09/12/2025
“आज मी बाबासाहेबांना भेटलो.”
निमित्त होत ते माझं पुस्तक "Quantum Change- NLP Strategies for Limitless Personal Masery" या पुस्तकासाच्या मा. प्रकाश आंबेडकर साहेबांच्या हस्ते प्रकाशनाचं.
मा. प्रकाश आंबेडकर साहेबांसोबतची appointment २ नोव्हेंबर २०२५ रोजी confirm झाली.
त्या क्षणापासून माझ्या मनात वेगळ्याच भावनांचा भडका पेटला होता. आनंद होता. घरचे, ऑफिसमधले, मित्र-नातेवाईक सगळे खुश होते… पण मी मात्र एका वेगळ्याच जगात होतो.
माझ्या मनात सतत एकच विचार — आमचे बाबा - आमचे मुक्तिदाता- डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
राजगृहात पुस्तकाचं अनावरण… हे भाग्य तर मोठंच, पण माझ्यासाठी सगळ्यात मोठा क्षण एकच — मी त्या घरात पाऊल ठेवणार होतो, जिथे बाबासाहेबांनी आयुष्य घडवलं.
ज्या हवेत त्यांनी श्वास घेतला, ज्या वस्तूंना त्यांनी स्पर्श केला, ते सगळं माझ्या डोळ्यासमोर उभं राहणार होतं…
हे सगळं माझ्यासाठी "अद्भुत" होतं.
आणि आता मी भेटणार होतो त्यांच्या नातवांना — मा. प्रकाश आंबेडकर साहेबांना —
ज्यांच्या रक्तात बाबासाहेबांचं रक्त वाहतं.
घरचे सगळे train reservation कपडे, सामान, अशा तयारीत व्यस्त होते…
आणि मी मात्र शांत.
मनात प्रचंड भावनांचं वादळ. डोळ्यात पाणी यावं असं होत होतं, पण जपून ठेवत होतो. कारण हे सगळं माझ्यासाठी फक्त कार्यक्रम नव्हता…
ही बाबासाहेबांबद्दलची माझी आयुष्यभराची निष्ठा होती.
शेवटी दिवस आला. आम्ही १४ जण निघालो. काही मुंबईत येणार होते.
सामान्य वेळी मी family trip मध्ये गप्पा, हशा करणारा … पण यावेळी मी फक्त शांत. आईने विचारलंही, “काय झालं? शांत का आहेस?” मी हसून टाळलं.
बाहेर पाऊस… Train थोडी उशिरा…
माझा जिवलग मित्र Adv. मनीष रानशूर, ज्याने ही भेट घडवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली, तो सतत phone वर.
सगळे थोडे nervous… पण मी मात्र एका वेगळ्या शांततेत.
राजगृहात पोचलो. गेटवरच मी नतमस्तक झालो. अनेक वेळा गेट आत-बाहेर जात होतो, फक्त प्रत्येक क्षण डोळ्यांत साठवण्यासाठी.
उत्कर्षाताई रुपवते यांनी minute-to-minute मार्गदर्शन केले:
कोण आत येणार, कसं बोलायचं, काय न्यायचं, फोटो-व्हिडीओ कसे…
मनीष माझ्या बाजूला भक्कमपणे उभा.
आता क्षणोक्षणी nervousness वाढत होता.
माझी पत्नी हात धरून माझ्या भावना शांत करत होती. मुलं उत्सुक. आई-वडील अभिमानाच्या शिखरावर. भाऊ, बहीण, सगळे नातेवाईक पहिल्यांदाच असा अनुभव जगत होते — आणि या सगळ्याचं कारण मी होतो.
शेवटी आम्हाला आत बोलावलं. एक क्षण तर माझं हृदय थबकलं. आम्ही पाच जण आत गेलो. मी पहिल्यांदाच मा. प्रकाश आंबेडकर साहेबांसमोर होतो.
त्यांच्या समोर उभा राहिल्यावर माझ्या अंगावर शहारा आला. मी त्यांचा हात हातात घेतला, त्यांचं हसू पाहिलं… आणि माझं जग थांबलं.
त्या क्षणी मला फक्त एकच गोष्ट जाणवली.
मी बाबासाहेबांच्या नातवांसमोर नाही… मी बाबासाहेबांसमोर उभा आहे.
मी स्वतःची ओळख, प्रोफाइल, पुस्तकाबद्दल सांगत होतो…आणि ते पूर्ण लक्ष देऊन ऐकत होते, प्रश्न विचारत होते… आणि मग माझ्यासोबत १६ लोक नाशिक हुन आले आहेत हे कळल्यावर —
जी व्यक्ती सामान्यपणे reserved, protocols पाळणारी — त्यांनी सगळ्यांना आत बोलावलं! सगळ्यांशी बोलले, फोटो काढले… त्यांचा हा relaxed mood सगळ्यांना आश्चर्य वाटणारा. आम्हाला १० मिनिटांचा वेळ होता… पण आम्ही अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ त्यांच्या सान्निध्यात होतो.
बाहेर पडलो तेव्हा माझं मन शांत आणि भारावलेलं होतं.
मनीष आणि उत्कर्षाताई यांच ऋण मी आयुष्यभर विसरणार नाही.
ते दोघं नसते तर ह्या स्मृती कधीच निर्माण झाली नसत्या.
परतीच्या प्रवासात सगळे आपआपले अनुभव शेअर करत होते…आणि मी फक्त हसत होतो. प्रत्येक क्षण पुन्हा पुन्हा मनात जगत होतो.
राजगृह ही ऊर्जा आहे. प्रेरणा आहे. इतिहासाचा स्पंदन आहे.
जिथून पिढ्यानपिढ्या प्रेरणा घेत आहेत — आणि पुढेही घेत राहतील.
आणि माझ्यासाठी? हा माझ्या आयुष्याचा शिखर क्षण आहे. आयुष्यभर जपत राहीन असा.
मनात फक्त एकच वाक्य घुमत होतं — “आज मी बाबासाहेबांना भेटलो.”