12/10/2024
परदेशी शिक्षण - हसतखेळत लुटण्याचा मामला - विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनाही व्यवहार्यतेचा सर्वंकष सल्ला देणार्या केन्द्रांची गरज
परदेशी व त्यातही मुख्यत्वे अमेरिकेत जाऊ इच्छिणार्या मुला-मुलींना मार्गदर्शन करणार्या पुण्यातील 'आघाडीच्या' शिकवणी घेणार्या व मार्गदर्शन करणार्या केन्द्राच्या महाशयांबद्दल काही गोष्टी नुकत्याच कळल्या.
अभियांत्रिकी पूर्ण झालेल्या बहुतेक मुला-मुलींच्या पालकांना परदेशी असलेल्या शिक्षणाच्या व नोकरीच्या संधींबद्दल फारशी कल्पना नसते. ते भारतातील नोकरीच्या संधीबाबतच अनभिज्ञ असतात; तेव्हा परदेशातील संधींबद्दल प्रश्नच नसतो. अनेक मुलांचे अभियांत्रिकीतील गुण समाधानकारक नसतात. तरीदेखील घरची परिस्थिती कशीही असली तरी कोणत्याही परिस्थितीत देश सोडण्याची अनेकदा या मुलांचीच इच्छा असते. जीआरईमध्ये सामान्यत: २८० पेक्षा अधिक गुण मिळाले तरी अमेरिकेत प्रवेश मिळू शकतो. मात्र मग अशा विद्यापीठाचा दर्जा काय असेल याचा विचार करायचा नाही. असा या क्षेत्राचा बाजार बनला आहे. क्वचित कधीकधी जीआरईचा स्कोअर इतका कमी आला असेल तर अमेरिकेचा व्हिजा नाकारला जाण्याचेही प्रकार घडतात.
मग असे सावज या महाशयांच्या केन्द्राकडे आले की मग हे खुश होतात. अमेरिकेतून पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या मुलांना तेथेच वर्षाला ऐंशी हजार ते एक लाख डॉलर्सचा पगार मिळेल आणि या पगारातून होणार्या बचतीतून तेथील शिक्षणावर झालेला खर्च तीन वर्षांमध्येच वसूल होईल, असे अतिशय आकर्षक चित्र हे महाशय या पालकांना दाखवतात. अनेकदा पालकांऐवजी मुलेच तिकडे सल्ला घेण्यासाठी जातात. काहीही असले तरी तीन वर्षांमध्ये चाळीस ते साठ लाख रूपयांचा परतावा मिळेल, असे चित्र त्यांच्यापुढे उभे केले जाते. तुमचा मुलगा किंवा मुलगी अमेरिकेला जाईल किंवा जर्मनीला जाईल असे चित्र उभे केले जाते. मात्र या देशांमधील नक्की कोणत्या दर्जाच्या विद्यापीठामध्ये प्रवेश मिळवला जाऊ शकतो याबद्दल समाधानकारकपणे सांगितले जात नाही. योरपीय किंवा जपानी विद्यापीठांमध्ये जायचे तर तेथे केवळ इंग्रजी माध्यमातून असलेले अभ्यासक्रम मर्यादित संख्येने असतात. मग स्थानिक भाषांमधील इतर अभ्यासक्रम घ्यायचे तर त्या भाषेत यांचे पुरेसे प्रावीण्य नसते. शिवाय अशा प्रत्येक देशामधील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी मिळण्याबाबतची परिस्थिती विविध कारणांमुळे सदैव बदलत असते. त्याची पुरेशी माहिती दिली घेतली जात नाही.
त्यातही काँप्युटर किंवा आयटीव्यतिरिक्त इतर शाखांच्या पदवीधरांना तिकडे कोणत्या प्रकारच्या पगाराच्या संधी आहेत हे सांगितले जात नाही. त्यांनाही अशीच मोठ्या रकमांच्या पगाराची किंवा तत्सम स्वप्ने सांगितली जातात. ट्रम्प अध्यक्ष झाल्यापासून अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांना शिक्षणानंतर अमेरिकेत राहता येण्याची आणि राहता आले तर नोकरी मिळण्याची शक्यताही दुरावलेली आहे. मेकॅनिकल इंजिनियरींगमधील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर तेथे नोकरी मिळणे कठीण झालेले आहे. मेकॅनिकल अभियंत्यांची ही स्थिती; तर इतर क्षेत्रांमध्ये काय अवस्था असेल? आणि हे ट्रम्प सत्तेत येण्याच्या आधीपासून चालू आहे. तरीही या मुलांपैकी किंवा पालकांपैकी कोणी ही शंका विचारलीच तर 'ट्रम्प काय आयुष्यभर अध्यक्षपदी राहणार आहे का?' असे थातुरमातुर उत्तर देऊन त्यांचे समाधान केले जाते. बिनानोकरीचे तेथे राहण्याचा खर्च परवडत नसल्याने काही काळ तेथे राहण्यासाठी संघर्ष केल्यानंतर या मुलांना अखेर भारतात परतण्याशिवाय पर्याय उरत नाही. तिकडच्या परिस्थितीबाबतची व्यवस्थित चौकशी न करताच तिकडे जाण्यामुळे किंवा तिकडे गेल्यावर स्थानिक वा जागतिक परिस्थितीत अचानक बदल झाल्यामुळे नोकरी न मिळता किंवा चांगली नोकरी न मिळता परत यावे लागल्यास इकडून जाताना घेतलेल्या कर्जाची भलीमोठी रक्कम भल्याभल्यांना काळजीग्रस्त करते. ही रक्कम इकडच्या गृहकर्जाएवढी अक्राळविक्राळ असू शकते. ती रक्कम भारतातच नोकरी करावी लागल्यास त्या पगारातून फेडणे कठीण होऊन बसते.
अनेकदा जीआरई परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी अशा क्लासवाल्यांनी जे प्रशिक्षक नेमलेले असतात, ते अतिशय उथळ व अननुभवी असतात. अभियांत्रिकी शाखेच्या पदवीधरांसाठी असे प्रशिक्षण बव्हंशी निरर्थक म्हणावे असे वरवरचे असते.
अभियांत्रिकी शाखेव्यतिरिक्त इतर शाखांचे विद्यार्थी या क्लासवाल्यांसाठीचे अगदी हिरवे गवत असते. कारण गणित हा यांच्यापैकी बहुतेकांचा शत्रू असल्यामुळे जीआरई परीक्षेत उत्तम गुण मिळवणे यांच्यासाठी बहुधा फार कठीण असते. मग हे गुण वाढवण्यासाठी पुन्हा पुन्हा परीक्षा देण्यास भाग 'पडणे' क्रमप्राप्त असते. म्हणजेच त्या नावाखालची वाढीव कमाई आली.
भारंभार अभियांत्रिकी महाविद्यालये काढण्यामुळे पुण्यातील मोठ्या समजल्या जाणार्या महाविद्यालयांमधील मुलांनाही नोकर्या मिळणे कठीण झालेले दिसते. एकीकडे त्यांची ही गत; तर दुसरीकडे अमेरिकेला जाऊ पाहणार्या मुलांचा 'फायदा उठवण्यासाठीचे' हे वेगळेच कुरण वर्षानुवर्षे उपलब्ध आहे. मात्र या मुलांचे अमेरिका-योरपला गेल्यानंतर काय होते हे पाहण्याची तसदी कोणीच घेत नाही. एकीकडे 'काहीही' करून अमेरिकेला जाण्याची मुलांची इच्छा व दुसरीकडे आर्थिकदृष्ट्या शक्य असो वा नसो; आपल्या मुलाला अमेरिकेला पाठवण्याची पालकांची इच्छा असल्यामुळेच या क्लासवाल्यांचे अर्ध्यापेक्षा अधिक काम झालेले असते. असा हा राजीखुशीचा लुटून घेण्याचा मामला असतो. त्यातही आरक्षणासह इतर गोष्टींमुळे या देशात मुलांना संधीच नाहीत असा कांगावा करणारे पालक हास्यास्पद वाटतात असल्यामुळे मुलांचाही विचार तसाच न झाल्यास नवल. जणू काही ही मुले येथे सरकारी कंपनीतच काम करणार असतात. शिक्षणासाठी इंग्रजी माध्यम सर्वश्रेष्ठ असा भ्रम बनवला गेला आहे, परदेशातील शिक्षणासाठीचा आटापिटा ही त्यापुढची पायरी. म्हटले तसे जाण्यापूर्वी सर्व गोष्टींचा विचार करण्याची तसदी घेतली जात नाही हा मुद्दा आहे.
आता या महाशयांप्रमाणेच या कुरणाचा (गैर)फायदा घेणारे इतरही छोटे-मोठे क्लास आहेत. असे करणारे हे महाशय एकटेच नव्हेत. कितीजण यांच्याकडे चौकशीसाठी आणि सल्ल्यासाठी येतात आणि त्यांच्यातील कितीजण पालकांना वा मुलांना योग्य मार्गदर्शन करतात हा प्रश्न आहे.
यातली अनेक केन्द्रे परदेशी विद्यापीठांचे एजंट म्हणूनही काम करताना दिसतात. म्हणजे त्यांना विद्यार्थी मिळवून देण्यासाठी. एखाद्या केन्द्राकडे काही देशांमधील विद्यापीठांची अद्ययावत माहिती आहे असा विद्यार्थ्यांचा किंवा त्यांच्या पालकांचा समज झाला तरी त्यात प्रत्यक्षात धोका असू शकतो. की एखाद्या विद्यापीठातील शिक्षणाची जागा आपल्याला 'विकण्याचा' तर त्यांचा हेतु नाही ना, अशी शंकाही येत नाही. त्यामुळे प्रभावित होऊन चुकीचा निर्णय घेण्यास प्रवृत्त केल्यासारखेही होऊ शकते. अतिशय उत्तम गुणवत्ता असलेल्या मोजक्या विद्यार्थ्यांना अमेरिकेतील एकापेक्षा अधिक विद्यापीठांकडून प्रवेश मिळू शकतो. अशा विद्यार्थ्यांना या एजंटांची गरजही पडत नाही. ही विद्यापीठे अशा विद्यार्थ्यांना विमानाचे परतीचे तिकिट देऊन शिवाय अमेरिकेतील मुक्कामाची सोय करून प्रवेश मिळालेल्या विद्यापीठांना भेट देण्याची सोयदेखील करतात. इतरांसाठी हे निव्वळ स्वप्नवत असते आणि स्वतंत्रपणे चौकशी करता येण्याची गरज त्यामुळे महत्त्वाची ठरते.
आपल्याकडे उत्तम संधी नाहीत म्हणून संशोधनासाठी परदेशी जाण्याशिवाय पर्याय नाही, असे फारच क्वचित म्हणजे मोजक्या मुलांबाबत असते. अगदी उत्तम ॲकॅडेमिक्स असलेलेही तिकडे संशोधनासाठीच जातात असे नाही तर पदव्युत्तर शिक्षण घेऊन तिकडेच नोकरी मिळवण्याचा त्यांचा हेतु असतो. त्यामुळे बहुतेकांसाठी तिकडील पदव्युत्तर शिक्षण ही आपल्या उत्तम भविष्याची तरतुद असते. त्यात वावगे काहीच नाही. मात्र आपल्या मित्रमैत्रिणींचे पाहून अनेकजण आपल्या आईवडलांना या आतबट्ट्याच्या स्वप्नासाठी भरीला घालतात हा मोठाच मुद्दा आहे. आणि याकडे दुर्लक्ष केले जाते.
अनेक पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी आज देशातच परदेशातील आघाडीच्या विद्यापीठांमधील तोडीचे नसले तर त्यातल्या त्यात बरा दर्जा असलेले अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. हे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरी मिळणे अगदी शक्य असते. त्यातून एखाद्याची परदेशात स्थायिक होण्याची इच्छा असेल तर तेदेखील करता येते. हा मार्ग प्रचंड खर्च करून परदेशातच पदव्युत्तर शिक्षण घेण्याच्या हट्टातून पुढील अनिश्चिततेचा सामना करण्यापेक्षा कितीतरी सुरक्षित असतो. मात्र हे क्लासवाले या स्वरूपाचा व्यवहार्य सल्ला देण्याच्या भानगडीत पडताना कधीच दिसत नाही. कारण मग त्यांचा 'धंदा' बुडतो. दारूच्या गुत्त्यावर 'दारूचे दुष्परिणाम' यावर कोणी व्याख्यान देण्यासारखा असा तो प्रकार होतो. यातली दुसरी अडचण अशी असते की देशातल्या अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयांचा दर्जा इतका सुमार आहे की बहुराष्ट्रीय कंपन्या त्यांच्याकडे कँपस भरतीसाठी फिरकतच नाहीत. त्यामुळे किमान पदव्युत्तर शिक्षण तरी नामांकित संस्थेतून घेऊ असा विचार करण्याऐवजी ही मंडळी थेट परदेशवारीचा मार्ग स्विकारतात. कारण भारतातील पदव्युत्तर परीक्षेसाठीच्या प्रवेश परीक्षेत चमकण्यासाठीची पात्रता यांनी कमावलेली असतेच असे नाही.
दुसरीकडे कोणत्याही स्वरूपाची आर्थिक अडचण नसलेल्या पालकांपैकी ज्यांचा व्यवसाय वगैरे असतो, त्यांना आपल्या मुलाकडे परदेशी शिक्षणाचा केवळ ठप्पा हवा असतो. भारतातील अभ्यासक्रमात या मुलांनी गुणवत्तेची कसलीही चमक दाखवलेली नसते. त्यामुळे ही मुले शिकण्यासाठी नव्हे, तर प्रत्यक्षात केवळ मौजमजा करण्यासाठी तिकडे गेलेली असतात. अरब देशांमधील अनेक विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रावर 'अमेरिकेत नोकरी देण्यासाठी हे प्रमाणपत्र वैध नाही.' असा उल्लेख असतो तो यामुळेच. या मुलांकडून मिळणार्या शुल्कातून ही विद्यापीठे चालवली जातात. अगदी आपल्याकडच्या भ्रष्ट मॅनेजमेंट कोट्याप्रमाणे. त्यामुळे या विद्यापीठांनी अशा मुलांना प्रवेशासाठी नकार देण्याचा प्रश्नच नसतो. उलट ती यांचे स्वागत करण्यासाठी अतिशय आतुर असतात. या सार्यामुळे कोणी शिक्षणासाठी परदेशी गेलाच तर त्यात कौतुक करण्यासारखे असेलच याची खात्री असण्याचे दिवस आता संपले आहेत.
आता उपलब्ध असलेली केवळ धंद्याचे स्वरूप आलेली केन्द्रे पाहता परदेशी जाण्यास इच्छूक विद्यार्थ्यांना सर्वंकष अशा स्वरूपाचा सल्ला देणार्या केन्द्रांची खरोखर मोठी गरज आहे. पुरेशी गुणवत्ता नसतानाही अमेरिकेत जाऊ पाहणार्या मुलांची इच्छा काहीही असली तरी याबाबतच्या अज्ञानातून भोगावे लागते ते त्यांच्या पालकांना.
राजेश कुलकर्णी
१२ ऑक्टोबर २०१९