31/07/2026
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या १३३ शिक्षणक्रमांच्या प्रवेशास १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ*
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील जुलै सत्रासाठी १३ विविध विद्याशाखांमधील १३३ पदवी, पदव्युत्तर पदवी, पदविका व प्रमाणपत्र शिक्षणक्रमांच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेस १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदतवाढ विद्यापीठाच्या बी.एड. व विशेष बी.एड. शिक्षणक्रम वगळता इतर सर्व शिक्षणक्रमांसाठी लागू आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांना नियमित पदवी शिक्षणाबरोबरच दूरस्थ शिक्षणाद्वारे आणखी एक पदवी मिळविण्याची किंवा मुक्त विद्यापीठाच्या दोन पदवी शिक्षणक्रमांना एकाच वेळी प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध आहे.
मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या नियोजनानुसार यंदाही पारंपरिक शिक्षणक्रमांसह अनेक आधुनिक व रोजगाराभिमुख शिक्षणक्रम प्रवेशासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये संगणकशास्त्र, विज्ञान व माहिती तंत्रज्ञान, ड्रोन तंत्रज्ञान, ऑटोमोबाईल तंत्रज्ञान, शिपिंग मॅनेजमेंट, मीडिया ग्राफिक्स, नाट्यशास्त्र, पाली भाषा, सायबर क्राईम तपास, सहकार व्यवस्थापन, डेटा ॲनालिटिक्स, डिजिटल फोटोग्राफी, शेतकरी उत्पादक कंपनी व्यवस्थापन, सौर व पवन ऊर्जा, कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा व एथिकल हॅकिंग, क्लाउड कॉम्प्युटिंग, भारतीय ज्ञान प्रणाली, मूल्य शिक्षण, योगशिक्षक आदी शिक्षणक्रमांचा समावेश आहे.
मुक्त विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण पद्धतीमुळे नोकरी किंवा व्यवसाय करणारे, गृहिणी तसेच नियमित महाविद्यालयात शिक्षण घेणे शक्य नसलेल्या विद्यार्थ्यांना घरबसल्या, आपल्या सोयीनुसार शिक्षण पूर्ण करण्याची संधी उपलब्ध आहे.
प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करावा किंवा जवळच्या अभ्यासकेंद्राशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी हेल्पलाइन क्रमांक (०२५३) २२३०५८०, २२३१७१५, २२३०१०६, २२३०७१४ तसेच ९३०७५७९८७४, ९३०७५६७१८२, ९२०७०४६७२५ या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन प्रभारी कुलसचिव तथा वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे व विद्यार्थी सेवा विभागाचे संचालक डॉ. प्रकाश देशमुख यांनी केले आहे. *Email - [email protected]*
विद्यापीठामध्ये निरंतर शिक्षण, मानव्यविद्या व सामाजिकशास्त्रे, विज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन, कृषिविज्ञान, शिक्षणशास्त्र, आरोग्य विज्ञान, स्कूल ऑफ डिजिटल एज्युकेशन, संगणकशास्त्र, महाज्ञानदीप, ग्रामीण विकास व उद्योजकता, ललित कला केंद्र तसेच व्यावसायिक शिक्षण व कौशल्य विकास या १३ विद्याशाखांमधील एकूण १३३ शिक्षणक्रम प्रवेशासाठी उपलब्ध आहेत.