10/07/2026
स्वयंसेवी संस्थांचा आधारवड "कचोलीया अंकल" यांना संस्था परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
सामाजिक क्षेत्रातील असंख्य सेवाभावी संस्थांचे आधारवड तथा "अंकल" म्हणून ओळखले जाणारे श्री रमेश कचोलिया यांचे आज मुंबई येथे वृद्धापकाळाने निधन झाले. ही बातमी अत्यंत वेदनादायी आहे. संस्थेतील वसुंधरा सभागृहात सर्व कार्यकर्त्यांतर्फे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
सन २०१४ मध्ये अंकल यांनी प्रथम संस्कृती संवर्धन मंडळाला भेट दिली. त्या भेटीत त्यांनी संस्थेचे कार्य, ग्रामीण भागातील शिक्षण, शेती, महिला सक्षमीकरण आणि सर्वांगीण ग्रामीण विकासासाठी सुरू असलेले प्रयत्न जवळून पाहिले. त्या दिवसापासून त्यांचे आणि संस्थेचे नाते हे केवळ दातृत्वाचे नव्हते, तर विश्वास, आत्मीयता आणि मार्गदर्शनाचे बनले.
Caring Friends या त्यांच्या व्यापक परिवाराच्या माध्यमातून त्यांनी संस्थेच्या अनेक महत्त्वपूर्ण विकासकामांना बळ दिले. यात कर्मचारी कुटुंबांसाठी कर्मचारी वसाहतीचे नूतनीकरण, १,००० विद्यार्थ्यांसाठी आधुनिक 'गुरुनाथ भवन' भोजनगृह, तंत्र विद्यालयाच्या इमारतीचे नूतनीकरण , तसेच १२० विद्यार्थिनींसाठी नवीन मुलींच्या वसतिगृहाची उभारणी यांसारखे अनेक महत्त्वाचे प्रकल्प त्यांच्या विश्वासामुळे आणि सहकार्यामुळे संकुलात साकार झाले.
अंकल यांची विकासाची दृष्टी केवळ संस्थेपुरती मर्यादित नव्हती. नांदेड जिल्ह्यातील तलाव आणि जलसाठ्यांच्या गाळमुक्तीच्या उपक्रमांनाही त्यांनी महत्त्वपूर्ण पाठबळ दिले. जलसंवर्धन, शाश्वत शेती आणि ग्रामीण विकास या क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान हजारो कुटुंबांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून गेले.
त्यांनी DRISHTI सारख्या विकासाभिमुख संस्थांशी संस्कृती संवर्धन मंडळाचा परिचय करून दिला आणि अनेक दाते, संस्था व विकास भागीदारांना आमच्या कार्याशी जोडले. त्यांच्या या विश्वासामुळे संस्थेच्या विकासाचा प्रवास अधिक व्यापक आणि परिणामकारक झाला.
अंकल यांनी आम्हाला मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा दिली, संस्थात्मक प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी अधिक दृढ केली. त्यांचे प्रेम, विश्वास आणि मार्गदर्शन आमच्यासाठी सदैव प्रेरणादायी राहील.
संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळी परिवाराच्या वतीने आम्ही श्री रमेश कचोलिया यांच्या पवित्र स्मृतींस विनम्र अभिवादन करतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती तसेच Caring Friends परिवाराप्रती आम्ही मनःपूर्वक शोकसंवेदना व्यक्त करतो.
भावपूर्ण श्रद्धांजली!
ॐ शांती! 🙏💐