24/02/2023
वैदर्भीय महिला संस्थेच्या विमेन्स कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, नागपूर येथे राष्ट्रीय सेवा योजना व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिर आणि दैनंदिन कार्यक्रम, स्पर्धांमध्ये विशेष कामगिरी करणाऱ्या विद्यार्थिनींना तसेच क्रीडा विभाग आयोजित क्रिकेट, लंगडी, बुद्धिबळ, स्कीप रोप, रस्सी खेच, कॅरम, निबंध, वकृत्व, कथाकथन, काव्यवाचन, पोस्टर मेकिंग स्पर्धा यासह विविध स्पर्धा व खेळांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थिनींचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. पाहुण्यांच्या हस्ते महाविद्यालयातील साठ विद्यार्थीनींना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विशेष म्हणजे या कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिरात उत्कृष्ट शिबिरार्थी म्हणून कुमारी आचल जुमळे आणि कुमारी रामेश्वरी किरणापुरे यांचाही सत्कार करण्यात आला. पुरस्कार विजेत्यांनी त्यांच्या समर्पण आणि वचनबद्धतेबद्दल त्यांच्या शिक्षकांचे मनापासून कृतज्ञता व्यक्त केली. या सत्कार समारंभास संस्थेच्या अध्यक्षा मा. सावित्रीताई रोकडे, प्राचार्य डॉ.एन.आर. दीक्षित आणि डॉ.पी.आर. गुल्हाने हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
शैक्षणिक तसेच अभ्यासक्रमपूरक कार्यक्रमात प्रावीण्य मिळविलेल्या आणि महाविद्यालयाला नावलौकिक मिळवून देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कामगिरीची प्रसंशा करण्यासाठी महाविद्यालयाने या सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. अध्यक्षांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना त्यांची वेगळी ओळख, आत्मविश्वास आणि मानवतेची सेवा करण्यासाठी प्रोत्साहित केले. यावेळी प्राचार्यांनी देखील संबोधित करताना विद्यार्थ्यांना लक्ष केंद्रित करून ध्येयाकडे दृढनिश्चय आणि कठोर परिश्रमाने प्रयत्नरत राहण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ संजय सिंगनजुडे यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ.विजया राऊत यांनी केले. याप्रसंगी सर्वांचे आभार डॉ.व्यवहारे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. डॉ.मिलिंद गुल्हाने, डॉ.भेंडे, डॉ.पवार, डॉ.गायकवाड, डॉ. शामकुरे, प्रा अमित तितरे, प्रा. अग्रवाल, प्रा. महाल्ले, प्रा. सोरते, डॉ. मस्के, प्रा. दाते, प्रा. त्रिपाठी, प्रा.कोटांगळे, प्रा.चौधरी, प्रा.साधना गुल्हाने, प्रा. शेगावकर आदींच्या अतुलनीय योगदानामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला.