18/04/2026
आत्मबल २०२५-२६ कार्यक्रमाबद्दलचे अभिप्राय
आत्मबल स्नेहसंमेलन २०२६ !!
सद्गुरू श्री अनिरुद्ध उपासना ट्रस्ट आणि श्री साई समर्थ विज्ञान प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने, परमपूज्य नंदाई यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येणाऱ्या स्त्रियांच्या आत्मबल वर्गाच्या तेविसाव्या पुष्पाचे स्नेहसंमेलन रविवार, दिनांक ५ एप्रिल २०२६ रोजी अत्यंत जल्लोषात पार पडले. दरवर्षीप्रमाणेच या सोहळ्याने प्रेक्षकांच्या ओंजळीत आनंदाची उधळण केली.
नुकत्याच स्थापन झालेल्या श्री अनिरुद्ध प्रथम पुरुषार्थ धाम येथे विराजमान असलेल्या श्री पराम्बा देवीच्या चरणी वंदन करून कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात झाली. तिच्या कृपाशीर्वादाने संपूर्ण सोहळा एका विशेष आध्यात्मिक उंचीवर जाऊन पोहोचला.
आजच्या काळातील सर्वाधिक प्रकर्षाने जाणवणारा प्रश्न म्हणजे आजची Gen Z पिढी आणि तिच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करणारी आधीची पिढी यांच्यातील सूक्ष्म द्वंद्व !! या प्रश्नाला समर्थपणे भिडणारं ' ए आई ' हे नाटक पुढे सादर करण्यात आलं. आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात सुद्धा निर्विवाद असणाऱ्या आईच्या संस्कारांचे आणि तिच्या मायेच्या शिकवणीचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या नाट्यप्रयोगाने प्रेक्षकांच्या मनावर विशेष ठसा तर उमटवलाच पण जाता जाता अगदी हळुवारपणे नव्या पिढीच्या डोळ्यांत अंजन सुद्धा घातले .
पुढे इतिहासाची सांगड घालण्यासाठी हा सोहळा पुढे सरकला आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंगांच्या प्रभावी नाट्यरूप सादरीकरणातून अधिकच उजळून निघाला.
मंडळी, आपल्या आयुष्यात ,आपल्या आजूबाजूला ,आपले नातेवाईक, मित्रपरिवार असे अनेक जण असतात पण तरीही या माणसांच्या गर्दीत खऱ्या अर्थाने आपल्याला जीव लावणारं, आपल्या सुखदुःखात खंबीरपणे आपल्या पाठीशी उभं राहणारं असं कोणी असतं का हो ? मनापासून विचार केला, तर उत्तर बहुधा ‘नाही’ असंच येतं , हो ना? खरी गरज असते तेव्हा आपल्या सोबतीला असतो तो फक्त एकाकीपणा.
परंतु बापू आयुष्यात आल्यानंतर मात्र अशी कोणतीही एकाकीपणाची पोकळी उरत नाही आणि याची प्रचिती आपण प्रत्येक क्षणी अनुभवत असतो , नाही का! याच बापूंच्या सख्यत्वाची आणि त्यांच्या अखंड सोबतीची जाणीव करून देणारा ' सोबत ' हा एक हृदयस्पर्शी नाट्यप्रयोग या सोहळ्यात सादर करण्यात आला.
आपल्या आयुष्यात सद्गुरुतत्त्वाच्या अस्तित्वामुळे घडणारे आमूलाग्र आणि सकारात्मक परिवर्तन या नाटिकेने अत्यंत सुंदर आणि प्रभावीपणे अधोरेखित केले. या सादरीकरणाने प्रत्येकाच्या अंतःकरणाला स्पर्श केला आणि प्रत्येकाला आपल्या आयुष्यातील बापूंची सोबत नव्याने जाणवली.
मंडळी, या दर्जेदार नाट्यसादरीकरणांसह आपल्या भारतवर्षातील प्रमुख राज्य असलेल्या गोव्याच्या समृद्ध संस्कृतीची झलक दाखवणाऱ्या लोकनृत्यावर ठेका धरायची संधीही या सोहळ्याने दिली. ' विविधतेत एकता ' या भारतीय संस्कृतीच्या मूलमंत्राला साजेसा हा नृत्याविष्कार वातावरण अधिकच खुलवत गेला .
नाटक आणि नृत्य यांच्या सुरेख संगमातून रंगतदार बनलेला हा सोहळा अखेरीस येऊन विसावला तो विठ्ठलाच्या वारीच्या भक्तिरसात. टाळ-मृदुंगाच्या निनादात वारीची अनुभूती घेत, अखेरीस ' नारदाच्या गावाला ' जाण्याचा भावमय क्षण अवतरला - तोही एकमेकांच्या सहवासात.
नेहमीप्रमाणेच अभंगांच्या तालावर साऱ्यांचीच पावले नकळत थिरकली आणि समस्त वातावरण भक्तीभावचैतन्यात ओथंबून गेलं .
या सगळ्यावर कळस चढवावा , तसे , चटकदार सामोसे, मऊ लुसलुशीत केक आणि सोबत फक्कड चहा-कॉफी या साऱ्यांनी सोहळ्याची रंगत आणि लज्जत दोन्हीही द्विगुणित केली.
मंडळी , आपण उपासना करतो , प्रार्थना करतो , बापू जे काही पितृवचनात सांगतात ते सगळं आपापल्या परीने चुकत माकत आचरणात आणण्याचा प्रयास करतो , पण तरीही या व्यवहारी जगात कधीतरी अडखळायला होतं , काहीतरी चुकतंय असं वाटतं , जग ज्या वेगाने चहूबाजूंनी आमूलाग्र बदलांना सामोरं जात पुढे सरकत आहे, त्या गतीशी जुळवून घेता न येण्याचं शल्य मनाला सतत कुरतडत राहतं , भक्तीसेवेतही अपेक्षित प्रगती साधता येत नाही याची बोचणी अंतर्मनाला स्पर्शून जाते आणि मग नकळतच स्वतःलाच प्रश्न पडतो - ' मीच उभा का बाहेर? ' पण अभंगातून मिळालेलं या प्रश्नाचं साधं, सरळ आणि सार्थ उत्तर म्हणजे ' फक्त अनिरुद्ध गावें ' . पण ' फक्त अनिरुद्ध गावें ' म्हणजे नेमकं काय ? तर मंडळी, याचं जिवंत उत्तर म्हणजे हा आत्मबल स्नेहसंमेलनाचा संपूर्ण सोहळा. अक्षरशः ‘अथ’ पासून ‘इति’ पर्यंत या सोहळ्याने याच भावनेचा प्रत्यय देत, याच सत्याची जाणीव प्रत्येकाच्या मनात खोलवर रुजवली. प्रेक्षक म्हणून उपस्थित असलेल्या प्रत्येकाला हा सोहळा बापूंशी, त्यांच्या कार्याशी आणि बापूभक्त म्हणून असलेल्या आपल्या जबाबदाऱ्यांशी नव्याने जोडून गेला. खरं तर केवळ यंदाच नव्हे तर प्रत्येक वर्षीच हा सोहळा आपल्याला नव्या ऊर्जेने नारदाच्या गावाकडे घेऊन जातो आणि सदैव भक्तिभावचैतन्यात राहण्यासाठी आवश्यक ते बळ प्रदान करतो.
प्रत्यक्ष नंदाई , बापू आणि दादा यांच्या सहवासात हा सोहळा अनुभवता येतो म्हणून प्रत्येकासाठीच तो खूप खास ठरतो , पण आत्मबल पूर्ण केलेल्या प्रत्येक स्त्री साठी तर हा सोहळा म्हणजे स्वतःला आरशात बघावं तसा अनुभव असतो. मैदानात उभारलेलं स्टेज , त्यावर लावलेला आत्मबल स्नेहसंमेलनाचा फलक (बॅनर ), खुर्च्यांवर बसलेला प्रेक्षकवर्ग , स्टेज वर दिसणारे अनेक माईक, या स्नेहसंमेलनाची केलेली तयारी, ' मोठ्या आवाजात बॊलायचंय ' हा टीचर्स चा सातत्याने मिळणारा सल्ला , त्या एका महिन्यातल्या तयारीत मैत्रिणींबरोबर घालवलेले गोड क्षण , एक ना अनेक..... प्रत्येकीच्या मनात दाटून येणाऱ्या असंख्य आठवणी आणि स्टेज च्या समोर बसून झालेली त्यांची उजळणी ...हे सगळं मनाला इतकं भरून टाकतं की, त्याची उब पुढच्या कार्यक्रमापर्यंत सहज साथ देत राहते.
तर असा हा सोहळा - नंदाईच्या प्रत्येक लेकीच्या सक्षमपणाचा आनंदोत्सव साजरा करणारा, स्त्रीशक्तीप्रती खरा आदरभाव जागवणारा, निराशेकडून आशेकडे वाटचाल करण्याची दिशा दाखवणारा आणि ' अवघाचि संसार सुखाचा करीन ' या बापूंच्या संकल्पाला साकार रूप देत स्त्रीशक्तीला सबळ करणारा.
हा सोहळा म्हणजे खरं तर आई बापू दादा आणि मोठी आई यांच्या आशीर्वादासह स्त्रीच्या सक्षमतेच्या प्रवासाची पहिली ठाम पायरी - आत्मविश्वास, स्वाभिमान आणि अंतर्बळ यांच्या दिशेने टाकलेलं एक महत्त्वपूर्ण पाऊल ! या वाटेवर प्रत्येक लेकीला दृढपणे उभं करण्यासाठी, तिच्यातील सामर्थ्य जागं करण्यासाठी आणि तिला योग्य दिशा देण्यासाठी अथक परिश्रम करणाऱ्या ,आत्मबल शिबीराच्या सर्वेसर्वा असणाऱ्या परमपूज्य नंदाईला मानाचा मुजरा.
त्याचबरोबर, आईच्या या उदात्त आणि विधायक कार्याला खंबीरपणे साथ देणाऱ्या आत्मबल पुष्प २३ मधील सर्व वीरांचे त्याचबरोबर आत्मबलच्या सगळ्या टीचर्सचे मनःपूर्वक अभिनंदन आणि हे स्नेहसंमेलन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी या कार्यात आपापल्या परीने खारीचा वाटा उचलणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे सुद्धा कृतज्ञतापूर्वक आभार.
हरि ओम श्रीराम अंबज्ञ नाथसंविध
श्वेतावीरा लोटलीकर, आत्मबल पुष्प २०.