमध्ये
कनिष्ठ विभागातून वैष्णवी तांबे व धनश्री चव्हाण यांनी प्रथम क्रमांक, वैभव रानडे व किशोर जाधव यांनी द्वितीय क्रमांक तर साक्षी कसे व नेहाराम यांनी तृतीय क्रमांक संपादित केला. तसेच वरिष्ठ विभागातून तनुजा डुंबरे व अक्षया डुंबरे यांनी प्रथम क्रमांक, सोनम मस्के,सुरज हांडे, बोगसगाव प्रियंका टिकेकर,साक्षी डुंबरे यांनी द्वितीय क्रमांक तसेच नीतू यादव व कविता चव्हाण यांनी तृतीय क्रमांक मिळवला. रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड चे माजी कुलगुरू डॉ.पंडित विद्यासागर यांच्या हस्ते करण्यात आले.
याबरोबरच संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे माजी कुलगुरू डॉ.पंडित विद्यासागर यांचे “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – २०२०” व्याख्यान महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात आले.

डॉ.पंडित विद्यासागर आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात म्हणाले, “राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात अध्ययन व अध्यापन पद्धतीत अमुलाग्र बदल होणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यशस्वी होण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक, पालक, शैक्षणिक संस्था,उद्योग संस्था,समाज यांच्या एकत्रित विचारातून व कृतीतून प्रयत्न होणे गरजेचे आहे. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यशस्वी होण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक, पालक व शैक्षणिक संस्था यांनी मनोधारणा बदलणे आवश्यक आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील आंतरविद्याशाखीय शिक्षणातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकसित होईल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शिक्षकांनी सतत नाविन्याचा ध्यास घेत नवनवीन गोष्टीचे ज्ञान प्राप्त करून घ्यावे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शिक्षकाची भूमिका ही फक्त अध्यापनाची न राहता मार्गदर्शकाची होणार आहे.

सदर वर्धापन दिन सोहळ्यामध्ये आपल्या मनोगतामध्ये संस्थेचे मानद सचिव ॲड.संदीप कदम यांनी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या स्थापनेपासून आजपर्यंत संस्थेने शैक्षणिक क्षेत्रामध्ये केलेल्या कार्याचा आढावा घेतला.

सदर व्याख्यानासाठी ऑनलाइन स्वरूपात पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड.संदीप कदम, खजिनदार ॲड.मोहनराव देशमुख, सहसचिव मा. ए.एम. जाधव, डॉ एस डी अघाव, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.के.डी.सोनवणे, डॉ. व्ही.एम.शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सहसचिव मा.ए एम जाधव यांनी केले. पाहुण्यांचा परिचय उपप्राचार्य डॉ. एस.एफ. ढाकणे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक डॉ. अमोल बिबे यांनी तर आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अभय खंडागळे यांनी केले.
उपप्राचार्य डॉ. व्ही एम.शिंदे उपप्राचार्य.डॉ.के.डी सोनावणे उपस्थित होते.
सदर व्याख्यानास इतर महाविद्यालयातील ऑनलाईन पद्धतीने २५० प्राध्यापक तसेच महाविद्यालयातील व संस्थेच्या इतर कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. अमोल बिबे, डॉ. निलेश काळे, प्रा. आजय कवाडे, डॉ. भुषण वायकर कार्यालयीन सेवक श्री दिपक बाबर यांनी विशेष परिश्रम घेतले.

.  *"जुन्नरची सुकन्या : देशात चमकली"*          *सई डावखरला ब्राँझ पदक*           〰️🍁🍁🍁🍁〰️ तुमच्या स्वप्नांचा आणि ध्येयाच...
15/06/2022

. *"जुन्नरची सुकन्या : देशात चमकली"*
*सई डावखरला ब्राँझ पदक*
〰️🍁🍁🍁🍁〰️
तुमच्या स्वप्नांचा आणि ध्येयाचा तुम्ही मनापासून पाठपुरावा करीत असाल तर यशस्वी होण्याचं कौशल्य शिकता येते. यासाठी हवी असलेली क्षमता सर्वांमध्ये असते, फक्त ती क्षमता ओळखून योजनाबद्ध रितीने मार्गक्रमण करण्याची गरज असते. वडिलांनी स्वतःचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न मुलीच्या डोळ्यात पाहिलं आणि मुलीने ते स्वप्न साकार करण्यासाठी, प्रतिकूल परिस्थितीतही प्रयत्नांची पराकाष्ठा करीत वयाच्या केवळ अठराव्या वर्षी 'खेलो इंडिया युथ क्रिडा' स्पर्धेत महाराष्ट्रसाठी ब्राँझ पदकाची कमाई केली. आळे गावची निमसे मळ्यातील 'सई विनायक डावखर' या सुकन्येची आतापर्यंतची नेत्रदीपक वाटचाल ही महिला मुष्टियुद्ध (बाॅक्सिंग) खेळात भविष्यातील भारताचे आशास्थान आणि 'जुन्नर तालुका भूषण' अशीच आहे.

शालेय जीवनात उत्कृष्ट बाॅक्सर आणि फुटबॉल खेळाडू असलेले विनायक डावखर यांना घरच्या जेमतेम परिस्थितीमुळे खेळ आणि शिक्षण अर्ध्यावर सोडून द्यावे लागले. पुणे - सोलापूर रोडवर रामोशी गेटजवळ १९९७ सालापासून सॅन्डविचची हातगाडी चालवून कुटुंबाचा कसाबसा उदरनिर्वाह करणा-या विनायक - दिपाली या दाम्पत्यांची एकुलती एक सुकन्या 'सई डावखर' हिचा जन्म १६ जून २००४ रोजी झाला. खेळण्या - बागडण्याच्या वयातच आपली अपूर्ण राहिलेली स्वप्नं विनायकरावांनी सईच्या मनावर बिंबवायला सुरूवात केली. बाॅक्सिंग खेळाला चार हजार वर्षांचा इतिहास असला तरी भारतात या धोकादायक खेळाचं आयुष्य फक्त सत्तर पंचाहत्तर वर्षांचं आहे. या खेळाकडे मुलींनी आकर्षित होण्याचं प्रमाण अजूनही नगण्यच आहे. तरीही विनायकरावांनी सईला ठरवून निश्चयपूर्वक याच खेळाचं बाळकडू दिले. बाॅक्सिंगमधील सईचे पहिले ट्रेनर तीचे वडील विनायक डावखर हेच आहेत. पुणे येथे आयोजित केलेल्या महापौर चषक - २०१५ स्पर्धेत सईने पहिले सिल्वर पदक जिंकले. या पदकाने सईचा आत्मविश्वास तर दुणावलाच पण वडिलांचे स्वप्नही पूर्ण करण्याची उर्मी तिच्या अंतर्मनात उसळून आली.

यानंतर 'स्पर्धा तिथं पदक' जिंकण्याचा सिलसिला सतत सुरूच राहिला. ध्येयप्राप्तीसाठी 'कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही' हा मंत्र सईच्या अंगी बाणविण्यात वडिल विनायक डावखर यशस्वी झाले होते. यशाचा कोणताही शाॅर्टकट नसतो हे सईच्याही लक्षात आले होते. एखाद्या खेळाडूकडून हारल्यानंतर परत त्या खेळाडूला हरवल्याशिवाय सईला चैन पडेना. त्याकरता वजन कमी किंवा जास्त करण्यासाठी व्यायामाला आणि सरावाला प्राधान्य दिले जाऊ लागले. रोज सकाळी अडीच तास आणि दुपारी एक तास असा साडेतीन तासांचा सईचा व्यायाम आणि सराव आजही वडिलांच्याच मार्गदर्शनाखाली सुरू आहे. संध्याकाळी मात्र सईचा सराव आंतरराष्ट्रीय आणि आयबा थ्री स्टार कोच श्री. विजय गुजरसर यांच्या कडक देखरेखीखाली कधी जनरल अरूणकुमार वैद्य स्टेडियम तर कधी KLVSP वर होत असतो.

करोना लाॅकडाऊन काळात उत्पन्नच बंद झाल्याने या कुटुंबाला आपल्या गावी आळे येथे परतावे लागले. सईला अहमदनगर येथील काॅलेज हाॅस्टेलवर रहावे लागले. मार्च महिन्यात दिलेल्या बारावी परीक्षेत सई विनायक डावखर ६६.६७% गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे. हळूहळू परिस्थिती पुर्व पदावर आल्यानंतर पुन्हा कसून सराव करून सई डावखर या आपल्या जुन्नर तालुक्याच्या सुकन्येने हरयाणा येथे नुकत्याच झालेल्या 'खेलो इंडिया युथ क्रिडा' स्पर्धेत महाराष्ट्रासाठी ब्राँझ पदक जिंकले आहे. चार वर्षांपूर्वी खेळल्या गेलेल्या पहिल्या 'खेलो इंडिया युथ क्रिडा' स्पर्धेत सईला खाली हात परतावे लागले होते पण यावेळी सईने यशाला गवसणी घातली आहे.

आतापर्यंत स्कूल गेम, महापौर चषक, महाराष्ट्र स्टेट चॅम्पियनशिप, आयबा (IBA) फेडरेशन स्पर्धा, इंडिया वेस्ट झोन, राज्य पातळीवरील खेलो इंडिया आणि आता राष्ट्रीय पातळीवर 'खेलो इंडिया युथ क्रिडा' अशा अनेक स्पर्धांमधून सई डावखरने पंचवीसहून अधिक पदकांची कमाई केली आहे. या धोकादायक खेळाकडे आपल्या एकुलत्या एक मुलीला प्रेरीत करणारे आणि तिच्या खेळासाठी, खुराकासाठी अहोरात्र कष्ट करणारे दिपाली - विनायक डावखर हे पती - पत्नी सईसाठी तर प्रेरणास्रोत आहेतच परंतु इतर पालकांसाठीही आदर्शवत आहेत. आपल्या आयुष्यात खडतर अशा स्थितीतही आपल्या ध्येयसाध्यतेच्या इच्छेवर ठाम राहून ध्येयाप्रत कसे जाता येते याचं उत्तम उदाहरण म्हणजे 'सई डावखर आणि परिवार' आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करून भारतासाठी मुष्टियुद्ध पदक जिंकणे सईचं स्वप्न आहे. आजपर्यंतचा प्रवास पाहिला तर नक्कीच 'सई डावखर' भविष्यातील भारताचे आशास्थान आहे..!

विशेष सूचना :- ही पोस्ट शेअर करताना मूळ लेखकाच्या नावासह शेअर करावी.

~ लेखक ~
श्री. संजय वसंतराव नलावडे
धोलवड, मुंबई
मोबाइल - ८४५१९८०९०२
"निसर्गरम्य जुन्नर-भूमी गुणीजणांची"
🍁🍁🍁 🍁🍁🍁 🍁🍁🍁

ओतूर महाविद्यालयातील गुणवंत प्राध्यापक श्री. कैलास दत्तात्रय बिबवे सर,दिनांक 31 में 2022 रोजी  सेवानिवृत्त होत आहेत, त्य...
30/04/2022

ओतूर महाविद्यालयातील गुणवंत प्राध्यापक श्री. कैलास दत्तात्रय बिबवे सर,दिनांक 31 में 2022 रोजी सेवानिवृत्त होत आहेत, त्यानिमित्ताने अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयाने 29/4/2022 रोजी सकाळी 10 वा. त्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित केला आहे, या समारंभास महाविद्यालयातील त्यांचा सहकारी या नात्याने माझ्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
आदरणीय प्राध्यापक श्री. कैलास दत्तात्रय बिबवे यांचा जन्म दिनांक 1जून 1964 रोजी तेजेवाडी या आपल्या मूळ गावी झाला. वडिलांचा शेती व्यवसाय होता, त्यासोबत त्यांचे वडील हुंडेकरी व टेलरिंग असा व्यवसाय करीत. सहाजिकच संपूर्ण तेजेवाडी ,ओझर ,शिरोली कुमशेत या गावातील शेतकऱ्यांचा व ग्राहकांचा संबंध येत असे .शालेय शिक्षण घेत असतानाच हुंडेकरी व्यवसाय सांभाळण्यास कैलास रावांनी वडिलांना मदत केली.
कैलासराव यांचे प्राथमिक शिक्षण तेजेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. माध्यमिक शिक्षणासाठी शिरोली येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये प्रवेश घेऊन विशेष प्राविण्य मिळविले तर महाविद्यालयीन शिक्षण जुन्नर येथील श्री. शिवछत्रपती कॉलेज मध्ये घेत बी.ए.ची पदवी उच्च श्रेणीत प्राप्त केली तर पदव्युत्तर शिक्षणासाठी पुणे येथे जाऊन राज्यशास्त्र या विषयाची पदवी प्राप्त केली ,पुढे पुण्यातच त्यांनी बी.एड.चे शिक्षण पूर्ण केले.
जिद्द व चिकाटी व प्रचंड आत्मविश्वासाच्या जोरावर कैलास रावांनी पुणे जिल्हा शिक्षण मंडळात दिनांक 20 जानेवारी 1993 रोजी आपल्या प्राध्यापकी पेशाला सुरुवात केली.
प्रचंड वाचन, सदोदित घडामोडींवर सदैव लक्ष असल्याने त्यांचे राज्यशास्त्र या विषयातील ज्ञानदानाचे कार्य सदैव बहरत गेले. विद्यार्थ्यांना राज्यशास्त्र विषयासंबंधात गोडी लावण्याचे काम त्यांनी केले. त्यांचे अनेक विद्यार्थी आज उच्च पदावर कार्यरत आहेत.
प्राध्यापक म्हणून सरांची महाविद्यालयातील सेवा ही गौरविण्यासारखीच राहिली आहे. महाविद्यालयातील शिस्तीचे सदैव सदैव पालन त्यांनी केले, त्यामुळेच प्राध्यापक मंडळीत त्यांना सदैव आदराचे स्थान राहिले ,आपल्या कार्यकाळात त्यांनी केव्हाच आजारपणातील रजेसाठी अर्ज केला नाही उलट 290 दिवस महाविद्यालयासाठी जास्त कार्य केले यातून त्यांचे महाविद्यालय याबाबतचे प्रेम व्यक्त होते.
सरांनी केवळ अध्यापनात गुंतून न राहता महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागात लक्ष घालून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग वाढविला.
नाट्यकला ही मुळातच तेजेवाडी गावची वैभवशाली परंपरा असल्याने लहानपणापासून नाट्यकलेचे बाळकडू सरांना मिळाले.
शालेय जीवनापासून ते महाविद्यालयीन जीवनात अनेक नाट्य कलाकृतीत त्यांनी महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या. त्यांनी सहभाग घेतलेल्या अनेक नाट्य कलाकृती जिल्ह्यात अनेक ठिकाणी सादर झाल्या, तसेच पुणे येथील बालगंधर्व नाट्य मंदिरात त्यांच्या नाटकाचे प्रयोग पार पडले .जुन्नर महाविद्यालयात शिकत असताना त्यांनी सुट्टी व सन एन सन या एकांकिकेत विशेष झलक दाखविली.
सरांनी अनेक एकांकिकांमध्ये भाग घेतला .शालेय जीवनातील त्यांनी सहभाग घेतलेल्या हिंदी एकांकिका स्पर्धेत त्या वेळी त्यांना तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले होते .त्यांनी सहभाग घेतलेल्या सविता दामोदर परांजपे तसेच तरुण तुर्क म्हातारे अर्क, सासरे बुवा जरा जपून .शांतेच कार्ट चालू आहे तसेच हिरवा चुडा जीवाळा याआदी नाटकांनी प्रेक्षकांची मने जिंकली.
ओतूर महाविद्यालयातील अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनात सरांचा सतत सहभाग राहिला.
व्यसनमुक्ती अभियानाअंतर्गत सादर केलेल्या अनेक पथनाट्याचे आयोजन ओतूर व मढ
येथे करण्यात विशेष सरांचा सहभाग राहिला.
जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी हे गाव मुळातच नाट्यकर्मींचा गाव आहे .त्यामुळे तेथील सांस्कृतिक मंडळ विविध कार्यक्रमांचे दरवर्षी आयोजन करीत असते, गेली अनेक वर्ष कै. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धांचे आयोजन केले जाते .यामध्ये मुंबई ,ठाणे ,पुणे पनवेल ,नाशिक या विभागातून अनेक कलाकार सहभाग नोंदवितात. या कार्यक्रमाच्या नियोजनात सरांची अग्रणी भूमिका असते.
जुन्नर, आंबेगाव, खेड पुणे अशा अनेक ठिकाणी भरविल्या गेलेल्या नाट्य स्पर्धांच्या परीक्षणाचे परीक्षक म्हणून सरांनी सतत काम पाहिले आहे.
ओतूर महाविद्यालयातील अनेक उपक्रमात सरांचा सदैव सहभाग राहिल्याने विद्यार्थी वर्गात ते अतिशय प्रिय राहिले आहेत.
अलीकडे शासनाने कोरोना काळातील त्यांच्याकडे सोपवलेली जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलली.
एच .एस .सी बोर्ड परीक्षेचे केंद्र संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले.
अण्णासाहेब वाघिरे ज्युनियर महाविद्यालयात प्रभारी उपप्राचार्य पदाची जबाबदारी ही त्यांनी पार पाडली.
सरांच्या अतिशय गोड विनम्र स्वभावाने अनेक मित्र जोडले गेले. ओतूर येथील मॉर्निंग ग्रुपच्या उभारणीत सरांचा मोठा वाटा आहे ,अनेक मित्र ग्रुपमध्ये सहभागी करून त्यांना व्यायामाची आवड निर्माण करून दिली ,तसेच विविध ट्रेकचे आयोजन करून जुन्नर तालुक्यातील पर्वत रांगातील अनेक अवघड मोहिमा पार पाडल्या.
अशा आमच्या गुणवंत ,ज्ञानवंत, प्रज्ञावंत, आदर्श सहकारी मित्राला सेवानिवृत्ती समारंभाच्या प्रसंगी मनपूर्वक शुभेच्छा.
प्रा. महेश गंभिर
🌹🌹🌹🌹🌹

🙏 *भावपूर्ण श्रद्धांजली* 🙏ओतूरकरांचे भूषण, समाजातील माणूसपण शोधणारा शोधक पत्रकार. एक अभ्यासू आणि संशोधक साहित्यिक. संवेद...
27/01/2022

🙏 *भावपूर्ण श्रद्धांजली* 🙏
ओतूरकरांचे भूषण, समाजातील माणूसपण शोधणारा शोधक पत्रकार. एक अभ्यासू आणि संशोधक साहित्यिक. संवेदनशील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते. व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात मुक्तांगणच्या रूपाने एक अगळा वेगळा ठसा उमटलेले महान कार्य असलेले व्यक्तिमत्व.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ( 2021 ) चा जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले......
🏵️ *अनिलदादा अवचट*
संकलित---

डॉ . अवचट, अनिल : (जन्म.२६ ऑगस्ट १९४४ निधन २७ जानेवारी २०२२).मराठीतील प्रसिद्ध लेखक, समाजसेवक, चित्रकार आणि पत्रकार. जन्म पुणे जिल्ह्यातील ओतूर येथे. वडील ओतुर येथे वास्तव्य करीत असल्याने त्यांचे आठवीपर्यंतचे शिक्षण ओतुरलाच झाले. आठ भावंडात ते सर्वात मोठे असल्याने त्यांनी डॉक्टर व्हावे ही व‍डिलांची तीव्र इच्छा होती. गावात राहून हे जमणं कठीण म्हणून वडिलांनी त्यांना पुण्याच्या मॉर्डन हायस्कूलमध्ये, बोर्डिंगमध्ये शिक्षणासाठी ठेवले.१९५९ मध्ये एस .एस.सी. झाल्यावर फर्ग्युसन कॉलेज (पुणे) मधून ते इंटर आणि पुण्याच्याच बी. जे. मेडिकल कॉलेजमधून एम्.बी.बी.एस. झाले. याच कॉलेजमधील त्यांची मैत्रीण सुनंदा हिचेसोबत त्यांचे लग्न झाले.

समाजकार्याकडे कल असल्याने वैद्यकीय व्यवसाय न करता त्यांनी सामाजिक चळवळीमध्ये सहभाग घेतला. सामाजिक क्षेत्रातील अनुभवाशी निगडीत अशा प्रकारचे लेखन साधना साप्ताहिकातील वेध या सदरातून त्यांनी केले . साधना व पुरोगामी सत्यशोधक या त्रैमासिकाचे संपादनही त्यांनी केले.युक्रांदला अर्पण केलेले पूर्णिया हे बिहारच्या समाजदर्शनाविषयीचे त्यांचे पहिले पुस्तक १९६९ मध्ये प्रकाशित झाले. एका समाजवादी निष्ठेच्या तरुणाची, प्रतिकारशून्य गुलामगिरीविषयीची प्रतिक्रिया यात व्यक्त झाली आहे.

वेध (१९७४), हमीद (१९७७),अंधेरनगरी, निपाणी (१९७८),छेद (१९७९),माणसं (१९८०),संभ्रम (१९८१),वाघ्यामुरळी (१९८३),कोंडमारा (१९८५),गर्द (१९८५),धागे आडवे उभे (१९८६) गर्द (१९८६) धार्मिक (१९८९),स्वत:विषयी (१९९०),अमेरिका (१९९२) कार्यरत (१९९७) ,आप्त (१९९७), छंदाविषयी (२०००) प्रश्न आणि प्रश्न (२००१), जगण्यातले काही (२००५) आणि मजेदार ओरिगामी, पुणे हवेसे , लाकूड कोरताना ,सरल–तरल ,बहर शिशिराचा ,अमेरिकेतील फॉल सीझन इत्यादी त्यांची प्रकाशित झालेली पुस्तके आहेत. वेध मध्ये सदर लेखनातील ३६ लेख असून छेद मधील लेख वृत्तांतकथन स्वरूपाचे आहेत.ही पुस्तके त्या त्या संदर्भातील प्रत्यक्ष पाहणीवर आधारलेली तीव्र सामाजिक भानातून लिहिलेली आहेत, तरीही ती एखाद्या कथेसारखी उत्कंठापूर्ण, वाचनीय झाली आहेत. मोर मध्ये ललित लेख असून, अमेरिका या पुस्तकात प्रवासवर्णनातील निरीक्षणे आहेत.स्वत:विषयी , आप्त , छंदाविषयी,शिकविले ज्यांनी यासारखी पुस्तके आत्मपर स्वरुपाची आहेत. धागे आडवे–उभे मध्ये पुण्यामुंबईच्या वेश्यावस्त्या, थिएटर कामगार, तमाशा कलावंतांचे, सांगलीच्या हळद कामगारांचे जीवन यथार्थपणे शब्दांकित केले आहे.

समाजातील दुबळ्या, उपेक्षित, दारिद्र्यात, रूढींच्या कचाट्यात अडकलेल्या सामान्य माणसाच्या, अगतिक आयुष्याची ओळख करून देणारे, वेगळ्या विषयांना हात घालणारे लेखन अवचट यांनी केले. दुष्काळग्रस्त माणसे, झोपडपट्टीतील माणसे, भटक्या जमातीची माणसे, विडी कामगारांचे अंधारमय शोषित जीवन या साऱ्यांचं विलक्षण दाहक दर्शन त्यांनी माणसं मधून घडविले आहे.भोवतालच्या घटनांकडे, वृत्तीप्रवृत्तीकडे बघण्याची चौकस, शोधक नजर, उत्कट सामाजिक जाणीव, पांढरपेशा, बुद्धीजीवी वर्गाच्या दांभिकपणाविषयीची चीड, त्यांच्या लेखनातून वेळोवेळी नेमकेपणाने व्यक्त झालेली दिसते. या सर्वांमागे समाजपरिवर्तनाची आस जाणवते.अवचटांचा जीवनविषयक दृष्टिकोन गंभीर, बांधिलकी हे मूल्य मानणारा आहे. त्यामुळे त्यांच्या लेखनातून एक सखोल, संवेदनशील दृष्टिकोन व्यक्त होतो. विषय गंभीर असले तरी लालित्यपूर्ण मांडणीमुळे ते वाचकप्रिय, लोकप्रिय झाले आहे. प्रथमपुरुषी आत्मनिवेदन, सूक्ष्म निरीक्षणे नोंदवीत, सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणारे अवचटांचे ओघवते लेखन म्हणूनच वाचकांच्या मनाचा ठाव घेणारे आहे.एकूणच महाराष्ट्रीय समाजाच्या उपेक्षित जीवनाचा वेध घेणारे मूर्तिमंत शब्दचित्र उभे करणारे, सामाजिक स्तरावरचे लेखन आणि दुसरीकडे स्वत:विषयी आत्मपर लेखन अशा दोन स्तरांवर अवचट लेखन करताना दिसतात.अनिल अवचट यांच्या लेखनाला समाजशास्त्रीयदृष्ट्या महत्व आहे.रिपोर्टाज शैलीला नवे परिमाण त्यांच्या लेखनशैलीने दिले.तसेच १९७० नंतरच्या गद्यलेखनाला देखील त्यांच्या लेखनाने नवे आयाम प्राप्त करून दिले आहेत.

ओरिगामी, लाकडातील शिल्प-कोरीव काम, फोटोग्राफी, चित्रकला या कलांचा त्यांना छंद आहे. बासरीचा नाद आणि वाचनाचं, भ्रमंतीचं वेड आहे. गर्द या पुस्तकातून अनिल अवचट यांनी ड्रग्जच्या विळख्यात अडकलेल्या तरुणांच्या व्यथा जगासमोर आणल्या. हे पुस्तक लिहितांना आलेले अनुभव आणि त्यानंतर पु. ल. देशपांडे यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे आणि पत्नी अनिता अवचट ह्यांच्या पुढाकाराने ‘मुक्तांगण’ हे व्यसनमुक्ती केंद्र त्यांनी चालू केले. व्यसनाधीन पुरुष, महिला, व्यसनाधीन पुरुषांच्या पत्नींसाठीचे कार्य तसेच विविध गट, कंपन्या, पोलीस दल यांचे जनजागरण यांसारखी अनेक कामे मुक्तांगणतर्फे गेल्या केली जात आहेत.

त्यांची आयोवा विद्यापीठातर्फे आंतरराष्ट्रीय लेखक परिषदेमध्ये (१९८८) भारतातर्फे निवड झालेली आहे. याशिवाय त्यांना इतरही अनेक पुरस्कार लाभले आहेत ; त्यामध्ये फाय फाउंडेशन पुरस्कार , अनंत भालेराव स्मृती पुरस्कार, लाभसेटवार पुरस्कार, शंकरराव किर्लोस्कर पुरस्कार, न्या.रामशास्त्री प्रभुणे प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा सामाजिक न्याय पुरस्कार (२००७). महाराष्ट्र शासन राज्य पुरस्कार ( २००८,सृष्टीत गोष्टीत),साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार (२०१०,सृष्टीत गोष्टीत ), महाराष्ट्र फाउंडेशन साहित्य जीवन गौरव पुरस्कार (२०१७), इत्यादी पुरस्कारांचा समावेश आहे. व्यसनमुक्ती क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना २६ जून २०१३ रोजी राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते दिल्लीत प्रदान करण्यात आला आहे.

संदर्भ : गणोरकर,प्रभा,टाकळकर उषा आणि सहकारी,संक्षिप्त मराठी वाङमयकोश (१९२०-२००३),मुंबई,२००४.

त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि आदरांजली......

🙏🙏🙏🙏🙏

01/12/2021

ओतूर माझे गाव.....!!!

जुन्नर तालुक्यातलं ओतूर हे माझं गाव. या गावचा आठवडे बाजार प्रसिद्ध आहे. हा गावाचा आठवडे बाजार गावाबरोबरच गावाच्या पंचक्रोशीला आणि गावच्या माणसांना समृद्ध करत आला आहे.
प्रत्येक गावात आठवडे बाजार असतोच. माझ्या गावी, ओतूर मध्ये तो दर गुरूवारी भरतो. ओतूर हे पुणे जिल्ह्याच्या उत्तर टोकाला, म्हणजे पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेलं महत्त्वाचं गाव. माझं गाव माळशेज घाटामुळे मुंबईचे प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जातं. आमचं दैवत कपरदिकेश्वर देवस्थान प्रसिद्ध आहे, तसाच दर गुरूवारी भरणारा आठवडे बाजारही प्रसिद्ध आहे.
‘आठवडे बाजार’ हा ग्रामीण अर्थचक्र फिरवणारा महत्त्वाचा घटक आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या चक्रात ‘आठवडे बाजार’ हे रक्तवाहिन्यांप्रमाणे काम करत असतात.

मला कळायला लागल्यापासून म्हणजे ७० च्या दशकापासून बघत आलोय, आमच्या ओतूर या गावी दर गुरूवारी भरणार्‍या या बाजारात ताजी भाजी मिळणारा भाजीपाला बाजार चाकरमान्यांसाठी खूप महत्वाचा होता. त्याला कारणही तसेच होते,तालुक्यातील सर्वात मोठे गाव,एक कॉलेज,दोन हायस्कूल आणि कित्येक मराठी शाळा,शिक्षक वर्ग मोठा. त्यावेळी होळी चौकापासून नगर वेशीपर्यंत भाजी बाजार भरायचा. नगर वेशीच्या पुढे धान्याचा बाजार भरत असे. पांढरी मारुतीमंदिरा पुढे तंबाखूचा बाजार, लिंबाखाली किराणा व्यापारी, मसाल्याचे जिन्नस आणि घरगुती सामानाचा विभाग,खाण्याच्या मिठाईचा एक वेगळाच बाजार भरायचा.त्या बाजारात शेव, रेवडी, पेढे, लाडू, भेळ, बटर
शेव-चिवडा, बेसन लाडू, गरमागरम जिलेबी, पाव, ब्रेड बिस्कीटापासून अनेक खाण्याच्या वस्तु विक्रीला ठेवलेल्या असायच्या.नंतर कपडा बाजार, चप्पल बाजार, बोंबील बाजार.पानसरे आळीच्या टोकाला झाडू,टोपली आणि हारा बाजार, ओतुरच्या या बाजाराला विस्तीर्ण गावरान मॉल म्हटले तरी चालेल. या साऱ्या वस्तु मला माझे लहानपण आठवून देतात. पांगूळगाडा, लाकडी पाट.लाकडी काठवट, दगडी खलबत्ते, पाटे वरवंटे, उखळ, मुसळ,माठ,बैलांची मुसकी, मोहोरकी,वेसण, कासरे, नाडे अशा अनेक शेतकरी उपयोगी वस्तूंची रेलचेल असायची. हे सारं आजही तसंच आहे. मोठ्या शहरातील व्यापारी इथे खरेदी -विक्री करण्यासाठी येत असतात.

ओतूरच्या पंचक्रोशीत येणाऱ्या १५-२० गावातील हजारो शेतकरी या बाजारात नेहमी येत असतं. जुन्नर तालुक्यातील सर्वांत मोठी बाजारपेठ म्हणून ओतूर गाव ओळखलं जातं. बाजाराच्या दिवशी आमचं गाव गर्दीनं फुलून जात असे. सकाळी ७ वाजता सुरू होणारा बाजार संध्याकाळी ७-८ वाजेपर्यंत सुरू असे.बाजारात मोठी उलाढाल होत असे. ग्रामीण भागातील अनेकांचं घर या बाजारावर अवलंबून असत. दैनंदिन जीवनात लागणाऱ्या साऱ्या गोष्टी मिळण्याचं हे एकमेव ठिकाण.

लहानपणी मी आईचं बोट पकडून सकाळी ८ वाजायच्या सुमाराला बाजारात जायचो. तेव्हा तिथे एवढी गडबड असायची, की बोललेलं काहीही समजायचं नाही. पाटी उतरण्यासाठी लागलेली भांडणं, भाव सांगण्यासाठी सोडलेल्या आरोळ्या, सुट्ट्या पैशांवरून चाललेले वादविवाद, वजनकाटा आणि वजनाची आदळआपट, हे सारं बघताना तेव्हा खूप मजा वाटायची.

गावोगावच्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतातल्या हिरव्यागार ताजा भाज्यांनी भाजीबाजार सजलेला दिसायचा. शेतकरी अतिशय ताजा म्हणजे अगदी भल्या पहाटे शेतातून तोडलेला भाजीपाला या बाजारांमध्ये घेऊन येत असत.भेंडी, मुळे, वांगी, गवार, मेथी, शेपू, तांदुळजा, पावटा, चाकवत, घेवडा,घोळू, कुरढू आणि लुसलुशीत हिरवी मिरची, तोंडाला चळ्ळ्कन पाणी सुटणार्‍या भाज्या घेऊन बसलेले बाया बापड्या आणि शेतकरी बघून आनंद वाटत असे. आठवडे बाजारांचा मुख्य फायदा म्हणजे शेतकऱ्यांना खूप ग्राहक मिळायचे आणि ग्राहकाला ताजा, स्वच्छ भाजीपाला कमी दरात उपलब्ध होत असे. या बाजारात फक्त खरेदी-विक्रीच होत नसे, तर आजूबाजूच्या गावातील आपापले सगे सोयरे बाजाराच्या निमित्ताने भेटत असायचे, इथे येणारी मंडळी मित्रत्वाच्या नात्याने थोडा वेळ रमून परस्परांशी गप्पाटप्पा करून बाजाराचा आनंद घ्यायचे. विरंगुळा म्हणूनही बाजारात अनेक जण फेरफटका मारून जायचे.काही लोक संध्याकाळी साधारण अंधार पडायला सुरुवात झाल्यानंतर खरेदीला यायचे,कारण असे की, दिवसभर विक्री करून झाल्यावर भाजीवाल्यांना घरी परतायची घाई झालेली असे. मग येईल त्या किमतीला भाजी विकली जायची. स्वस्तात भाजी मिळाल्याचे सुख ग्राहकाला मिळत असे, आणि वाया जाणार्‍या भाजीला कांहीतरी किमत मिळाल्याचे समाधान शेतकऱ्यांना मिळत असे.

मानवाने शोधून काढलेला जगातील पहिला व्यवसाय शेती हाच आहे.पंचमहाभूतांच्या लक्षावधी वर्षांच्या साठलेल्या ऊर्जा माणसाच्या श्रमांचा स्पर्श होताच गुणाकार करीत फळाला आल्या.एका दाण्यातून शंभर दाणे तयार होण्याचा शेतीतील हा चमत्कार मानवाच्या यशोमार्गाचा पहिला टप्पा आहे.पूर्वी वस्तूच्या बदल्यात वस्तू हेच विनिमयाचे माध्यम होते,वस्तू किंवा सेवा यांची देवघेव सर्वमान्य विनिमय माध्यमाद्वारे होण्यापूर्वी वस्तूंची किंवा सेवांची प्रत्यक्षपणे देवघेव होत असे. दुसरी एखादी वस्तू देऊन मीठ घेणे, श्रमाचा मोबदला धान्याच्या रूपात देणे अशा पद्धतीचे वस्तुविनिमयावर आधारलेले व्यवहार प्रगत मानवजातीस गैरसोयीचे वाटू लागले. नंतर पुढे विनिमायचे माध्यम म्हणून स्वीकारण्यात येणारी सर्वमान्य वस्तू म्हणजे पैसा.विनिमयाचे माध्यम म्हणून पैशाचा प्रामुख्याने उपयोग केला जाऊ लागला. संपत्तीचे हस्तांतर करणे पैशामुळे सोपे झाले. साधारणत: सत्तरीच्या दशकात जन्मलेल्या माझ्या सारख्या लोकाना आज मागे वळून पहाताना खरेच जाणवते की वाह ! वो दिन भी क्या दिन थे. एकुणातच समाजजीवन संथ अन खुप छान घडीदार होते. फारसे तरंग न उठणारे. शांत. नव्वदीच्या जागतिकीकरणामुळे झालेले हे बदल अतिशय झपाट्याने एखादा झंझावात यावा तसे स्निग्धपणे समाजभर पसरले.

आजही अनेक गावांमध्ये आठवडे बाजार भरतो. याच बाजारात आठवड्याची खरेदी आणि आपल्या मालाची विक्री होते. त्यामुळे या बाजाराचं अप्रूप मोठं आहे. एखाद्या गावाच्या विकासात त्या गावाची पार्श्वभूमी, ऐतिहासिक परंपरा, मूलभूत गरजा आदींना जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व आठवडे बाजारालादेखील आहे. बाजार बदलत्या युगाप्रमाणे कात टाकत असून विज्ञान युगाचे वारेही बाजारात घोंघावत आहे. पूर्वी घरातून यादी घेऊन बाजारात येणारी व्यक्ती आता थेट बाजारात येऊन मोबाइलवरून घरी फोन करून यादी घेते. आठवडा बाजारामध्ये एकूण विक्री होणाऱ्या मालापैकी ८० ते ९० टक्के शेतीमाल, तर १० ते २० टक्के माल बिगर कृषी असतो. आपल्या पुढचे रोजचे जेवणाचे ताट ज्याच्या श्रमांतून येते त्या शेतकऱ्याचे विश्व, त्याच्या अडचणी, त्याचे संघर्ष, त्याच्या आशा, त्याच्या निराशा ह्यांची थोडीफार ओळख शहर वासियांना व्हावी हा या लिखाणाचा शुद्ध हेतू कारण‍ शेतकऱ्यांचे ते दु:ख कळण्यासाठी त्यांच्या दु:खाचा अनुभव घेणे आवश्यक असते.

आपल्या आयुष्यातला प्रत्येक दिवस म्हणजे एक प्रकारचा आठवडे बाजारच आहे. सकाळी असणाऱ्या हुरूपाला रात्री आलेल्या मरगळीची झालर आहे. जे काही आयुष्याचं चित्र रंगवायचं आहे, ते मधल्या वेळेतच. म्हणूनच ती गंमत अनुभवण्यासाठी साऱ्यांनी कधीतरी आवर्जून आपल्या आपल्या गावाच्या आठवडे बाजाराला भेट द्यावी.

धन्यवाद......!!!..........................................................................................
बाळशिराम गायकवाड
तळेगांव दाभाडे,पुणे

💐🙏 भावपूर्ण श्रद्धांजली❗🙏💐  'आण्णासाहेब मगर महाविद्यालयाचे' माजी प्राचार्य, आमचे 'गुरुतुल्य मार्गदर्शक' व सहकारी आदरणीय ...
23/11/2021

💐🙏 भावपूर्ण श्रद्धांजली❗🙏💐
'आण्णासाहेब मगर महाविद्यालयाचे' माजी प्राचार्य, आमचे 'गुरुतुल्य मार्गदर्शक' व सहकारी आदरणीय दामोदर भागुजी गाढवे सर दि.२३ नोव्हेंबर २०२१ रोजी वयाच्या ८२ व्या वर्षी यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना❗💐🙏💐

Address

A/P, National Highway 61, Otur, Pune
Otur
412409

Alerts

Be the first to know and let us send you an email when PDEA's Annasaheb Waghire Arts, Commerce & Science College,Otur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to PDEA's Annasaheb Waghire Arts, Commerce & Science College,Otur:

Shortcuts

Share