31/05/2026
लाडशाखीय वाणी समाज धर्मदाय शैक्षणिक मंडळ पंढरपूर संचलित शैक्षणिक संकुल, आडगाव येथे “लिटिल मिलेनियम प्री-प्रायमरी स्कूल”चा उत्साहात शुभारंभ
नाशिक : लाडशाखीय वाणी समाज धर्मदाय शैक्षणिक मंडळ, पंढरपूर संचलित शैक्षणिक संकुल, आडगाव, नाशिक येथे “लिटिल मिलेनियम प्री-प्रायमरी स्कूल”चा शुभारंभ शनिवार, दिनांक ३० मे २०१९ रोजी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त श्री अशोक आबा सोनजे यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ शास्त्रज्ञ अविनाशजी शिरोडे तसेच आयटी तज्ञ व रोटरी क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष डॉ. गौरव सामनेरकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री अरुण काशिनाथ शिरोडे होते.
दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात करण्यात आली. संस्थेचे सचिव विलास दत्तात्रय शिरोरे यांनी प्रभावी प्रास्ताविक सादर करत संस्थेच्या आजपर्यंतच्या प्रगतीचा सविस्तर आलेख उपस्थितांसमोर मांडला. त्यांनी सांगितले की, समाजातील दानशूर व्यक्ती, देणगीदार व समाजबांधव यांच्या आर्थिक पाठबळामुळेच आज शैक्षणिक संकुलाचे भव्य कार्य उभे राहू शकले आहे. संस्थेच्या उभारणीपासून आजपर्यंत प्रत्येक टप्प्यावर देणगीदारांनी संस्थेवर विश्वास ठेवून दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी सर्व देणगीदारांचे मनःपूर्वक आभार मानले.
यावेळी बोलताना त्यांनी येत्या १ जुलैपासून लहान मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी अबॅकस, वैदिक मॅथ्स, डान्स, म्युझिक, ड्रॉईंग, रोबोटिक्स आदी विविध हॉबी क्लासेस सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच संस्थेच्या उर्वरित बांधकामाचे काम तातडीने पूर्ण करून त्या ठिकाणी स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, सुसज्ज ग्रंथालय व अभ्यासिका सुरू करण्याचा संस्थेचा मानस असल्याचे सांगितले.
उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन संस्थेला सहकार्य करावे, असे भावनिक आवाहनही त्यांनी केले. त्यांच्या मनोगतामुळे उपस्थित समाजबांधवांमध्ये संस्थेविषयी आत्मीयता व अभिमानाची भावना निर्माण झाली.
“लिटिल मिलेनियम” संस्थेतर्फे मुकुंद कळसकर यांनी प्री-प्रायमरी शिक्षणाचे महत्त्व आणि संस्थेच्या उपक्रमांविषयी सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अशोक आबा सोनजे यांनी आपल्या मनोगतामध्ये संस्थेच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव करत संस्थेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. समाजातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेने सुरू केलेले उपक्रम अत्यंत कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी डॉ. गौरव सामनेरकर तसेच ज्येष्ठ शास्त्रज्ञ अविनाशजी शिरोडे यांनीही आपले मनोगत व्यक्त करत संस्थेच्या नियोजनबद्ध कामकाजाविषयी समाधान व्यक्त केले. आधुनिक शिक्षणपद्धती, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणारे उपक्रम आणि भविष्यातील शैक्षणिक संकल्पना यांचे त्यांनी विशेष कौतुक केले. संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण व उपनगरी भागातील विद्यार्थ्यांना मोठी शैक्षणिक संधी उपलब्ध होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी आर्किटेक्ट संदीप येवला यांनी प्री-प्रायमरी स्कूलचे आकर्षक डिझाईन विनामूल्य तयार करून दिल्याबद्दल त्यांचा सत्कार प्रमुख अतिथी अशोक आबा सोनजे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी श्री आशिष शिनकर, सचिन सोमनाथ बागड, जितेंद्र बळवंत कोठावदे , मनिष दशपुते, कॉन्ट्रॅक्टर निलेश धामणे यांनीही प्री-प्रायमरी स्कूल सुरू करण्यासाठी आपल्या परीने मोलाचे योगदान दिल्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचे विशेष आभार मानण्यात आले. संस्थेच्या शैक्षणिक उपक्रमांना समाजातील विविध स्तरातून मिळत असलेल्या सहकार्यामुळेच हे कार्य अधिक सक्षमपणे उभे राहत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमास संस्थेचे खजिनदार संजय मालपुरे, विश्वस्त रमेश मुसळे, सुरेश मुसळे, हिरालाल बापू शिनकर, विजय शिनकर, पी. टी. नानकर, निंबा अण्णा सोनजे, प्रशांत सोनजे, मनोज कोतकर, विनोद बापू कोठावदे, निलेश मकर, ॲड. राहुल खुटाडे, सुशील बागड, दिलीप आबा पाटकर, रवींद्र शिरोडे (चाळीसगाव), डॉ. जी. पी. वाणी, देवा मुसळे, पी. एस. मुसळे तसेच डॉ. नेहा शिरोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमासाठी शिक्षण समिती सदस्य, शिक्षकवृंद, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे संस्थेचे सर्व विश्वस्त मंडळ आपल्या कुटुंबीयांसह कार्यक्रमास उपस्थित होते. तसेच कोणार्क नगर, अमृतधाम, जत्रा हॉटेल परिसरातील समाजबांधव व नागरिकांनी आपल्या पाल्यांसह मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला.
लहान मुलांसाठी विशेष आकर्षण म्हणून मॅजिक शोचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षल कोठावदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ. जी. पी. वाणी यांनी मानले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण, प्रेरणादायी आणि भविष्यातील गुणवत्तापूर्ण शिक्षणाची दिशा दर्शविणारा ठरला.
23/09/2025
11/09/2025