14/07/2023
पोशाख रेखाटन आणि निर्मिती
पोशाख रेखाटन आणि निर्मिती या विषयी अनेक गैरसमज आहेत . हा अभ्यासक्रम वेळ घालविण्याचे साधन , कमीपणाचे काम किंवा स्त्रीयांचा उद्योग अशा गैरसमजांमध्ये अडकलेला आढळतो. खरेतर हा अभ्यासक्रम अतिशय रसपूर्ण , तंत्रज्ञानाने परिपूर्ण आणि भरपूर कलांचा देखणा अवतार असं म्हणायला काहीच हरकत नाही. कुठे ? काय ? कसे ? आणि किती शिकवले जाते ? हा एक संपूर्ण वेगळा विषय आहे .परंतू विद्यार्थ्याने अभ्यासक्रमास प्रवेश घेताना या गोष्टींचा जरूर विचार करावा. हा अभ्यासक्रम कौशल्यपूर्ण आणि चिकित्सापूर्ण असावा. या अभ्यासक्रमास प्रवेश घेताना केवळ प्रशिक्षण केंद्राच्या बाह्यस्वरुपास भूलून जाऊ नये तर अभ्यासक्रमाचे स्वरूप समजून घेतले पाहिजे. तसेच काहीतरी शिकायचे म्हणून शिकू नये. तर हा अभ्यासक्रम निवडताना उत्तम व्यवसायिक बनणे , एखाद्या व्यवसायिक संस्थेला जोडले जाऊन उच्चतम अर्थार्जन करणे , या क्षेत्रात काहीतरी विशेष कामगिरी करणे , भारतातील वस्त्र व्यवसायास उत्तुंग शिखरावर नेणे , किंवा या कलेशी संबंधित छंद व्रुद्धींगत करणे असे काहीतरी उद्दिष्ट असायला हवे . ही उद्दिष्टे साध्य होण्यासाठी या क्षेत्रातील कला - व्यवसाय - आणि तंत्रज्ञान याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणे आवश्यक आहे. पोशाख रेखाटन सोपे असते याचा अर्थ ते कसेही करता येते असे नाही . त्याकरिता योग्य शिक्षण आणि प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. पोशाख रेखाटन पोशाख निर्मिती हा आणि हाच मूळ उद्देश असतो. त्यामुळे त्याविषयाचे अद्ययावत ज्ञान मिळवणे आवश्यक असते. तसेच त्या विषयातील इतर घटकांचे स्वतंत्र रित्या शिक्षण घेणे हे अर्थार्जनाकरिता उत्तम पर्याय आहे. उच्च दर्जाचे शिवणकाम, भरतकाम, विणकाम, पोशाख रेखाटन, व्यवस्थापन कौशल्य या सर्वांचा सुयोग्य संगम म्हणजेच हा अभ्यासक्रम
!!!पोशाख रेखाटन आणि निर्मिती !!
आजच्या यंत्र आणि तंत्रयुगात या विषयीचे शिक्षण - कलाविष्कार आणि तंत्रज्ञानाने जास्त उपयुक्त आणि फायदेशीर ठरते .
आपल्याकडे पोशाख रेखाटन आणि निर्मिती याचे बहुसंख्य अभ्यासक्रम आढळतात. परंतू अभ्यासक्रमातील मुख्य विषय वस्त्र सजावट आणि शिवणकाम यांचे तंत्रशुद्ध शिक्षण आधुनिक पद्धतीने राबविले जात नाहीत. त्यामुळे ते शिकण्यास लोक फारसे उत्सुक नसतात . हल्ली तर चांगला शिंपी अथवा कारागीर ही दुर्मिळ बाब होवून बसली आहे. त्यामुळे पोशाख रेखाटकाला वस्त्र सजावट आणि शिवणकाम यांची तंत्रशुद्ध आणि व्यवसायिक जाण असणे ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे.
योग्य प्रशिक्षण देवून कारागीर तयार करणे किंवा असलेल्या कारागीरांना आवश्यकतेनुसार शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. आपल्या देशात जर निर्यात करण्याच्या दर्जाचे कपडे तयार होवू लागले तर आपला देश नक्कीच नं.१ होवू शकेल कारण आपल्या देशात कापूस होतो.कॉटनचा कपडा जो सर्वऋतूत आरामदायी असतो तो भारतात भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे . भारतात कलाकौशल्याची तर रेलचेलच आहे. फक्त गरज आहे ती व्यवसाय कुशलतेची ! मग थांबायचे कशाला ? चला तर मग शोधू या संधीचे सोनेरी किरण !!