19/09/2026
एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी कर्नल प्रा. डॉ. हेमलता के. बागला
सातत्य, सहकार्य आणि सामूहिक जबाबदारीतून विद्यापीठाच्या प्रगतीचा संकल्प
मुंबई, दि. १९ सप्टेंबर २०२६ : कर्नल प्रा. डॉ. हेमलता के. बागला यांनी एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदाचा पदभार १९ सप्टेंबर २०२६ रोजी स्वीकारला. विद्यापीठाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे यावेळी उत्साहात स्वागत केले.
पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. हेमलता के. बागला यांनी एसएनडीटी महिला विद्यापीठाचे संस्थापक भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या प्रतिमेस अभिवादन करून त्यांना आदरांजली वाहिली. महिला शिक्षण आणि सक्षमीकरणासाठी महर्षी कर्वे यांनी दिलेल्या ऐतिहासिक योगदानाचे त्यांनी स्मरण केले.
यावेळी विद्यापीठाच्या माजी कुलगुरू प्रा. उज्वला चक्रदेव, माजी प्र-कुलगुरू डॉ. रुबी ओझा, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, अधिष्ठाता (अति. भार) आणि संचालक, UGC-MMTTC डॉ. जयश्री शिंदे, परीक्षा नियंत्रक डॉ. संजय नेरकर, आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचे संचालक डॉ. प्रभाकर चव्हाण, क्रीडा संचालक डॉ. कविता खोलगडे, अभियंता आशिष कांबळे, सहायक वित्त व लेखाधिकारी जान्हवी भोळे, सहायक कुलसचिव श्री मनोज गोसावी, सहायक कुलसचिव श्री अंगद पुकळे तसेच विद्यापीठातील अन्य अधिकारी उपस्थित होते.
पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. हेमलता के. बागला यांनी विद्यापीठातील विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला. विद्यापीठासमोरील सद्य शैक्षणिक व प्रशासकीय प्राधान्यक्रमांची माहिती घेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शैक्षणिक उपक्रम, परीक्षा, प्रशासकीय कामकाज तसेच विद्यापीठातील इतर महत्त्वाच्या बाबींचा आढावा घेण्यात आला.
यावेळी डॉ. हेमलता के. बागला यांनी सातत्य, सहकार्य आणि सामूहिक जबाबदारी यावर भर देत विद्यापीठाच्या शैक्षणिक व प्रशासकीय उपक्रमांना अधिक बळकटी देण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज व्यक्त केली.
एसएनडीटी महिला विद्यापीठाची समृद्ध परंपरा आणि वारसा पुढे नेताना महिला शिक्षण, सक्षमीकरण, नवोन्मेष आणि भविष्यकालीन कौशल्याधारित शिक्षणाला चालना देण्यासाठी सामूहिकपणे कार्य करण्याची आपली बांधिलकी त्यांनी व्यक्त केली.