Swapnil Jadhav

Swapnil Jadhav

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Swapnil Jadhav, Nashik.

08/09/2021

जे शिकतो त्याचे आचरण करण्याची हिंमत...

शालेय पुस्तके बघितली तर एक लक्षात येतं की सध्याची वैचारिक परिस्थिती आणि भविष्यातील पिढी याचा पूर्ण विचार करून अभ्यासक्रम तयार केलेला आहे☺️. त्यामध्ये आवर्जून सांगण्यासारखे दोन मुद्दे आहेत.

१) पहिली ते चौथी या इयत्तासाठी भाषा विषय आणि अंकगणित या विषयांवर भर दिलाय. त्यानंतरच्या इयत्तांसाठी उर्वरित विषयांचा क्रमाक्रमाने समावेश केला आहे.
२) प्रत्येक पुस्तकाच्या सुरुवातीला प्रतिज्ञेबरोबरच मुलभूत कर्तव्ये यांचा समावेश केला आहे.

मुलांच्या शिक्षणातील प्रधान्याचा विचार केला तर पहिल्यांदा नैतिक शिक्षण, त्यानंतर भाषा व अंकगणित शिक्षण, त्यानंतर सामाजिक शास्त्रे व विज्ञान हे विषय आणि शेवटी उच्चशिक्षण असा क्रम राहिला तर ते शिक्षण बऱ्याच अंशी यशस्वी ठरेल😊. त्यातही मुलाचा कल कोणत्या क्षेत्राकडे आहे याचाही विचार व्हायला पाहिजे😐. या गोष्टीचा विचार केला तर शालेय शिक्षणासाठी तयार करण्यात आलेला अभ्यासक्रम हा बऱ्याच अंशी परिपूर्ण असल्याचा दिसतो🥳. आपल्या समाजाच्या विचारश्रेणीची कमतरता फक्त एकच ती म्हणजे इथे मुलाचा कल नाही तर तात्कालीन समाजाचा तथाकथित scope बघितला जातो😒. मुलाचा कल काय आहे त्यानुसार त्याला त्याला घडविण्याचा एकदा हिम्मत करावी त्याचे परिणाम नक्कीच चांगले असतील🥇🤝.
"भारत माझा देश आहे , सारे भारतीय माझे बांधव आहेत...." ही प्रतिज्ञा आठवते ना. आता या प्रतिज्ञेबरोबरच भारतीय राज्यघटनेतील मुलभूत कर्तव्ये सुद्धा पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात आलेली आहेत👏. आपल्या सर्वांना आपले हक्क काय आहेत ते माहीत असतं, पण आपले काही कर्तव्ये सुद्धा असतात याची जाणीव आपल्याला नसते आणि जरी जाणीव असली तरी त्याकडे सोयीस्करपणे डोळेझाक केली जाते🤨. ज्याप्रमाणे आपण हक्कांविषयी बोलतो त्याचप्रमाणे कर्तव्यांचीही जाणीव भावी पिढीला असायला हवी हाच उद्देश या कर्तव्यांचा समावेश पाठ्यपुस्तकात केलेला दिसतो🥰. आपण सर्वजण शाळेत असताना राष्ट्रगीत झाल्यावर प्रतिज्ञा म्हणायचो पण ती किती आचरणात आणली हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे😜. आपल्यासोबत तसे झाले कारण आपल्याला ती कुणी समजावून नाही सांगितली किंवा तिचे महत्वसुद्धा पटवून नाही दिले🙄. अशीच अवस्था या मुलांची होऊ नये यासाठी या मुलांना कर्तव्यांचे महत्व समजावून सांगायला हवे आणि त्याचे पालन करण्याची समजही त्यांना मिळायला पाहिजे....☺️😇👍

05/08/2021

शाळेला वरचढ ठरणारी आभासी शाळा...

काहीही झालं तरी शैक्षणिक क्षेत्रात जी पिछेहाट झाली आहे त्यामध्ये भर टाकायला बराचसा वेळ लागेल यात शंका नाही..😢... सध्या शिक्षण पुरविण्यासाठी भरपूर online platform सुरू आहेत.☺️.. ते एवढे प्रभावी आहेत की त्यामुळे एक समांतर शैक्षणिक व्यवस्था निर्माण झाल्यासारखे वाटते. Byju's, vedanto, Unacademy, Mrunal, Akash यांच्या online शैक्षणिक सेवांमुळे या कोरोनाच्या काळात निर्माण झालेली पोकळीच काही प्रमाणात भरून आल्यासारखे वाटते...🎯. हे सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या शैक्षणिक सुविधा पुरविण्यात दिवसेंदिवस पारंगत होत आहेत. उदा. Unacadeny ही स्पर्धा परीक्षेसाठी, byjus हे शालांत शिक्षणासाठी, akash हे माध्यमिक शिक्षणासाठी..💥..Central board च्या अभ्यासक्रमासाहित त्यांनी state board च्या अभ्यासक्रमवरसुद्धा त्यांचे courses सुरू केलेले आहेत, तेही ज्या त्या प्रादेशिक भाषेत..💫.. त्यांचा अजून एक positive point म्हणजे ते video form मध्ये असल्यामुळे आपण एकच पाठ परत परत बघू शकतो,जी सुविधा पारंपरिक शैक्षणिक सुविधांमध्ये मिळत नाही..💽...त्यांच्यासाठी हा सर्व एक व्यवसाय असला तरी ही ऑनलाईन शैक्षणिक प्रणाली quality, flexibility आणि durability हे सर्वच गुण देत आहे..😎..तसेच तंत्रज्ञानाचा उपयोग करून प्रत्येक टॉपिक अगदी व्यवस्थित समजावून सांगितलेला दिसतो. म्हणजेच पारंपरिक शैक्षणिक व्यवस्थेपेक्षा ही नवीन शिक्षण प्रणाली नक्कीच सरस दिसते.
हे सर्व positive points एक असा negative point यामध्ये आहे जो या सर्वांना पुरून उरेल आणि जो खुप मोठी हानी ठरू शकतो..🤔..तो म्हणजे या शैक्षणिक प्रणालीमुळे विद्यार्थी समाजापासून खूप दूर जातो.🧐.. शाळेमध्ये जी समाजाप्रती काही प्रमाणात का होईना पण बांधीलकी तयार होते ती येथे पूर्णपणे नाहीशी होईल..😊.. जर आपण स्वार्थीपणाने फक्त स्वतःच्या कुटुंबापूरताच विचार केला तर त्या negative point चे आपल्या ठायी काहीही महत्व नाही..😏.. परंतु दुरोगामी विचार केला तर फक्त स्वतःचा विचार करणारी स्वार्थी पिढी आपण जन्माला घालतोय..😒😒.
आता बऱ्याचजनांना असे वाटेल की या online शैक्षणिक प्रणालीला शाळेला पर्याय म्हणून लोक घेणार नाहीत.😐... परंतु तशी सुरुवात झालेली आहे. त्यामुळे अगोदरच स्वार्थी असलेला आपला समाज जास्तच एकांगी आणि स्वहित साधणारा होईल यात शंका नाही..😮.. इंटरनेटच्या या काळात इंटरनेटच्याच वेगाने बदलत जाणाऱ्या आपल्या या समाजासाठी दोन्ही शैक्षणिक प्रणालींचा सुवर्णमध्य साधणारी एखाद्या प्रणालीचा पर्याय मिळेल का हा मोठा प्रश्न आहे....🧐

23/07/2021

इतिहासाला महत्व का बरं द्यावे...

लहान असताना नेहमी प्रश्न पडायचा की, हे असे विषय का बर आहेत अभ्यासासाठी ? पण प्रत्येक विषयाचं अभ्यासक्रमात असणं हे काहीतरी उद्देश पूर्ण करण्यासाठी असतं. उदा. इतिहास. इतिहासाची परिपूर्ण व्याख्या सांगायची झाली तर भूतकाळ आणि वर्तमान यामधील संवाद होय. इतिहासाचा अभ्यास करताना वेगवेगळ्या घटनाक्रमाचा अभ्यास करावा लागतो, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वांचा अभ्यास होतो. हे करताना ते व्यक्तिमत्व त्या घटना हाताळताना कसे निर्णय घेतात आणि त्याचा काय परिणाम होतो हे आपण अभ्यासतो. त्यामुळे परिस्थितीप्रमाणे निर्णय कसे घ्यायचे हे आपण शिकतो. अशा प्रकारचे बरेचसे उद्देश आपण इतिहासाचा अभ्यास करताना साध्य करतो. त्यामुळे इतिहासाचा अभ्यास करणे महत्वाचे असते. बरेचजण त्याला फक्त भूतकाळाची शिदोरी समजतात पण त्याचा व्यवस्थित उपयोग करून घ्यायला मात्र विसरतात...

21/07/2021

या कोरोनाच्या काळामध्ये सर्वांना थोडी उसंत भेटली...सर्वात जास्त शैक्षणिक क्षेत्राला. नाहीतर सर्वजण फक्त पळत होते. आता वाटतय की मुलांना थोडा विचार करायला वेळ मिळाला. शिक्षण म्हणजे फक्त शाळा, क्लास ,पुस्तके ,गुरुजी, मार्क्स एवढंच नसून त्यापलीकडे या सर्वातून आपण काय शिकलो आणि त्याचा आपल्या दैनंदीन जीवनात योग्य वापर कसा करतो हे होय. मराठी माध्यमाच्या शाळेत आपण सर्वजण साधारणपणे मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, गणित, सामान्य विज्ञान, पर्यावरण आणि तंत्रज्ञान या विषयांचा अभ्यास करतो, पण आपला भर फक्त परीक्षेत जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळावेत यावरच असतो. घोकंपट्टीपेक्षा संकल्पना चांगल्याप्रकारे समजतील याकडे आपण लक्ष देतो का ! जर पुढेमागे दहावीनंतर अकरावीच्या प्रवेशासाठी प्रवेशपरीक्षा घेतली तर आपली मुलं ती चांगल्या प्रकारे उत्तीर्ण होऊ शकतील का ? या गोष्टीकडेही लक्ष द्यायला हवे. अभ्यासक्रमात हा प्रत्येक विषय समाविष्ट करण्याचा काहीतरी उद्देश असतो, तो एकदा समजून घेतला की मग तो विषय समजून घेण्यात आपोआप मन लागतं.... मुलाचं आणि शिक्षकांचसुद्धा...

05/07/2021

आयुष्यात साचलेपण आल्यावर जीवन भयावह वाटतं. त्या साचलेपणाच्या वेळी बरेच लोक आपल्याला बोलतात की मी तुला समजू शकतो. पण असं काहीही नसतं, कोणीही आपलं दुःख समजू शकत नाही कारण ते दुःख त्यांनी अनुभवलेलच नसतं. त्यामुळे मी तुला समजू शकतो असं बोलणारे फक्त फाजील सांत्वन करत असतात. कुणाचं दुःख खरच कमी करायचं असेल तर स्वतःला त्या व्यक्तीच्या जागी ठेवून त्याला समजून घ्यावं लागतं , जे सर्वांनाच जमत नाही...

07/03/2021

फुलपाखराचा अंगभूत गुणच तो...मानवी मनालासुद्धा निस्वार्थपणे असे करायला जमणार नाही का....पण एक आहे, इथे स्वार्थाला थारा नसतो....!!!

19/02/2021

पहिल्या चार छत्रपतीनंतरच्या छत्रपतींचे काय झाले...???

🙏🙏🙏🙏🙏शिवजयंती साजरी करताना आपण महाराजांनी केलेल्या कार्याचे खरच स्मरण करतो का ? याबद्दल शंका वाटते. आपल्याला एखादी अडचण आली तरी आपली दमछाक होते. महाराजांनी तर शून्यातून विश्व निर्माण केलं होतं. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही या तीन राजवटींचे राज्य दख्खनवर होते आणि उत्तरेला मुघल. त्यात भर म्हणजे वडील शहाजीराजे ज्याच्याकडे जहागीरदार म्हणून आहेत त्यांच्याच राज्यांवर हल्ले करून स्वराज्य स्थापन करायचे. हे सर्व खरच वाटतं तेवढं सोप्प होतं का ? अजिबात नाही.
बहुतेक जणांना तर महाराजांच्या जीवनाचा कालानुक्रमसुद्धा सांगता येणार नाही. एवढेच काय राजमुद्राही कुणाला पाठ नसेल..😞 त्यापुढचा प्रश्न म्हणजे शिवाजी महाराज, संभाजी महाराज,राजाराम महाराज आणि शाहू महाराज यानंतरचे छत्रपती कोण होते ?🤔... ते होते तर छत्रपतींपेक्षा पेशवेपद एवढं महत्वाचं का बरं झालं ?🤔.. यापैकी कुठलाही प्रश्न आपल्याला कधी पडत नाही. प्रश्न पडत नाहीत कारण आपली विचार करण्याची तयारीच नाही. महाराज इतिहास घडवू शकले कारण भारताच्या पूर्वइतिहासावर त्यांनी खूप चिंतन केले होते आणि म्हणूनच ते योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकले. बाराव्या शतकाच्या शेवटी पृथ्वीराज चौहानने मोहम्मद घोरीला अभय दिलं होतं आणि नंतर याच घोरीने पृथ्वीराजचा खात्मा केला. यावरून शिकलेले हाताशी आलेल्या शत्रूला कधीही सोडायचे नसते हे तत्व महाराजांनी आयुष्यभर पाळले..🔥 शाहूमहाराजानंतर छत्रपतीपदाचं महत्व कमी झालं कारण इतिहासाचे चिंतन करणेच सोडून दिले गेले होते....
१६८९ मध्ये संभाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर महाराणी येसूबाई आणि युवराज शाहूराजे औरंजेबाच्या कैदेत होते. तब्बल अठरा वर्षे म्हणजेच १७०७ पर्यंत. तोपर्यंत स्वराज्याची धुरा सांभाळली छत्रपती राजाराम महाराज आणि त्यांच्या मृत्यूनंतर म्हणजेच १७०० नंतर महाराणी ताराबाई यांनी. परंतु १७०७ मध्ये शाहूमहाराजांची सुटका होऊन ते महाराष्ट्रात परत आले. त्यांना सोडणे ही औरंगजेबाची एक राजकीय खेळीच होती आणि घडलेही तसेच. शाहूमहाराज महाराष्ट्रात परत आल्यावर त्यांच्यात आणि महाराणी ताराबाई यांच्यात सत्ता संघर्ष सुरू झाला⚔⚔. यामध्ये बाळाजी विश्वनाथ यांच्या पाठिंब्यामुळे शाहूमहाराज साताऱ्याच्या गादीवर बसले आणि छत्रपती बनले👑👑. परंतु महाराणी ताराबाई इथेच थांबल्या नाही. त्यांनी कोल्हापूरला छत्रपतींची दुसरी गादी स्थापन करून त्यावर त्यांचा मुलगा शिवाजी दुसरा यांना बसविले. पण छत्रपती म्हणून सर्वमान्यता साताऱ्याच्या गादीलाच म्हणजेच शाहूमहाराजांनाच होती. शाहूमहाराजांना युद्धभूमीचा अनुभव नसल्यामुळे ती जबाबदारी पेशवे आणि सेनापती यांनी सांभाळली🤞. कधी कधी तर पेशव्यांच्या सल्ल्याशिवाय त्यांना निर्णय घेणे कठीण जात असे. त्यामुळे साहजिकच पेशव्यांचा दरबारात दबदबा वाढत गेला. शाहूमहाराजांचा मृत्यू १६४८ मध्ये झाला. शाहू महाराजांना मुलं नव्हते म्हणून गादीचा वारसदार म्हणून त्यांनी महाराणी ताराबाई यांचे नातू रामराजा यांना दत्तक घेतले होते. परंतु त्याअगोदर रामराजा यांना कधी कुणी बघितले नव्हते. महाराणी ताराबाई यांनी एकदमच रामराजा यांना आपला नातू म्हणून प्रकट केले होते. एवढे दिवस ते कुठे होते या प्रश्नाला त्यांनी असे उत्तर दिले की सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना राजपुतांकडे ठेवण्यात आले होते🧐. हे कारण शाहू महाराजांनी स्वीकारले आणि रामराजा यांना दत्तक घेतले. शाहू महाराजांनंतर ते स्वराज्याचे पाचवे छत्रपती बनले.
महाराणी ताराबाई यांची सत्तेची आस अजूनही संपलेली नव्हती. त्यांना छत्रपती फक्त नामधारी हवा होता आणि सत्ता स्वतःला चालवायची होती. पण त्यांच्या या विचारामध्ये प्रमुख अडथळा पेशवे बाळाजी बाजीराव म्हणजेच पेशवे नानासाहेब यांचा होता. म्हणून त्यांनी नानासाहेबांना पेशवेपदावरून काढून टाकण्यास छत्रपती रामराजा यांना सांगितले. परंतु रामराजे यांनी त्यास नकार दिला. तेव्हा महाराणी ताराबाई यांनी रामराजा स्वतःचा नातू नसल्याचे जाहीर केले आणि त्यांना छत्रपतीपदावरून पदच्युत केले व कारभार स्वतःच्या हाती घेतला🙄🙄. या सर्व प्रकारामुळे महाराणी ताराबाई आणि नानासाहेब पेशवे यांच्यात युद्धं झाले⚔⚔. त्या युद्धात महाराणी ताराबाईंचा पराभव झाला. त्यानंतर नानासाहेब पेशवे आणि ताराबाई यांच्यात तह होऊन ताराबाईंनी पेशव्यांचे प्रभुत्व मान्य केले🤝. तह पाळण्याबद्दल दोघांनी जेजुरीच्या मंदिरात शपथ घेतली. त्याचवेळेस महाराणी ताराबाई यांनी शपथेवर रामराजा त्यांचे नातू नसल्याचे सांगितले. तरीही त्यापुढे म्हणजेच १७५२ नंतर रामराजा यांनाच नामधारी छत्रपती म्हणून गादीवर बसविले गेले आणि सर्व राज्यकारभार पेशव्यांकडे आला.
त्यानंतर छत्रपतीपद हे फक्त नामधारी राहिले आणि मराठा साम्राज्य पेशव्यांमार्फत चालविले जाऊ लागले.....🙏🙏🙏

23/01/2021

नेताजींनी हिटलरला दिलेली भेटवस्तू...

इतर भारतीय नेत्यांच्या पुढे जाऊन विचार करण्याची कुवत नेताजींमध्ये होती, म्हणूनच तर संपूर्ण भारतावर गांधीजींच्या अहिंसात्मक मार्गाचा प्रभाव असताना नेताजींनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी परकीय लष्करी मदत घेण्याचा प्रयत्न केला होता. आता असं वाटतं की नेताजींना इतर भारतीय नेत्यांचं समर्थन भेटलं असत तर परिस्थिती खूप वेगळी असती...पण ठीक...
तर तशी परकीय लष्करी मदत मिळविण्याचा पहिला प्रयत्न नेताजींनी जर्मनीचा चान्सलर एडॉल्फ हिटलर याची भेट घेऊन केला. त्यांची भेटण्याची तारीखही ठरली. २९ मे १९४२. आजच्याप्रमाणे तेव्हाही एखाद्या राष्ट्रप्रमुखाची भेट घेण्यासाठी जाताना त्याच्यासाठी एखादी भेटवस्तू घेऊन जाण्याचा प्रघात होता. परंतु हिटलरसारख्या गुंतागुंतीच्या व्यक्तिमत्वासाठी काय भेटवस्तू न्यावी हे नेताजींच्या लक्षात येत नव्हते. त्याबाबतीत नेताजींनी पत्नी एमिलीकडेही विचारणा केली आणि शेवटी एक भेटवस्तू ठरली.
ठरल्यादिवशी हिटलरची भेट घेण्यासाठी नेताजी गेले. आदरातिथ्य झाल्यानंतर नेताजींनी भेटवस्तूचा बॉक्स हिटलरला दिला. अशी बंदिस्त बॉक्समध्ये आलेली भेटवस्तू बघण्यासाठी हिटलरने कुतूहलाने बॉक्स उघडला तर तो त्या भेटवस्तुकडे बघतच राहिला. ती भेटवस्तू होती पद्मासन अवस्थेतील भगवान बुद्ध यांची मूर्ती. थोडा वेळ बघितल्यावर हिटलरचा प्रश्न होता..."हा पहेलवान कोण आहे ?" 😅.. त्यावर नेताजींनी हिटलरला भगवान बुद्ध आणि अहिंसा याबद्दल माहिती दिली (हिटलरचे अज्ञान बघून नेताजींनाही आश्चर्य वाटले असेल !!😅)...

भारताचा एक नेता दुसऱ्या देशाच्या राष्ट्रप्रमुखाकडे (हिंसात्मक लढाईसाठी) लष्करी मदतीच्या अपेक्षेने जातो आणि भेटवस्तू म्हणून अहिंसेचे प्रणेते भगवान बुद्ध यांची मूर्ती देतो,याचे आश्चर्य मलाही वाटते...

10/01/2021

इसापनीती ते वाचनाची आवड.....

लहानपणी आपल्या प्रत्येकाने गोष्टी ऐकल्या असतील. त्यातील बऱ्याच जणांनी इसपनीतीमधील गोष्टी वाचल्याचं असतील. त्यातीलचं एक गोष्ट आपण बघू...
एका शेतकऱ्याने त्याच्या शेतात कोंबड्या पाळलेल्या असतात. त्या कोंबड्यांवर एका लांडग्याचे लक्ष असते. तो रोज तिथे येऊन कोंबड्या खाऊ लागला. ती गोष्ट त्या शेतकऱ्याच्या लक्षात आली आणि त्याने त्या लांडग्याला अडकविण्यासाठी एक जाळे लावले. रात्री अंधारात तो लांडगा रोजप्रमाणे त्यादिवशीही आला आणि त्या जाळयात अडकला. मग तो शेतकरी लांडग्याला अद्दल घडविण्यासाठी त्याच्या शेपटीला आग लावतो. त्या आगीमुळे शेपटी तर जळायला लागतेच त्याचबरोबर ते जाळंसुद्धा जळायला लागत. जाळं जळाल्यामुळे लांडगा तेथून सुटून सैरावैरा पाळायला लागतो आणि शेजारीच असलेल्या शेतात शिरतो. लांडग्याच्या शेपटीला असलेल्या आगीमुळे शेतातलं पीक जळायला लागतं आणि बघता बघता सर्व शेतात ती आग पसरून सर्व पीक जळून जातं. तेव्हा शेतकरी डोक्याला हात लावून बसतो. त्याच्या डोक्यात विचार येतो की आपण लांडग्याला एवढी कठोर शिक्षा देण्याच्या नादात स्वतःचच खूप मोठं नुकसान करून घेतलं.
ही गोष्ट बघायला गेलं तर खूप साधी पण यातून मिळणारा बोध खूप मोठा, जो की लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येकाला त्याच्या जीवनात अवलंबता येईल. पण दुर्दैवाने आपण इसपनीतीमधील गोष्टींना लहान मुलांच्या गोष्टी म्हणून दुर्लक्ष करतो. खरेतर या गोष्टी योग्य अर्थाने समजण्याची गरज लहान मुलांपेक्षा मोठ्या माणसांनाच आहे. प्रसिद्ध लेखक नरहर कुरुंदकर यांच्या मते तर इसापनीती राजकारणी लोकांसाठी खूप उपयुक्त पडेल आणि ते बऱ्याच अंशी खरेही ठरते....
जगातील प्रत्येक यशस्वी माणसाचे आत्मचरित्र बघितले तर त्यांच्यातील बहुतांशी समान धागा म्हणजे त्यांची ज्ञानाबद्दलची आसक्ती. मायक्रोक्रोसॉफ्टचे बिल गेट्स असो का मग बर्कशायरचे वॉरेन बफे प्रत्येकाचा वाचनावर खूप भर आहे. वाचनामुळे जी जडणघडण होते ती बाकी कशानेही होणे शक्य नाही. पण भारतीयांमध्ये ही वाचनाची आवड खूप कमी दिसते. माझे बरेचसे मित्र असे आहेत की त्यांना जर मी सांगितलं की मी वाचतोय तर त्यांचा प्रश्न असतो, आता कोणती परीक्षा आहे ? वाचन काय फक्त परिक्षेसाठीच करायचा असतो का ! नाही, अजिबात नाही !! वाचन तर निरंतर असायला हवं आणि त्याची आवड लहानपणापासूनच असायला हवी. लहानपणीच वाचनाची आवड लागावी आणि आवडीचे रूपांतर सवयीत व्हावे यासाठी इसापनीतीसारखी बरीचशी पुस्तके आपल्या संपर्कातील लहान मुलांना देऊ शकतो. जसे की,

१. बोक्या सातबंडे, दिलीप प्रभावळकर.
२. फास्टर फेणे, भा.रा. भागवत.
३. वाचू आनंदे, माधुरी पुरंदरे.
४. तोत्तोचन, मराठी अनुवाद- पूर्वा कुशवाहा.
५. सत्तर दिवस , रवींद्र गुर्जर.
६. भुताळी जहाज, भा.रा. भागवत.
७. चला जाऊया अवकाश सफरीला,जयंत नारळीकर.
८. श्यामची आई, साने गुरुजी.
९. आईची देणगी, गो.नि.दांडेकर.
१०. एक होता कार्व्हर, वीणा गवाणकर.
११.अग्निपंख, Dr. A.P.J. kalam.
१२. द अलकेमिस्ट, अनुवाद- नितीन कोत्तापल्ले.

अशा पुस्तकांपासून सुरुवात करून आपण लहान मुलांना वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तके वाचायला दिली पाहिजे. त्यांना वाचनाची आवड लागल्यानंतर त्यांना विशेषतः प्रसिद्ध व्यक्तीचे आत्मचरित्र वाचायला द्यायला हवे. कारण त्यामुळे त्यांना सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक आणि काही प्रमाणात आर्थिक समज यायला मदत होईल.
जपानमध्ये प्राथमिक शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना फक्त भाषाविषय आणि नैतिक शिक्षण दिलं जातं. भाषाविषयामध्ये वाचन तर येतच असेल ना. मी असं नाही म्हणत की त्यांनी जे केलं तेच आपणही करायला हवं, पण ही पद्धत बौद्धिक विकासासाठी योग्य वाटते....

07/01/2021

प्रतीशिवाजी....

आपला विभाग एखाद्या अमूल्य ऐतिहासिक वारश्याचा वारसदार आहे हे जेव्हा अगदी नकळतपणे कळतं तेव्हा आपसूकच छाती अभिमानाने फुगते. स्वराज्याचे पाहिले सरनोबत (सेनापती) नेतोजी पालकर यांना कोण ओळखत नाही ! शिवाजी महाराजांच्या १६६५पर्यंतच्या जवळ-जवळ सर्वच मोहिमांमध्ये त्यांचा महत्वाचा सहभाग होता आणि म्हणूनच त्यांना प्रतीशिवाजी म्हणूनही ओळखले जायचे. त्यांचा लढा, स्वराज्यासाठीचा त्यांचा त्याग, परधर्मातील दहा वर्षांचा वनवास, परत स्वधर्मात येताना आपल्याच माणसांकडून झालेला विरोध (तरीही महाराजांच्या ऐतिहासिक निर्णयामुळे त्यांना परत स्वधर्मात घेण्यात आले)...अशा कित्येक गोष्टींनी नेतोजी बद्दल भारावून गेलो आणि त्यांचं दर्शन घेण्याचं मन झालं, म्हणून त्यांच्या समाधीचा शोध घेतला. त्यात समजलं की त्यांची समाधी नांदेड जिल्यातील हदगाव तालुक्यातील तामसा या गावी. म्हणजेच माझ्याच तालुक्यात. माझ्या घरापासून साधारणपणे 15 किमी अंतरावर. स्वराज्याच्या सारनौबतांची समाधी आपल्या तालुक्यात आहे आणि आपल्याला त्याची माहिती पण नाही याची क्षणभर लाज वाटली. परंतु नंतर वाटलं लहान वयापासूनच घरापासून दूर राहतोय म्हणून नसेल माहिती...
पुरंदरच्या तहानंतर मिर्झाराजे जयसिंग दक्षिणेत असताना त्याच्याविरुद्धच्या चालीत नेतोजी छत्रपतीसोबत भांडण झाल्याचं नाटक करत विजापूरच्या आदिलशाहला सामील झाले. त्यानंतर महाराजांच्याच सांगण्यावरून मुघलांना मिळाले (किंवा..मिर्झाराजे जयसिंग यांनी त्यांना मुघलांकडे वळवून घेतलं असंही मानलं जातं). तेव्हा त्यांना पाच हजारांचा मनसब आणि तामसा परगण्यातील 55 गावांची जहागिरी देण्यात आली. पण महाराज आग्राच्या कैदेतून निसटले हे समजताच संशयातून मुघलांनी त्यांना कैद केले आणि धर्मांतर करत त्यांच नामकरण "मोहम्मद कुलीखान" करून त्यांना काबूलला पाठवलं. तिथे दहा वर्षे (१६६५ -१६७५) काढल्यानंतर महाराष्ट्रात येण्याची त्यांना संधी मिळाली आणि ते थेट महाराजांना येऊन मिळाले.तेव्हा महाराजांनी त्यांना परत स्वधर्मात घेतलं. एवढा संघर्ष करणाऱ्या नेतोजी पालकरांच्या समाधीला स्वराज्यात एवढी भूमी असताना त्यांच्या भूतपूर्व मुघलांच्या जहागिरीत स्थान मिळावं, हे कोडं काही उलघडत नाही.
स्वराज्याच्या पहिल्या सारनोबतांची समाधी आपल्या गावी आहे याचा अभिमान आहेच, पण त्या काळच्या स्वराज्यात त्यास स्थान का बर नाही मिळाले हे कोडंही आहे...तरीही त्यांच्या समाधीचा जीर्णोद्धार करण्याचा प्रयत्न राहीलच....🙏🙏

(त्यांचे नाव नेतोजी होते नेताजी नव्हे.)

30/12/2020

बळीराजाचे राज्य....

आरक्षणाची मागणी सध्या सगळेच करताना दिसतात, मग ते शैक्षणिक क्षेत्रात असो का मग नौकरीमध्ये...परंतु असं एक क्षेत्र आहे की जिथे आरक्षणाची अजिबात गरज नाही...येथे गरज आहे फक्त मेहनतीची आणि आधुनिक कल्पनांची😏...शेती हे असे क्षेत्र आहे की जो भारतातील सर्वाधिक लोकसंख्येला रोजगार पुरवितो पण त्याचा वारसा सांभाळण्यास कुणीही इच्छूक नाही😔...पुढारी लोक म्हणतात की शेतकऱ्यांच्या मुलांनी नोकरीच्या मागे न धावता धंद्यात पडावे...तेही चुकीचे नाही, पण मग ह्या वारश्यात प्रगती कुणी करायची🤔...सगळ्यांनीच पाठ फिरवली तर सगळेच उपाशी राहतील...तरीही त्याबाबतीत कुणाला फारशी फिकीर नाही😒...शहरी मध्यमवर्गीयांचा बजेट सांभाळण्यासाठी शेतमालाच्या किंमतीला कात्री लावली जाते पण बळीराजाच्या खिशाला चाळणी लागल्यावर त्याची तमा कुणाला राहत नाही😔...सर्वांचे पोट भरणारा हा राजा स्वतःच दारिद्र्य रेषेखाली आयुष्य काढतोय..."इडा पीडा टळो अन बळीराजाचे राज्य येवो", ही अपेक्षा प्रत्यक्षात येण्यासाठी कोण कमी पडतंय हेच समजेनासे झाले....स्वतः बळीराजा का मग आपण सर्व....

30/12/2020

रात्र....

विषय तसा जुनाच.... पण रात्रीची किमया प्रत्येकासाठी नवीन असते...दिवस उगवल्यापासून रात्रीची ओढ प्रत्येकासाठी वेगवेगळी... लहान मुलांना रात्र म्हणजे अभ्यासपासून सुटका, परीक्षा असणाऱ्यांसाठी रात्र म्हणजे कसोटीच (त्यात एका रात्रीतून अभ्यास करणाऱ्यांसाठी तर ती महासंग्रामच), जन्मदिवस असणाऱ्यांसाठी रात्र म्हणजे एखाद्या पुढाऱ्यापेक्षा जास्त घाई... नवीन लग्न झालेल्यांना हवीहवीशी वाटणारी , तर आजी आजोबांना तेवढीच नकोशी असणारी...कुटुंबासाठी ही रात्र म्हणजे एकमेकांसोबतचा सुखद सहवास आणि कधी कधी थट्टेमधला वाद...अशा या रात्रीचा आनंद घेणारे आपण सगळे,पण तरीही ही रात्र आपणा सर्वांना खूप काही शिकवून जाते..!!!अंधारात आनंदी राहणे आणि उजेडासाठी संयम ठेवणे... सतत सूर्याचे चटके सहन करण्यापेक्षा थोडा वेळ रात्रीची शितलता आयुष्यात असायला हवी...नवीन उत्साह निर्माण करण्यासाठी थोडी विश्रांती घ्यावी... अंधाराच्या अज्ञानापासून उजेडाच्या ज्ञानाकडे सगळ्यांनी जावे अशी या रात्रीची वर्षानुवर्षांची शिकवण... ही शिकवण आपण सर्व घेऊया आणि उजेडाकडे पहिलं पाऊल टाकूया...

Want your school to be the top-listed School/college in Nashik?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


Nashik