Global Teachers' Training Institute

Global Teachers' Training Institute

Share

Institute goals on Grooming Knowledgeable, Confident & Dynamic Personality Teacher.

16/10/2025

"कठोर गुरू तुमचा मार्ग सोपा करत नाहीत, पण तुम्हाला इतके सक्षम बनवतात; की कोणताही मार्ग कठीण वाटत नाही."

२६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी सात वाजता राजदूत मोटारसायकलवर एक ८० वर्षाचा अतिशय उत्साही तरुण आमच्या शाळेत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्या दाम्पत्याने वयाची केवळ पंचाहत्तरी ओलांडली होती. ते दाम्पत्य म्हणजे माझे आयुष्यातील प्रथम क्रीडाशिक्षक आदरणीय श्री. रघुनाथ चव्हाण सर.
त्यांना पाहताच माझ्या मनात पूर्वस्मृती तरळू लागल्या.
आमची शाळा खेळास अत्यंत जास्त प्राधान्य देणारी नाशिक जिल्ह्यातील एक नामवंत व नावाजलेली शाळा होती. खेळात दरवर्षी धावणे ते धनुर्विद्यापर्यंत
अशा विविध खेळात राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदक घेऊन येणारे विद्यार्थी या शाळेने घडविले आहेत. भाऊसाहेबनगर म्हणजे निफाड साखर कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांची वस्ती. हे म्हणजे न धड गाव होते ना शहर ! तिथल्या स्वर्गीय सुंदर शाळेच्या सुंदर शाळेत विद्यार्थांना घडविणारे शिक्षक व शिक्षकांना महात्वाकांक्षी बनविणारे मुख्याध्यापक म्हणजे आदरणीय श्री. करंडे सर. अतिशय मेहनती, कडक शिस्तीचे अथक कष्ट करणारे.
मी या शाळेत पाचवीत प्रवेश घेतला आणि आदरणीय श्री चव्हाण सरांचे खोखो खेळासाठी शिष्यत्व स्वीकारले. सरांनी सुरुवातीला भारतीय खेळ परंपरांची माहिती देऊन खोखो खेळाची प्रत्यक्ष मैदानावर सर्व माहिती देऊन आमच्या प्रशिक्षणाला सुरुवात केली. खो-खो हा खेळ शारीरिक तंदुरुस्ती, निर्णय क्षमता, सांघिक वृत्ती, चपळता, आणि रणनीती यांचे सुंदर मिश्रण आहे.
माझे वडील महाराष्ट्रातील नावाजलेले गायक व आमच्याच शाळेत संगीत शिक्षक असल्यामुळे आमच्या घरात संगीताचा रियाज दररोज सायंकाळी चालत असे.
मी आता दररोज खेळायला जाणार अशी घोषणा केल्यामुळे तशी त्यांच्या चेहर्‍यावरील रेघही हलली नाही. मला कोणी गांभीर्याने घेतले नाही. आमचे क्रीडाशिक्षक श्री चव्हाण सरांनी मात्र दुसऱ्या दिवशी निवडलेल्या सर्व नवखेळाडूंना क्रीडा साहित्य खोलीत बोलावून खेळासाठी आमच्या मापाचे दोन दोन टी शर्ट्स व शाॅर्टस निवडून घ्यायला सांगितले. नवीन कपडे मिळाल्यामुळे आमचा आनंद गगनात मावेना.
माझी आई फार सुज्ञ आहे. ती मला काही बोलली नाही. फक्त संध्याकाळी सातच्या आत घरी येत जा, नाहीतर कंबरडं मोडीन एवढंच बोलली. मी मात्र तेवढंही न ऐकल्यासारखं केलं. मी आनंदात मग्नच होते. खेळायला जाण्याच्या आनंदापुढे आईच्या धमकीला घाबरणारी मुलगी मी नव्हतेच मुळी !
दुसऱ्या दिवशी मी खेळाचा गणवेश घालून ग्राऊंडवर गेले आणि आमच्या खोखो च्या रीतसर प्रशिक्षणाला सुरुवात झाली. सर अत्यंत दूरदृष्टी असलेले निष्णात क्रीडाशिक्षक होते. सर कडक शिस्तीचे होते. खेळात कुशाग्र बुद्धीचा सजगतेचा वापर कसा करायचा याबद्दल ते खेळाडूंना सतत मार्गदर्शन करायचे. सरांना बेशिस्त, ग्राऊंडवर उशीरा येणं, स्पोर्ट्स युनिफॉर्म न घालता ग्राऊंडवर येणं, दांड्या मारणं, गप्पा मारणं वगैरे अजिबात चालायचे नाही. आम्ही सरांना आदरयुक्त घाबरायचो. सर विद्यार्थांवर मनापासून प्रेम करायचे. स्वतः सर्वांच्या आधी ग्राऊंडवर यायचे आणि सगळ्यात शेवटी जायचे. सरांनी शेकडो विद्यार्थी खेळाडू म्हणून घडविले. विद्यार्थांचे मनोबल वाढविण्यात सरांना नेहमीच यश यायचे. दोन वर्षाच्या प्रॅक्टीसनंतर आमचा संघ इतका उत्कृष्ट तयार झाला, की हरणे आम्हास माहितीच नव्हते. स्पर्धेवेळी सरांची दोन रुपे आम्हाला पहायला मिळायची. एक म्हणजे अतिशय स्ट्रीक्ट कोच आणि दुसरे म्हणजे अगदी आईसारखे प्रेमळ मातृहृदयी सर. आम्हास स्पर्धेच्या निमित्ताने विविध गावी सर घेऊन जायचे. आमच्यासाठी लागणारी औषधे वगेरे महत्वाच्या गोष्टी सर सोबत ठेवायचे.
खेड्यात कुठल्या तरी शाळेत झोपायला लागायचे. कधी बसचा, कधी ट्रेनचा प्रवास. हाॅटेल वगैरे अशा काही सुविधा त्यावेळी नसायच्या. आमचा गेम सांघिक असल्यामुळे आम्हा मुलींच्या टिमचे एकत्र जेवण, एकत्र प्रवास, एकत्र झोपणे , एकत्र राहणे त्यातून आमचे राग, लोभ, रुसवे, फुगवे , आजारपण, आळशीपण, घरापासून दूर आल्यानंतर हट्टीपणा, आई वडीलांच्या आठवणीने व्याकुळ मुली असं सगळं सरांनी झेललं आहे. आमचं खऱ्या अर्थाने संगोपन सरांनी केलंय. सर म्हणजे आमचे गुरु, त्राता, माऊली, सखा सगळं काही सरच. मी तर माझ्या मनातील प्रत्येक विचार सरांशी बोलायचे. मला सर अगदी माझ्या आजोबांसारखे वाटायचे. सर आमची इतकी काळजी घ्यायचे की क्वचितच कोणी शिक्षक अशी काळजी घेतील.
विशेष म्हणजे एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे; ती म्हणजे आमच्यासोबत सरांव्यतिरिक्त स्रीशिक्षिका कधीही स्पर्धेच्या वेळी सोबत आलेली मला आठवत नाही. सरांनी कमावलेला पालकांचा, शाळा व्यवस्थापनाचा, विद्यार्थीनींचा विश्वास हा शब्दातीत आहे. आज सख्ख्या नातेवाईकांसोबत सुद्धा कधी मुलींना एकटे पाठवत नाही. त्याकाळात जेव्हा फोन उपलब्ध नव्हते, संपर्काचे सहज मार्ग उपलब्ध नव्हते, अशा काळात सर वीस तीस मुलींचे खो-खोचे दोन दोन संघ घेऊन लांब लांब प्रवास करायचे. स्पर्धांमुळे आम्ही वयाच्या बारा ते पंधरा वयोगटात अवघा महाराष्ट्र पाहिला होता. तोही आईवडीलांशिवाय आणि शाळेच्या पैशातून. आमच्या शाळेस सुवर्ण दिवस दाखवणारे आमचे कडक शिस्तीचे चव्हाण सर त्यावेळीही आम्हास अतिशय प्रिय होते.
मला सरांनी एकदा अतिशय उत्तम संधी मिळवून दिली. ठाणे येथे नॅशनल ॲथलेटीक्स गेम्स चॅम्पियनशीप स्पर्धेत सर आम्हास घेऊन गेले होते. मला सरांनी विचारले, 'आठशे मीटरमध्ये धावशील का ?' मी हो म्हटले. सरांनी वैयक्तिक आठशे मीटर व रिलेमध्ये माझे नाव घातले. मला आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव मिळवून दिला. मी दादोजी कोंडदेव मैदानावर शायनी विल्सन आणि पी. टी. उषासोबत एकाच टीममध्ये, एकाच गेममध्ये धावली, राष्ट्रीय स्तरावर धावपटू म्हणून जिल्ह्यात नाव कमावले ते चव्हाण सरांमुळेच. खोखोची राष्ट्रीय खेळाडू झाले ते चव्हाण सरांमुळेच. अतिशय आनंदी बालपण मिळाले. शरीर निकोप, सुदृढ व काटक बनवून आयुष्यभराची शिदोरी दिली ती चव्हाण सरांनीच. आपण जेव्हा घडत असतो, तेव्हा आपण लहान असतो. आपल्याला विद्यार्थीदशेत भविष्याबद्दल फार काही कळत नसते. आपले शिक्षकच आपल्या भल्याबुऱ्याचा विचार करुन आपल्याबाबत निर्णय घेतात. अर्थात असे शिक्षक दुर्लभ असतात. 'दुर्लभ असतो तो असा शिक्षक, जो केवळ ज्ञान देतो असे नव्हे तर जीवन घडवतो.'

मी आठवीत असताना एकदा सोलापूर शहरात राज्यस्तरीय स्पर्धा होत्या. 'सोलापूर माझे आजोळ आहे. मी सरांकडे हट्ट केला, की मला मामाला भेटायला जायचे आहे.' मी शांत असले तरी फार हट्टी होते. सर एक दिवस माझ्याशी काहीच बोलले नाही. मी आजारी पडल्यामुळे मी टीममध्ये खेळत नव्हते. मला राखीव खेळाडू म्हणून ठेवले होते. मला फार दुःख झाले, तरी मी माझा हेका सोडायला तयार नव्हते. मग सरांनी मला समोर बसवले व मला त्यांनी काही गोष्टी सांगितल्या त्या मी आजतागायत विसरले नाही. सर म्हणाले, ''इथं आपण नॅशनल्स खेळायला आलोय. नॅशनल्सला पोहचण्याआधी आपण कुठेकुठे खेळलो, कशी कशी मेहनत करुन किती किती स्पर्धा जिंकलो आणि या स्तरावर पोहचण्यासाठी कित्येक महिनोनमहिने मेहनत करत आहोत. तू अतिशय प्रतिष्ठित घराण्यात जन्माला आलीस, तुझे वडील नामवंत कलाकार आहेत. तू अभ्यासात हुशार आहेस. तू खेळाडू झाली नाहीस, तरी तुला उदरनिर्वाहाचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. तू अभ्यासात हुशार आहेस. तुला उत्तम नोकरी मिळू शकेल. खो-खो हा सांघिक खेळ आहे. यात सगळे खेळाडू तेवढेच तरबेज लागतात. सगळ्यांना एकजुटीने खेळावे लागते. एकानेही मनाने खचून चालत नाही. एकमेकांना जिंकवून देण्यासाठी जिगरबाज होऊन खेळावे लागते. आधी खेळ पूर्ण करायचा मग बाकीचे लाड. आज आपण हारलो तर तुला काहीच फरक पडणार नाही, पण बाकीच्या मुलींना खूप फरक पडेल. त्यांचे वडील कामगार आहेत. त्यांना खेळाच्या या राज्यस्तरीय सर्टिफिकेटचे फार फार महत्त्व आहे. या सर्टिफिकेटवर त्यांना नोकरी मिळेल. त्यांचे आयुष्य मार्गी लागेल. तू आता तेरा वर्षांची आहेस. तुला चूक बरोबर सगळे कळते. शहाणी हो. शहाण्यासारखं वाग. संघात एकमेकांसाठी खेळायचं असतं. जे करायचं ते एकमेकांसाठी करायचं. मैत्रीखातर, आपल्या शाळेखातर करायचं. त्यामुळे आता अंगातून हा मुडीपणा काढून टाक. परत परत अशी संधी मिळत नसते. तुझ्यात हा खेळ जिंकून देण्याची ताकद आहे. जो काही उत्तम खेळ दाखवायचाय तो तुलाच दाखवायचाय.' एवढं बोलून सर पुन्हा मौनात गेले. मी मात्र एकदम खाडकन जागी झाले, सजग झाले आणि माझ्यातले आजारपण पळून गेले. आम्ही उत्तम खेळलो आणि जिंकलोसुद्धा. त्या दिवशी मला कळले सर आमच्या भवितव्याचाही किती विचार करायचे. आज असे शिक्षक दुर्लभ आहेत.
सर फार म्हणजे फार कुटुंबवत्सल आहेत. फार मृदुभाषी आहेत. संत माऊलीप्रमाणे त्यांचे हृदय मातृत्वाने व्यापलेले आहे. सरांना मी त्यांच्या थोरल्या मुलीच्या लग्नात ढसाढसा रडताना पाहिलेले आहे. तर आमच्या शाळेच्या सहलीत आमच्या सोबत मनसोक्त गाणी गाताना ऐकले आहे.
सर हिंदी कविता, हिंदी गाणी भरपूर गायचे. सगळं त्यांचं तोंडपाठ असायचं. मला फार आश्चर्य वाटायचं की सरांचं हिंदी एवढं उत्कृष्ट कसं ? मला दहावीत गेल्यावर कळलं की सरांची आपल्या शाळेत क्रीडाशिक्षक म्हणून नियुक्ती असली तरी हिंदीचेही ते उत्कृष्ट शिक्षक आहेत. हे कळल्यावर मला फार फार भरुन आले होते, कारण तुम्हीच विचार करा, की आज शिक्षकास स्वतःचा विषय सोडून काही शिकवायला लावले तर अजिबात तयारी नसते. कारण ते कोणत्याच विषयात पारंगत नसतात. ज्या विषयाची पदवी असते, त्या विषयाचेही परिपूर्ण ज्ञान आजच्या शिक्षकांना नसते. असो. मला त्याविषयी इथे बोलायचे नाही; पण आम्हास लाभलेले उत्कृष्ट शिक्षक आठवले की आजच्या परिस्थितीबद्दल काळजी वाटते एवढंच.
श्री. रघुनाथ चव्हाण सर तथा तात्या यांना त्यांच्या नोकरीत अनेक उत्तमोत्तम पुरस्कारांनी सन्मानित केले गेले. अत्यंत महत्वाचा पुरस्कार म्हणजे महाराष्ट्र राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार, 'क्रीडामहर्षी ' पुरस्कार. सरांनी शालेय विद्यार्थ्यांच्या हृदयात जे अढळपद, आदर आणि असीम प्रेम प्राप्त केले ते आजतागायतही म्हणजे गेली चाळीस-पन्नास वर्षांत कमी झालेले नाही. आजही भाऊसाहेबनगर येथील त्या काळात शिकलेल्या विद्याभवनच्या विद्यार्थ्यांशी बोलले तर सर्वांच्या मनात सरांबद्दल भरभरून आठवणी जाग्या होतील.

लक्ष्मीमंगेश,
( विजयालक्ष्मी मणेरीकर. )
नाशिक, मो. ९८२२६८३७९९

देवाचिये द्वारी उभा क्षणभरी | Devachiye Dwari | Sant Dnyaneshwar | Suresh Wadkar |Cover|LaxmiMangesh 09/08/2024

https://youtu.be/9ug_CNMzFlA?feature=shared देवाचीये द्वारी उभा क्षणभरी....हरीपाठातील हा सुंदर अभंग जरूर ऐका व आपला लाईक द्या. कमेंट लिहा आणि ही लिंक इतरांना शेअर करा.

देवाचिये द्वारी उभा क्षणभरी | Devachiye Dwari | Sant Dnyaneshwar | Suresh Wadkar |Cover|LaxmiMangesh देवाचिये द्वारी उभा क्षणभरीदेवाचे दर्शन घेतल्यानंतर काही क्षण मंदिरात बसावे, चिंतन, मनन, ध्यान करावे देवाचे नामस...

28/03/2024

स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट निमित्ताने…

'विनायक दामोदर सावरकर' हा चित्रपट पाहिला आणि विस्मृतीत गेलेल्या भावना जागृत झाल्या. आजच्या परिस्थितीत सावरकरांवर चित्रपट बनवणं ही तशी काही फार सुखासुखी गोष्ट नाही. आज समाजात सावरकरांबद्दल जी टोकाची मतं सर्रास पसरवून काही राजकारणी सामान्य जनतेला चिथवण्याचं , दिशाभूल करण्याचं काम करत आहेत. ते पहाताना संताप होतो पण आपण काहीच करु शकत नाही. ही हतबलता निराशा आणतेच.

'सावरकर' चित्रपट पाहताना निरपेक्ष म्हणजे पूर्वग्रह काहीही न ठेवता गेले होते. कारण एका अमराठी नटाने हा चित्रपट केलाय त्यामुळे त्याच्या लेखी सावरकरांचे योगदान नक्की काय असावे. त्याच्या हृदयाच्या कोणत्या तरी कप्प्यात सावरकर वसले असावेत का ? असे प्रश्न माझ्या मनात होते. आणि चित्रपट पाहिल्यावर वाटले
की एका अमराठी माणसाच्या मनास सावरकर इतके सखोल कळू शकतात तर महाराष्ट्रातील घराघरात त्यांची पुजाच व्हायला हवी.

सिनेमा म्हटल्यावर बहुदा मनोरंजन हे प्रथम प्राधान्य असते मग तो चरित्रात्मक (बायोपिक) असला तरी ! आपल्याकडे फार उदाहरणे आहेत . परंतु 'सावरकर' या चित्रपटात ' सत्य(रियलिस्टीक) राजकीय व क्रांतीकारी घटनाक्रम' या एकमेव संकल्पनेतून सावरकरांची कथा दर्शविण्यात आली आहे. सावरकराना चित्रपटाच्या तीन तासात बांधता येणे केवळ अशक्य. ते जितके जहाल मतवादी होते तितकेच संवेदनशील लिहिणारे हळुवार मनाचे कवी होते. देशभक्तीपायी स्वातंत्र्याचा ध्यास घेऊन वैयक्तिक सुखास तिलांजली देत पती व पिता म्हणून अपयशी ठरल्याचे शल्य व त्यांच्या वेदना त्यांनी लिखाणातून मांडल्या आहेत.

एखादा असा तेजस्वी, बुध्दीमान, चतुर, धैर्यशील वीर जन्मालाच यावा लागतो. स्वातंत्र्याची धग संपूर्ण हिंदुस्थानात पोहोचविण्याचे बळ एका वीराच्या हाती असू शकते हे स्वातंत्र्य वीरांविषयी व त्यांचे चरित्र पाहिल्यावर पटते. दुःख वाटते की स्वातंत्र्यानंतरच्या काळातले फुकटात स्वातंत्र्याचा उपभोग घेणाऱ्या ऐदीना क्रांतीचे महत्व पटवून द्यावे लागते. एखादी गोष्ट फुकट मिळाली की तिची किंमत कोण ठेवतो ?

प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीचे स्वतंत्र अर्थ काढून स्वतंत्र आयुष्य जगण्याची मुभा मिळाली ती देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच. त्याआधी श्वास सुद्धा गुलामगिरीतच होते याची अनुभूती स्वातंत्र्य काळानंतर जन्मलेल्यांना कशी येणार ? कोणीही आपापल्या कल्पनांप्रमाणे (स्वकर्तृत्व शून्य असतानाही लोक बाष्कळ चर्चा करण्याचे कर्म दररोज नित्याने करतातच की !) इतिहासाची मांडणी करायला आपण आता स्वतंत्र आहोत अशा फुशारकीत तावातावात मत प्रदर्शन करत सुटतात. इतिहासाचा अभ्यास न करणारी मंडळी इतिहासकारांनी जे लिहिलेले आहे ते वाचून, नाटककारांनी केलेले चिंतन पाहून ते समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात. विचारांची स्वतंत्र मांडणी करता येईल अशी परिस्थिती समाजात नसते तेव्हा जीवांचे काय होत असावे याची कल्पना निदान संवेदनशील लोकांनी तरी करावी.

काळ बदलत राहतो काळाच्या बदलण्यानुसार लोकांचे राहणीमान, खानपान, चालीरीती वगैरे बदलतात. काळासोबत विचारही बदलत असावेत. ऐतिहासिक चित्रपटांच्या बाबतीत लक्षात येते काही कलाकृती भव्य असतात, भडक असतात. एक धागा घेऊन त्याभोवती संपूर्ण चित्रपट फिरत असतो. काही मनोरंजनात्मक असतात, काही दुःखी असतात आणि काही मनाला सुन्न करून सोडणाऱ्या असतात. आणि अशा मनाला सुन्न करून सोडणाऱ्या चित्रपट कलाकृतीमध्ये पूर्णवेळ काहीतरी बोचत राहतं, नेमकं काय बोचत राहतं ? हे लगेच सापडणं तसं कठीण वाटतं. खूपदा आपण वरवर पन्नास मुद्दे सांगू शकतो की चित्रपटात हे बरं नव्हतं ते चांगलं नव्हतं आणि हे सांगताना चित्रपटात नेमकं काय आहे हेच आपण विसरतो. असा हा मनास सुन्न करुन सोडणारा चित्रपट आहे.

आपल्या आयुष्यात काहीही चांगले घडले की आपण पूर्व संचिताच्या गोष्टी बोलतो. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे नेमके कोणते पूर्व संचित घेऊन जन्मास आले असावेत ? त्यांच्या जाणत्या वयापासून स्वातंत्र्य देवीच्या व्रताचे गारुड त्यांच्या मनास वेढून होते, त्यातच ते संपूर्ण आयुष्य होरपळत जगले आणि शेवटी पदरी काय आले ते सर्वश्रुत आहेच !

वीर सावरकर हा रणदीप हुडा या तरुण दिग्दर्शक, अभिनेता, निर्मात्याने बनवलेला हिंदी चित्रपट बघताना सावरकरांबद्दलच्या विचारांनी पुन्हा एकदा मनात कल्लोळ केला. या चित्रपटाचं वैशिष्ट्य हे की यात लेखक व दिग्दर्शकाने स्वतःची मते, विचार प्रेक्षकांवर थोपवली नाहीत. त्यांनी प्रश्न निर्माण केलेत. या चित्रपटात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आयुष्यातील केवळ महत्त्वाच्या घटना मांडल्या आहेत. यातील संवाद अतीसंवेदनशील भाषेने हृदय पिळवटून टाकणारे नाहीत की वेदनेची ओल ल्यालेल्या शब्दांचा भडीमार नाही, किंवा भडक डायलॉगच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भावनांचा उद्रेक होणे असेही काही नाही. तर केवळ जशा घटना प्रत्यक्षात घडल्या असव्यात तशाच दाखवल्या आहेत. पार्श्वसंगीतही मनाला हृदयाला पिळवटून त्या घटनेची भावनात्मकत उंची वाढविणारे नाही. त्यामुळे चित्रपट बघताना सत्य जाणण्याच्या लालसेने आपण स्तब्ध होऊन घटनाक्रमावर संपूर्ण लक्ष केंद्रित करतो.

चाफेकर बंधूंना फाशी दिल्याचे वृत्त समजताच लहानग्या सावरकरांनी आपले कुलदैवत भगवती पुढे देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून 'मारिता मारिता मरेतो झुंजेन' अशी शपथ घेतली होती. आणि आयुष्यभर ती पाळली.
स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे क्रांतिकारक, राजकारणी, वकील, कवी, लेखक, हिंदुतत्वज्ञ, भाषाशुद्धीचे आग्रही, लिपीशुद्धीचे प्रणेते असे बहू आयामी व्यक्तिमत्त्व. त्यांच्याबद्दल जास्तीत जास्त जाणून घेऊन त्यांच्यातील कणभर तरी गुण आपल्याला आपल्या अंगी बाणवता येईल का याचा विचार करत आपण त्यांचे भक्त होतो.

"या देशाची पवित्र माती
येथे वीर वर जन्मा येती”

असे शांताबाईंनी एका कवितेत कधीकाळी लिहिले होते. आता या पवित्र मातीत भेसळ झालीय का ? असो.

या चित्रपटातील अतिशय महत्वाची बाजू म्हणजे
सावरकरांचे हिंदुत्व विषयी असलेले विचार अतिशय स्पष्टपणे सगळ्यांना समजेल अशा शब्दात दिग्दर्शकाने मांडले आहेत. या चित्रपटाच्या अनेक बाजू उत्तम आहेत‌ पुराव्यासहित सत्य घटनाक्रम दाखवणे, अभिनयाचा बडेजाव न आणता सत्यास प्रमाण मानून सर्वच कलाकारांचा अतिशय संयमित अभिनय, चित्रपटाचा बॅकग्राऊंड कलर, चित्रपटातील प्रसंगानुरूप घेतलेली स्थळे अनेक घटनांचे वर्तमान पत्रात त्याकाळी छापलेले मथळे (हेडलाईन्स) हे इतिहासाची खरी साक्ष देतात. चित्रपट बिलकुल सुचवत नाही की तुम्ही दुःखी होऊन वेदनेने तळमळून रडा, उलट चित्रपट हेच दाखवतो की विचार करा, देश स्वतंत्र व्हावा यासाठी मरणप्राय यातना भोगणारा माणूस भेकड असू शकतो का ? सारासार विचार जनतेने करावा हेच यातून सुचित केले आहे.

अखंड भारत, हिंदू महासभा, अभिनव भारत चे निर्मितीकार, हरिजन म्हणजे आपण सगळेच 'हरिचे जन' असे गांधीजींना ठणकावून सांगणारे सावरकर, "Quite India" नव्हे तर "स्प्लिट इंडिया" चा खल रचला जातोय हे ओळखणारे सावरकर. हिंदुत्व आणि सनातन धर्म ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे स्पष्ट करणारे सावरकर यात आपण जाणतो..

"गांव गांव में बम बनाने की फॅक्टरी होनी चाहिये, अगर हमने ये करके दिखाया तो १९१२ तक हम इन अंग्रेजों को मार मार कर भगा देंगे,या इनको मारते मारते मर जायेंगे. शायद यही क्रांती है....." गुलामगिरीतून सुटण्यासाठी अशीच परिस्थिती होती. नाहीतर भगतसिंग, मदनलाल धींग्रा, कान्हेरे असे वीर फासावर का गेले असते ?

"अपने घर मे आग लगाने पडेगी तो हजारो लाखो घरों में स्वातंत्र्य का दीप जलायेंगे" असे बोलणारे सावरकर अखेरपर्यंत तसेच आयुष्य जगतात आणि स्वातंत्र्याची ज्वाला मनामनात शिलगत ठेवतात.

पहिली बार किसी को दो उमर कैद की सजा दी है | उपर वालों ने एकही जिंदगी दी थी, जज साहब ने दो दी | इति सावरकर.

सावरकर हिंदुत्व या संकल्पनेचे प्रणेते होते. सर्वसमावेशक हिंदुत्व त्यांनी मांडले होते.

आ सिंधू सिंधू पर्यंता, यस्थ भारत भूमिका | पितृभू : पुण्य भुशवैवस वै हिंदुरीती स्मृत : ||

सिंधू नदी से सागर तक विशाल भारत भूमी मे जो इसको अपनी पीतृभूमी माने और अपनी पूर्वजों की जमीन मातृभूमी याने अपनी संस्कृती, भाषा, खानपान, त्योहारों को अपना माने वह हिंदू है. सिंधू से सिंधू तक किसी को भी शेक्सपियर और रवींद्रनाथ टागोर की क़िताब दोगे तो हर हिंदुस्तानी बोलेगा 'रवींद्रनाथ टागोर' की क़िताब हमारी है. यह भूमी जिसकी पुण्यभूमी होगी वह हिंदू है. बुद्धिस्ट हिंदू है, जैन हिंदू है, मुसलमान - अगर वो भी इस भारत भूमी पे किसी दर्गा या मस्जिद को अपनी पुण्यभूमी माने तो वो हिंदू क्यूं नही ? हिंदुत्व एक राजनैतिक, भौगोलिक, सांस्कृतिक इतिहास है.

हा चित्रपट पाहिल्यावर रणदीप हुडा यांची मुलाखत माझा कट्ट्यावर पाहिली व जे मला जाणवले ते असे की हा दिग्दर्शक अभिनेता स्पष्टवक्ता आहे. केवळ नशिबाने सावरकर चित्रपटासाठी तो निवडण्यात आला होता असे बिनदिक्कतपणे सांगतो. हा केवळ एक भाग्ययोग आहे असे कबुल करत सांगतो की, माझा या आधी 'सावरकर' या व्यक्तिमत्त्वाविषयीचा फार जास्त अभ्यास नव्हता, परंतु जेव्हा मी त्यांच्याबद्दल वाचायला सुरुवात केली, विविध माध्यमातून त्यांना जाणून घ्यायला सुरुवात केली तेव्हा मी आतून बाहेरून खाडकन जागा झालो, आणि मीच सावरकर झालो. जगात त्यांच्याबद्दल बोलल्या जाणाऱ्या गोष्टी किती खोट्या आहेत याची उकल माझ्या मनात होत गेली. ( त्याने असं सांगणं हे विशेष आहे कारण तो हरियाणवी आहे महाराष्ट्रीयन नाही. )

एका चित्रपटातून मांडता येईल इतकी छोटी 'सावरकर' ही व्यक्तिरेखा मुळीच नाही. सागरासारखी अथांग आहे, जो व्यक्ती अंदमानच्या एका बंदिस्त खोलीत दहा वर्ष आयुष्य घालवून, दगडाचा कलम बनवून तुरुंगाच्या भिंतीवर महाकाव्य लिहितो, घाण्याचा बैल बनतो, काळ्या पाण्याची शिक्षा भोगतो, फ्रान्सचा समुद्र पोहून किनाऱ्यावर पोहोचतो, मराठी भाषेत नवे शब्द आणून भाषा समृद्ध करतो, सर्वांसाठी पतीत पावन मंदिरे खुली करून सामूहिक भोजनालये सुरू करतो, कजाग ब्रिटीश अधिकाऱ्यांशी बोलून त्यांची मनं परिवर्तन करतो असे अशक्यप्राय ते सगळे करणारा तो माणूस हा कोणी साधा माणूस नव्हेच!

सावरकर म्हणजे स्वातंत्र्यसंग्राम सदैव जागृत रहावा यासाठी संपूर्ण आयुष्य हाल सोसत बुद्धीची, शरीराची, मनाची ससेहोलपट सहन करत स्वतःच्या अस्तित्वाची मशाल तेवत ठेवून आपले कार्य सिद्धीस नेणारा दीव्यात्मा होता. कितीही सैन्य मारले गेले तरी सैन्यास दिशादर्शक असलेला, बल देणारा सेनापती हा वाचवावाच लागतो. अन्यथा सैन्य अर्ध्यात कच खावून माघारी फिरण्याचीच दाट शक्यता असते. अशा क्रांतीची दिशा दर्शवणारया स्वातंत्र्यवीरास त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या पर्वात राजकारणाच्या खेळीचे प्यादे बनून नामुश्की पत्करून जगण्यापेक्षा त्यांनी मौन बाळगून देह त्याग केला आणि १ फेब्रुवारी १९६६ रोजी, अन्न ,पाणी ,औषधाचा त्याग करून २६ फेब्रुवारी १९६६ रोजी त्याचे प्राण पंचतत्वात विलीन झाले. त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांस कोटी कोटी प्रणाम. देशातील समस्त नागरिकांनी हा चित्रपट जरुर पहावा.

- विजयालक्ष्मी मणेरीकर
नाशिक

Photos from Global Teachers' Training Institute's post 27/01/2024
16/01/2024

ग्लोबल टिचर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट व ऍक्टिव्ह मदर्स क्लब
प्रस्तुत

“मकर संक्राती निमित्त स्पर्धा व हळदी कुंकु समारंभ”

नव वर्षाच्या स्वागताचा मकर संक्रांत हा पहिला उत्सव साजरा करण्यासाठी ग्लोबल टिचर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट व ऍक्टिव्ह मदर्स क्लब तर्फे नाशिकच्या मुली व महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन व बक्षिसांची लयलूट.

संस्कार, संस्कृती आणि आधुनिकतेची घालून सांगड, मकर संक्रांत सणाची करू लगबग..
मुली व महिलांच्या अंगभूत असलेल्या गुणांचे सादरीकरण करून स्वतःला सिद्ध करण्याची ही स्पर्धा आहे. आपल्या व्यक्तीमत्वात असलेले छुपे गुण शोधण्याची ही संधी आम्ही तुम्हाला देत आहोत. त्यात वेशभूषा, स्पष्ट वक्तेपणा, स्मरणशक्ती, ज्ञान, बुद्धिमत्ता, स्टेज डेरिंग, आत्मविश्वास हे गुण पारखले जातील. यासाठी पूर्व नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.

• १६ ते ४५ वयोगटातील सर्व मुली व महिलांसाठी स्पर्धा- फॅशन शो-
विविध क्षेत्रातील कर्तुत्वान महिलांचे व्यक्तिमत्व “विजेता मी होणार”
१- विजेता मी होणार
२- हलव्याचे दागिने (हलव्याचे दागिने घरून करून आणून त्याचे प्रदर्शन)

• रील मेकिंग
विषय: १- माझे जीवन ध्येय २- तुमचा आवडता कोणताही विषय

(आपल्याला १ ते ३ मिनिटांचा रील बनवून ८७६७५४१०१५ या नंबर वरती पाठवावा) रील पाठवण्याचा अंतीम दिनांक १८ जानेवारी २०२४ आहे.

काही गमतीशीर उत्स्फूर्त स्पर्धा : (यामध्ये ही सर्वांना हमखास बक्षिसे)

“बक्षिसांची नाही कमी, आनंदाची हमखास हमी !”
रोख पारितोषिके सोबत स्मृतीचिन्ह व सर्टिफिकेट

रोख पारितोषिके सोबत स्मृतीचिन्ह व सर्टिफिकेट

आजच नाव नोंदणी करा... वर्षाचा पहिला सण अविस्मरणीय करा.

रजिस्ट्रेशन फी : १०० /- रु.
कार्यक्रम व स्पर्धा : शनिवार, दि. २० जानेवारी २०२४ रोजी, सायं. ३.०० ते ६.०० वाजता.
स्थळ : ग्लोबल व्हिजन स्कूल, अंबड, नाशिक.

रजिस्ट्रेशन व अधिक माहितीसाठी- माधुरी गोडबोले ८७६७५४१०१५ या मोबाईल नंबर वर फोन करावा.

16/01/2024
12/01/2024

ग्लोबल टिचर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट व ऍक्टिव्ह मदर्स क्लब
प्रस्तुत

“मकर संक्राती निमित्त स्पर्धा व हळदी कुंकु समारंभ”

नव वर्षाच्या स्वागताचा मकर संक्रांत हा पहिला उत्सव साजरा करण्यासाठी ग्लोबल टिचर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट व ऍक्टिव्ह मदर्स क्लब तर्फे नाशिकच्या मुली व महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन व बक्षिसांची लयलूट.

संस्कार, संस्कृती आणि आधुनिकतेची घालून सांगड, मकर संक्रांत सणाची करू लगबग..
मुली व महिलांच्या अंगभूत असलेल्या गुणांचे सादरीकरण करून स्वतःला सिद्ध करण्याची ही स्पर्धा आहे. आपल्या व्यक्तीमत्वात असलेले छुपे गुण शोधण्याची ही संधी आम्ही तुम्हाला देत आहोत. त्यात वेशभूषा, स्पष्ट वक्तेपणा, स्मरणशक्ती, ज्ञान, बुद्धिमत्ता, स्टेज डेरिंग, आत्मविश्वास हे गुण पारखले जातील. यासाठी पूर्व नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.

• १६ ते ४५ वयोगटातील सर्व मुली व महिलांसाठी स्पर्धा- फॅशन शो-
विविध क्षेत्रातील कर्तुत्वान महिलांचे व्यक्तिमत्व “विजेता मी होणार”
१- विजेता मी होणार
२- हलव्याचे दागिने (हलव्याचे दागिने घरून करून आणून त्याचे प्रदर्शन)

• रील मेकिंग
विषय: १- माझे जीवन ध्येय २- तुमचा आवडता कोणताही विषय

(आपल्याला १ ते ३ मिनिटांचा रील बनवून ८७६७५४१०१५ या नंबर वरती पाठवावा) रील पाठवण्याचा अंतीम दिनांक १८ जानेवारी २०२४ आहे.

काही गमतीशीर उत्स्फूर्त स्पर्धा : (यामध्ये ही सर्वांना हमखास बक्षिसे)

“बक्षिसांची नाही कमी, आनंदाची हमखास हमी !”
रोख पारितोषिके सोबत स्मृतीचिन्ह व सर्टिफिकेट

रोख पारितोषिके सोबत स्मृतीचिन्ह व सर्टिफिकेट

आजच नाव नोंदणी करा... वर्षाचा पहिला सण अविस्मरणीय करा.

नावनोंदणी : ११ जानेवारी ते १९ जानेवारी २०२४
रजिस्ट्रेशन फी : १०० /- रु.
कार्यक्रम व स्पर्धा : शनिवार, दि. २० जानेवारी २०२४ रोजी, सायं. ३.०० ते ६.०० वाजता.
स्थळ : ग्लोबल व्हिजन स्कूल, अंबड, नाशिक.

रजिस्ट्रेशन व अधिक माहितीसाठी- माधुरी गोडबोले ८७६७५४१०१५ या मोबाईल नंबर वर फोन करावा.

Want your school to be the top-listed School/college in Nashik?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Address


Gut No. 23/1, Behind Indoline Furniture, Flora Town, Ambad Gaon Road, Ambad, Nashik/10
Nashik
422010

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 4pm